यहेज्केल
३९ हे मनुष्याच्या मुला! गोगविरुद्ध भविष्यवाणी कर+ आणि त्याला असं म्हण: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “हे गोग! मेशेख आणि तुबालच्या मुख्य प्रधाना!*+ बघ, मी तुझ्या विरोधात उठलोय. २ मी तुला मागे वळायला लावीन. मी तुला उत्तरेकडच्या सगळ्यात दूरच्या भागांतून बाहेर आणून+ इस्राएलच्या डोंगरांवर हाकत नेईन. ३ मी तुझ्या डाव्या हातातलं धनुष्य उडवून देईन आणि तुझ्या उजव्या हातातले बाण खाली पाडीन. ४ तू, तुझं सगळं सैन्य आणि तुझ्यासोबत असलेली सगळी राष्ट्रं इस्राएलच्या डोंगरांवर पडतील.+ मी तुझं प्रेत सर्व प्रकारच्या शिकारी पक्ष्यांना आणि रानातल्या हिंस्र प्राण्यांना खायला देईन.’”+
५ ‘तू खुल्या मैदानात पडशील,+ कारण मी स्वतः हे बोललोय,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
६ ‘मी मागोगवर, तसंच बेटांवर सुरक्षितपणे राहणाऱ्या लोकांवर आगीचा वर्षाव करीन.+ तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे. ७ मी माझ्या इस्राएली लोकांमध्ये माझं पवित्र नाव जाहीर करीन, आणि पुन्हा कधीच मी माझ्या पवित्र नावाची बदनामी होऊ देणार नाही; तेव्हा राष्ट्रांना समजेल, की मी यहोवा,+ इस्राएलमध्ये पवित्र देव आहे.’+
८ ‘पाहा! ज्याबद्दल भविष्यवाणी करण्यात आली होती, ती पूर्ण होईल; हो, ती नक्कीच पूर्ण होईल,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो. ‘मी याच दिवसाविषयी बोललो होतो. ९ इस्राएली लोक आपापल्या शहरातून बाहेर येतील आणि आग पेटवायला शस्त्रं जाळतील; छोट्या ढाली,* मोठ्या ढाली, धनुष्य, बाण, बरची* आणि सोटे* अशी सगळी शस्त्रं ते सरपण म्हणून वापरतील.+ सात वर्षांपर्यंत ते आग पेटवायला यांचाच उपयोग करतील. १० त्यांना रानावनातून लाकडं गोळा करून आणावी लागणार नाहीत; कारण आग पेटवायला ते शस्त्रं वापरतील.
ज्यांनी त्यांना लुटलं, त्यांना ते लुटतील आणि ज्यांनी त्यांना लुबाडलं, त्यांना ते लुबाडतील,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
११ ‘त्या दिवशी मी गोगला+ इस्राएलमध्ये एक कबरस्तान देईन; समुद्राच्या पूर्वेकडे प्रवास करणाऱ्या लोकांच्या खोऱ्यात ते असेल. त्या कबरस्तानामुळे खोऱ्यातून ये-जा करणाऱ्या लोकांचा रस्ता अडेल. तिथेच ते गोगला आणि त्याच्या सगळ्या जमावाला पुरतील आणि त्या ठिकाणाला ‘हमोन-गोगचं खोरं,’* असं नाव देतील.+ १२ देश शुद्ध करायला इस्राएलच्या घराण्यातले लोक त्यांना पुरतील आणि त्यासाठी त्यांना सात महिने लागतील.+ १३ देशातले सगळे लोक पुरण्याच्या कामात सहभागी होतील, आणि या कामामुळे त्यांना प्रसिद्धी मिळेल; मी माझा गौरव करीन, त्या दिवशी त्यांना प्रसिद्धी मिळेल,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
१४ ‘देश शुद्ध करायला माणसांना नेमलं जाईल. ते सतत देशातून फिरतील आणि जमिनीवरचे उरलेसुरलेले मृतदेह पुरतील. सात महिन्यांपर्यंत ते हे शोधकार्य करत राहतील. १५ देशातून फिरणाऱ्या माणसांना जर एखादं मानवी हाड सापडलं, तर ते त्याच्या शेजारी एक निशाणी लावतील. मग पुरायचं काम ज्यांवर सोपवलंय, ती माणसं येऊन ‘हमोन-गोगच्या खोऱ्यात’ ते पुरतील.+ १६ तिथे हमोना* नावाचं एक शहरही असेल. अशा प्रकारे ती माणसं देश शुद्ध करतील.’+
१७ मनुष्याच्या मुला! सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘सगळ्या प्रकारच्या पक्ष्यांना आणि जंगलातल्या सगळ्या प्राण्यांना असं म्हण, “तुम्ही सगळे एकत्र होऊन या. आणि मी तुमच्यासाठी इस्राएलच्या डोंगरांवर जे महान बलिदान तयार करतोय त्याभोवती गोळा व्हा.+ तिथे तुम्ही सगळे मांस खाल आणि रक्त प्याल.+ १८ तुम्ही शूरवीरांचं मांस खाल आणि पृथ्वीवरच्या प्रधानांचं रक्त प्याल; तुम्ही बाशानच्या सगळ्या धष्टपुष्ट एडक्यांचं, कोकरांचं, बकऱ्यांचं आणि बैलांचं रक्त प्याल. १९ मी तुमच्यासाठी तयार केलेल्या बलिदानातून तुम्ही अधाश्यासारखी चरबी खाल आणि नशा येईपर्यंत रक्त प्याल.”’
२० ‘तुम्ही माझ्या मेजावर बसून घोड्यांचं, रथ चालवणाऱ्यांचं, शूरवीरांचं आणि सगळ्या प्रकारच्या योद्ध्यांचं मांस पोटभर खाल,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
२१ ‘मी राष्ट्रांमध्ये माझा गौरव प्रकट करीन. मग सगळी राष्ट्रं पाहतील, की मी कशा प्रकारे न्यायदंड बजावला आणि त्यांच्यामध्ये आपली ताकद दाखवून दिली.+ २२ त्या दिवसापासून इस्राएलच्या घराण्याला कळून येईल, की मी त्यांचा देव यहोवा आहे. २३ आणि राष्ट्रांना कळून येईल, की इस्राएलच्या घराण्यातले लोक आपल्याच अपराधांमुळे, माझ्याशी अविश्वासूपणे वागल्यामुळे बंदिवासात गेले.+ आणि म्हणून मी त्यांच्यापासून आपलं तोंड फिरवलं,+ त्यांना त्यांच्या शत्रूंच्या हवाली केलं+ आणि ते तलवारीने मारले गेले. २४ त्यांच्या अशुद्धपणामुळे आणि त्यांच्या अपराधांमुळे मी त्यांना योग्य ती शिक्षा दिली आणि त्यांच्यापासून आपलं तोंड फिरवलं.’
२५ म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘मी बंदिवासात असलेल्या याकोबच्या लोकांना परत घेऊन येईन+ आणि इस्राएलच्या संपूर्ण घराण्यावर दया करीन.+ मी माझ्या पवित्र नावाबद्दल मोठा आवेश दाखवीन.+ २६ माझ्याशी अविश्वासूपणे वागल्यामुळे त्यांना बराच अपमान सहन करावा लागेल;+ पण त्यानंतर ते आपल्या देशात सुरक्षित राहतील, आणि कोणीही त्यांना घाबरवणार नाही.+ २७ मी त्यांना राष्ट्रांतून परत घेऊन येईन आणि शत्रूंच्या देशांतून गोळा करीन.+ मी त्यांच्याशी ज्या प्रकारे वागीन त्यावरून अनेक राष्ट्रांना दिसून येईल, की मी पवित्र देव आहे.’+
२८ ‘मी त्यांना राष्ट्रांमध्ये बंदिवासात पाठवून परत त्यांच्या देशात आणीन; त्यांच्यापैकी एकालाही मागे सोडणार नाही. तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा त्यांचा देव आहे.+ २९ मग त्यानंतर कधीच मी त्यांच्यापासून आपलं तोंड फिरवणार नाही.+ कारण मी इस्राएलच्या घराण्यावर माझ्या पवित्र शक्तीचा* वर्षाव करीन,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”