२ शमुवेल
१४ सरूवाचा मुलगा यवाब+ याच्या लक्षात आलं, की राजाचं मन अबशालोमसाठी आतुर झालं आहे.+ २ म्हणून मग यवाबने तकोवा+ इथून एका चतुर स्त्रीला बोलावून घेतलं. तो तिला म्हणाला: “शोकवस्त्रं घालून शोक करत असल्याचं सोंग घे. अंगाला तेल लावू नकोस+ आणि असं दाखव, की तू कोणाच्यातरी मृत्यूसाठी खूप दिवसांपासून शोक करत आहेस. ३ आणि राजाकडे जाऊन असं-असं बोल.” मग राजाशी काय बोलायचं हे यवाबने तिला सांगितलं.
४ तकोवाची ती स्त्री मग राजाकडे गेली आणि तिने जमिनीवर डोकं टेकवून त्याला दंडवत घातला. ती त्याला म्हणाली: “हे राजा! मला मदत करा!” ५ तेव्हा तो तिला म्हणाला: “काय झालं?” त्यावर ती म्हणाली: “मी एक विधवा आहे; माझा नवरा मेलाय. ६ तुमच्या या दासीला दोन मुलं होती. ती दोघं शेतात एकमेकांसोबत भांडायला लागली. पण त्यांचं भांडण सोडवायला कोणीही नव्हतं. आणि त्यांच्यातल्या एकाने दुसऱ्यावर वार करून त्याला ठार मारलं. ७ आता सगळे नातेवाईक माझ्याविरुद्ध उठलेत. ते आपल्या या दासीला म्हणत आहेत: ‘ज्याने आपल्या भावाला मारलं त्याला आमच्या हवाली कर. म्हणजे आपल्या भावाचा खून केल्याबद्दल आम्ही त्याचा जीव घेऊ;+ मग त्यामुळे तुझ्या कुटुंबात कोणी वारस राहिला नाही तरी चालेल!’ ते माझा उरलेला शेवटचा जळता निखारा* विझवून टाकतील. आणि मग पृथ्वीवरून माझ्या नवऱ्याचं नाव व त्याचे वंशज नाहीसे होतील.”
८ तेव्हा राजा त्या स्त्रीला म्हणाला: “तू आपल्या घरी जा. तुझ्यासंबंधाने मी एक आदेश काढीन.” ९ त्यावर तकोवाची ती स्त्री राजाला म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू! माझ्या मुलाच्या अपराधाचा दोष माझ्यावर आणि माझ्या वडिलांच्या घराण्यावर येवो. आणि तुम्ही व तुमचं राजघराणं निर्दोष राहो.” १० राजा मग तिला म्हणाला: “आता जर कोणी तुला काही बोललं, तर त्याला माझ्याकडे घेऊन ये. मग तो परत कधीही तुला त्रास देणार नाही.” ११ तेव्हा ती म्हणाली: “हे राजा, कृपया तुमचा देव यहोवा याची आठवण ठेवा. म्हणजे, रक्ताचा सूड घेणारा+ माझ्या मुलाला ठार मारून माझ्या दुःखात आणखी भर घालणार नाही.” त्यावर राजा म्हणाला: “जिवंत देव यहोवाची शपथ,+ तुझ्या मुलाच्या केसालाही धक्का लागणार नाही.” १२ मग ती स्त्री म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू! तुमच्या या दासीला आणखी काही बोलायची परवानगी असावी.” त्यावर राजा म्हणाला: “बोल!”
१३ ती स्त्री म्हणाली: “हे राजा, देवाच्या लोकांचं+ नुकसान होईल असं तुम्ही का वागलात? तुम्ही स्वतःच्या मुलाला हद्दपार केलंत आणि त्याला परतही आणत नाहीत.+ म्हणून, तुम्ही नुकतंच जे म्हणालात त्यावरून तुम्ही स्वतः दोषी ठरता. १४ मरण हे सगळ्यांना येणारच, आणि जमिनीवर पडलेलं पाणी जसं पुन्हा भरून घेता येत नाही, तसं आपलंही होईल. देव कोणाचाही जीव घेत नाही; उलट, हद्दपार केलेला माणूस कायमचा आपल्यापासून हद्दपारीत राहू नये, म्हणून त्याला परत आणण्याची कारणं तो शोधतो. १५ हे राजा, माझ्या प्रभू! लोकांनी मला घाबरवून सोडलं, म्हणून मी ही गोष्ट बोलायला इथे आले. कारण तुमच्या या दासीने विचार केला: ‘मी याविषयी राजाशी बोलून बघते; कदाचित राजा आपल्या या दासीची विनंती मान्य करेल. १६ माझं म्हणणं ऐकून राजा कदाचित आपल्या या दासीला त्या माणसाच्या हातून वाचवेल, जो मला आणि माझ्या मुलाला देवाने दिलेल्या वारशाच्या प्रदेशातून नाहीसं करायला बघतोय.’+ १७ मग आपल्या या दासीने विचार केला: ‘राजाच्या, माझ्या प्रभूंच्या शब्दांनी मला दिलासा मिळेल.’ कारण बऱ्या-वाइटात फरक करण्यात माझे राजे, माझे प्रभू अगदी खऱ्या देवाच्या स्वर्गदूतासारखे आहेत. तुमचा देव यहोवा तुमच्यासोबत असो.”
१८ राजा मग त्या स्त्रीला म्हणाला: “मी आता तुला जे काही विचारीन ते मला सांग. माझ्यापासून काहीही लपवू नकोस.” त्यावर ती स्त्री म्हणाली: “हो माझ्या प्रभू. राजाला जे काही विचारायचं असेल ते त्यांनी विचारावं.” १९ तेव्हा राजाने विचारलं: “हे सगळं तुला यवाबने करायला सांगितलं ना?”+ त्यावर ती स्त्री म्हणाली: “हे राजा, माझ्या प्रभू तुमच्या जिवाची शपथ, तुम्ही अगदी बरोबर बोललात. तुमचे सेवक यवाब यांनीच मला हे सगळं करायला सांगितलं. आणि हे सगळं बोलायला त्यांनीच तुमच्या या दासीला शिकवून पाठवलं. २० या सगळ्या गोष्टीकडे तुम्हाला एका वेगळ्या दृष्टिकोनातून पाहता यावं, म्हणून तुमचे सेवक यवाब यांनी मला हे सगळं करायला पाठवलं. पण माझे प्रभू हे खऱ्या देवाच्या स्वर्गदूतासारखे बुद्धिमान आहेत, आणि देशात काय चाललंय हे सगळं त्यांना माहीत आहे.”
२१ नंतर राजा यवाबला म्हणाला: “ठीक आहे. तू म्हणतोस तसं मी करीन.+ जा आणि त्या तरुणाला, अबशालोमला परत घेऊन ये.”+ २२ तेव्हा यवाबने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला. आणि राजाची स्तुती करून तो म्हणाला: “हे राजा, माझ्या प्रभू! आपल्या या सेवकाची विनंती तुम्ही मान्य केलीत. आज तुमच्या या सेवकाला खातरी पटली आहे, की तुमची माझ्यावर कृपा आहे.” २३ मग यवाब गशूरला+ गेला आणि अबशालोमला यरुशलेममध्ये घेऊन आला. २४ पण राजा म्हणाला: “तो त्याच्या घरी परत येऊ शकतो, पण त्याने माझं तोंड पाहू नये.” म्हणून अबशालोम आपल्या घरी परतला, पण तो राजासमोर आला नाही.
२५ संपूर्ण इस्राएलमध्ये अबशालोमसारखा देखणा कोणीही नव्हता. त्याच्या देखणेपणाची लोक तोंड भरून प्रशंसा करायचे. डोक्याच्या केसापासून पायाच्या नखापर्यंत त्याच्यात कोणताही दोष नव्हता. २६ त्याला आपल्या डोक्याच्या केसांचा भार सहन व्हायचा नाही, म्हणून तो दरवर्षी आपले केस कापायचा. तो केस कापायचा तेव्हा शाही वजनाप्रमाणे* त्यांचं वजन २.३ किलो* इतकं भरायचं. २७ अबशालोमला तीन मुलं+ आणि एक मुलगी होती. त्याच्या मुलीचं नाव तामार असून ती फार सुंदर होती.
२८ अबशालोमला यरुशलेममध्ये येऊन पूर्ण दोन वर्षं झाली होती, पण तो राजाला भेटू शकला नाही.+ २९ म्हणून मग अबशालोमने यवाबला राजाकडे पाठवण्यासाठी बोलावलं, पण तो काही आला नाही. मग त्याने दुसऱ्यांदा यवाबला बोलावणं पाठवलं, पण तरीही त्याने यायला नकार दिला. ३० शेवटी, अबशालोम आपल्या सेवकांना म्हणाला: “माझ्या शेताच्या शेजारीच यवाबचं शेत आहे. आणि त्यात जवाचं पीक आलंय. जा आणि त्याला आग लावून टाका.” म्हणून मग अबशालोमच्या सेवकांनी यवाबच्या शेताला आग लावली. ३१ तेव्हा यवाब अबशालोमच्या घरी आला आणि त्याला म्हणाला: “तुझ्या सेवकांनी माझ्या शेताला आग का लावली?” ३२ त्यावर अबशालोम यवाबला म्हणाला: “हे बघ, मी तुला निरोप पाठवला होता, की ‘माझ्याकडे ये, म्हणजे मी तुला राजाकडे असं विचारायला पाठवीन: “मी गशूरमधून इथे कशाला आलोय?+ त्यापेक्षा मी तिथेच राहिलो असतो तर बरं झालं असतं. आता मला राजाला भेटायची परवानगी मिळावी. आणि मी जर दोषी असेन, तर राजाने मला मृत्युदंड द्यावा.”’”
३३ मग यवाब राजाकडे जाऊन याविषयी बोलला. म्हणून राजाने अबशालोमला बोलावलं. अबशालोम आला आणि त्याने जमिनीवर डोकं टेकवून राजाला दंडवत घातला, आणि राजाने त्याचा मुका घेतला.+