मार्कने सांगितलेला संदेश
२ पण काही दिवसांनंतर तो पुन्हा कफर्णहूमला आला. तेव्हा, तो घरी आला आहे+ अशी बातमी सगळीकडे पसरली. २ घरात इतके लोक जमले की पाय ठेवायलासुद्धा जागा नव्हती; अगदी दाराजवळही लोकांची गर्दी होती. मग तो त्यांना देवाचं वचन सांगू लागला.+ ३ तेव्हा लोक लकवा मारलेल्या* एका माणसाला घेऊन आले. चौघांनी त्याला उचलून आणलं होतं.+ ४ पण लोकांच्या गर्दीमुळे ते त्याला थेट येशूजवळ घेऊन जाऊ शकत नव्हते. त्यामुळे, ज्या ठिकाणी येशू होता त्या ठिकाणी त्यांनी छताचा काही भाग उघडला. मग लकवा मारलेला माणूस झोपला होता ती खाट त्यांनी तिथून खाली सोडली. ५ त्यांचा विश्वास पाहून+ येशू त्या लकवा मारलेल्या माणसाला म्हणाला: “मुला, तुझ्या पापांची क्षमा झाली आहे.”+ ६ तेव्हा, तिथे बसलेले काही शास्त्री मनातल्या मनात असा विचार करू लागले:+ ७ “असं कसं बोलू शकतो हा माणूस? हा तर देवाची निंदा करतोय. देवाशिवाय आणखी कोण पापांची क्षमा करू शकतो?”+ ८ पण, त्यांच्या मनातले विचार लगेच ओळखून येशू त्यांना म्हणाला: “तुम्ही असा विचार का करता?+ ९ ‘तुझ्या पापांची क्षमा झाली आहे,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे, की ‘ऊठ आणि आपली खाट उचलून चालायला लाग,’ असं म्हणणं जास्त सोपं आहे? १० पण, मनुष्याच्या मुलाला+ पृथ्वीवर पापांची क्षमा करायचा अधिकार आहे+ हे तुम्हाला कळावं म्हणून . . . . ” तो त्या लकवा मारलेल्या माणसाला म्हणाला: ११ “मी तुला सांगतो, ऊठ, आपली खाट उचल आणि घरी जा.” १२ तेव्हा तो उठला आणि लगेच आपली खाट उचलून त्या सगळ्यांच्या देखत बाहेर चालत गेला. हे पाहून लोकांना फार नवल वाटलं आणि त्यांनी असं म्हणून देवाचा गौरव केला: “यापूर्वी आम्ही कधीच असं काही पाहिलं नव्हतं.”+
१३ मग येशू पुन्हा समुद्रकिनाऱ्यावर गेला. तेव्हा सगळे लोक त्याच्यामागे येऊ लागले आणि तो त्यांना शिकवू लागला. १४ तिथून जात असताना त्याला अल्फीचा मुलगा लेवी, जकात नाक्यावर बसलेला दिसला. येशू त्याला म्हणाला: “माझ्यामागे ये आणि माझा शिष्य हो.” तेव्हा तो उठला आणि त्याच्यामागे चालू लागला.+ १५ नंतर, येशू लेवीच्या घरात जेवायला बसला होता, तेव्हा बरेच जकातदार आणि पापी लोकही येशू आणि त्याचे शिष्य यांच्याबरोबर जेवायला बसले होते. कारण त्यांच्यापैकी बरेच जण त्याचे शिष्य बनले होते.+ १६ पण, जेव्हा परूशी* लोकांमधल्या शास्त्र्यांनी त्याला पापी लोकांसोबत आणि जकातदारांसोबत जेवताना पाहिलं, तेव्हा ते त्याच्या शिष्यांना म्हणाले: “हा जकातदारांसोबत आणि पापी लोकांसोबत कसा काय जेवतो?” १७ येशूने हे ऐकलं तेव्हा तो त्यांना म्हणाला: “जे निरोगी असतात त्यांना वैद्याची गरज नसते, तर आजाऱ्यांना असते. मी नीतिमान लोकांना नाही, तर पापी लोकांना बोलवायला आलोय.”+
१८ योहानचे शिष्य आणि परूशी लोक उपास करायचे. त्यामुळे ते त्याच्याजवळ आले आणि म्हणाले: “योहानचे आणि परूश्यांचे शिष्य उपास करतात, मग तुमचे शिष्य उपास का करत नाहीत?”+ १९ तेव्हा येशू त्यांना म्हणाला: “नवरा मुलगा+ सोबत असेपर्यंत त्याच्या मित्रांना उपास करायची गरज असते का? नाही. नवरा मुलगा सोबत असेपर्यंत ते उपास करत नाहीत. २० पण, असे दिवस येतील जेव्हा नवऱ्या मुलाला त्यांच्यापासून दूर केलं जाईल+ आणि त्या दिवशी ते उपास करतील. २१ एखाद्या जुन्या झग्याला कोणीही नवीन कापडाचं ठिगळ लावत नाही. कारण नवीन कापड आकसतं आणि झग्याला पडलेलं छिद्र आणखीनच मोठं होतं.+ २२ तसंच, कोणीही जुन्या बुधल्यांमध्ये* नवीन द्राक्षारस भरत नाही. कारण असं केलं, तर द्राक्षारसामुळे बुधल्या फाटतील आणि बुधल्यांसोबत द्राक्षारसही वाया जाईल. म्हणून लोक नवीन द्राक्षारस नवीन बुधल्यांमध्ये भरतात.”
२३ मग शब्बाथाच्या दिवशी तो शेतांतून जात होता, तेव्हा त्याचे शिष्य जाताजाता धान्याची कणसं तोडू लागले.+ २४ त्यामुळे परूशी त्याला म्हणाले: “बघ! शब्बाथाच्या दिवशी नियमाप्रमाणे योग्य नसलेली गोष्ट हे का करत आहेत?” २५ पण येशू त्यांना म्हणाला: “एकदा दावीदला आणि त्याच्या माणसांना भूक लागली होती आणि त्यांच्याजवळ खायला काहीही नव्हतं तेव्हा त्याने काय केलं, हे तुम्ही कधी वाचलं नाही का?+ २६ दावीद देवाच्या घरात गेला आणि त्याने पवित्र भाकरी* खाल्ल्या आणि आपल्या माणसांनाही दिल्या. नियमाप्रमाणे, याजकांशिवाय कोणीही त्या खाणं योग्य नव्हतं.+ तुम्ही याबद्दल मुख्य याजक अब्याथार+ याच्या वृत्तान्तात वाचलं नाही का?” २७ मग तो त्यांना म्हणाला: “माणूस शब्बाथासाठी नाही, तर शब्बाथ माणसासाठी अस्तित्वात आला.”+ २८ मनुष्याचा मुलगा तर शब्बाथाचाही प्रभू आहे.+