१ राजे
२१ या गोष्टी झाल्यानंतर इज्रेलमध्ये राहणारा नाबोथ याच्या द्राक्षमळ्याबद्दल एक घटना घडली. नाबोथचा द्राक्षमळा, शोमरोनचा राजा अहाब याच्या महालाशेजारी इज्रेलमध्ये+ होता. २ अहाब नाबोथला म्हणाला: “तुझा द्राक्षमळा माझ्या महालाजवळच आहे. तो मला दे, म्हणजे मी त्यात भाजीपाला लावीन. त्याच्या बदल्यात मी तुला आणखी चांगला द्राक्षमळा देईन; किंवा तुला हवं असेल, तर त्याची जेवढी किंमत आहे तेवढे पैसे तुला देईन.” ३ पण नाबोथ अहाबला म्हणाला: “माझ्या वाडवडिलांची वारशाची जमीन तुम्हाला देण्याचा मी विचारसुद्धा करू शकत नाही.+ तसं करणं यहोवाच्या दृष्टीने चुकीचं ठरेल.” ४ तेव्हा अहाब अतिशय दुःखी होऊन घरी गेला. त्याचं तोंड उतरलं होतं. कारण इज्रेलकर नाबोथ त्याला असं म्हणाला होता: “मी माझ्या वाडवडिलांची वारशाची जमीन तुम्हाला देणार नाही.” घरी आल्यावर अहाब आपल्या बिछान्यावर भिंतीकडे तोंड करून पडून राहिला. तो काही खायलाही तयार नव्हता.
५ तेव्हा त्याची बायको ईजबेल+ त्याच्याकडे येऊन म्हणाली: “तुम्ही एवढे दुःखी का आहात? तुम्ही जेवत का नाही?” ६ त्यावर तो तिला म्हणाला: “मी इज्रेलकर नाबोथला म्हणालो, की ‘तुझा द्राक्षमळा मला विकत दे. किंवा हवं असेल तर त्याच्या बदल्यात मी तुला दुसरा द्राक्षमळा देतो.’ पण तो म्हणाला: ‘मी तुम्हाला माझा द्राक्षमळा देणार नाही.’” ७ तेव्हा त्याची बायको ईजबेल त्याला म्हणाली: “आज इस्राएलवर कोणाचं राज्य आहे? तुमचंच ना! तर आता उठा, काहीतरी खाऊन घ्या आणि आनंदी राहा. मी तुम्हाला इज्रेलकर नाबोथचा मळा मिळवून देईन.”+ ८ मग तिने अहाबच्या नावाने पत्रं लिहिली आणि त्यांवर त्याची मोहर लावली.+ तिने ती पत्रं नाबोथच्या शहरातल्या वडीलजनांना+ आणि प्रतिष्ठित लोकांना पाठवली. ९ पत्रांत तिने असं लिहिलं: “उपासाची घोषणा करा. आणि नाबोथला सर्व लोकांच्या पुढे बसवा. १० मग दोन रिकामटेकड्या माणसांना त्याच्यासमोर बसवा आणि त्यांना नाबोथविरुद्ध अशी साक्ष द्याला सांगा,+ की ‘तू देवाची आणि राजाची निंदा केलीस!’+ नंतर त्याला बाहेर घेऊन जा आणि दगडमार करून ठार मारा.”+
११ म्हणून, ईजबेलने पत्रांत सांगितल्याप्रमाणे नाबोथच्या शहरातल्या माणसांनी, म्हणजे तिथल्या वडीलजनांनी आणि प्रतिष्ठित लोकांनी केलं. १२ त्यांनी उपासाची घोषणा केली आणि नाबोथला सर्व लोकांच्या पुढे बसवलं. १३ मग दोन रिकामटेकडी माणसं त्याच्यासमोर येऊन बसली. आणि सर्व लोकांपुढे ती त्याच्याविरुद्ध अशी साक्ष देऊ लागली: “नाबोथने देवाची आणि राजाची निंदा केली आहे!”+ त्यानंतर त्यांनी त्याला शहराबाहेर नेलं आणि दगडमार करून ठार मारलं.+ १४ मग त्यांनी ईजबेलला असा निरोप पाठवला: “आम्ही नाबोथला दगडमार करून ठार मारलंय.”+
१५ नाबोथला दगडमार करून ठार मारण्यात आलं आहे, हे समजताच ईजबेल अहाबला म्हणाली: “ज्या इज्रेलकर नाबोथने तुम्हाला द्राक्षमळा विकायला नकार दिला होता, तो आता मेलाय. तर आता उठा आणि जाऊन त्याचा द्राक्षमळा ताब्यात घ्या.”+ १६ नाबोथ मेला आहे हे ऐकताच अहाब उठला आणि त्याच्या द्राक्षमळ्याचा ताबा घ्यायला निघाला.
१७ इकडे, एलीया+ तिश्बी याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: १८ “ऊठ, आणि शोमरोनात+ इस्राएलचा राजा अहाब याच्याकडे जा. तो नाबोथच्या द्राक्षमळ्यात आहे. त्या मळ्याचा ताबा घ्यायला तो तिथे गेलाय. १९ त्याला सांग, ‘यहोवा असं म्हणतो: “तू एका माणसाचा खून केलास+ आणि त्याची जमीनही बळकावलीस काय?”’+ मग त्याला म्हण: ‘यहोवा असं म्हणतो: “ज्या ठिकाणी कुत्र्यांनी नाबोथचं रक्त चाटलं, त्याच ठिकाणी कुत्री तुझंही रक्त चाटतील.”’”+
२० नंतर अहाब एलीयाला म्हणाला: “माझ्या शत्रू! शेवटी मी सापडलोच तुला!”+ त्यावर एलीया त्याला म्हणाला: “हो, सापडलास तू. देव असं म्हणतो: ‘तू यहोवाच्या नजरेत वाईट करायचं ठरवलं* आहेस,+ २१ म्हणून आता मी तुझ्यावर संकट आणीन आणि तुझा व तुझ्या घराण्याचा समूळ नाश करीन; तुझ्या घराण्यातला प्रत्येक पुरुष व मुलगा,+ मग तो लाचार असो किंवा दुर्बळ त्याचा मी इस्राएलमधून नाश करीन.+ २२ तू माझा क्रोध भडकवलास आणि इस्राएलला पाप करायला लावलंस, म्हणून आता नबाटचा मुलगा यराबाम आणि अहीयाचा मुलगा बाशा यांच्या घराण्यांसारखीच मी तुझ्याही घराण्याची दशा करीन.’+ २३ आणि ईजबेलबद्दल यहोवा असं म्हणतो: ‘ईजबेलला इज्रेलच्याच जमिनीवर कुत्री खाऊन टाकतील.+ २४ अहाबच्या घराण्यातला जो कोणी शहरात मरेल, त्याला कुत्री खाऊन टाकतील; आणि जो कोणी मैदानावर मरेल, त्याला आकाशातले पक्षी खाऊन टाकतील.+ २५ खरंच, आजपर्यंत अहाबइतका वाईट कोणीही होऊन गेला नाही.+ कारण त्याने आपल्या बायकोच्या, ईजबेलच्या भडकावण्यावरून यहोवाच्या नजरेत जे वाईट ते करण्याचा ठाम निश्चय केलाय.*+ २६ यहोवाने इस्राएली लोकांपुढून ज्या सर्व अमोरी लोकांना हाकलून लावलं होतं,+ त्या लोकांप्रमाणे अहाबसुद्धा घृणास्पद मूर्तींच्या* मागे लागला; आणि अशा प्रकारे तो अतिशय दुष्टपणे वागला.’”
२७ हे शब्द ऐकताच अहाबने दुःखाने आपले कपडे फाडले आणि गोणपाट घातलं. तो उपास करू लागला, गोणपाटावर झोपू लागला आणि उदास होऊन चालू लागला. २८ मग एलीया तिश्बी याला यहोवाकडून असा संदेश मिळाला: २९ “अहाब माझ्यासमोर कसा नमलाय हे तू पाहिलंस का?+ तो माझ्यासमोर नम्र झाला, म्हणून तो जिवंत असेपर्यंत मी त्याच्यावर हे संकट आणणार नाही; तर त्याच्या मुलाच्या जीवनकाळात मी हे संकट त्याच्या घराण्यावर आणीन.”+