२ राजे
४ एकदा, संदेष्ट्यांच्या पुत्रांपैकी*+ एकाची बायको अलीशाकडे आली. ती त्याच्यापुढे रडून म्हणू लागली: “माझ्या नवऱ्याचा, तुमच्या सेवकाचा मृत्यू झालाय. आणि तुम्हाला तर माहीतच आहे, की तुमचा हा सेवक नेहमी यहोवाला भिऊन वागायचा.+ माझ्या नवऱ्याने एका माणसाकडून कर्ज घेतलं होतं. आणि आता तो माणूस माझ्या दोन्ही मुलांना दास करून न्यायला आलाय.” २ त्यावर अलीशा तिला म्हणाला: “मी तुझ्यासाठी काय करावं अशी तुझी इच्छा आहे? मला सांग, तुझ्याकडे घरात काय आहे?” ती म्हणाली: “तुमच्या या दासीकडे, एका भांड्यात* थोडं तेल आहे;+ त्याशिवाय घरात दुसरं काहीही नाही.” ३ तेव्हा तो तिला म्हणाला: “तुझ्या सगळ्या शेजाऱ्यांकडे जा आणि त्यांच्याकडे रिकामी भांडी माग; मिळतील तेवढी भांडी गोळा कर. ४ मग आपल्या मुलांना घेऊन घरात जा आणि दार लावून घे. त्यानंतर सगळ्या रिकाम्या भांड्यांत तेल भर, आणि भरलेली भांडी बाजूला ठेव.” ५ मग ती स्त्री तिथून निघाली.
घरी आल्यावर तिने मुलांना आत घेऊन दार लावलं. मग तिच्या मुलांनी तिला एकेक भांडं दिलं आणि ती त्यात तेल ओतत गेली.+ ६ सर्व भांडी भरल्यावर ती तिच्या मुलाला म्हणाली: “आणखी एक भांडं दे.”+ पण तो म्हणाला: “आता एकही भांडं उरलं नाही.” त्या वेळी तेल यायचं बंद झालं.+ ७ मग त्या स्त्रीने खऱ्या देवाच्या माणसाकडे जाऊन त्याला ही गोष्ट सांगितली. तेव्हा तो तिला म्हणाला: “आता बाजारात जाऊन ते तेल वीक आणि तुझं जे काही कर्ज असेल ते फेडून टाक. आणि उरलेल्या पैशांतून तुझ्या आणि तुझ्या मुलांच्या पोटापाण्याची सोय कर.”
८ एक दिवस अलीशा शूनेमला+ गेला. तिथे राहणाऱ्या एका प्रतिष्ठित स्त्रीने त्याला जेवणाचा आग्रह केला.+ अलीशा जेव्हा-जेव्हा तिथून जायचा, तेव्हा-तेव्हा तो तिच्याकडे जेवायला थांबायचा. ९ एकदा ती स्त्री आपल्या नवऱ्याला म्हणाली: “इथून नेहमी जाणारा हा माणूस नक्कीच देवाचा खास सेवक असावा. १० म्हणून आपण त्याच्यासाठी घराच्या छतावर एक लहान खोली बांधू या.+ आणि त्यात एक पलंग, मेज, खुर्ची आणि एक दिवा ठेवू या; म्हणजे जेव्हाही तो आपल्याकडे येईल, तेव्हा त्याला तिथे राहता येईल.”+
११ एक दिवस अलीशा तिथे आला आणि छतावरच्या त्या खोलीत आराम करायला गेला. १२ मग तो आपला सेवक गेहजी+ याला म्हणाला: “त्या शूनेमकरीण+ स्त्रीला बोलावून आण.” तेव्हा गेहजीने तिला बोलावलं. १३ मग अलीशा गेहजीला म्हणाला: “तिला विचार, ‘तू आमच्यासाठी खूप कष्ट घेतलेस;+ तर आता सांग, मी तुझ्यासाठी काय करू शकतो?+ मी राजाकडे+ किंवा सेनापतीकडे तुझी शिफारस करू का?’” पण ती म्हणाली: “मी माझ्या लोकांमध्ये सुखात आहे.” १४ म्हणून मग अलीशाने गेहजीला विचारलं: “तिच्यासाठी दुसरं काही करता येईल का?” त्यावर गेहजी म्हणाला: “तिला मुलगा नाही;+ आणि तिचा नवराही वयस्कर आहे.” १५ तेव्हा तो लगेच म्हणाला: “तिला बोलव.” म्हणून गेहजीने तिला बोलावलं आणि ती दाराजवळ येऊन उभी राहिली. १६ मग अलीशा तिला म्हणाला: “पुढच्या वर्षी या वेळी तुझ्या कुशीत मुलगा असेल.”+ पण ती म्हणाली: “माझ्या प्रभू, तुम्ही खऱ्या देवाचे माणूस आहात! तुमच्या या दासीसोबत असं खोटं बोलू नका.”
१७ पण अलीशाने सांगितलं होतं त्याप्रमाणे ती स्त्री गरोदर राहिली आणि पुढच्या वर्षी त्याच सुमारास तिला मुलगा झाला. १८ मुलगा मोठा झाल्यावर एक दिवस असं झालं, की त्याचे वडील शेतात कापणी करणाऱ्यांसोबत असताना तो त्यांच्याकडे गेला. १९ तो त्यांना म्हणत राहिला: “माझं डोकं खूप दुखतंय!” तेव्हा त्याचे वडील आपल्या सेवकाला म्हणाले: “याला त्याच्या आईकडे घेऊन जा.” २० म्हणून त्या सेवकाने त्या मुलाला उचलून त्याच्या आईकडे नेलं. दुपारपर्यंत तो मुलगा आपल्या आईच्या मांडीवरच बसून राहिला, आणि नंतर मेला.+ २१ तेव्हा तिने त्याला वरच्या खोलीत नेलं आणि खऱ्या देवाच्या माणसाच्या पलंगावर ठेवलं.+ मग खोलीचं दार लावून ती निघाली. २२ तिने आपल्या नवऱ्याला बोलावून म्हटलं: “कृपा करून, एक सेवक आणि एक गाढव माझ्यासाठी पाठवा; म्हणजे मी पटकन खऱ्या देवाच्या माणसाकडे जाऊन येते.” २३ पण तो तिला म्हणाला: “तू त्यांच्याकडे आज का चाललीस? आज तर नवचंद्राचा दिवसही*+ नाही आणि शब्बाथही नाही.” त्यावर ती म्हणाली: “काळजी करू नका, सगळं ठीक आहे.” २४ मग गाढव तयार करून ती त्यावर बसली आणि आपल्या सेवकाला म्हणाली: “लवकर चल. मी सांगत नाही तोपर्यंत गाढव हाकण्याचं थांबवू नकोस.”
२५ मग ती कर्मेल डोंगरावर खऱ्या देवाच्या माणसाकडे गेली. तिला दुरून पाहताच खऱ्या देवाचा माणूस आपल्या सेवकाला, गेहजीला म्हणाला: “ती पाहा! शूनेमकरीण स्त्री येत आहे. २६ धावत जा आणि तिला विचार: ‘तू ठीक आहेस ना? तुझा नवरा आणि तुझा मुलगा तर ठीक आहे ना?’” त्यावर ती म्हणाली: “सगळं ठीक आहे.” २७ ती डोंगरावर खऱ्या देवाच्या माणसाकडे आली आणि तिने लगेच त्याचे पाय धरले.+ तेव्हा गेहजी तिला दूर लोटण्यासाठी जवळ आला. पण खऱ्या देवाचा माणूस त्याला म्हणाला: “असू दे. तिला काही करू नकोस. ती फार दुःखी आहे. पण कशामुळे ते मला माहीत नाही. कारण यहोवाने मला ते सांगितलं नाही.” २८ मग ती म्हणाली: “माझ्या प्रभू! मी तुमच्याकडे मुलगा मागितला होता का? मी म्हणाले होते ना, ‘मला खोटी आशा दाखवू नका’?”+
२९ तेव्हा अलीशा लगेच गेहजीला म्हणाला: “आपला झगा कंबरेला बांध+ आणि माझी काठी घेऊन निघ. रस्त्यात कोणी भेटला तर त्याला नमस्कार करू नकोस; किंवा कोणी तुला नमस्कार केला तर त्याला उत्तर देऊ नकोस. जा आणि माझी काठी त्या मुलाच्या तोंडावर ठेव.” ३० त्यावर मुलाची आई अलीशाला म्हणाली: “जिवंत देव यहोवा याची शपथ आणि तुमच्या जिवाची शपथ, तुम्ही सोबत आल्याशिवाय मी जाणार नाही.”+ म्हणून मग अलीशा उठून तिच्यासोबत गेला. ३१ आणि गेहजी त्यांच्यापुढे गेला व त्याने जाऊन मुलाच्या तोंडावर काठी ठेवली. पण मुलाने काही हालचाल केली नाही किंवा आवाजही केला नाही.+ म्हणून गेहजी परत अलीशाकडे आला आणि म्हणाला: “मुलगा काही उठला नाही.”
३२ अलीशा घरात आला तेव्हा मेलेला मुलगा आपल्या पलंगावर असलेला त्याला दिसला.+ ३३ तो खोलीत गेला आणि त्याने दार लावून घेतलं; खोलीत ते दोघंच होते. मग अलीशा यहोवाला प्रार्थना करू लागला.+ ३४ नंतर पलंगावर जाऊन तो त्या मुलावर पालथा पडला; मुलाच्या तोंडाला तोंड, डोळ्यांना डोळे आणि हातांना हात लावून तो त्याच्यावर पालथा पडून राहिला. तेव्हा मुलाच्या शरीरात ऊब येऊ लागली.+ ३५ मग अलीशा घरात फेऱ्या मारू लागला. नंतर पुन्हा पलंगावर जाऊन तो मुलावर पालथा पडला. तेव्हा मुलगा सात वेळा शिंकला आणि नंतर त्याने आपले डोळे उघडले.+ ३६ मग अलीशाने गेहजीला बोलावून म्हटलं: “शूनेमकरीण स्त्रीला बोलव.” तेव्हा त्याने तिला बोलावलं आणि ती आली. मग अलीशा तिला म्हणाला: “आपल्या मुलाला उचलून घे.”+ ३७ तेव्हा ती स्त्री आत आली आणि तिने त्याच्या पायांजवळ, जमिनीवर पडून त्याला नमन केलं. नंतर आपल्या मुलाला उचलून ती बाहेर गेली.
३८ पुढे अलीशा गिलगालला परत गेला, तेव्हा देशात दुष्काळ पडला होता.+ एकदा संदेष्ट्यांचे पुत्र+ अलीशासमोर बसलेले असताना, तो आपल्या सेवकाला म्हणाला:+ “चुलीवर मोठं पातेलं ठेव आणि संदेष्ट्यांच्या पुत्रांसाठी खायला रस्सा बनव.” ३९ मग त्यांच्यापैकी एक जण रानात फळभाज्या गोळा करायला गेला. तेव्हा एका जंगली वेलीवर त्याला फळं दिसली. त्याने ती आपल्या ओटीत भरून आणली. नंतर त्याने ती चिरून पातेल्यात टाकली; ती फळं कसली आहेत हे त्याला माहीत नव्हतं. ४० नंतर त्यांनी तो रस्सा सर्व माणसांना वाढला. पण तो चाखताच ते ओरडू लागले: “हे खऱ्या देवाच्या माणसा! पातेल्यात विष आहे!” आणि कोणीही तो रस्सा खाऊ शकला नाही. ४१ तेव्हा अलीशा म्हणाला: “थोडं पीठ घेऊन या.” मग ते पीठ पातेल्यात टाकून तो म्हणाला: “आता लोकांना वाढा.” त्यानंतर पातेल्यात काहीही विषारी राहिलं नाही.+
४२ नंतर बआल-शालीशा+ इथून एक माणूस आला. त्याने खऱ्या देवाच्या माणसासाठी, जवाच्या पहिल्या उत्पन्नातून बनवलेल्या २० भाकरी+ आणि एक गोणी जवाची हिरवी कणसं आणली.+ मग अलीशा म्हणाला: “लोकांना हे खायला दे.” ४३ पण त्याचा सेवक त्याला म्हणाला: “हे १०० माणसांना कसं काय पुरेल?”+ त्यावर तो म्हणाला: “तू ते लोकांना खायला दे, कारण यहोवा असं म्हणतो, ‘ते सर्व त्यातून खातील, शिवाय त्यातलं काही उरेलही.’”+ ४४ तेव्हा सेवकाने ते लोकांना वाढलं आणि त्यांनी ते खाल्लं. तसंच, यहोवाने सांगितल्याप्रमाणे त्यातलं थोडं उरलंसुद्धा.+