एज्रा
५ मग संदेष्टा हाग्गय+ आणि इद्दोचा+ नातू म्हणजे संदेष्टा जखऱ्या+ हे त्यांच्यासोबत असलेल्या इस्राएलच्या देवाच्या नावाने, यहूदा आणि यरुशलेम इथल्या यहुद्यांना संदेश सांगू लागले. २ तेव्हा शल्तीएलचा मुलगा जरूब्बाबेल+ आणि यहोसादाकचा मुलगा येशूवा+ यरुशलेममध्ये असलेलं देवाचं मंदिर पुन्हा बांधू लागले.+ देवाचे संदेष्टे त्यांच्यासोबत होते आणि ते त्यांची हिंमत वाढवत राहिले.+ ३ त्या वेळी नदीपलीकडच्या* प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, तसंच शथर-बोजनइ आणि त्यांचे सोबती, यहुद्यांकडे येऊन त्यांना विचारू लागले: “हे मंदिर बनवण्याची आणि बांधकाम* उभं करण्याची आज्ञा तुम्हाला कोणी दिली?” ४ शिवाय, त्यांनी असंही विचारलं: “या इमारतीचं काम करणाऱ्यांची नावं काय आहेत?” ५ पण यहुदी वडीलजनांवर देवाचं लक्ष होतं,+ म्हणून ही बातमी दारयावेश राजाला पाठवेपर्यंत आणि त्याच्याकडून याबद्दल राजपत्र येईपर्यंत, त्यांनी यहुद्यांना थांबवलं नाही.
६ नदीपलीकडच्या प्रदेशाचा राज्यपाल ततनइ, तसंच शथर-बोजनइ, त्याचे सोबती आणि उपराज्यपाल यांनी दारयावेश राजाला पाठवलेल्या पत्राची ही प्रत आहे; ७ त्यांनी असं लिहून राजाला ही बातमी कळवली:
“महाराज दारयावेश यांना:
तुम्हाला शांती असो! ८ महाराजांना आम्हाला असं कळवायचं आहे, की आम्ही यहूदा प्रांतात, महान देवाच्या मंदिराकडे गेलो होतो. मंदिर बांधण्यासाठी मोठमोठे दगड वापरले जात आहेत, तसंच लाकडं वापरून त्याच्या भिंती उभ्या केल्या जात आहेत. लोक मोठ्या उत्साहाने काम करत आहेत आणि त्यांच्या मेहनतीमुळे काम जोरात चाललं आहे. ९ तेव्हा आम्ही त्यांच्या वडीलजनांना विचारलं: ‘हे मंदिर बनवण्याची आणि बांधकाम* उभं करण्याची आज्ञा तुम्हाला कोणी दिली?’+ १० तसंच, त्यांच्यात पुढाकार घेणाऱ्या माणसांची नावं तुम्हाला कळवता यावीत, म्हणून आम्ही त्यांची नावंही विचारली.
११ त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं: ‘आम्ही स्वर्गाच्या आणि पृथ्वीच्या देवाचे सेवक आहोत. इस्राएलच्या एका महान राजाने, जे मंदिर अनेक वर्षांपूर्वी बांधलं होतं,+ ते आता आम्ही पुन्हा बांधत आहोत. १२ आमच्या वाडवडिलांच्या वाईट वागणुकीमुळे त्यांच्यावर स्वर्गाच्या देवाचा क्रोध भडकला;+ म्हणून त्याने त्यांना बाबेलचा खास्दी राजा नबुखद्नेस्सर याच्या हाती दिलं.+ त्या राजाने या मंदिराचा नाश केला+ आणि तो त्यांना बंदी बनवून बाबेलला घेऊन गेला.+ १३ पण, बाबेलचा राजा कोरेश याने आपल्या शासनकाळाच्या पहिल्या वर्षी, देवाचं हे मंदिर पुन्हा बांधण्याचं फर्मान काढलं.+ १४ इतकंच नाही, तर नबुखद्नेस्सरने जी सोन्याचांदीची भांडी यरुशलेमच्या मंदिरातून आणून बाबेलच्या मंदिरात ठेवली होती, ती कोरेश राजाने तिथून बाहेर काढली.+ कोरेशने राज्यपाल म्हणून नेमलेल्या शेशबस्सर*+ नावाच्या माणसाकडे, ती सर्व भांडी देण्यात आली. १५ कोरेश त्याला म्हणाला: “ही भांडी घे आणि यरुशलेममधल्या मंदिरात जाऊन ठेव. देवाचं मंदिर आपल्या मूळ ठिकाणी पुन्हा बांधलं जावं.”+ १६ तेव्हा शेशबस्सरने येऊन यरुशलेममधल्या देवाच्या मंदिराचा पाया घातला+ आणि तेव्हापासून मंदिराचं काम चालू आहे, पण अजून ते पूर्ण झालेलं नाही.’+
१७ म्हणून आता महाराजांना योग्य वाटत असेल, तर त्यांनी बाबेलच्या शाही खजिन्यात शोध करावा आणि यरुशलेममधलं देवाचं मंदिर बांधण्याची आज्ञा कोरेश राजाने दिली होती की नाही याची खातरी करावी.+ मग याविषयी महाराजांचा जो काही निर्णय असेल तो आम्हाला कळवावा.”