लेवीय
२ जर कोणी यहोवासाठी अन्नार्पण+ आणलं, तर ते चांगल्या पिठाचं असावं आणि त्याने त्यावर तेल ओतून ऊद* ठेवावा.+ २ मग त्याने ते याजकांकडे, म्हणजे अहरोनच्या मुलांकडे आणावं. तेव्हा याजक त्यातून मूठभर चांगलं पीठ, तेल आणि सगळा ऊद काढून घेईल आणि ते अर्पणाचं प्रतीक* म्हणून वेदीवर जाळेल.+ हे अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.* ३ अन्नार्पणाचा उरलेला भाग अहरोनचा आणि त्याच्या मुलांचा असेल.+ हा यहोवासाठी अग्नीत जाळून केलेल्या अर्पणांतला भाग आहे आणि तो परमपवित्र आहे.+
४ जर तू भट्टीत भाजलेलं अन्नार्पण आणलंस, तर चांगल्या पिठाच्या तेलात मळलेल्या बेखमीर* भाकरी किंवा तेल लावलेल्या बेखमीर पापड्या आण.+
५ जर तू तव्यावर भाजलेलं अन्नार्पण आणलंस,+ तर ते तेलात मळलेल्या चांगल्या, बेखमीर पिठाचं असावं. ६ त्याचे तुकडे करून त्यावर तेल ओतावं.+ हे एक अन्नार्पण आहे.
७ जर तू कढईत तळलेलं अन्नार्पण आणलंस, तर ते तेलात मळलेल्या चांगल्या पिठाचं असावं. ८ यांपासून बनवलेलं अन्नार्पण तू यहोवासाठी आणावं आणि ते याजकाकडे द्यावं, म्हणजे याजक ते वेदीजवळ नेईल. ९ मग याजक त्या अन्नार्पणातलं काही अर्पणाचं प्रतीक*+ म्हणून घेईल आणि वेदीवर जाळेल. ते अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे आणि त्याच्या सुवासाने यहोवाला आनंद होईल.*+ १० या अन्नार्पणाचा उरलेला भाग अहरोनचा आणि त्याच्या मुलांचा असेल. हा यहोवासाठी अग्नीत जाळून केलेल्या अर्पणांतला भाग आहे आणि तो परमपवित्र आहे.+
११ यहोवासाठी तुम्ही आणलेल्या कोणत्याही अन्नार्पणात खमीर* नसावं.+ खमीर आणि मध यहोवासाठी अर्पण म्हणून अग्नीत कधीच जाळू नका.
१२ तुम्ही या वस्तू पहिल्या पिकाचं अर्पण+ म्हणून यहोवासाठी आणू शकता, पण त्या कधीही सुवासासाठी* वेदीवर जाळल्या जाऊ नयेत.
१३ तू दिलेल्या प्रत्येक अन्नार्पणात मीठ असावं; तुझ्या अन्नार्पणात देवाच्या कराराची आठवण करून देणारं मीठ घालायला विसरू नकोस. तुझ्या प्रत्येक अर्पणासोबत तू मीठ अर्पण कर.+
१४ जर तुला यहोवासाठी पहिल्या पिकातलं काही अन्नार्पण म्हणून आणायचं असेल, तर तू आगीवर भाजलेल्या हिरव्या कणसांचे दाणे भरडून, पहिल्या पिकाचं अन्नार्पण म्हणून ते द्यावेत.+ १५ तू त्यावर तेल ओतून ऊद ठेवावा. हे एक अन्नार्पण आहे. १६ भरडलेले दाणे आणि तेल यांतलं काही, तसंच सगळा ऊद, अर्पणाचं प्रतीक*+ म्हणून याजक जाळेल. हे यहोवासाठी अग्नीत जाळून केलेलं अर्पण आहे.