अनुवाद
१९ ज्या राष्ट्रांची जमीन तुमचा देव यहोवा तुम्हाला देणार आहे, त्या राष्ट्रांचा जेव्हा तुमचा देव यहोवा नाश करेल आणि तुम्ही त्या राष्ट्रांना हाकलून लावल्यानंतर त्यांच्या शहरांमध्ये आणि घरांमध्ये राहू लागाल,+ २ तेव्हा तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही तीन शहरं निवडा.+ ३ तुमचा देव यहोवा तुम्हाला देत असलेल्या देशाच्या क्षेत्राचे तुम्ही तीन भाग करा आणि त्या शहरांपर्यंत जाण्यासाठी रस्ते तयार करा, म्हणजे कोणाच्या हातून एखाद्याचा खून झाला, तर त्याला त्यांपैकी एका शहरात पळून जाता येईल.
४ जो आपल्या हातून खून झाल्यावर, जीव वाचवण्यासाठी तिथे पळून जातो, त्याच्या बाबतीत असं केलं जावं: आधीपासून आपल्या शेजाऱ्याबद्दल मनात द्वेष नसताना जर एखाद्याच्या हातून त्याचा खून झाला;+ ५ जसं की, तो आपल्या शेजाऱ्यासोबत जंगलात लाकडं तोडायला गेला आणि झाड कापण्यासाठी त्याने आपली कुऱ्हाड उचलली आणि ती दांड्यातून निसटून त्याच्या शेजाऱ्याला लागली आणि तो मेला; तर खून करणाऱ्याने आपला जीव वाचवण्यासाठी यांपैकी एका शहरात पळून जावं.+ ६ शहर फार दूर असलं, तर रक्ताचा सूड घेणारा+ रागाच्या भरात* त्या खून करणाऱ्याचा पाठलाग करून त्याला गाठेल आणि मारून टाकेल. पण खरंतर त्या माणसाला मारण्याची गरज नव्हती, कारण त्याच्या मनात आधीपासून आपल्या शेजाऱ्याविरुद्ध द्वेष नव्हता.+ ७ म्हणूनच मी तुम्हाला आज्ञा देत आहे, की ‘तीन शहरं निवडा.’
८ तुमचा देव यहोवा तुमच्या वाडवडिलांना वचन दिल्याप्रमाणे, जेव्हा तुमच्या देशाच्या सीमा वाढवेल+ आणि त्यांना वचन दिलेला सगळा देश तुम्हाला देईल,+ ९ तेव्हा या तीन शहरांसोबतच तुम्ही आणखी तीन शहरं निवडा.+ (मी आज तुम्हाला देत असलेल्या या सर्व आज्ञा पाळून, जर तुम्ही तुमचा देव यहोवा याच्यावर प्रेम केलं आणि नेहमी त्याच्या मार्गांवर चालत राहिलात,+ तरच तो तुमच्या देशाच्या सीमा वाढवेल.) १० यामुळे तुमचा देव यहोवा तुम्हाला वारसा म्हणून देत असलेल्या देशात, कोणत्याही निर्दोष माणसाचं रक्त सांडलं जाणार नाही+ आणि तुमच्यावर रक्तदोष येणार नाही.+
११ पण जर एखाद्याच्या मनात आधीपासूनच आपल्या शेजाऱ्याबद्दल द्वेष असेल;+ आणि जर त्याच्यावर हल्ला करण्यासाठी तो टपून बसला आणि त्याने त्याच्यावर जीवघेणा हल्ला करून त्याला जखमी केल्यामुळे तो मेला; आणि जर तो खून करणारा यांपैकी एका शहरात पळाला, १२ तर त्याच्या शहरातल्या वडीलजनांनी त्याला तिथून बोलावून घ्यावं आणि त्याला ठार मारण्यासाठी रक्ताचा सूड घेणाऱ्याच्या हाती द्यावं.+ १३ तुम्ही* त्याच्यावर दयामाया करू नका. इस्राएलमधून निरपराध माणसाच्या रक्ताचा दोष काढून टाका,+ म्हणजे तुमचं भलं होईल.
१४ तुमचा देव यहोवा देत असलेल्या देशात जेव्हा तुम्हाला तुमचा वारसा मिळेल, तेव्हा पूर्वजांनी ठरवलेल्या आपल्या शेजाऱ्याच्या सीमेची खूण तिच्या जागेवरून हलवू नका.+
१५ फक्त एकच साक्षीदार कोणालाही त्याच्या अपराधाबद्दल किंवा पापाबद्दल दोषी ठरवू शकत नाही.*+ दोन किंवा तीन जणांच्या साक्षीनेच* प्रत्येक गोष्ट सिद्ध केली जावी.+ १६ जर एखाद्याने दुष्ट हेतूने कोणाविरुद्ध साक्ष देऊन त्याच्यावर काही अपराध करण्याचा आरोप लावला,+ १७ तर ज्यांच्यात वाद आहे त्या दोघांनी यहोवापुढे, याजकांच्या आणि त्या दिवसांत सेवा करत असलेल्या न्यायाधीशांच्या समोर जावं.+ १८ मग न्यायाधीश या गोष्टीचा कसून तपास करतील+ आणि जर त्या माणसाने दिलेली साक्ष खोटी असेल आणि त्याने आपल्या भावावर खोटा आरोप लावला असेल, १९ तर त्याने आपल्या भावाविरुद्ध जे करण्याचा कट रचला होता, ते त्याच्यासोबत केलं जावं.+ तुम्ही आपल्यामधून अशा वाईट गोष्टी काढून टाका;+ २० म्हणजे बाकीचे लोक जेव्हा याबद्दल ऐकतील, तेव्हा त्यांना भीती वाटेल आणि ते तुमच्यामध्ये पुन्हा कधीही अशी वाईट गोष्ट करणार नाहीत.+ २१ तुम्ही* दयामाया दाखवू नका.+ जिवाबद्दल जीव, डोळ्याबद्दल डोळा, दाताबद्दल दात, हाताबद्दल हात आणि पायाबद्दल पाय असा न्याय करा.+