लूकने सांगितलेला संदेश
१७ मग येशू आपल्या शिष्यांना म्हणाला: “अडखळणं तर नक्कीच येतील. पण ज्या माणसाद्वारे अडखळणं येतात त्याचा धिक्कार असो! २ या लहानांपैकी एकालाही त्याने अडखळायला लावावं, यापेक्षा त्याच्या गळ्यात जात्याचा दगड बांधून त्याला समुद्रात टाकून दिलं जावं, हेच त्याच्यासाठी चांगलं ठरेल.+ ३ स्वतःला सांभाळा. तुझ्या भावाने पाप केलं, तर त्याची कानउघाडणी कर+ आणि त्याने पश्चात्ताप केला, तर त्याला क्षमा कर.+ ४ त्याने दिवसातून सात वेळा तुझ्याविरुद्ध पाप केलं आणि सात वेळा तुझ्याकडे येऊन, ‘मला क्षमा कर’ असं म्हटलं, तर तू त्याला क्षमा केली पाहिजे.”+
५ मग प्रेषित प्रभूला म्हणाले: “आमचा विश्वास वाढव.”+ ६ तेव्हा प्रभू म्हणाला: “जर तुमच्याजवळ मोहरीच्या दाण्याइतका विश्वास असला, तर तुम्ही या झाडाला* ‘इथून उपटून समुद्रात लावलं जा’ असं म्हणाल आणि ते तुमचं ऐकेल.+
७ तुमच्यापैकी असा कोण आहे की ज्याचा दास नांगरणी करून किंवा मेंढरांना चारून परत आल्यावर तो त्याला म्हणेल, ‘लगेच इकडे ये आणि जेवायला बस?’ ८ उलट, तो असं म्हणणार नाही का, की ‘माझ्या संध्याकाळच्या जेवणाची तयारी कर आणि माझं खाणंपिणं होईपर्यंत कंबर बांधून माझी सेवा कर आणि मग तू खाऊपिऊ शकतोस’? ९ आणि सांगितलेली कामं केल्याबद्दल तो दासाचे उपकारही मानणार नाही, मानेल का? १० त्याच प्रकारे, तुम्हाला सांगितलेल्या सगळ्या गोष्टी केल्यावर असं म्हणा: ‘आम्ही फक्त दास आहोत आणि आमची काहीच लायकी नाही. आम्ही जे काही केलं ते आमचं कर्तव्यच होतं.’”+
११ यरुशलेमला प्रवास करताना येशू शोमरोन आणि गालीलच्या सीमेवरून जात होता. १२ एका गावात जात असताना त्याला दहा कुष्ठरोगी भेटले, पण ते त्याच्यापासून दूरच उभे राहिले.+ १३ आणि ते मोठमोठ्याने म्हणू लागले: “हे गुरू, येशू, आमच्यावर दया कर!” १४ त्यांना पाहून येशू म्हणाला: “जा आणि स्वतःला याजकांना दाखवा.”+ मग ते तिथून जात असताना शुद्ध झाले.+ १५ आपण बरे झालो आहोत हे पाहून त्यांच्यापैकी एक जण परत आला आणि मोठ्याने देवाची स्तुती करू लागला. १६ आणि येशूसमोर पालथा पडून त्याने त्याचे उपकार मानले; खरंतर हा माणूस शोमरोनी होता.+ १७ तेव्हा येशू म्हणाला: “दहाचे दहा शुद्ध झाले नव्हते का? मग बाकीचे नऊ कुठे आहेत? १८ देवाचा गौरव करण्यासाठी या विदेशी माणसाशिवाय आणखी कोणीही परत आलं नाही का?” १९ मग तो त्याला म्हणाला: “ऊठ आणि आपल्या मार्गाने जा. तुझ्या विश्वासाने तुला बरं केलंय.”+
२० देवाचं राज्य केव्हा येईल असं परूश्यांनी त्याला विचारलं,+ तेव्हा त्याने उत्तर दिलं: “देवाचं राज्य सगळ्यांच्या लक्षात येईल इतक्या उघडपणे येणार नाही. २१ किंवा, ‘पाहा, ते इथे आहे!’ किंवा ‘तिथे आहे!’ असं लोक म्हणणार नाहीत. कारण देवाचं राज्य खरंतर तुमच्यामध्ये आहे.”+
२२ मग तो आपल्या शिष्यांना म्हणाला: “असे दिवस येत आहेत, जेव्हा मनुष्याच्या मुलाच्या काळातला एक दिवस पाहायची तुमची इच्छा होईल, पण तो तुम्हाला पाहता येणार नाही. २३ आणि लोक तुम्हाला म्हणतील, ‘पाहा, तो इथे आहे!’ किंवा ‘तिथे आहे!’ पण, त्यांच्यामागे जाऊ नका आणि त्यांच्या नादी लागू नका.+ २४ कारण वीज जशी आकाशाच्या एका टोकापासून चमकून दुसऱ्या टोकापर्यंत चकाकत जाते, तसंच मनुष्याचा मुलगा+ प्रकट होण्याच्या दिवशी घडेल.+ २५ पण आधी त्याला बरीच दुःखं सहन करावी लागतील आणि ही पिढी त्याला नाकारेल.+ २६ शिवाय, नोहाच्या दिवसांत जसं घडलं+ तसंच मनुष्याच्या मुलाच्या दिवसांतही घडेल.+ २७ कारण नोहा जहाजात* गेला+ त्या दिवसापर्यंत लोक खातपीत होते आणि लग्नं करत होते. मग जलप्रलय आला आणि सगळे त्यात वाहून गेले.+ २८ त्याच प्रकारे, लोटच्या दिवसांत घडलं+ तसंच त्या वेळी घडेल. त्या वेळीही लोक खातपीत होते, खरेदी-विक्री करत होते, शेतांत पेरणी करत होते आणि घरं बांधत होते. २९ पण लोट सदोममधून बाहेर गेला त्या दिवशी आकाशातून आगीचा आणि गंधकाचा वर्षाव झाला आणि त्या सगळ्यांचा नाश झाला.+ ३० मनुष्याचा मुलगा प्रकट होण्याच्या दिवशीही असंच घडेल.+
३१ त्या दिवशी एखादा माणूस घराच्या छतावर असेल आणि त्याच्या वस्तू घरात असतील, तर त्याने त्या घ्यायला खाली येऊ नये. त्याच प्रकारे, शेतात असलेल्या माणसानेही मागे राहिलेल्या वस्तूंसाठी परत येऊ नये. ३२ लोटच्या बायकोला लक्षात ठेवा.+ ३३ जो आपला जीव सुरक्षित ठेवायचा प्रयत्न करतो तो त्याला गमावेल, पण जो आपला जीव गमावतो तो त्याला सुरक्षित ठेवेल.+ ३४ मी तुम्हाला सांगतो, त्या रात्री जर दोन जण एकाच बिछान्यावर झोपलेले असतील, तर एकाला घेतलं जाईल आणि दुसऱ्याला सोडून दिलं जाईल.+ ३५ दोन बायका जर एकाच जात्यावर दळत असतील, तर एकीला घेतलं जाईल आणि दुसरीला सोडून दिलं जाईल.” ३६ *—— ३७ हे ऐकून ते त्याला म्हणाले: “कुठे प्रभू?” तो त्यांना म्हणाला: “जिथे प्रेत आहे तिथेच गिधाडं जमतील.”+