लेवीय
७ हा दोषार्पणाचा नियम आहे:+ ते परमपवित्र आहे. २ होमार्पणाचा पशू जिथे कापतात, तिथेच दोषार्पणाचा पशू कापावा आणि त्याचं रक्त+ वेदीच्या सभोवती शिंपडावं.+ ३ त्याने त्याची सगळी चरबी,+ म्हणजे चरबीदार शेपूट, तसंच आतड्यांवरची चरबी अर्पण करावी. ४ तसंच, त्याने दोन गुरदे आणि त्यांवरची कमरेजवळची चरबीही अर्पण करावी. गुरद्यांसोबत त्याने यकृतावरची चरबीही काढावी.+ ५ याजक हे भाग, यहोवासाठी अग्नीत जाळून केलं जाणारं अर्पण म्हणून वेदीवर जाळेल.+ हे एक दोषार्पण आहे. ६ याजक असलेल्या प्रत्येक पुरुषाने ते खावं+ आणि ते एका पवित्र ठिकाणी खाल्लं जावं. ते परमपवित्र आहे.+ ७ पापार्पणाविषयी असलेला नियम दोषार्पणालाही लागू होतो; जो याजक हे अर्पण देऊन प्रायश्चित्त करेल त्याला ते मिळेल.+
८ याजक एखाद्यासाठी होमार्पण करेल तेव्हा याजकाकडे आणलेली होमार्पणाची कातडी+ त्या याजकाची होईल.
९ भट्टीत भाजलेलं, तसंच कढईत किंवा तव्यावर तयार केलेलं+ प्रत्येक अन्नार्पण, ते अर्पण करणाऱ्या याजकाचं होईल. ते त्याचंच होईल.+ १० पण तेलात मिसळून तयार केलेलं+ किंवा कोरडं असलेलं+ प्रत्येक अन्नार्पण अहरोनच्या सर्व मुलांसाठी असेल; प्रत्येकाला त्यातून सारखा भाग मिळेल.
११ यहोवासाठी आणल्या जाणाऱ्या शांती-अर्पणासाठी हा नियम आहे:+ १२ जर ते अर्पण आभार मानण्यासाठी असेल,+ तर मग या आभाराच्या अर्पणासोबत त्याने तेलात मळलेल्या बेखमीर* भाकरी, तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आणि भरपूर तेल मिसळून बनवलेल्या चांगल्या पिठाच्या बेखमीर भाकरीही द्याव्यात. १३ आभार मानण्यासाठी असलेल्या त्याच्या या शांती-अर्पणांसोबत त्याने खमीर* घातलेल्या भाकरीही द्याव्यात. १४ त्याने या प्रत्येक प्रकारच्या भाकरींतून एकेक, यहोवासाठी पवित्र भाग म्हणून द्यावी. हा भाग शांती-अर्पणाचं रक्त शिंपडणाऱ्या याजकाचा होईल.+ १५ आभार मानण्यासाठी दिलेल्या त्याच्या शांती-अर्पणांचं मांस, अर्पण देण्याच्या दिवशीच खाल्लं जावं. त्यातलं काहीही सकाळपर्यंत ठेवू नये.+
१६ जर त्याच्या अर्पणाचं बलिदान हे नवस फेडण्यासाठी+ किंवा स्वेच्छेने दिलेलं बलिदान असेल,+ तर ते बलिदान देण्याच्या दिवशी खाल्लं जावं. जर त्यातून काही उरलं, तर ते दुसऱ्या दिवशीही खाल्लं जाऊ शकतं. १७ पण तिसऱ्या दिवशी, बलिदानाच्या मांसातलं जे उरेल ते आगीत जाळून टाकावं.+ १८ जर कोणी शांती-अर्पणातलं मांस तिसऱ्या दिवशी खाल्लं, तर ज्याने ते अर्पण दिलं होतं, त्याला स्वीकारलं जाणार नाही. त्या अर्पणामुळे त्याच्यावर कृपा होणार नाही; ती एक वाईट गोष्ट आहे आणि ते मांस खाणाऱ्याला* आपल्या अपराधाची शिक्षा मिळेल.+ १९ कोणत्याही अशुद्ध गोष्टीचा स्पर्श झालेलं मांस खाल्लं जाऊ नये. ते आगीत जाळून टाकावं. शुद्ध असलेलं मांस हे शुद्ध असलेल्यानेच खावं.
२० पण अशुद्ध असलेल्या कोणत्याही माणसाने* यहोवासाठी असलेल्या शांती-अर्पणाचं मांस खाल्लं, तर त्याला* ठार मारलं जावं.+ २१ कोणीही* एखाद्या अशुद्ध गोष्टीला, म्हणजेच एखाद्या अशुद्ध माणसाला,+ किंवा अशुद्ध प्राण्याला+ किंवा कोणत्याही अशुद्ध व घृणास्पद गोष्टीला स्पर्श केला+ आणि यहोवासाठी असलेल्या शांती-अर्पणातलं मांस खाल्लं, तर त्याला* ठार मारलं जावं.’”
२२ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २३ “इस्राएली लोकांना सांग, ‘तुम्ही बैलाची, मेंढ्याची किंवा बकऱ्याची चरबी खाऊ नका.+ २४ मेलेल्या स्थितीत सापडलेल्या प्राण्याची आणि दुसऱ्या प्राण्याने मारलेल्या प्राण्याची चरबी तुम्ही इतर कोणत्याही गोष्टीसाठी वापरू शकता, पण तुम्ही ती कधीच खाऊ नका.+ २५ यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण म्हणून दिलेल्या प्राण्याची चरबी जो कोणी खाईल, त्याला ठार मारलं जावं.
२६ तुम्ही तुमच्या वस्त्यांमध्ये कोणत्याही प्रकारचं रक्त अजिबात खाऊ नका,+ मग ते पक्ष्यांचं असो किंवा प्राण्यांचं. २७ जो* कोणत्याही प्रकारचं रक्त खाईल त्याला ठार मारलं जावं.’”+
२८ यहोवा मोशेला पुढे म्हणाला: २९ इस्राएली लोकांना सांग, ‘जो कोणी यहोवासाठी शांती-अर्पण देतो, त्याने त्या अर्पणातला काही भाग यहोवासाठी आणावा.+ ३० त्याने त्यातली चरबी+ आणि छातीचा भाग, यहोवासाठी अग्नीत जाळून केलं जाणारं अर्पण म्हणून स्वतःच्या हाताने आणावा. तो त्याने ओवाळण्याचं अर्पण म्हणून यहोवापुढे ओवाळावा.+ ३१ याजक ती चरबी वेदीवर जाळेल,+ पण छातीचा भाग अहरोन आणि त्याच्या मुलांचा होईल.+
३२ तुमच्या शांती-अर्पणांतून उजवा पाय तुम्ही पवित्र भाग म्हणून याजकाला द्यावा.+ ३३ अहरोनच्या मुलांपैकी जो शांती-अर्पणांचं रक्त आणि चरबी अर्पण करेल त्याला उजवा पाय, त्याचा भाग म्हणून मिळेल.+ ३४ कारण, इस्राएली लोकांनी दिलेल्या शांती-अर्पणांतून, ओवाळलेला छातीचा भाग आणि पवित्र भागातला उजवा पाय, मी याजक असलेल्या अहरोनला आणि त्याच्या मुलांना देतो. हा इस्राएली लोकांसाठी कायमचा नियम आहे.+
३५ यहोवासाठी अग्नीत जाळून केल्या जाणाऱ्या अर्पणांमधून याजकांसाठी, म्हणजेच अहरोनसाठी आणि त्याच्या मुलांसाठी वेगळा केलेला हा भाग होता. ज्या दिवशी त्यांना यहोवासाठी याजक म्हणून सेवा करायला निवडण्यात आलं, त्या दिवशी तो त्यांच्यासाठी वेगळा करण्यात आला होता.+ ३६ याजकांचा अभिषेक केला जाईल त्या दिवशी इस्राएली लोकांनी हा भाग त्यांना द्यावा, अशी आज्ञा यहोवाने दिली.+ इस्राएली लोकांनी पिढ्या न् पिढ्या पाळावा, असा हा कायमचा नियम आहे.’”
३७ हा होमार्पण,+ अन्नार्पण,+ पापार्पण,+ दोषार्पण,+ नियुक्तीचं बलिदान+ आणि शांती-अर्पण+ यांबद्दलचा नियम आहे. ३८ हा नियम यहोवाने मोशेला सीनाय पर्वतावर दिला.+ ज्या दिवशी त्याने इस्राएली लोकांना सीनायच्या रानात यहोवाला अर्पणं देण्याची आज्ञा दिली, त्या दिवशी त्याने हा नियम दिला.+