तीमथ्य याला दुसरं पत्र
१ ख्रिस्त येशूद्वारे मिळणाऱ्या जीवनाच्या+ अभिवचनाची घोषणा करण्यासाठी, जो देवाच्या इच्छेप्रमाणे ख्रिस्त येशूचा प्रेषित आहे त्या पौलकडून, २ माझा प्रिय मुलगा, तीमथ्य याला:+
देव जो आपला पिता आणि ख्रिस्त येशू जो आपला प्रभू यांच्याकडून तुला अपार कृपा, दया आणि शांती मिळो.
३ माझ्या वाडवडिलांप्रमाणेच मी ज्या देवाची शुद्ध विवेकाने पवित्र सेवा करत आहे, त्याचे मी आभार मानतो. आणि रात्रंदिवस त्याला याचना करताना न चुकता तुझी आठवण करतो. ४ तुझे अश्रू मला आठवतात तेव्हा तुला भेटायची मला फार ओढ लागते. तुला भेटता आलं तर माझं मन आनंदाने भरून जाईल. ५ मला तुझा निष्कपट* विश्वास आठवतो.+ असाच विश्वास तुझी आजी लोईस आणि आई युनीके यांच्यामध्ये होता. माझी खातरी आहे, की तोच विश्वास तुझ्यामध्येही आहे.
६ म्हणूनच मी तुला याची आठवण करून देतो, की मी तुझ्यावर हात ठेवले तेव्हा देवाचं जे दान तुला मिळालं होतं ते ज्वलंत ठेव.+ ७ कारण देवाने आपल्याला जी पवित्र शक्ती* दिली आहे, तिच्यामुळे भित्रेपणा नाही,+ तर सामर्थ्य,+ प्रेम आणि समंजसपणा* निर्माण होतो. ८ त्यामुळे, आपल्या प्रभूबद्दल साक्ष देण्याची किंवा मी जो त्याच्यासाठी कैदेत आहे, त्या माझीसुद्धा लाज बाळगू नकोस.+ तर, देवाच्या सामर्थ्यावर भरवसा ठेवून+ आनंदाच्या संदेशासाठी दुःख सोसायला तयार राहा.+ ९ देवाने आपल्याला वाचवलं* आणि पवित्र जन होण्यासाठी बोलावलं.+ अर्थात, आपल्या कार्यांमुळे नाही, तर त्याच्या उद्देशामुळे आणि त्याच्या अपार कृपेमुळे त्याने आपल्याला बोलावलं.+ ख्रिस्त येशूद्वारे फार पूर्वीच आपल्यावर ही अपार कृपा करण्यात आली होती. १० पण, आता आपला तारणकर्ता, ख्रिस्त येशू प्रकट झाल्यामुळे ती आपल्याला अगदी स्पष्टपणे दाखवण्यात आली आहे.+ त्याने मृत्यूला निकामी केलं आहे+ आणि आनंदाच्या संदेशाद्वारे+ जीवनावर+ आणि अविनाशीपणावर+ प्रकाश टाकला आहे. ११ या आनंदाच्या संदेशासाठीच मला घोषणा करणारा, प्रेषित आणि शिक्षक म्हणून नेमण्यात आलं होतं.+
१२ याच कारणामुळे मी या गोष्टी सोसत आहे,+ पण मला याची लाज वाटत नाही.+ कारण ज्याच्यावर मी विश्वास ठेवला आहे त्याला मी ओळखतो. आणि मी त्याच्या स्वाधीन केलेला ठेवा तो न्यायाच्या दिवसापर्यंत जपून ठेवेल, याची मला खातरी आहे.+ १३ ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात असल्यामुळे उत्पन्न होणारा विश्वास आणि प्रेम दाखवण्यासोबतच, माझ्याकडून ऐकलेल्या फायदेकारक* वचनांच्या नमुन्याला* धरून राहा.+ १४ तुला सोपवण्यात आलेला हा ठेवा, आपल्यामध्ये राहणाऱ्या पवित्र शक्तीच्या+ मदतीने जपून ठेव.
१५ तुला माहीतच आहे, की आशिया प्रांतातल्या+ सर्व लोकांनी मला सोडून दिलं आहे. फुगल आणि हर्मगनेस हेही त्यांच्यापैकी आहेत. १६ अनेसिफरच्या घराण्यावर+ प्रभूने दया दाखवावी, अशी मी प्रार्थना करतो. कारण त्याने कित्येकदा मला प्रोत्साहन दिलं आणि माझ्या बेड्यांची त्याला लाज वाटली नाही. १७ उलट, तो रोममध्ये असताना त्याने मला शोधण्यासाठी बरेच प्रयत्न केले आणि शेवटी मला शोधून काढलं. १८ प्रभू यहोवा* न्यायाच्या दिवशी त्याला दया दाखवो. इफिसमध्ये त्याने माझ्यासाठी कायकाय केलं, हे तुला चांगलं माहीत आहे.