यहेज्केल
२० त्यानंतर सातव्या वर्षी, पाचव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, इस्राएलच्या वडीलजनांपैकी काही जण यहोवाकडून मार्गदर्शन मिळवायला माझ्याकडे आले आणि माझ्यासमोर येऊन बसले. २ तेव्हा यहोवाकडून मला असा संदेश मिळाला: ३ “मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या वडीलजनांशी बोल. त्यांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: “तुम्ही माझ्याकडे मार्गदर्शन मागायला आला आहात का? पण सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो, ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला उत्तर देणार नाही.’”’+
४ हे मनुष्याच्या मुला! तू त्यांचा न्याय करायला* तयार आहेस का? तू तयार आहेस का? तर मग, त्यांच्या वाडवडिलांनी ज्या घृणास्पद गोष्टी केल्या त्या त्यांना सांग.+ ५ तू त्यांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “ज्या दिवशी मी इस्राएलला निवडलं होतं,+ त्या दिवशी मी याकोबच्या घराण्याच्या संततीला* अभिवचन दिलं होतं आणि इजिप्तमध्ये त्यांना स्वतःची ओळखही करून दिली होती.+ हो, मी शपथ घेऊन त्यांना म्हणालो होतो: ‘मी तुमचा देव यहोवा आहे.’ ६ त्या दिवशी मी अशी शपथ वाहिली होती, की मी त्यांना इजिप्तमधून बाहेर काढीन आणि जो देश मी त्यांच्यासाठी पाहून* ठेवला होता, त्या सर्वात सुंदर देशात, म्हणजे दूध आणि मध वाहत असलेल्या देशात आणीन.+ ७ मग मी त्यांना म्हणालो, ‘तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्यासमोर असलेल्या किळसवाण्या गोष्टी फेकून द्याव्यात. इजिप्तच्या घृणास्पद मूर्तींच्या* नादी लागून तुम्ही स्वतःला अशुद्ध करून घेऊ नका.+ मी यहोवा तुमचा देव आहे.’+
८ पण ते माझं ऐकायला तयार नव्हते. त्यांनी माझ्याविरुद्ध बंड केलं. त्यांच्यासमोर असलेल्या किळसवाण्या गोष्टी त्यांनी फेकून दिल्या नाहीत आणि इजिप्तच्या घृणास्पद मूर्तींच्या नादी लागायचं सोडून दिलं नाही.+ म्हणून मी शपथ घेतली, की मी इजिप्तमध्ये त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा प्याला ओतीन आणि त्यांच्यावर माझ्या रागाचा पूर्णपणे वर्षाव करीन. ९ पण, माझ्या नावासाठी मी तसं केलं नाही; ज्या राष्ट्रांमध्ये ते राहत होते त्यांच्यामध्ये माझ्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून मी पाऊल उचललं.+ मी त्यांना* इजिप्तमधून बाहेर आणलं आणि मी कोण आहे हे त्या राष्ट्रांसमोर त्यांना* दाखवून दिलं.+ १० मी त्यांना इजिप्तमधून बाहेर आणून ओसाड रानात नेलं.+
११ मग मी त्यांना माझे कायदे लावून दिले आणि माझे न्याय-निर्णय कळवले,+ म्हणजे जो कोणी त्यांचं पालन करेल त्याला जीवन मिळेल.+ १२ तसंच, माझ्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये चिन्ह म्हणून+ मी त्यांना शब्बाथाचे दिवसही दिले,+ म्हणजे त्यांना कळून येईल, की त्यांना पवित्र करणारा मी यहोवा आहे.
१३ पण इस्राएलच्या घराण्याने ओसाड रानात माझ्याविरुद्ध बंड केलं.+ ज्या माझ्या कायद्यांचं आणि न्याय-निर्णयांचं पालन केल्याने एखाद्याला जीवन मिळतं, त्या कायद्यांप्रमाणे ते चालले नाहीत. माझे न्याय-निर्णयही त्यांनी धुडकावून लावले. त्यांनी माझे शब्बाथ पूर्णपणे अपवित्र करून टाकले. म्हणून मी अशी शपथ घेतली, की मी ओसाड रानात त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा प्याला ओतून त्यांचा समूळ नाश करून टाकीन.+ १४ पण मी माझ्या नावासाठी तसं केलं नाही; ज्या राष्ट्रांसमोर मी त्यांना* इजिप्तमधून बाहेर आणलं, त्यांच्यामध्ये माझ्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून मी पाऊल उचललं.+ १५ ओसाड रानात मी शपथ घेऊन त्यांना असंही सांगितलं, की जो देश मी त्यांना देणार होतो त्या देशात, म्हणजे दूध आणि मध वाहत असलेल्या सर्वात सुंदर देशात+ मी त्यांना नेणार नाही.+ १६ कारण, ते माझ्या कायद्यांप्रमाणे चालले नाहीत, त्यांनी माझे न्याय-निर्णय धुडकावून लावले आणि माझे शब्बाथ पूर्णपणे अपवित्र करून टाकले. शिवाय, त्यांचं मन घृणास्पद मूर्तींकडे लागलं होतं.+
१७ पण, मला त्यांची कीव आली आणि म्हणून मी त्यांचा नाश केला नाही; मी ओसाड रानात त्यांचा समूळ नाश केला नाही. १८ मी ओसाड रानात त्यांच्या मुलांना म्हणालो,+ ‘तुम्ही तुमच्या वाडवडिलांच्या कायद्यांप्रमाणे चालू नका+ आणि त्यांच्या न्याय-निर्णयांचं पालन करू नका. त्यांच्या घृणास्पद मूर्तींच्या नादी लागून स्वतःला अशुद्ध करून घेऊ नका. १९ मी यहोवा तुमचा देव आहे. माझ्या कायद्यांप्रमाणे चाला, माझ्या न्याय-निर्णयांचं पालन करा आणि त्यांप्रमाणे वागा.+ २० माझे शब्बाथ पवित्र माना,+ म्हणजे ते तुमच्यामध्ये आणि माझ्यामध्ये चिन्ह म्हणून राहतील. आणि तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा तुमचा देव आहे.’+
२१ पण त्यांची मुलं माझ्याविरुद्ध बंड करू लागली.+ ज्या माझ्या कायद्यांचं आणि न्याय-निर्णयांचं पालन केल्याने एखाद्याला जीवन मिळतं, त्या कायद्यांप्रमाणे ते चालले नाहीत. माझे न्याय-निर्णयही त्यांनी धुडकावून लावले. त्यांनी माझे शब्बाथ पूर्णपणे अपवित्र करून टाकले. म्हणून मी अशी शपथ घेतली, की मी ओसाड रानात त्यांच्यावर माझ्या क्रोधाचा प्याला ओतीन आणि माझ्या रागाचा त्यांच्यावर पूर्णपणे वर्षाव करीन.+ २२ पण माझ्या नावासाठी मी स्वतःला आवरलं.+ आणि ज्या राष्ट्रांसमोर मी त्यांना* इजिप्तमधून बाहेर आणलं, त्या राष्ट्रांमध्ये माझ्या नावाची बदनामी होऊ नये म्हणून मी पाऊल उचललं.+ २३ तसंच, मी ओसाड रानात शपथ घेऊन त्यांना म्हणालो, की मी राष्ट्रा-राष्ट्रांत त्यांची पांगापांग करीन आणि देशा-देशांत त्यांना विखरून टाकीन.+ २४ कारण त्यांनी माझे न्याय-निर्णय पाळले नाहीत, माझे कायदे धुडकावून लावले,+ माझे शब्बाथ अपवित्र केले आणि ते आपल्या वाडवडिलांच्या घृणास्पद मूर्तींच्या मागे लागले.+ २५ जे कायदे चांगले नव्हते आणि ज्या न्याय-निर्णयांचं पालन केल्याने त्यांना जीवन मिळणार नव्हतं, ते मी त्यांना पाळू दिले.+ २६ मी त्यांना त्यांच्याच बलिदानांनी अपवित्र होऊ दिलं; त्यांनी प्रत्येक पहिल्या मुलाचा आगीत होम केला,*+ तेव्हा मी त्यांना अपवित्र होऊ दिलं. म्हणजे त्यांचा पूर्णपणे नाश व्हावा आणि त्यांना कळून यावं, की मी यहोवा आहे.”’
२७ म्हणून हे मनुष्याच्या मुला, इस्राएलच्या घराण्याशी बोल आणि त्यांना सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “तुमच्या वाडवडिलांनीही माझ्याशी अविश्वासूपणे वागून अशाच प्रकारे माझी निंदा केली. २८ मी त्यांना जो देश द्यायचं वचन दिलं होतं, त्या देशात मी त्यांना घेऊन गेलो.+ पण, तिथल्या उंच-उंच टेकड्या आणि हिरवीगार झाडं पाहून+ ते तिथे बलिदानं देऊ लागले. त्यांनी तिथे अर्पणं देऊन माझा क्रोध भडकवला. तसंच, त्यांनी तिथे सुगंधी धूप म्हणून बलिदानं जाळली आणि पेयार्पणंही ओतली. २९ म्हणून मी त्यांना विचारलं, ‘तुम्ही त्या उच्च स्थानावर कशाला जाता? (आजही त्या जागेला उच्च स्थान म्हटलं जातं.)’”’+
३० आता तू इस्राएलच्या घराण्याला सांग, ‘सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “तुमचे वाडवडील आपल्या घृणास्पद मूर्तींच्या नादी लागले आणि त्यांची उपासना करू लागले.* तुम्हीही तसंच वागून स्वतःला अशुद्ध करून घेताय का?+ ३१ तुम्ही आजपर्यंत तुमच्या सगळ्या घृणास्पद मूर्तींसमोर बलिदानं अर्पण करून आणि तुमच्या मुलांचा आगीत होम करून स्वतःला अशुद्ध करत आला आहात.+ आणि असं असताना, हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, मी तुम्हाला उत्तर द्यावं का?”’+
सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला उत्तर देणार नाही.+ ३२ तुम्ही जेव्हा म्हणता, “चला आपण इतर राष्ट्रांसारखं होऊ; लाकडाची आणि दगडाची पूजा* करणाऱ्या इतर देशांतल्या लोकांसारखं होऊ,” तेव्हा तुमच्या मनात काय चाललेलं असतं हे मला चांगलं माहीत आहे.+ पण तसं मुळीच घडणार नाही.’”
३३ “सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘मी माझ्या जीवनाची शपथ घेऊन सांगतो, की मी माझा सामर्थ्यशाली हात उगारून आणि क्रोधाचा वर्षाव करून तुमच्यावर राजा म्हणून राज्य करीन.+ ३४ ज्या राष्ट्रांमध्ये आणि देशांमध्ये तुमची पांगापांग झाली आहे तिथून मी तुम्हाला बाहेर आणीन; मी माझा सामर्थ्यशाली हात उगारून आणि क्रोधाचा वर्षाव करून तुम्हाला तिथून गोळा करीन.+ ३५ मी तुम्हाला राष्ट्रांच्या ओसाड रानात आणीन आणि तिथे तुमच्याशी समोरासमोर खटला लढीन.+
३६ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘मी इजिप्तच्या ओसाड रानात जसा तुमच्या वाडवडिलांशी खटला लढला होता, तसाच तुमच्याशीही लढीन. ३७ मी तुम्हाला मेंढपाळाच्या काठीखालून जायला लावीन+ आणि करार पाळायला लावीन. ३८ आणि मी तुमच्यामधून बंड करणाऱ्यांना व माझ्याविरुद्ध अपराध करणाऱ्यांना काढून टाकीन.+ ते ज्या विदेशी लोकांच्या देशात राहत आहेत, तिथून मी त्यांना बाहेर आणीन, पण ते इस्राएल देशात परत येऊ शकणार नाहीत.+ तेव्हा तुम्हाला कळून येईल, की मी यहोवा आहे.’
३९ हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘जा, खुशाल तुमच्या घृणास्पद मूर्तींची पूजा करा.+ मग त्यानंतर तुम्ही माझी आज्ञा जरी पाळली नाही, तरी तुमच्या बलिदानांनी आणि घृणास्पद मूर्तींनी माझ्या पवित्र नावाचा अपमान होणार नाही.’+
४० ‘कारण, इस्राएलच्या घराण्यातले सगळे लोक देशात माझ्या पवित्र पर्वतावर, इस्राएलच्या उंच पर्वतावर+ माझी सेवा करतील,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.+ ‘तिथे मी तुमचा स्वीकार करीन, आणि तिथे तुम्ही माझ्यासाठी तुमच्या सर्व पवित्र वस्तू, म्हणजे तुमची दानं आणि सगळ्यात चांगली अर्पणं आणावीत अशी मी अपेक्षा करीन.+ ४१ ज्या राष्ट्रांमध्ये आणि देशांमध्ये तुमची पांगापांग झाली, तिथून मी तुम्हाला जेव्हा बाहेर काढून गोळा करीन,+ तेव्हा तुम्ही अर्पण केलेल्या सुगंधी धूपामुळे मला आनंद होईल. आणि ज्या प्रकारे मी तुमच्याशी वागेन त्यामुळे सगळ्या राष्ट्रांना माझी पवित्रता दिसून येईल.’+
४२ ‘मी जो देश तुमच्या वाडवडिलांना देण्याचं वचन दिलं होतं, त्या इस्राएल देशात मी जेव्हा तुम्हाला आणीन,+ तेव्हा तुम्हाला कळून येईल की मी यहोवा आहे.+ ४३ तिथे तुम्हाला तुमचं वागणं आठवेल. आणि जी सगळी कामं करून तुम्ही स्वतःला अशुद्ध केलं ती सर्व कामंही तुम्हाला आठवतील.+ तुम्ही केलेल्या सगळ्या वाईट गोष्टींमुळे तुम्हाला तुमचीच किळस वाटेल.+ ४४ हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो! मी तुमच्याशी तुमच्या वाईट वागणुकीप्रमाणे किंवा दुष्ट कामांप्रमाणे वागणार नाही. मी माझ्या नावासाठी पाऊल उचलेन. मी जेव्हा असं करीन, तेव्हा तुम्हाला कळून येईल की मी यहोवा आहे,’ असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.”+
४५ मग यहोवाकडून मला परत असा संदेश मिळाला: ४६ “हे मनुष्याच्या मुला, दक्षिणेकडे आपलं तोंड वळव आणि घोषणा कर. दक्षिणेकडच्या जंगलाबद्दल भविष्यवाणी कर. ४७ दक्षिणेकडच्या जंगलाला सांग, ‘यहोवा काय म्हणतो ते ऐक. सर्वोच्च प्रभू यहोवा असं म्हणतो: “मी तुला आग लावीन.+ आणि त्या आगीत तुझ्यातलं प्रत्येक हिरवंगार झाड आणि प्रत्येक सुकलेलं झाड भस्म होऊन जाईल. ती आग विझवली जाणार नाही.+ दक्षिणेपासून उत्तरेपर्यंत प्रत्येकाला त्याची झळ बसेल. ४८ तेव्हा सगळ्या लोकांना दिसून येईल, की मी यहोवानेच जंगलाला आग लावली आहे, आणि ती विझवली जाणार नाही.”’”+
४९ मग मी म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा! हे लोक माझ्याविषयी म्हणतात, ‘हा माणूस तर नेहमी कोड्यात बोलतो.’”