तीत याला पत्र
३ त्यांना याची आठवण करून देत राहा, की त्यांनी सरकार आणि अधिकारी यांच्या अधीन आणि आज्ञेत राहावं,+ प्रत्येक चांगल्या कामासाठी तयार असावं, २ कोणाचीही बदनामी करू नये, भांडखोर असू नये; तर समजूतदार असावं+ आणि सर्वांशी सौम्यतेने वागावं.+ ३ कारण आपणसुद्धा एकेकाळी अविचारी, आज्ञा मोडणारे, बहकलेले, वेगवेगळ्या वासनांच्या आणि शारीरिक सुखांच्या आहारी गेलेले, दुष्टपणे आणि ईर्ष्येने वागणारे, तिरस्कार करण्याच्या लायकीचे आणि एकमेकांचा द्वेष करणारे असे होतो.
४ पण, आपल्या तारणकर्त्या देवाची कृपा+ आणि मानवजातीसाठी असलेलं त्याचं प्रेम प्रकट झालं. ५ त्याने आपल्याला एक नवीन जीवन देणाऱ्या स्नानाद्वारे+ आणि पवित्र शक्तीने* एक नवीन व्यक्ती बनवून आपलं तारण केलं.+ हे आपण केलेल्या नीतिमान कार्यांमुळे नाही,+ तर फक्त त्याच्या दयेमुळे झालं.+ ६ त्याने आपला तारणकर्ता, येशू ख्रिस्त याच्याद्वारे आपल्यावर या पवित्र शक्तीचा उदारपणे* वर्षाव केला आहे.+ ७ हे यासाठी, की त्याच्या अपार कृपेमुळे नीतिमान ठरवलं गेल्यावर,+ आपण आपल्या आशेप्रमाणे सर्वकाळाच्या जीवनाचे+ वारस बनावं.+
८ या गोष्टी विश्वसनीय आहेत आणि त्यांवर तू भर देत राहावा अशी माझी इच्छा आहे; म्हणजे, ज्यांनी देवावर विश्वास ठेवला आहे, ते आपली मनं चांगली कामं करत राहण्यावर केंद्रित करू शकतील. या गोष्टी उत्तम आणि लोकांच्या फायद्याच्या आहेत.
९ पण मूर्खपणाचे वादविवाद, वंशावळ्यांवर चर्चा आणि नियमशास्त्राबद्दल मतभेद आणि भांडणतंटे यांपासून दूर राहा. कारण या गोष्टी निरुपयोगी आणि व्यर्थ आहेत.+ १० एखादा माणूस वेगळी शिकवण देत असेल,+ तर त्याला दोनदा ताकीद द्यावी*+ आणि तरीसुद्धा त्याने ऐकलं नाही, तर त्याच्याशी संबंध तोडून टाकावा.+ ११ कारण असा माणूस योग्य मार्गापासून बहकला असून तो पाप करत आहे. त्याच्या स्वतःच्या वागणुकीनेच त्याला दोषी ठरवलं आहे.
१२ मी अर्तमा आणि तुखिक+ यांना तुझ्याकडे पाठवीन, तेव्हा माझ्याकडे निकपलिसला यायचा होईल तितका प्रयत्न कर. कारण तिथेच हिवाळा घालवण्याचा माझा विचार आहे. १३ नियमशास्त्राचा जाणकार असलेला जेना आणि अपुल्लो यांना प्रवासात काही कमी पडायला नको, म्हणून त्यांना लागेल ते सगळं पुरवण्याचा होईल तितका प्रयत्न कर.+ १४ पण, बांधवांच्या तातडीच्या गरजा पुरवण्यासाठी आपल्या लोकांनीही चांगली कार्यं करण्याची स्वतःला सवय लावून घ्यावी,+ म्हणजे ते त्यांच्या सेवेत निष्फळ ठरणार नाहीत.+
१५ माझ्यासोबत असलेले सगळे तुला नमस्कार सांगतात. आमच्यावर प्रेम करणाऱ्या सर्व सहविश्वासू बांधवांना माझा नमस्कार सांग.
देवाची अपार कृपा तुम्हा सगळ्यांवर असो.