लूकने सांगितलेला संदेश
१५ आता सगळे जकातदार आणि पापी लोक येशूचं ऐकायला त्याच्याभोवती गर्दी करू लागले.+ २ तेव्हा परूशी आणि शास्त्री अशी कुरकुर करू लागले: “हा माणूस पापी लोकांना जवळ करतो आणि त्यांच्यासोबत बसून जेवतो.” ३ मग त्याने त्यांना एक उदाहरण सांगितलं. तो म्हणाला: ४ “तुमच्यापैकी असा कोण आहे, ज्याच्या १०० मेंढरांपैकी एक हरवलं, तर तो ९९ मेंढरांना रानात सोडून ते हरवलेलं मेंढरू शोधायला जाणार नाही आणि ते सापडेपर्यंत त्याचा शोध घेणार नाही?+ ५ ते सापडल्यावर त्याला खूप आनंद होतो आणि तो त्याला खांद्यावर घेतो. ६ मग घरी गेल्यावर तो आपल्या मित्रांना आणि शेजाऱ्यांना बोलावून म्हणतो, ‘माझ्यासोबत आनंद साजरा करा कारण माझं हरवलेलं मेंढरू मला सापडलंय.’+ ७ त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, की ज्यांना पश्चात्तापाची गरज नाही अशा ९९ नीतिमान माणसांपेक्षा, पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल स्वर्गात जास्त आनंद व्यक्त केला जाईल.+
८ किंवा मग अशी कोणती स्त्री असेल जिच्या दहा चांदीच्या नाण्यांपैकी* एक हरवलं, तर ती दिवा लावून आपलं घर झाडणार नाही आणि ते सापडेपर्यंत मन लावून त्याचा शोध घेणार नाही? ९ नाणं सापडल्यावर ती आपल्या मैत्रिणींना आणि शेजाऱ्यांना बोलावून म्हणते, ‘माझ्यासोबत आनंद साजरा करा कारण माझं हरवलेलं नाणं* मला सापडलंय.’ १० त्याचप्रमाणे मी तुम्हाला सांगतो, की पश्चात्ताप करणाऱ्या एका पापी माणसाबद्दल देवाच्या दूतांमध्ये असाच आनंद व्यक्त केला जातो.”+
११ मग तो म्हणाला: “एका माणसाला दोन मुलं होती. १२ त्यांपैकी धाकटा मुलगा एकदा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, माझ्या वाट्याची मालमत्ता मला द्या.’ त्यामुळे त्या माणसाने आपल्या मालमत्तेची त्यांच्यात वाटणी केली. १३ काही दिवसांनी त्या धाकट्या मुलाने आपल्या हक्काचं सगळं काही गोळा केलं आणि तो एका दूर देशी निघून गेला. तिथे त्याने आपली सगळी संपत्ती ऐशआरामात उधळून टाकली. १४ त्याने सगळी संपत्ती उधळून टाकल्यावर त्या संपूर्ण देशात भयंकर दुष्काळ पडला आणि त्याच्याजवळ काहीच उरलं नाही. १५ शेवटी तो त्या देशातल्या एका माणसाकडे काम करायला गेला. त्याने त्याला आपल्या शेतांत डुकरं+ चारण्यासाठी पाठवलं. १६ तेव्हा डुकरं खात असलेल्या शेंगा खाऊन पोट भरायची त्याला फार इच्छा व्हायची. पण, कोणीही त्याला काही खायला देत नव्हतं.
१७ तो भानावर आला तेव्हा मनात विचार करू लागला, ‘माझ्या वडिलांकडे काम करणारे मजूरसुद्धा पोटभर भाकर खातात आणि मी इथे उपाशी मरतोय! १८ मी आपल्या वडिलांकडे जाईन आणि त्यांना म्हणीन: “बाबा, मी देवाविरुद्ध* आणि तुमच्याविरुद्ध पाप केलंय. १९ तुमचा मुलगा म्हणवून घ्यायची आता माझी लायकी राहिली नाही. मला मजूर म्हणून ठेवून घ्या.”’ २० मग तो उठून आपल्या वडिलांकडे गेला. तो दूर असतानाच त्याच्या वडिलांनी त्याला पाहिलं आणि त्यांना त्याचा कळवळा आला. त्यांनी धावत जाऊन त्याला मिठी मारली* आणि प्रेमाने त्याचे मुके घेतले. २१ तेव्हा मुलगा आपल्या वडिलांना म्हणाला, ‘बाबा, मी देवाविरुद्ध आणि तुमच्याविरुद्ध पाप केलंय.+ तुमचा मुलगा म्हणवून घ्यायची आता माझी लायकी राहिली नाही.’ २२ पण वडील नोकरांना म्हणाले, ‘लवकर जा! आणि सगळ्यात चांगला झगा आणून याला घाला. आणि याच्या हातात अंगठी आणि पायांत जोडे घाला. २३ एक धष्टपुष्ट वासरू आणून ते कापा, म्हणजे आपण सगळे मिळून खाऊ-पिऊ आणि आनंद साजरा करू. २४ कारण माझा हा मुलगा मेला होता पण तो पुन्हा जिवंत झालाय.+ तो हरवला होता आणि आता सापडलाय.’ तेव्हा ते सगळे आनंद साजरा करू लागले.
२५ आतापर्यंत त्याचा मोठा मुलगा शेतात होता. तो शेतातून परत आला तेव्हा घराजवळ येताच त्याला नाच-गाण्याचा आवाज ऐकू आला. २६ म्हणून त्याने नोकरांपैकी एकाला बोलावून काय चाललं आहे याबद्दल विचारलं. २७ तो त्याला म्हणाला, ‘तुझा भाऊ आलाय आणि तुझ्या वडिलांनी आपला मुलगा सुखरूप* परत आला, म्हणून धष्टपुष्ट वासरू कापलंय.’ २८ पण मोठ्या भावाला याचा राग आला आणि तो घरात जायला तयार होईना. तेव्हा त्याचे वडील बाहेर आले आणि त्याची समजूत घालू लागले. २९ तो आपल्या वडिलांना म्हणाला, ‘मी इतक्या वर्षांपासून तुमच्यासाठी राबलो आणि एकदाही तुमचा शब्द टाळला नाही. पण आजपर्यंत तुम्ही मला माझ्या मित्रांसोबत मौजमजा करायला साधं कोकरूसुद्धा दिलं नाही. ३० पण वेश्यांसोबत तुमची संपत्ती उधळणारा* हा तुमचा मुलगा परत येताच तुम्ही त्याच्यासाठी धष्टपुष्ट वासरू कापलं.’ ३१ तेव्हा वडील मुलाला म्हणाले, ‘बेटा, तू तर नेहमीच माझ्यासोबत राहिला आहेस आणि माझं जे काही आहे ते तुझंच आहे. ३२ पण तुझा भाऊ मेला होता आणि पुन्हा जिवंत झालाय. तो हरवला होता आणि आता सापडलाय. मग आपण त्याच्यासाठी आनंद साजरा करायला नको का?’”