उत्पत्ती
१६ अब्रामची बायको साराय हिला मूलबाळ नव्हतं.+ पण तिची एक दासी होती. तिचं नाव हागार+ होतं आणि ती इजिप्तची होती. २ साराय अब्रामला म्हणाली: “पाहा, यहोवाने मला मुलं होऊ दिली नाहीत. म्हणून मी तुम्हाला विनंती करते, की माझ्या दासीचा स्वीकार करा.* कदाचित तिच्यामुळे मला मुलं मिळतील.”+ तेव्हा अब्रामने सारायचं म्हणणं ऐकलं. ३ कनान देशात राहून अब्रामला दहा वर्षं झाल्यावर, सारायने आपली इजिप्तची दासी हागार अब्रामला बायको म्हणून दिली. ४ तेव्हा त्याने हागारशी संबंध ठेवले आणि ती गरोदर राहिली. आपण गरोदर आहोत हे तिला कळलं, तेव्हा ती आपल्या मालकिणीला तुच्छ समजू लागली.
५ म्हणून साराय अब्रामला म्हणाली: “तुमच्यामुळेच मला अशी वाईट वागणूक मिळत आहे. मी स्वतःहून माझी दासी तुम्हाला दिली.* पण ती गरोदर आहे हे कळताच ती मला तुच्छ समजू लागली. आता यहोवाने तुमच्यामाझ्यात न्याय करावा.” ६ तेव्हा अब्राम सारायला म्हणाला: “हे बघ, तू तिची मालकीण आहेस. तुला जे योग्य वाटेल ते कर.” मग साराय हागारला छळू लागली आणि ती सारायपासून पळून गेली.
७ नंतर यहोवाच्या स्वर्गदूताला ती रानातल्या एका झऱ्याजवळ दिसली. तो झरा शूरला+ जाणाऱ्या वाटेवर होता. ८ तेव्हा स्वर्गदूत तिला म्हणाला: “सारायची दासी हागार, तू कुठून आलीस आणि कुठे चाललीस?” यावर ती म्हणाली: “मी माझी मालकीण साराय हिच्यापासून पळून जात आहे.” ९ मग यहोवाचा स्वर्गदूत तिला म्हणाला: “तुझ्या मालकिणीकडे परत जा आणि नम्रपणे तिच्या अधीन राहा.” १० पुढे यहोवाचा दूत म्हणाला: “मी तुझ्या संततीला* इतकं वाढवीन, की कोणीही तिला मोजू शकणार नाही.”+ ११ यहोवाचा दूत असंही म्हणाला: “पाहा, तू गरोदर आहेस आणि तुला एक मुलगा होईल. तू त्याचं नाव इश्माएल* ठेव, कारण यहोवाने तुझा छळ पाहिला आहे.* १२ तो रानातल्या गाढवासारखा* असेल. तो सर्वांच्या विरोधात आणि सर्व त्याच्या विरोधात असतील. तो आपल्या भावांच्या समोर वस्ती करेल.”*
१३ मग आपल्याशी बोलत असलेल्या यहोवाचं नाव घेऊन तिने प्रार्थना केली: “तू सर्व पाहणारा देव आहेस.”+ कारण ती म्हणाली: “ज्याची दृष्टी माझ्यावर आहे, त्याला मी खरंच या ठिकाणी पाहिलं आहे का?” १४ म्हणून त्या विहिरीचं नाव बैर-लहाय-रोई* असं पडलं. (ही विहीर कादेश आणि बेरेदच्या मध्ये आहे.) १५ अशा रितीने अब्रामला हागारपासून एक मुलगा झाला आणि अब्रामने त्याचं नाव इश्माएल+ ठेवलं. १६ अब्रामला हागारपासून इश्माएल झाला तेव्हा अब्राम ८६ वर्षांचा होता.