प्रकटीकरण
५ जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातात मला एक गुंडाळी दिसली, जिच्यावर दोन्ही बाजूला* लिहिलेले होते आणि तिला सात शिक्के मारून बंद करण्यात आले होते. २ मग, मला एक शक्तिशाली देवदूत दिसला जो अशी घोषणा करत होता: “गुंडाळीवरचे शिक्के फोडून ती उघडायला कोण योग्य आहे?” ३ पण स्वर्गात किंवा पृथ्वीवर किंवा पृथ्वीखाली कोणीही ती गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला योग्य ठरला नाही. ४ तेव्हा मी खूप रडू लागलो, कारण गुंडाळी उघडायला किंवा तिच्यात पाहायला योग्य असा कोणीही सापडला नाही. ५ पण वडिलांपैकी एक जण मला म्हणाला: “थांब, रडू नकोस. पाहा! जो यहुदाच्या वंशातला सिंह आणि दावीदचे मूळ, तो गुंडाळीचे सात शिक्के फोडण्यासाठी व ती उघडण्यासाठी विजयी ठरला आहे.”
६ राजासनाच्या व त्या चार जिवंत प्राण्यांच्या मधोमध आणि वडिलांच्या मधोमध मला एक कोकरा दिसला, ज्याचा जणू काय वध झाला होता. त्याला सात शिंगे आणि सात डोळे होते आणि ते डोळे सबंध पृथ्वीवर पाठवण्यात आलेले देवाचे सात आत्मे आहेत. ७ तो कोकरा लगेच पुढे आला आणि जो राजासनावर बसलेला होता त्याच्या उजव्या हातातून त्याने ती गुंडाळी घेतली. ८ त्याने गुंडाळी घेतली, तेव्हा ते चार जिवंत प्राणी आणि चोवीस वडील यांनी कोकऱ्याला नमन केले; त्या प्रत्येकाजवळ एक वीणा आणि धुपाने भरलेल्या सोन्याच्या वाट्या होत्या. (धूप हा पवित्र जनांच्या प्रार्थनांना सूचित करतो.) ९ आणि ते एक नवीन गीत गातात आणि म्हणतात: “गुंडाळी घेऊन तिचे शिक्के फोडायला तू योग्य आहेस, कारण तुझा वध करण्यात आला आणि तुझ्या रक्ताने तू प्रत्येक वंश, भाषा, जाती व राष्ट्र यांतून देवासाठी लोकांना विकत घेतले आहे. १० तू त्यांना आमच्या देवासाठी एक राज्य व याजक असे केले आणि ते राजे या नात्याने पृथ्वीवर राज्य करतील.”
११ मग मी पाहिले तेव्हा राजासन, चार जिवंत प्राणी व वडील यांच्याभोवती मला अनेक देवदूतांचा आवाज ऐकू आला. त्यांची संख्या हजारो लाखो इतकी होती. १२ आणि ते मोठ्या आवाजात असे म्हणत होते: “ज्या कोकऱ्याचा वध झाला होता, तो सामर्थ्य, वैभव, बुद्धी, शक्ती, सन्मान, गौरव व स्तुती मिळण्यास योग्य आहे.”
१३ आणि मी स्वर्गात, पृथ्वीवर आणि पृथ्वीच्या खाली, तसेच समुद्रावर असलेल्या प्रत्येक प्राण्याला, सर्वांना असे म्हणताना ऐकले: “जो राजासनावर बसला आहे त्याला व कोकऱ्याला सदासर्वकाळ स्तुती, सन्मान, गौरव व सामर्थ्य मिळो.” १४ तेव्हा ते चार जिवंत प्राणी म्हणाले: “आमेन!” आणि वडिलांनी गुडघे टेकून नमन केले.