यहेज्केल
११ मग, पवित्र शक्तीने* मला उचलून यहोवाच्या मंदिराच्या पूर्वेकडे असलेल्या दरवाजाजवळ आणलं; त्या दरवाजाचं तोंड पूर्व दिशेला होतं.+ तिथे मंदिराच्या प्रवेशाजवळ मला २५ माणसं दिसली. त्यांच्यामध्ये अज्जूरचा मुलगा याजन्या आणि बनायाचा मुलगा पलत्याह हेही होते. ते लोकांचे अधिकारी होते.+ २ मग देव मला म्हणाला: “मनुष्याच्या मुला, कटकारस्थानं करणारी आणि या शहरात* लोकांना वाईट सल्ला देणारी माणसं ती हीच आहेत. ३ ती म्हणतात, ‘ही घरंदारं बांधायची वेळ आहे.+ ही नगरी* एक कढई आहे+ आणि आपण तिच्यातलं मांस आहोत.’
४ “म्हणून हे मनुष्याच्या मुला, त्यांच्याविरुद्ध भविष्यवाणी कर. भविष्यवाणी केल्याशिवाय राहू नकोस.”+
५ मग यहोवाची पवित्र शक्ती* माझ्यावर कार्य करू लागली.+ देव मला म्हणाला: “तू असं म्हण, ‘यहोवा म्हणतो: “हे इस्राएलच्या घराण्यातल्या लोकांनो, तुम्ही अगदी बरोबर बोललात. तुमच्या डोक्यात काय विचार चालले आहेत, तेपण मी चांगलं ओळखून आहे. ६ तुमच्यामुळेच या नगरीतल्या अनेक लोकांना आपला जीव गमवावा लागलाय, आणि त्यांच्या प्रेतांनी तुम्ही तिचे रस्ते भरून टाकलेत.”’”+ ७ “म्हणून सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो: ‘ही नगरी तर कढई आहेच. पण या संपूर्ण नगरीत तुम्ही जी प्रेतं इथे-तिथे फेकली आहेत, ती खरंतर तिच्यातलं मांस आहे.+ आणि तुमच्या बाबतीत म्हणायचं, तर तुम्हाला तिच्यातून बाहेर काढून टाकलं जाईल.’”
८ सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, ‘तुम्ही तलवारीला घाबरता,+ पण मी तुमच्याविरुद्ध तलवारच आणीन.’ ९ ‘मी तुम्हाला या नगरीतून बाहेर काढून विदेश्यांच्या हाती देईन आणि तुम्हाला शिक्षा करीन.+ १० तुम्ही तलवारीला बळी पडाल.+ आणि मी इस्राएलच्या सीमेवर तुमचा न्याय करीन.+ तेव्हा तुम्हाला समजेल, की मी यहोवा आहे.+ ११ मग ही नगरी तुमच्यासाठी कढई राहणार नाही आणि तुम्हीसुद्धा तिच्यातलं मांस असणार नाहीत. मी जेव्हा इस्राएलच्या सीमेवर तुमचा न्याय करीन, १२ तेव्हा तुम्हाला समजून येईल, की मी यहोवा आहे. कारण तुम्ही माझ्या कायद्यांप्रमाणे आणि न्याय-निर्णयांप्रमाणे नाही,+ तर आजूबाजूच्या राष्ट्रांच्या नियमांप्रमाणे चाललात.’”+
१३ मी ही भविष्यवाणी करून झाल्यानंतर लगेच बनायाचा मुलगा पलत्याह मरून पडला. तेव्हा मी जमिनीवर पालथा पडलो आणि मोठ्या आवाजात म्हणालो: “हे सर्वोच्च प्रभू यहोवा, तू इस्राएलच्या उरलेल्या सगळ्या लोकांचा नाश करणार आहेस का?”+
१४ मग पुन्हा एकदा मला यहोवाकडून संदेश मिळाला. तो मला म्हणाला: १५ “मनुष्याच्या मुला! यरुशलेमचे रहिवासी तुझ्या भावांना, म्हणजे तुझ्या भावांपैकी ज्यांना सोडवण्याचा हक्क आहे त्यांना, आणि त्यांच्यासोबत इस्राएलच्या संपूर्ण घराण्यातल्या लोकांना असं म्हणालेत, ‘यहोवापासून दूर राहा. हा आमचा देश आहे; हा आमच्या ताब्यात देण्यात आलाय.’ १६ म्हणून तू असं म्हण: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, “मी त्यांना राष्ट्रांमध्ये जरी घालवून दिलंय आणि देशा-देशांत जरी त्यांची पांगापांग केली आहे,+ तरी ते ज्या देशांमध्ये गेलेत तिथे मी थोड्या काळाकरता त्यांच्यासाठी एक मंदिर होईन.”’+
१७ म्हणून तू असं म्हण: ‘सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो, “ज्या राष्ट्रांमध्ये आणि ज्या देशांमध्ये तुमची पांगापांग झाली आहे, तिथून मी तुम्हाला परत गोळा करून एकत्र आणीन, आणि तुम्हाला इस्राएल देश देईन.”+ १८ ते सगळे आपल्या देशात परत येतील आणि तिथली सगळी घृणास्पद कामं व किळसवाण्या गोष्टी काढून टाकतील.+ १९ मी त्या सगळ्यांचं हृदय एक करीन+ आणि त्यांच्यामध्ये नवीन मनोवृत्ती निर्माण करीन.+ मी त्यांचं दगडाचं हृदय काढून+ त्यांना मांसाचं हृदय* देईन.+ २० म्हणजे ते माझ्या कायद्यांप्रमाणे चालतील आणि माझे न्याय-निर्णय पाळतील. मग ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.’
२१ ‘“पण जे लोक आपलं मन घृणास्पद कामं आणि किळसवाण्या गोष्टी करण्याकडेच लावतात, त्यांना मी त्यांच्या कामांचे परिणाम भोगायला लावीन,” असं सर्वोच्च प्रभू यहोवा म्हणतो.’”
२२ त्यानंतर, करुबांनी उडण्यासाठी आपले पंख पसरले आणि त्यांच्या बाजूला ती चाकंही होती.+ त्यांच्या वरती इस्राएलच्या देवाचं तेज पसरलं होतं.+ २३ मग यहोवाचं तेज+ शहरातून वर गेलं आणि शहराच्या पूर्वेकडे असलेल्या डोंगरावर जाऊन थांबलं.+ २४ मग देवाच्या पवित्र शक्तीद्वारे मिळालेल्या दृष्टान्तात, पवित्र शक्तीने* मला उचलून खास्द्यांच्या देशात बंदिवासात असलेल्या लोकांकडे आणलं. त्यानंतर, मी पाहत असलेला दृष्टान्त संपला. २५ मग, यहोवाने ज्या सगळ्या गोष्टी मला दाखवल्या होत्या, त्या मी बंदिवासात असलेल्या लोकांना सांगू लागलो.