रोमकर यांना पत्र
९ ख्रिस्तामध्ये मी खरं बोलतो, खोटं बोलत नाही. माझा स्वतःचा विवेक पवित्र शक्तीद्वारे* मला साक्ष देतो, २ की मी खूप दुःखी आहे आणि माझ्या मनाला सतत वेदना होत आहेत. ३ मी तर माझ्या यहुदी बांधवांऐवजी, म्हणजे शारीरिक दृष्टीने जे माझे नातलग आहेत त्यांच्याऐवजी स्वतः शापित म्हणून ख्रिस्तापासून वेगळं व्हायला तयार आहे. ४ त्यांना, म्हणजे इस्राएली लोकांना मुलं म्हणून दत्तक घेण्यात आलं होतं.+ आणि त्यांनाच गौरव, करार,+ नियमशास्त्र,+ पवित्र सेवा+ आणि अभिवचनं देण्यात आली होती.+ ५ ते कुलप्रमुखांचे वंशज असून+ त्यांच्यातूनच ख्रिस्त माणसाच्या रूपात आला.+ ज्याचा सर्वांवर अधिकार आहे, त्या देवाची सदासर्वकाळ स्तुती असो. आमेन.
६ पण याचा अर्थ, देवाने दिलेलं वचन निष्फळ ठरलं असं नाही. कारण इस्राएलपासून आलेले सर्व जण खरोखरच इस्राएली आहेत असं नाही.+ ७ तसंच, अब्राहामची संतती* असल्यामुळे ते सर्व त्याची मुलं आहेत असंही नाही.+ तर असं म्हटलं आहे, की “जे इसहाकपासून येतील त्यांना तुझी संतती* म्हटलं जाईल.”+ ८ याचा अर्थ, शारीरिक दृष्टीने जन्मलेली मुलं, ही खऱ्या अर्थाने देवाची मुलं नाहीत.+ तर अभिवचनाप्रमाणे जन्मलेल्या मुलांना+ संतती* म्हणण्यात आलं आहे. ९ कारण असं अभिवचन देण्यात आलं होतं, की “याच वेळी मी परत येईन आणि साराला एक मुलगा झालेला असेल.”+ १० पण फक्त तेव्हाच नाही, तर आपला पूर्वज इसहाक याच्यापासून रिबकाला जुळ्या मुलांचा गर्भ राहिला तेव्हाही हे वचन देण्यात आलं.+ ११ निवड करण्याच्या बाबतीत देवाचा उद्देश पुढेही, कार्यांवर नाही तर ज्याने बोलावलं त्याच्या इच्छेवर अवलंबून राहावा, म्हणून रिबकाच्या मुलांचा जन्म होण्याआधीच आणि त्यांनी चांगलं-वाईट असं कोणतंही काम करण्याआधीच, १२ तिला असं सांगण्यात आलं होतं: “मोठा धाकट्याचा दास बनेल.”+ १३ शास्त्रात लिहिल्याप्रमाणेच हे घडलं: “मी याकोबवर प्रेम केलं, पण एसावचा द्वेष केला.”+
१४ तर मग, आता काय म्हणता येईल? देव अन्यायी आहे का? मुळीच नाही!+ १५ कारण तो मोशेला म्हणतो: “ज्या कोणावर दया करायची माझी इच्छा असेल, त्याच्यावर मी दया करीन; आणि ज्या कोणाला करुणा दाखवायची माझी इच्छा असेल, त्याला मी करुणा दाखवीन.”+ १६ तर मग, निवडलं जाणं हे एखाद्याच्या इच्छेवर किंवा त्याच्या प्रयत्नांवर नाही,* तर दया करणाऱ्या देवावर अवलंबून आहे.+ १७ कारण फारोबद्दल शास्त्रवचन म्हणतं: “तुझ्या बाबतीत माझी ताकद दाखवण्यासाठी आणि संपूर्ण पृथ्वीवर माझं नाव जाहीर करण्यासाठी मी तुला अजून जिवंत ठेवलं आहे.”+ १८ तर मग, ज्याच्यावर दया करायची त्याची इच्छा असेल त्याच्यावर तो दया करतो, पण ज्या कोणाला कठोर होऊ द्यायची त्याची इच्छा असेल, त्याला तो कठोर होऊ देतो.+
१९ यावरून कोणी म्हणेल: “मग तरीसुद्धा तो दोष का काढतो? कारण त्याच्या इच्छेपुढे कोणाचं काय चालू शकतं?” २० पण अरे माणसा, देवाला उलट उत्तर देणारा तू कोण?+ घडवण्यात आलेली वस्तू आपल्या घडवणाऱ्याला, “तू मला असं का बनवलंस?” असं म्हणेल का?+ २१ कुंभाराला मातीच्या एकाच गोळ्यापासून एक भांडं महत्त्वाच्या* कामासाठी, तर दुसरं हलक्या* कामासाठी बनवायचा अधिकार नाही का?+ २२ देवाला आपला क्रोध व्यक्त करायची आणि आपलं सामर्थ्य दाखवून द्यायची इच्छा असताना, नाशासाठी योग्य असलेल्या क्रोधाच्या भांड्यांचं त्याने खूप धीराने सहन केलं नाही का? २३ त्याने गौरवासाठी ज्यांना आधीच तयार केलं, त्या दयेच्या भांड्यांवर मोठ्या प्रमाणात आपला गौरव प्रकट करण्यासाठी जर त्याने असं केलं असेल, तर काय?+ २४ त्याने दयेच्या त्या भांड्यांना म्हणजेच आपल्याला फक्त यहुद्यांमधूनच नाही, तर राष्ट्रांमधूनही बोलावलं.+ २५ होशेयच्या पुस्तकात त्याने म्हटलं त्याप्रमाणेच हे आहे: “जे माझे लोक नव्हते,+ त्यांना मी ‘माझे लोक’ म्हणीन. आणि जी प्रिय नव्हती, तिला ‘प्रिय’ म्हणीन.+ २६ तसंच, ‘तुम्ही माझे लोक नाही,’ असं जिथे त्यांना म्हणण्यात आलं होतं, तिथे त्यांना ‘जिवंत देवाची मुलं’ म्हटलं जाईल.”+
२७ शिवाय, इस्राएलच्या बाबतीत यशया असं घोषित करतो: “इस्राएलच्या मुलांची संख्या समुद्राच्या वाळूइतकी असली, तरी त्यांच्यापैकी फक्त काहींचंच तारण होईल.+ २८ कारण यहोवा* पृथ्वीवर राहणाऱ्यांकडून हिशोब घेईल आणि तो हे काम उशीर न लावता पूर्ण करेल.”*+ २९ तसंच, यशयाने भविष्यवाणी केल्याप्रमाणे: “सैन्यांच्या देवाने, यहोवाने* आपल्यासाठी संतती* राहू दिली नसती, तर आपलीही अवस्था सदोमसारखी आणि आपलीही दशा गमोरासारखी झाली असती.”+
३० तर मग काय म्हणता येईल? हेच, की राष्ट्रांतल्या लोकांनी, नीतिमत्त्व मिळवायचा प्रयत्न करत नसतानाही+ विश्वासाने प्राप्त होणारं नीतिमत्त्व मिळवलं.+ ३१ पण इस्राएली लोकांनी नीतिमत्त्वाच्या नियमाप्रमाणे चालायचा प्रयत्न करूनही, ते त्या नियमापर्यंत पोहोचले नाहीत. ३२ असं का? कारण त्यांनी ते विश्वासाद्वारे नाही, तर कार्यांद्वारे मिळवायचा प्रयत्न केला. ते “ठेच लागण्याच्या दगडावर” अडखळले;+ ३३ जसं लिहिण्यात आलं होतं त्याप्रमाणेच हे घडलं: “पाहा! मी सीयोनमध्ये ठेच लागण्याचा दगड+ आणि अडखळणाचा खडक ठेवत आहे. पण, जो त्याच्यावर विश्वास ठेवतो त्याची कधीच निराशा होणार नाही.”+