यिर्मया
२४ बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदाच्या राजाला, म्हणजे यहोयाकीमचा मुलगा+ यखन्या*+ याला यरुशलेममधून बाबेलला बंदी बनवून नेलं. तसंच, त्याने यहूदाच्या अधिकाऱ्यांना, कारागिरांना आणि धातूकाम करणाऱ्यांनाही* बंदिवासात नेलं.+ त्यानंतर, यहोवाने मला अंजिरांनी भरलेल्या दोन टोपल्या दाखवल्या. त्या यहोवाच्या मंदिरासमोर ठेवल्या होत्या. २ एका टोपलीत खूप चांगली अंजिरं होती; पहिल्या हंगामातल्या पिकलेल्या फळांसारखी ती होती. तर दुसऱ्या टोपलीत खूप खराब अंजिरं होती; कोणीही खाऊ शकणार नाही इतकी ती खराब होती.
३ मग यहोवाने मला विचारलं: “यिर्मया, तुला काय दिसतंय?” तेव्हा मी म्हणालो: “मला अंजिरं दिसत आहेत. चांगली अंजिरं खूप चांगली आहेत. पण खराब अंजिरं इतकी खराब आहेत, की ती खाण्यालायक नाहीत.”+
४ मग यहोवाकडून मला असा संदेश मिळाला: ५ “इस्राएलचा देव यहोवा म्हणतो, ‘मी ज्यांना या ठिकाणाहून खास्दी लोकांच्या देशात बंदिवासात पाठवलंय, त्या यहूदाच्या लोकांना मी या चांगल्या अंजिरांसारखं समजेन. ६ त्यांचं भलं व्हावं म्हणून माझं लक्ष कायम त्यांच्यावर राहील. आणि मी त्यांना परत या देशात घेऊन येईन.+ मी त्यांचा नाश करणार नाही, तर त्यांची भरभराट करीन. मी त्यांना मुळासकट उपटून टाकणार नाही, तर त्यांना रोपासारखं लावीन.+ ७ आणि मी यहोवा आहे हे ओळखणारं हृदय मी त्यांना देईन.+ ते माझे लोक होतील आणि मी त्यांचा देव होईन.+ कारण ते पूर्ण मनाने माझ्याकडे परत येतील.+
८ पण खाण्यालायक नसलेल्या खराब अंजिरांबद्दल+ यहोवा असं म्हणतो: “यहूदाचा राजा सिद्कीया,+ त्याचे अधिकारी आणि या देशात व इजिप्तमध्ये राहत असलेले यरुशलेमचे उरलेले लोक यांना+ मी या खराब अंजिरांसारखं समजेन. ९ मी त्यांच्यावर असं संकट आणीन आणि त्यांची अशी दशा करीन, की ती पाहून पृथ्वीवरच्या सगळ्या राज्यांना दहशत बसेल.+ जिथे-जिथे मी त्यांची पांगापांग करीन,+ तिथे-तिथे लोक त्यांची निंदा करतील, त्यांची टर उडवायला म्हणी रचतील, त्यांची थट्टा करतील आणि त्यांना शिव्याशाप देतील.+ १० आणि जो देश मी त्यांना आणि त्यांच्या वाडवडिलांना दिला होता, त्यातून त्यांचा पूर्णपणे नाश होईपर्यंत मी त्यांच्यावर दुष्काळ, तलवार+ आणि रोगराई पाठवीन.”’”+