यहेज्केल
३२ मग १२ व्या वर्षाच्या १२ व्या महिन्याच्या पहिल्या दिवशी, मला यहोवाकडून पुन्हा एकदा संदेश मिळाला. तो मला म्हणाला: २ “मनुष्याच्या मुला, इजिप्तचा राजा फारो याच्यासाठी एक शोकगीत गा. तू त्याला म्हण,
‘राष्ट्रांमध्ये तू एका शक्तिशाली तरुण सिंहासारखा होतास,
पण आता तुला गप्प करण्यात आलंय.
तू महाकाय समुद्री प्राण्यासारखा होतास.+
तू आपल्या नद्यांमध्ये उसळ्या मारायचास,
आपल्या पायांनी तू पाणी गढूळ करायचास आणि नद्या* दूषित करायचास.’
३ पण, सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो:
‘मी अनेक राष्ट्रांचा उपयोग करून तुझ्यावर आपलं जाळं टाकीन,
ते तुला माझ्या जाळ्यात अडकवतील आणि ओढून बाहेर काढतील.
४ मी तुला कोरड्या जमिनीवर सोडून देईन;
खुल्या मैदानावर तुला टाकून देईन.
मी आकाशातल्या पक्ष्यांना तुझ्यावर बसायला लावीन,
आणि तुझ्या मांसाने पृथ्वीवरच्या सगळ्या जंगली प्राण्यांचं पोट भरीन.+
५ मी तुझं मांस डोंगरांवर फेकून देईन,
आणि तुझ्या प्रेताच्या तुकड्यांनी दऱ्या-खोऱ्या भरून टाकीन.+
६ तुझ्यातून वाहणाऱ्या रक्ताच्या प्रवाहाने, मी देशातली जमीन थेट डोंगरांपर्यंत भिजवून टाकीन.
तुझ्या रक्ताने नद्याही भरून जातील.’
७ ‘तुझा नाश केल्यावर मी आकाश झाकून टाकीन आणि त्यातले तारे निस्तेज करीन.
मी सूर्याला ढगांनी झाकून टाकीन,
आणि चंद्र आपला प्रकाश देणार नाही.+
८ तुझ्यामुळे मी आकाशातल्या सगळ्या तेजस्वी ज्योती अंधकारमय करीन,
आणि तुझ्या देशावर काळोख पसरवीन,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
९ ‘मी जेव्हा तुझ्या लोकांना बंदी बनवून इतर राष्ट्रांत नेईन;
तुला माहीत नसलेल्या देशांत त्यांना नेईन,+
तेव्हा मी राष्ट्रांतल्या लोकांची मनं दुःखी करीन.
१० मी राष्ट्रांतल्या लोकांना भयचकित करीन.
मी तुझ्यावर आपली तलवार चालवीन, तेव्हा तुझी दशा पाहून त्यांचे राजे भीतीने थरथर कापतील.
तुझा नाश होईल त्या दिवशी,
ते सतत आपल्या जिवाच्या भीतीने थरथर कापतील.’
११ सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो:
‘तुझ्यावर बाबेलच्या राजाची तलवार चालवली जाईल.+
१२ मी शूर योद्ध्यांच्या तलवारींनी तुझ्या जमावाची कत्तल करीन,
ते सगळे राष्ट्रांमधले सर्वात क्रूर योद्धे आहेत.+
ते इजिप्तचा गर्व उतरवतील आणि तिच्या जमावाचा समूळ नाश करून टाकतील.+
१३ तिच्या जलाशयांजवळ असलेल्या तिच्या सगळ्या गुराढोरांचा मी नाश करून टाकीन.+
मग परत कधीच माणसाच्या पावलांनी किंवा जनावरांच्या खुरांनी ते पाणी गढूळ होणार नाही.’+
१४ ‘त्या वेळी मी त्यांचं पाणी स्वच्छ करीन,
आणि त्यांच्या नद्यांना तेलासारखं वाहायला लावीन,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
१५ ‘मी इजिप्तला जेव्हा ओसाड आणि उद्ध्वस्त करून टाकीन;
देशातलं सगळं काही काढून घेईन,+
आणि त्यातल्या सगळ्या रहिवाशांना मारून टाकीन,
तेव्हा त्यांना कळून येईल, की मी यहोवा आहे.+
१६ हे एक शोकगीत आहे, आणि लोक नक्कीच हे गातील; राष्ट्रांच्या मुली शोक करताना हे गीत गातील.
इजिप्तसाठी आणि तिच्या सगळ्या जमावासाठी लोक हे शोकगीत गातील,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”
१७ मग १२ व्या वर्षी, महिन्याच्या १५ व्या दिवशी मला यहोवाकडून एक संदेश मिळाला. तो मला म्हणाला: १८ “मनुष्याच्या मुला, इजिप्तच्या जमावासाठी मोठ्याने आक्रोश कर. तिला जमिनीखाली टाक, आणि तिच्यासोबत शक्तिशाली राष्ट्रांच्या मुलींनाही कबरेत जाणाऱ्यांसोबत खाली टाक.
१९ ‘हे इजिप्त! तुला काय वाटतं, तू सगळ्यांत सुंदर आहेस? खाली कबरेत जा, आणि सुंता* न झालेल्यांसोबत पडून राहा!’
२० ‘तलवारीने कत्तल झालेल्यांमध्ये ते सगळे पडून राहतील.+ तिला तलवारीच्या हवाली करण्यात आलंय; तिला आणि तिच्या जमावाला ओढून घेऊन जा.
२१ कबरेच्या* अगदी खालच्या भागातून शक्तिशाली योद्धे त्याच्याशी* आणि त्याला मदत करणाऱ्यांशी बोलतील. ते जमिनीखाली जातील आणि सुंता न झालेल्यांसारखं, तलवारीने कत्तल झालेल्यांसारखं तिथेच पडून राहतील. २२ अश्शूरसुद्धा तिच्या सगळ्या जमावासोबत तिथे आहे. त्याच्या* आजूबाजूला सगळीकडे त्यांच्या कबरी आहेत. ते सगळे तलवारीने मारले गेले होते.+ २३ तिच्या कबरी अगदी खोल खड्ड्यात आहेत, आणि तिचा सगळा जमाव तिच्या कबरेभोवती आहे. ते सगळे तलवारीने मारले गेले, कारण त्यांनी जिवंतांच्या देशात सगळीकडे दहशत पसरवली होती.
२४ एलामसुद्धा+ तिथे आहे आणि तिचा जमाव तिच्या कबरेभोवती आहे. ते सगळे तलवारीने मारले गेले होते. जिवंतांच्या देशात दहशत पसरवणारे ते सगळे सुंता न होताच जमिनीखाली गेले आहेत. खड्ड्यात जाणाऱ्यांसोबत आता तेसुद्धा अपमानित होतील. २५ त्यांनी कत्तल झालेल्यांमध्ये तिच्यासाठी पलंग तयार केलाय, आणि तिचा जमाव तिच्या कबरींभोवती आहे. ते सगळे सुंता न झालेले आणि तलवारीला बळी पडलेले आहेत. कारण त्यांनी जिवंतांच्या देशात दहशत पसरवली होती. खड्ड्यात जाणाऱ्यांसोबत आता तेसुद्धा अपमानित होतील. कत्तल झालेल्यांमध्ये त्याला टाकण्यात आलंय.
२६ मेशेख आणि तुबाल,+ तसंच त्यांचे* जमावही तिथे आहेत. आणि त्यांच्या* कबरी त्याच्याभोवती* आहेत. सुंता न झालेले ते सगळे तलवारीने मारले गेले होते. कारण जिवंतांच्या देशात त्यांनी दहशत पसरवली होती. २७ सुंता न झालेल्या शूर योद्ध्यांसोबत तेही तिथे पडून राहणार नाहीत का? जे शूर योद्धे आपल्या शस्त्रांसोबत खाली कबरेत* गेले आहेत, तिथे ते त्यांच्यासोबत पडून राहणार नाहीत का? ते त्यांच्या तलवारी त्यांच्या उशाखाली ठेवतील,* आणि त्यांची पापं त्यांच्या हाडांवर ठेवतील. कारण या शूर योद्ध्यांनी जिवंतांच्या देशात दहशत पसरवली होती. २८ पण तुला मात्र सुंता न झालेल्यांसोबत चिरडून टाकलं जाईल, आणि तलवारीला बळी पडलेल्यांसोबत तू पडून राहशील.
२९ अदोमही+ तिथे आहे. तिचे राजे आणि तिचे सगळे प्रधानही तिथे आहेत. ते शूर असूनही तलवारीला बळी पडलेल्यांमध्ये टाकले गेले. तेसुद्धा सुंता न झालेल्यांसोबत+ आणि खाली खड्ड्यात जाणाऱ्यांसोबत पडून राहतील.
३० तिथे उत्तरेकडचे सगळे अधिकारी सीदोनच्या+ सगळ्या लोकांसोबत आहेत. त्यांनी आपल्या शक्तीच्या जोरावर दहशत पसरवली होती, तरी ते अपमानित होऊन कत्तल झालेल्यांसोबत खाली गेले. तलवारीने मारले गेलेल्यांसोबत ते सुंता न झालेल्या अवस्थेत पडून राहतील, आणि कबरेत जाणाऱ्यांसोबत अपमानित होतील.
३१ फारो हे सगळं पाहील, आणि आपल्या जमावाच्या बाबतीत जे काही घडलं त्यामुळे त्याचं समाधान होईल.+ फारो आणि त्याचं सगळं सैन्य तलवारीला बळी पडेल,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.
३२ ‘फारोने जिवंतांच्या देशात दहशत पसरवली होती, म्हणून त्याला आणि त्याच्या सगळ्या जमावाला मारून टाकलं जाईल; सुंता न झालेल्या लोकांसोबत, तलवारीला बळी पडलेल्या लोकांसोबत त्यांना टाकलं जाईल,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”