२ शमुवेल
६ दावीदने पुन्हा एकदा इस्राएलमधल्या सैनिकांच्या सगळ्यात चांगल्या तुकड्या जमा केल्या. त्या सैनिकांची संख्या ३०,००० इतकी होती. २ मग दावीद आणि त्याच्यासोबतची सर्व माणसं बाले-यहूदा इथून खऱ्या देवाच्या कराराची पेटी आणण्यासाठी निघाली.+ लोक त्या पेटीसमोर, करुबांच्या वर* विराजमान असलेला+ सैन्यांचा देव यहोवा याच्या नावाचा धावा करायचे.+ ३ पण टेकडीवर असलेल्या अबीनादाबच्या घरातून+ खऱ्या देवाच्या कराराची पेटी नेण्यासाठी, त्यांनी ती एका नव्या गाडीवर+ ठेवली. आणि अबीनादाबची मुलं, म्हणजे उज्जा व अहयो हे दोघं ती गाडी हाकत होते.
४ अशा रितीने त्यांनी खऱ्या देवाच्या कराराची पेटी, टेकडीवर असलेल्या अबीनादाबच्या घरातून बाहेर आणली. आणि अहयो हा त्या पेटीच्या पुढे चालत होता. ५ दावीद आणि इस्राएलचं संपूर्ण घराणं यहोवासमोर आनंदोत्सव करत होतं. ते सर्व गंधसरूच्या लाकडाची वेगवेगळी वाद्यं, वीणा, इतर तंतुवाद्यं,+ डफ,+ झांजा+ आणि छोट्या झांजा वाजवून आनंदोत्सव करत होते. ६ पण ते नाखोनच्या खळ्याजवळ* आले, तेव्हा बैल अडखळले आणि कराराची पेटी पडायला लागली. म्हणून उज्जाने आपला हात पुढे करून खऱ्या देवाच्या कराराची पेटी धरली.+ ७ तेव्हा, यहोवाचा क्रोध उज्जावर भडकला आणि देवाच्या नियमाचा अनादर केल्यामुळे+ खऱ्या देवाने त्याला तिथेच मारून टाकलं.+ तो खऱ्या देवाच्या कराराच्या पेटीजवळ मेला. ८ पण यहोवाचा क्रोध उज्जावर भडकल्यामुळे दावीदला राग आला;* आणि आजपर्यंत ते ठिकाण पेरेस-उज्जा* या नावाने ओळखलं जातं. ९ त्या दिवशी दावीदला यहोवाची फार दहशत बसली+ आणि तो म्हणाला: “मी यहोवाच्या कराराची पेटी माझ्या इथे कशी काय आणू?”+ १० यहोवाच्या कराराची पेटी आपल्या शहरात, म्हणजे दावीदपुरात+ न्यायला दावीद तयार नव्हता. त्यामुळे त्याने ती पेटी ओबेद-अदोम+ या गित्ती माणसाच्या घरी नेली.
११ ओबेद-अदोम या गित्ती माणसाच्या घरी यहोवाच्या कराराची पेटी तीन महिने राहिली. या काळात यहोवा ओबेद-अदोमला आणि त्याच्या संपूर्ण कुटुंबाला आशीर्वादित करत राहिला.+ १२ दावीद राजाला खबर मिळाली: “खऱ्या देवाच्या कराराच्या पेटीमुळे यहोवाने ओबेद-अदोमच्या कुटुंबाचं कल्याण केलंय आणि त्याचं जे काही आहे ते सर्व आशीर्वादित केलंय.” म्हणून मग, दावीद मोठ्या आनंदाने खऱ्या देवाच्या कराराची पेटी दावीदपुरात आणायला ओबेद-अदोमच्या घरी गेला.+ १३ यहोवाच्या कराराची पेटी वाहून नेणारे+ जेव्हा सहा पावलं चालून गेले, तेव्हा दावीदने एका बैलाचं आणि एका धष्टपुष्ट प्राण्याचं बलिदान दिलं.
१४ दावीद मोठ्या आवेशाने यहोवापुढे नाचत होता; त्या वेळी त्याने मलमलीचं* एफोद घातलं होतं.*+ १५ दावीद आणि त्याच्यासोबत इस्राएलचं संपूर्ण घराणं आनंदाने जयघोष करत+ आणि शिंग फुंकत,+ यहोवाच्या कराराची पेटी+ घेऊन येत होतं. १६ यहोवाच्या कराराची पेटी दावीदपुरात येत असताना शौलच्या मुलीने, मीखलने+ खिडकीतून खाली पाहिलं. तेव्हा दावीद यहोवापुढे नाचत-बागडत असल्याचा तिला दिसला. आणि ती मनातल्या मनात त्याला तुच्छ लेखू लागली.+ १७ दावीदने यहोवाच्या कराराच्या पेटीसाठी जो तंबू उभा केला होता,+ त्यात त्यांनी ती पेटी आणून ठेवली. त्यानंतर दावीदने यहोवासमोर+ होमार्पणं+ आणि शांती-अर्पणं वाहिली.+ १८ होमार्पणं आणि शांती-अर्पणं वाहिल्यानंतर त्याने सैन्यांचा देव यहोवा याच्या नावाने सर्व लोकांना आशीर्वाद दिला. १९ तसंच त्याने सर्व लोकांना, म्हणजे इस्राएलच्या समूहातल्या प्रत्येक स्त्री आणि पुरुषाला एक भाकर,* खजुराची एक ढेप आणि मनुकांची एक ढेप दिली. त्यानंतर सर्व लोक आपापल्या घरी निघून गेले.
२० मग दावीद आपल्या कुटुंबातल्या लोकांना आशीर्वाद द्यायला घरी आला. तेव्हा शौलची मुलगी मीखल+ त्याला भेटायला बाहेर आली. ती त्याला म्हणाली: “एखादा मूर्ख माणूस जसा उघडा-नागडा होतो, तसा इस्राएलचा राजा जेव्हा आज आपल्या सेवकांच्या दासींसमोर उघडा झाला, तेव्हा त्याने स्वतःला किती वैभवशाली बनवलं!”+ २१ त्यावर दावीद मीखलला म्हणाला: “ज्याने तुझ्या बापाऐवजी आणि त्याच्या संपूर्ण घराण्याऐवजी मला निवडलं, त्या यहोवासमोर मी आनंदोत्सव करत होतो. यहोवाने मला त्याच्या लोकांचा, इस्राएलचा पुढारी म्हणून नेमलं.+ म्हणून यहोवासमोर मी आनंदोत्सव करणारच. २२ आणि मी स्वतःला याहून जास्त लीन करीन आणि स्वतःला आपल्या नजरेत आणखी कमी करीन. पण तू ज्या दासींबद्दल बोललीस त्या माझा गौरव करतील.” २३ म्हणून शौलची मुलगी मीखल+ हिला मरेपर्यंत मूलबाळ झालं नाही.