यहेज्केल
३४ मग परत एकदा मला यहोवाकडून एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या मेंढपाळांविरुद्ध भविष्यवाणी कर. तू त्यांना म्हण, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “इस्राएलच्या मेंढपाळांचा धिक्कार असो!+ मेंढपाळांनी आपल्या मेंढरांना चारायला नको का? पण तुम्ही तर स्वतःचंच पोट भरत राहता.+ ३ तुम्ही सगळ्यात धष्टपुष्ट प्राणी कापता, त्याची चरबी खाता आणि लोकरीचे कपडे घालता.+ पण आपल्या कळपाला मात्र तुम्ही उपाशी ठेवता.+ ४ तुम्ही कमजोरांना बळ दिलं नाही, आजाऱ्यांना बरं केलं नाही, जखमी झालेल्यांची मलमपट्टी केली नाही, भरकटलेल्यांना परत आणलं नाही, किंवा हरवलेल्यांचा शोध घेतला नाही.+ उलट तुम्ही कठोरपणे अधिकार गाजवून त्यांच्यावर जुलूम केला.+ ५ म्हणून त्यांची पांगापांग झाली. त्यांना कोणी मेंढपाळ नसल्यामुळे ते विखुरले गेले+ आणि जंगलातल्या प्राण्यांनी त्यांना फाडून खाल्लं. ६ सगळ्या डोंगरांवर आणि प्रत्येक उंच टेकडीवर माझी मेंढरं भरकटत राहिली. संपूर्ण पृथ्वीवर त्यांची पांगापांग झाली. पण, कोणीही त्यांचा तपास केला नाही किंवा शोध घेतला नाही.
७ म्हणून मेंढपाळांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका: ८ ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो, “मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, मी शांत बसणार नाही. माझ्या मेंढरांची शिकार झाली आहे आणि रानातल्या हिंस्र प्राण्यांनी त्यांना फाडून खाल्लंय. कारण माझ्या मेंढपाळांनी त्यांची राखण केली नाही आणि त्यांचा शोध घेतला नाही. उलट, मेढरांना चारण्याऐवजी ते स्वतःच चरत राहिले.”’ ९ म्हणून हे मेंढपाळांनो, यहोवा काय म्हणतो ते ऐका. १० सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: ‘मी या मेंढपाळांच्या विरोधात उठलोय! मी त्यांच्याकडून माझ्या मेंढरांचा हिशोब मागीन.* मी त्यांच्याकडून माझ्या मेंढरांना चारायचं काम* काढून घेईन.+ पुन्हा कधीच ते स्वतःचं पोट भरू शकणार नाहीत. मी त्यांच्या तोंडांतून माझी मेंढरं सोडवीन, म्हणजे पुन्हा कधीच ती त्यांच्यासाठी अन्न होणार नाहीत.’”
११ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “पाहा, मी जिवंत आहे! मी स्वतः माझ्या मेंढरांना शोधीन. मी स्वतः त्यांची काळजी घेईन.+ १२ आपली विखुरलेली मेंढरं परत सापडल्यावर एखादा मेंढपाळ जसं त्यांना खाऊ-पिऊ घालतो, तसं मी माझ्या मेंढरांची काळजी घेईन.+ काळ्या ढगांच्या आणि अंधाराच्या दिवशी जिथे कुठे माझी मेंढरं विखुरली गेली होती, त्या सगळ्या ठिकाणांहून मी त्यांना परत आणीन.+ १३ मी सर्व राष्ट्रांमधून त्यांना बाहेर आणीन. मी त्यांना सगळ्या देशांमधून गोळा करून त्यांच्या स्वतःच्या देशात घेऊन येईन. मी त्यांना इस्राएलच्या डोंगरांवर, झऱ्यांजवळ आणि लोकवस्ती असलेल्या ठिकाणी चारीन.+ १४ मी त्यांना उत्तम कुरणांत चारीन; इस्राएलच्या उंच-उंच डोंगरांवर त्यांची चरण्याची ठिकाणं असतील.+ तिथे ती हिरव्यागार मैदानात विसावा घेतील+ आणि इस्राएलच्या उंच डोंगरांवर, लुशलुशीत गवत असलेल्या कुरणांत चरतील.”
१५ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, “मी स्वतः माझ्या मेंढरांना चारीन+ आणि मी स्वतः त्यांना विसावा देईन.+ १६ मी हरवलेल्या मेंढराला शोधून काढीन+ आणि भरकटलेल्या मेंढराला परत घेऊन येईन. मी जखमी झालेल्या मेंढराची मलमपट्टी करीन आणि कमजोराला बळ देईन. पण, धष्टपुष्ट आणि ताकदवान असलेल्याचा मी नाश करीन. त्याचा न्याय करून मी त्याला योग्य शिक्षा देईन.”
१७ हे माझ्या कळपा, सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मी लवकरच तुझ्यातल्या मेंढरांचा, तसंच एडके आणि बकरे यांचा न्याय करीन.+ १८ तुम्ही* सगळ्यात उत्तम कुरणांत चरता आणि बाकीची कुरणं पायांखाली तुडवता, ही काय क्षुल्लक गोष्ट आहे? तुम्ही स्वच्छ पाणी पिता आणि नंतर पाय मारून ते दूषित करता, ही काय साधी गोष्ट आहे? १९ आता काय माझ्या मेंढरांनी तुम्ही तुडवलेल्या कुरणांत चरावं का? तुम्ही पाय मारून दूषित केलेलं पाणी त्यांनी प्यावं का?”
२० म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा त्यांना असं म्हणतो: “पाहा, मी जिवंत आहे! मी स्वतः धष्टपुष्ट मेंढरं आणि बारीक मेंढरं यांच्यात न्याय करीन. २१ कारण तुम्ही सगळ्या रोगी मेंढरांना आपल्या अंगाखांद्याने धक्का देत राहिलात आणि आपल्या शिंगांनी हुंदडून त्यांची दूरपर्यंत पांगापांग करत राहिलात. २२ म्हणून आता मी माझ्या मेंढरांना वाचवीन आणि पुन्हा कधी ती कोणाची शिकार होणार नाहीत;+ मी प्रत्येक मेंढराचा न्याय करीन. २३ त्यांच्यासाठी मी एक मेंढपाळ नेमीन;+ माझा सेवक दावीद+ याला मी त्यांच्यावर नेमीन आणि तो त्यांना चारेल. तो स्वतः त्यांना चारेल आणि त्यांचा मेंढपाळ होईल.+ २४ मी यहोवा त्यांचा देव होईन+ आणि माझा सेवक दावीद त्यांचा प्रधान होईल.+ मी यहोवा स्वतः हे बोललोय.
२५ मी त्यांच्यासोबत शांतीचा करार करीन+ आणि देशातल्या सगळ्या हिंस्र प्राण्यांना हाकलून लावीन;+ म्हणजे माझी मेंढरं ओसाड रानात सुरक्षित राहू शकतील आणि जंगलात झोपू शकतील.+ २६ मी त्यांना आणि माझ्या टेकडीभोवती असलेल्या जागेला आशीर्वादित करीन.*+ मी वेळच्या वेळी पाऊस पाडीन आणि आशीर्वादांचा पावसासारखा वर्षाव करीन.+ २७ देशातली झाडं फळं देतील, जमीन आपलं पीक देईल+ आणि ते देशात सुरक्षित राहतील. मी जेव्हा त्यांच्यावर लादलेलं जू* मोडून टाकीन+ आणि त्यांना गुलाम बनवणाऱ्यांच्या हातून त्यांची सुटका करीन, तेव्हा त्यांना कळून येईल की मी यहोवा आहे. २८ मग पुन्हा कधीच राष्ट्रं त्यांची शिकार करणार नाहीत, पृथ्वीवरचे हिंस्र प्राणी त्यांना फाडून खाणार नाहीत आणि कोणीही त्यांना घाबरवणार नाही; ती सगळी सुरक्षित राहतील.+
२९ मी त्यांच्यासाठी एक मळा लावीन आणि तो खूप प्रसिद्ध होईल. त्यानंतर ती कधीच देशात दुष्काळाने मरणार नाहीत,+ आणि राष्ट्रं कधीच त्यांचा अपमान करणार नाहीत.+ ३० ‘तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा त्यांचा देव त्यांच्यासोबत आहे आणि माझी मेंढरं, म्हणजे इस्राएलच्या घराण्यातले लोक हे माझे लोक आहेत,’+ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”’
३१ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘तुम्ही माझी मेंढरं आहात+ आणि मी तुमची राखण करतो. तुम्ही नश्वर माणसं आहात आणि मी तुमचा देव आहे.’”