२ इतिहास
११ रहबाम यरुशलेमला आला तेव्हा त्याने लगेच यहूदाच्या आणि बन्यामीनच्या+ घराण्याला एकत्र केलं. इस्राएलविरुद्ध लढाई करून आपलं राज्य परत मिळवायला रहबामने १,८०,००० प्रशिक्षित* योद्धे जमवले.+ २ मग यहोवा शमाया+ संदेष्ट्याला* म्हणाला: ३ “यहूदाचा राजा, म्हणजे शलमोनचा मुलगा रहबाम याला आणि यहूदा व बन्यामीन इथल्या सगळ्या इस्राएली लोकांना असं सांग, की ४ ‘यहोवा म्हणतो: “आपल्या भावांशी जाऊन लढू नका. प्रत्येकाने आपापल्या घरी परत जावं. कारण मीच हे घडवून आणलंय.”’”+ तेव्हा लोकांनी यहोवाचं म्हणणं ऐकलं आणि ते सर्व आपापल्या घरी निघून गेले. ते यराबामशी लढायला गेले नाहीत.
५ रहबाम यरुशलेममध्ये राहू लागला आणि त्याने यहूदामधली शहरं मजबूत केली. ६ त्याने या शहरांची मजबुती केली: बेथलेहेम,+ एटाम, तकोवा,+ ७ बेथ-सूर, सोखो,+ अदुल्लाम,+ ८ गथ,+ मारेशा, जीफ,+ ९ अदोरइम, लाखीश,+ अजेका,+ १० सरा, अयालोन+ आणि हेब्रोन;+ त्याने मजबूत केलेली ही सर्व शहरं यहूदाच्या आणि बन्यामीनच्या प्रदेशांतली होती. ११ त्याने या तटबंदीच्या* शहरांमध्ये सेनाधिकारी नेमून आणि त्यांना अन्नसामग्री, तेल व द्राक्षारस पुरवून ती शहरं बळकट केली. १२ तसंच, प्रत्येक शहर आणखी मजबूत करण्यासाठी त्याने त्यांना मोठमोठ्या ढाली व भालेही पुरवले. आणि यहूदाचे व बन्यामीनचे लोक त्याच्या अधिकाराखाली राहिले.
१३ रहबामला पाठिंबा द्यायला संपूर्ण इस्राएलमधले याजक आणि लेवी आपापले प्रदेश सोडून त्याच्याकडे आले. १४ यहोवासाठी याजक म्हणून सेवा करणाऱ्या या लेव्यांना, यराबामने आणि त्याच्या मुलांनी याजक पदावरून काढून टाकलं होतं.+ त्यामुळे ते आपापली मालमत्ता आणि कुरणं सोडून+ यहूदा आणि यरुशलेमला आले. १५ मग यराबामने बकऱ्यांसारख्या दैवतांची+ आणि आपण बनवलेल्या वासरांच्या मूर्तींची+ सेवा करण्यासाठी उच्च स्थानांवर* स्वतःचे याजक नेमले.+ १६ पण इस्राएलच्या वंशांतल्या ज्या सगळ्या लोकांनी इस्राएलचा देव यहोवा याची उपासना करण्याचा निश्चय केला होता, ते सगळे आपल्या पूर्वजांचा देव यहोवा याला बलिदान अर्पण करायला लेव्यांमागे यरुशलेमला आले.+ १७ त्यांनी तीन वर्षं यहूदाच्या राज्याला बळकटी दिली आणि शलमोनचा मुलगा रहबाम याला पाठिंबा दिला. कारण तीन वर्षं ते दावीद आणि शलमोन यांच्या पावलांवर पाऊल ठेवून चालत राहिले.
१८ मग रहबामने महलथ हिच्याशी लग्न केलं. महलथ ही यरीमोथ आणि अबीहईल यांची मुलगी होती. यरीमोथ हा दावीदचा मुलगा होता, तर अबीहईल ही इशायचा मुलगा अलीयाब+ याची मुलगी होती. १९ काही काळाने रहबामला महलथपासून यऊश, शमरयाह आणि जाहम ही मुलं झाली. २० महलथनंतर, त्याने माकासोबत लग्न केलं. माका ही अबशालोमची+ नात होती. काही काळाने रहबामला माकापासून अबीया,+ अत्तय, जीजा आणि शलोमीथ ही मुलं झाली. २१ रहबामला १८ बायका आणि ६० उपपत्नी होत्या.+ त्याला २८ मुलं आणि ६० मुली झाल्या. आपल्या सगळ्या बायका आणि उपपत्नी यांच्यापेक्षा रहबामचं अबशालोमची मुलगी माका हिच्यावर सर्वात जास्त प्रेम होतं. २२ म्हणून रहबामने माकाचा मुलगा अबीया याला त्याच्या सगळ्या भावांवर प्रमुख आणि पुढारी नेमलं. कारण रहबामला त्याला राजा बनवायचं होतं. २३ रहबाम मोठ्या हुशारीने वागला. त्याने आपल्या मुलांपैकी काहींना यहूदा आणि बन्यामीन प्रदेशांत असलेल्या तटबंदीच्या वेगवेगळ्या शहरांत पाठवलं.*+ त्याने त्यांना भरपूर अन्नसामग्री पुरवली आणि बऱ्याच बायका करून दिल्या.