उत्पत्ती
७ मग यहोवा नोहाला म्हणाला: “तू तुझ्या पूर्ण कुटुंबासोबत जहाजात जा, कारण या पिढीतल्या लोकांपैकी तूच माझ्या नजरेत नीतिमान आहेस.+ २ प्रत्येक प्रकारच्या शुद्ध प्राण्यांपैकी नर आणि मादी असे सात,*+ आणि प्रत्येक प्रकारच्या अशुद्ध प्राण्यांपैकी नर आणि मादी असे फक्त दोन प्राणी आपल्यासोबत ने. ३ तसंच, आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू यांपैकी नर आणि मादी असे सात* आपल्यासोबत जहाजात ने; म्हणजे त्यांच्या जाती सबंध पृथ्वीवर जिवंत राहतील.+ ४ कारण फक्त सात दिवसांनंतर, मी ४० दिवस आणि ४० रात्री+ पृथ्वीवर पाऊस पाडीन+ आणि मी बनवलेल्या सर्व जिवांचा पृथ्वीवरून नाश करीन.”+ ५ तेव्हा यहोवाने जे काही करण्याची आज्ञा दिली होती, ते सर्व नोहाने केलं.
६ पृथ्वीवर जलप्रलय आला तेव्हा नोहा ६०० वर्षांचा होता.+ ७ जलप्रलय सुरू होण्याआधी नोहा आपल्या मुलांना, बायकोला आणि आपल्या सुनांना घेऊन जहाजात गेला.+ ८ प्रत्येक शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू, तसंच जमिनीवर चालणारे सर्व प्राणी,+ ९ नर आणि मादी असे दोन-दोन प्राणी, देवाने नोहाला आज्ञा दिल्याप्रमाणे जहाजात त्याच्याकडे गेले. १० मग सात दिवसांनंतर पृथ्वीवर जलप्रलय सुरू झाला.
११ नोहा ६०० वर्षांचा झाला त्या वर्षी, दुसऱ्या महिन्याच्या १७ व्या दिवशी पृथ्वीवर जलप्रलय आला. त्या दिवशी आकाशातले पाण्याचे सर्व झरे फुटले आणि आकाशातली पाण्याची दारं उघडली.+ १२ मग ४० दिवस आणि ४० रात्री पृथ्वीवर मुसळधार पाऊस पडला. १३ त्याच दिवशी, नोहा आणि त्याची बायको, तसंच शेम, हाम आणि याफेथ+ ही त्याची मुलं आणि त्यांच्या तीन बायकाही जहाजात गेल्या.+ १४ त्यांच्यासोबत सर्व जंगली प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे, सर्व पाळीव प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे, जमिनीवर रांगणारे सर्व प्राणी त्यांच्या जातींप्रमाणे आणि आकाशात उडणारे सर्व पक्षी आणि जीवजंतू त्यांच्या जातींप्रमाणे जहाजात गेले. १५ ज्यांच्यात जीवनाचा श्वास* होता असे सर्व प्राणी दोन-दोन करून जहाजात नोहाकडे गेले. १६ अशा रितीने, देवाच्या आज्ञेप्रमाणे सर्व प्रकारच्या प्राण्यांपैकी, नर आणि मादी यांच्या जोड्या जहाजात गेल्या. मग यहोवाने जहाजाचं दार बंद केलं.
१७ पृथ्वीवर ४० दिवस सतत पाऊस पडत राहिला. पाणी वाढत गेलं आणि जमिनीपासून बऱ्याच उंचावर, जहाज पाण्यावर तरंगू लागलं. १८ पृथ्वीवर मोठा पूर आला आणि सगळीकडे पाणीच पाणी झालं, पण जहाज पाण्यावर तरंगत राहिलं. १९ पृथ्वीवर इतका मोठा पूर आला, की आकाशाखालचे सर्व उंच पर्वत पाण्याखाली गेले.+ २० पाणी पर्वतांच्याही वर १५ हात* चढलं.
२१ अशा रितीने, पृथ्वीवर चालणारे सर्व प्राणी मेले.+ आकाशात उडणारे पक्षी आणि जीवजंतू, पाळीव प्राणी, जंगली प्राणी, इतर लहान प्राणी* आणि सर्व मानव मरून गेले.+ २२ ज्यांच्या नाकपुड्यांत जीवनाचा श्वास* होता, असे जमिनीवर राहणारे सर्व जीव मेले.+ २३ अशा प्रकारे, देवाने पृथ्वीवरून मानव, प्राणी, रांगणारे प्राणी, आकाशात उडणारे पक्षी व जीवजंतू अशा सर्वांचा नाश केला. ते सर्व पृथ्वीवरून नाहीसे झाले;+ फक्त नोहा आणि जे जहाजात त्याच्यासोबत होते तेच जिवंत राहिले.+ २४ आणि पुराचं पाणी पृथ्वीवर १५० दिवस तसंच राहिलं.+