२ इतिहास
७ शलमोनची प्रार्थना संपली+ तेव्हा लगेच स्वर्गातून अग्नी आला,+ आणि त्या अग्नीने होमार्पण व बलिदानं भस्म केली. आणि मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं.+ २ यहोवाचं मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेल्यामुळे याजक यहोवाच्या मंदिरात जाऊ शकले नाहीत.+ ३ ज्या वेळी स्वर्गातून अग्नी आला आणि मंदिर यहोवाच्या तेजाने भरून गेलं, त्या वेळी सगळे इस्राएली लोक ते पाहत होते. तेव्हा त्यांनी खाली फरशीवर डोकं टेकवून दंडवत घातला आणि यहोवाचे आभार मानले, “कारण तो चांगला आहे; त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”
४ मग राजाने आणि सगळ्या लोकांनी यहोवासमोर बलिदानं अर्पण केली.+ ५ शलमोन राजाने २२,००० गाय-बैल आणि १,२०,००० मेंढरं अर्पण केली. अशा प्रकारे, राजाने आणि सगळ्या लोकांनी खऱ्या देवाच्या मंदिराचं उद्घाटन केलं.+ ६ याजक आपल्या नेमलेल्या ठिकाणी उभे होते. आणि यहोवासाठी गीत गायलं जात असताना, लेवीसुद्धा संगीत वाद्यं वाजवण्यासाठी आपल्या जागी उभे होते.+ (दावीद राजाने ही वाद्यं यहोवाचे आभार मानण्यासाठी आणि त्यांच्यासोबत* त्याची स्तुती करण्यासाठी बनवली होती—“कारण त्याचं एकनिष्ठ प्रेम कायम राहतं.”) लेव्यांसमोर उभे असलेले याजक मोठ्याने कर्णे वाजवत होते.+ आणि सर्व इस्राएली लोकही उभे होते.
७ मग, शांती-अर्पणांची चरबी आणि होमार्पणं वाहण्यासाठी+ शलमोनने यहोवाच्या मंदिरासमोर असलेल्या अंगणाचा मधला भाग पवित्र केला. कारण होमार्पणं, चरबी+ आणि अन्नार्पणं वाहण्यासाठी+ शलमोनने बनवलेली तांब्याची वेदी+ लहान पडत होती. ८ त्या वेळी, शलमोनने संपूर्ण इस्राएलसोबत, म्हणजे लेबो-हमाथपासून* ते थेट इजिप्तच्या ओढ्यापर्यंतच्या+ मोठ्या मंडळीसोबत सात दिवस सण साजरा केला.+ ९ आणि आठव्या दिवशी* त्यांनी एक पवित्र सभा भरवली.+ कारण त्यांनी सात दिवस वेदीचं समर्पण* केलं होतं आणि सात दिवस सण साजरा केला होता. १० मग सातव्या महिन्याच्या २३ व्या दिवशी शलमोनने लोकांना निरोप दिला. आणि लोक मोठा जल्लोष करत आपापल्या घरी गेले.+ यहोवाने दावीदला, शलमोनला आणि आपल्या इस्राएली लोकांना जो चांगुलपणा दाखवला होता, त्यामुळे त्यांची मनं आनंदाने भरून गेली होती.+
११ अशा प्रकारे, शलमोनने यहोवाच्या मंदिराचं आणि आपल्या राजमहालाचं+ बांधकाम पूर्ण केलं. तसंच, यहोवाच्या मंदिराविषयी आणि आपल्या राजमहालाविषयी त्याच्या मनात जे काही होतं ते सगळं त्याने यशस्वीपणे पूर्ण केलं.+ १२ यहोवाने मग शलमोनला रात्री दर्शन दिलं.+ तो त्याला म्हणाला: “मी तुझी प्रार्थना ऐकली आहे. आणि मी हे स्थान, बलिदानं अर्पण करण्याची जागा म्हणून निवडलंय.+ १३ मी आकाशाची दारं बंद केल्यामुळे जर पाऊस पडला नाही; किंवा मी नाकतोड्यांना आज्ञा दिल्यामुळे जर त्यांनी देशातलं पीक फस्त केलं; किंवा मी जर लोकांवर रोगाची साथ पाठवली, १४ आणि त्यामुळे माझ्या नावाने ओळखल्या+ जाणाऱ्या लोकांनी जर स्वतःला नम्र केलं,+ मला प्रार्थना केली, मला शोधलं आणि आपले वाईट मार्ग सोडून दिले,+ तर मी स्वर्गातून त्यांची प्रार्थना ऐकून त्यांच्या पापांची क्षमा करीन, आणि त्यांची जमीन पुन्हा सुपीक करीन.+ १५ या ठिकाणी केल्या जाणाऱ्या प्रार्थनेकडे माझे डोळे आणि कान लागलेले असतील.+ १६ हे मंदिर कायम माझ्या नावाने ओळखलं जावं, म्हणून मी ते निवडलंय+ आणि पवित्र केलंय. माझी दृष्टी आणि माझं मन नेहमी इथे राहील.+
१७ आणि तुझे वडील दावीद यांच्यासारखंच जर तू माझ्या आज्ञेप्रमाणे सर्वकाही केलंस, माझे न्याय-निर्णय आणि कायदे पाळलेस,+ १८ तर मी तुझ्या वडिलांशी, दावीदशी केलेल्या कराराप्रमाणे तुझं राजासन कायमचं स्थापन करीन.+ मी दावीदशी असा करार केला होता:+ ‘इस्राएलवर राज्य करायला तुझ्या वंशाचा एकही पुरुष नाही, असं कधीही होणार नाही.’+ १९ पण जर तू माझ्या मार्गांपासून भरकटलास, मी दिलेल्या आज्ञांचं व कायद्यांचं तू पालन केलं नाहीस आणि जाऊन दुसऱ्या दैवतांची उपासना केलीस व त्यांच्या पाया पडलास,+ २० तर मी इस्राएली लोकांना जो देश दिलाय त्यातून मी त्यांना मुळासकट उपटून टाकीन.+ आणि माझ्या नावाच्या गौरवासाठी पवित्र केलेलं हे मंदिर मी माझ्या नजरेपासून दूर करीन; आणि हे मंदिर सर्व राष्ट्रांतल्या लोकांमध्ये थट्टेचा आणि निंदेचा विषय बनेल.+ २१ हे मंदिर उद्ध्वस्त होऊन त्याचा ढिगारा बनेल. येणारा-जाणारा प्रत्येक जण ते पाहून चकित होईल+ आणि म्हणेल: ‘यहोवाने या देशाची आणि या मंदिराची अशी दशा का केली?’+ २२ मग ते म्हणतील, ‘कारण ज्या देवाने त्यांच्या पूर्वजांना इजिप्त देशातून बाहेर आणलं,+ त्या यहोवा देवाला त्यांनी सोडून दिलं.+ त्यांनी इतर दैवतांना जवळ केलं आणि त्यांच्या पाया पडून त्यांची उपासना केली.+ म्हणूनच त्याने हे संकट त्यांच्यावर आणलंय.’”+