उत्पत्ती
३७ याकोब कनान देशातच राहू लागला. या देशात त्याचा पिताही विदेशी म्हणून राहिला होता.+
२ हा याकोबच्या कुटुंबाचा वृत्तान्त आहे.*
योसेफ+ १७ वर्षांचा असताना, आपल्या वडिलांच्या बायका बिल्हा आणि जिल्पा यांच्या मुलांसोबत+ कळप चारायला जायचा.+ एकदा योसेफने त्यांच्या वाईट वागणुकीबद्दल आपल्या वडिलांना येऊन सांगितलं. ३ आपल्या सर्व मुलांपेक्षा+ इस्राएलचं योसेफवर जास्त प्रेम होतं, कारण तो त्याला म्हातारपणी झाला होता. त्याने योसेफसाठी एक खास झगा* बनवून घेतला होता. ४ आपल्या वडिलांचं योसेफवर सर्वात जास्त प्रेम आहे हे त्याच्या भावांनी पाहिलं, तेव्हा ते त्याचा द्वेष करू लागले. ते कधीच त्याच्याशी प्रेमाने बोलत नव्हते.
५ पुढे, योसेफला एक स्वप्न पडलं आणि त्याने ते आपल्या भावांना सांगितलं.+ तेव्हा, ते त्याचा आणखीनच द्वेष करू लागले. ६ तो त्यांना म्हणाला: “मला पडलेलं स्वप्न ऐका. ७ आपण सर्व जण शेतात पेंढ्या बांधत होतो. तेव्हा, माझी पेंढी उठून उभी राहिली आणि तुमच्या पेंढ्या माझ्या पेंढीभोवती उभ्या राहून, माझ्या पेंढीला नमन करू लागल्या.”+ ८ त्याचे भाऊ त्याला म्हणाले: “तू काय आता आमचा राजा होऊन आमच्यावर अधिकार चालवणार आहेस?”+ अशा रितीने, योसेफच्या स्वप्नांमुळे आणि तो जे बोलला त्यामुळे त्याच्या भावांना त्याचा द्वेष करण्याचं आणखी एक कारण मिळालं.
९ यानंतर त्याला पुन्हा एक स्वप्न पडलं आणि त्याने तेही आपल्या भावांना सांगितलं. तो म्हणाला: “मी अजून एक स्वप्न पाहिलं. यावेळी सूर्य, चंद्र आणि ११ तारे मला वाकून नमन करत होते.”+ १० मग त्याने ते स्वप्न आपल्या भावांसोबत आपल्या वडिलांनाही सांगितलं. तेव्हा, त्याचे वडील त्याला रागावून म्हणाले: “तुझ्या या स्वप्नाचा अर्थ काय आहे? म्हणजे मी, तुझी आई आणि तुझे भाऊ तुझ्यासमोर येऊन जमिनीपर्यंत वाकून तुला नमन करू?” ११ त्याचे भाऊ त्याचा हेवा करू लागले,+ पण त्याच्या वडिलांनी योसेफचे शब्द आपल्या मनात ठेवले.
१२ नंतर त्याचे भाऊ त्यांच्या वडिलांच्या कळपांना चारायला शखेमजवळ+ गेले. १३ तेव्हा इस्राएल योसेफला म्हणाला: “तुझे भाऊ कळपांना घेऊन शखेमजवळ गेले आहेत ना? तर तू आता त्यांच्याकडे जा.” तेव्हा तो म्हणाला: “हो, मी जातो.” १४ मग तो योसेफला म्हणाला: “जरा जाऊन तुझे भाऊ बरे आहेत ना, आणि कळपही ठीक आहेत ना ते बघ आणि मला येऊन सांग.” असं म्हणून त्याने योसेफला हेब्रोनच्या+ खोऱ्यातून* पाठवलं आणि योसेफ पुढे शखेमला गेला. १५ नंतर, तो रानात भटकत असताना एक माणूस त्याला भेटला आणि म्हणाला: “काय शोधत आहेस?” १६ तेव्हा तो म्हणाला: “मी माझ्या भावांना शोधतोय. ते कुठे कळप चारत आहेत, हे सांगाल का मला?” १७ तो माणूस म्हणाला: “ते इथून पुढे गेले आहेत. कारण ‘आपण दोथानला जाऊ या’ असं मी त्यांना म्हणताना ऐकलं.” म्हणून योसेफ आपल्या भावांना शोधायला गेला आणि ते त्याला दोथान इथे दिसले.
१८ मग त्याच्या भावांनी त्याला दुरून येताना पाहिलं आणि तो त्यांच्याजवळ पोहोचण्याआधीच ते त्याला मारून टाकण्याचा कट रचू लागले. १९ ते एकमेकांना म्हणू लागले: “तो बघा, आला स्वप्न पाहणारा!+ २० चला आपण त्याला मारून टाकू आणि एका खड्ड्यात फेकून देऊ. एखाद्या जंगली प्राण्याने त्याला फाडून खाल्लं असं सांगू. मग पाहू काय होतं त्याच्या स्वप्नांचं.” २१ जेव्हा रऊबेनने+ हे ऐकलं, तेव्हा त्याने योसेफला त्यांच्यापासून वाचवण्याचा प्रयत्न केला. तो त्यांना म्हणाला: “त्याचा जीव नको घ्यायला.”+ २२ रऊबेन पुढे म्हणाला: “रक्त सांडू नका.+ हवं तर त्याला रानातल्या या खड्ड्यात टाकून द्या, पण त्याला काही इजा करू नका.”*+ रऊबेनला त्याला त्यांच्यापासून वाचवून आपल्या वडिलांकडे परत न्यायचं असल्यामुळे तो असं बोलला.
२३ योसेफ आपल्या भावांजवळ पोहोचताच, त्यांनी त्याच्या अंगावरचा खास झगा काढून घेतला,+ २४ आणि त्याला धरून त्या खड्ड्यात फेकून दिलं. त्या खड्ड्यात पाणी नव्हतं, तो कोरडा होता.
२५ मग ते जेवायला बसले. त्यांनी समोर पाहिलं, तेव्हा त्यांना गिलादहून येत असलेला इश्माएली+ लोकांचा एक काफिला दिसला. ते आपल्या उंटांवर सुगंधी डिंक, बाल्सम,* आणि झाडांची सुगंधी साल+ लादून खाली इजिप्तला जात होते. २६ तेव्हा यहूदा आपल्या भावांना म्हणाला: “स्वतःच्या भावाचा जीव घेऊन आणि त्याचा खून लपवून आपल्याला काय मिळणार आहे?+ २७ त्यापेक्षा चला, आपण त्याला या इश्माएली लोकांना विकून टाकू.+ आपण त्याला इजा का करावी? शेवटी तो आपलाच भाऊ, आपल्याच हाडामांसाचा आहे.” तेव्हा त्यांनी आपल्या भावाचं म्हणणं ऐकलं. २८ मग ते मिद्यानी+ व्यापारी त्यांच्याजवळ आले, तेव्हा त्यांनी योसेफला त्या खड्ड्यातून बाहेर काढलं आणि चांदीच्या २० तुकड्यांच्या मोबदल्यात त्याला त्या इश्माएली लोकांना विकून टाकलं.+ ती माणसं योसेफला इजिप्तला घेऊन गेली.
२९ नंतर जेव्हा रऊबेनने त्या खड्ड्याजवळ येऊन योसेफ तिथे नसल्याचं पाहिलं, तेव्हा त्याने दुःखाने आपले कपडे फाडले. ३० तो त्याच्या भावांजवळ जाऊन म्हणाला: “ते लेकरू तिथे नाही! आता मी काय करू?”
३१ तेव्हा त्यांनी योसेफचा झगा घेतला आणि एक मेंढा कापून त्याच्या रक्तात तो बुडवला. ३२ मग त्यांनी तो खास झगा आपल्या वडिलांकडे पाठवला आणि सोबत असा निरोप पाठवला: “आम्हाला हा झगा सापडला. हा तुमच्या मुलाचा आहे की नाही ते पाहा.”+ ३३ तेव्हा त्याने तो तपासून पाहिला आणि म्हणाला: “हा माझ्याच मुलाचा झगा आहे! एखाद्या जंगली प्राण्याने त्याला खाल्लं असेल! नक्कीच योसेफचे फाडून तुकडे केले असतील त्याने!” ३४ मग, याकोबने दुःखाने आपले कपडे फाडले आणि कमरेभोवती गोणपाट गुंडाळून तो बरेच दिवस आपल्या मुलासाठी शोक करत राहिला. ३५ त्याच्या सर्व मुलांनी आणि मुलींनी त्याचं सांत्वन करण्याचा खूप प्रयत्न केला, पण काही केल्या त्याचं सांत्वन झालं नाही. तो सारखा म्हणत राहिला: “मी माझ्या मुलासाठी असाच शोक करत कबरेत*+ जाईन!” आणि योसेफचा पिता त्याच्यासाठी रडत राहिला.
३६ मिद्यानी लोकांनी योसेफला इजिप्तमध्ये फारोच्या दरबारात एक अधिकारी आणि पहारेकऱ्यांचा प्रमुख असलेल्या पोटीफरला+ विकलं.