प्रेषितांची कार्यं
२३ मग पौलने न्यायसभेकडे* रोखून पाहिलं आणि तो म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, मी आजपर्यंत देवासमोर अगदी शुद्ध विवेकाने वागलोय.”+ २ हे ऐकून, महायाजक हनन्या याने जवळ उभ्या असलेल्यांना पौलच्या थोबाडीत मारायची आज्ञा दिली. ३ तेव्हा पौल त्याला म्हणाला: “अरे चुना लावलेल्या भिंती! देव तुला मारेल. तू नियमशास्त्राप्रमाणे माझा न्याय करायला बसला आहेस आणि स्वतःच नियमशास्त्राविरुद्ध जाऊन मला मारायची आज्ञा देतोस?” ४ हे ऐकून जवळ उभे असलेले त्याला म्हणाले: “तू देवाच्या महायाजकाचा अपमान करतोस?” ५ त्यावर पौल म्हणाला: “बांधवांनो, हा महायाजक आहे हे मला माहीत नव्हतं. कारण असं लिहिलंय, की ‘तुम्ही तुमच्यातल्या अधिकाऱ्याबद्दल वाईट बोलू नका.’ ”+
६ त्यांच्यापैकी काही जण सदूकी, तर काही परूशी आहेत हे माहीत असल्यामुळे पौल न्यायसभेत मोठ्याने म्हणाला: “माणसांनो, बांधवांनो, मी एक परूशी+ आणि परूश्यांचा मुलगा आहे. मला मेलेल्यांच्या पुनरुत्थानाची* आशा आहे, म्हणून माझी न्यायचौकशी केली जात आहे.” ७ हे ऐकताच, परूशी आणि सदूकी यांच्यात वादविवाद सुरू झाला आणि न्यायसभेत फूट पडली. ८ कारण सदूकी म्हणतात, की मेलेल्यांचं पुनरुत्थान, स्वर्गदूत किंवा अदृश्य प्राणी असं काहीच नसतं. तर परूशी लोक या सगळ्या गोष्टी मानतात.*+ ९ यामुळे बरीच खळबळ माजली आणि परूश्यांच्या पक्षाचे काही शास्त्री उठून तावातावाने म्हणू लागले: “या माणसात आम्हाला काहीच दोष सापडत नाही. पण एखादा अदृश्य प्राणी किंवा स्वर्गदूत त्याच्याशी बोलला असेल तर+ . . . . ” १० भांडण इतकं पेटलं, की आता ते पौलचा जीव घेतील* अशी सेनापतीला भीती वाटली. तेव्हा, त्याने सैनिकांना खाली जाऊन त्याला त्यांच्या तावडीतून सोडवून, सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी आणायचा हुकूम दिला.
११ पण त्या रात्री प्रभू त्याच्याजवळ उभा राहून त्याला म्हणाला: “हिंमत धर!+ कारण माझ्याबद्दल तू जशी यरुशलेममध्ये अगदी पूर्णपणे साक्ष देत आहेस, तशीच तुला रोममध्येसुद्धा द्यावी लागेल.”+
१२ दिवस उजाडला तेव्हा यहुद्यांनी एक कट रचून अशी शपथ घेतली,* की जोपर्यंत आम्ही पौलला ठार मारत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही खाणार-पिणार नाही. १३ अशी शपथ घेणारी चाळीसपेक्षा जास्त माणसं होती. १४ ती माणसं मुख्य याजकांकडे आणि वडीलजनांकडे जाऊन म्हणाली: “आम्ही अशी शपथ घेतली आहे, की जोपर्यंत आम्ही पौलला मारून टाकत नाही, तोपर्यंत आम्ही काहीही खाणार नाही. १५ तर आता, तुम्ही आणि न्यायसभा मिळून सेनापतीला असं कळवा, की तुम्हाला पौलची आणखीन बारकाईने चौकशी करायची आहे. आणि म्हणून त्याने त्याला तुमच्याकडे आणावं. पण तो पोहोचण्याआधीच आम्ही तयार राहू आणि त्याला ठार मारू.”
१६ पण पौलला मारण्यासाठी ते लपून बसणार असल्याची खबर त्याच्या बहिणीच्या मुलाला लागली. तेव्हा तो सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी गेला आणि त्याने ही गोष्ट पौलच्या कानावर घातली. १७ त्यामुळे पौलने, सैन्याच्या अधिकाऱ्यांपैकी एकाला बोलावून त्याला म्हटलं: “या तरुणाला सेनापतीला काही सांगायचंय. याला त्याच्याकडे घेऊन जा.” १८ म्हणून, तो अधिकारी त्याला घेऊन सेनापतीकडे गेला आणि म्हणाला: “कैदेत असलेल्या पौलने मला बोलावून या तरुणाला तुमच्याकडे आणायला सांगितलं, कारण याला तुम्हाला काहीतरी सांगायचंय.” १९ तेव्हा सेनापतीने त्याचा हात धरून त्याला बाजूला नेलं आणि विचारलं: “काय सांगायचं होतं तुला?” २० तो म्हणाला: “यहुद्यांनी तुमच्याकडे अशी विनंती करायचं ठरवलंय, की पौलची आणखीन बारकाईने चौकशी करायच्या निमित्ताने त्याला उद्या न्यायसभेपुढे आणण्यात यावं.+ २१ पण त्यांच्या बोलण्यावर विश्वास ठेवू नका. कारण त्यांच्यापैकी चाळीसपेक्षा जास्त माणसं त्याला ठार मारण्यासाठी लपून बसली आहेत. आणि त्याला मारून टाकेपर्यंत अन्नपाणी न घेण्याची त्यांनी शपथ घेतली आहे.+ त्यांनी पूर्ण तयारी केली असून ते फक्त तुमच्या परवानगीची वाट पाहत आहेत.” २२ त्यामुळे सेनापतीने त्या तरुणाला अशी आज्ञा देऊन पाठवून दिलं की, “तू ही गोष्ट मला सांगितली, हे कोणालाही सांगू नकोस.”
२३ मग तो सैन्यातल्या अधिकाऱ्यांपैकी दोघांना बोलावून म्हणाला: “आज रात्री नऊच्या सुमारास* कैसरीयाला जाण्यासाठी २०० सैनिकांना, ७० घोडेस्वारांना आणि भाले घेतलेल्या २०० सैनिकांना तयार करा. २४ तसंच, पौलला राज्यपाल फेलिक्सकडे सुखरूप घेऊन जाण्यासाठी घोड्यांची व्यवस्था करा.” २५ त्याने राज्यपालाला एक पत्रही लिहिलं. त्यात असं म्हटलं होतं:
२६ “राज्यपाल फेलिक्स महाराजांना, क्लौद्य लुसिया याचा नमस्कार! २७ यहुद्यांनी या माणसाला धरलं होतं आणि ते त्याला ठार मारायच्या बेतात होते. पण तो रोमी नागरिक असल्याचं समजताच,+ मी माझ्या सैनिकांना घेऊन तिथे पोहोचलो आणि त्याला वाचवलं.+ २८ आणि यहुदी लोक त्याच्यावर आरोप का करत होते, हे जाणून घ्यायच्या उद्देशाने मी त्याला त्यांच्या न्यायसभेत आणलं.+ २९ त्यांनी त्याला त्यांच्या नियमशास्त्राच्या प्रश्नांवरून दोषी ठरवलं असल्याचं मला दिसून आलं.+ तरी, मृत्युदंड देण्यासारख्या किंवा तुरुंगात टाकण्यासारख्या कोणत्याही गोष्टीबद्दल तो दोषी नाही. ३० पण या माणसाला ठार मारायचा कट रचण्यात आल्याची बातमी मिळाल्यामुळे+ मी त्याला लगेच तुमच्याकडे पाठवतोय. त्याच्यावर आरोप करणाऱ्यांना मी हुकूम दिलाय, की त्यांनी तुमच्यासमोर येऊन त्याच्यावर आरोप करावेत.”
३१ म्हणून, शिपायांना मिळालेल्या हुकमाप्रमाणे ते पौलला घेऊन+ रात्रीच्या वेळी अंतिपत्रिस इथे आले. ३२ दुसऱ्या दिवशी त्यांनी घोडेस्वारांना त्याच्यासोबत पुढे जायला सांगितलं. पण ते सैनिकांच्या राहण्याच्या ठिकाणी परत आले. ३३ कैसरीयात पोहोचल्यावर, घोडेस्वारांनी राज्यपालाला पत्र दिलं आणि पौललाही त्याच्या हवाली केलं. ३४ पत्र वाचून, पौल कोणत्या प्रांताचा आहे असं राज्यपालाने विचारलं. तो किलिकिया प्रांताचा आहे असं समजल्यावर,+ ३५ तो त्याला म्हणाला: “तुझ्यावर आरोप करणारे आले,+ म्हणजे मी तुझी बाजू सविस्तर ऐकून घेईन.” मग त्याने पौलला हेरोदच्या वाड्यात पहाऱ्याखाली ठेवायचा हुकूम दिला.