३ योहान
१ एका वडिलाकडून,* प्रिय गायस याला, ज्याच्यावर मी मनापासून प्रेम करतो.
२ प्रिय बांधवा, आता जसे तुझे* सगळे व्यवस्थित चालले आहे, तसेच पुढेही सर्व बाबतींत तुझे* व्यवस्थित चालावे आणि तुला उत्तम आरोग्य लाभावे, अशीच माझी प्रार्थना आहे. ३ सत्याच्या मार्गावर चालत असताना तू कशा प्रकारे सत्याला जडून राहिला आहेस, हे बांधवांनी येऊन मला सांगितले तेव्हा मला खूप आनंद झाला. ४ माझी मुले सत्याच्या मार्गात चालत राहतात हे ऐकून मला जितका आनंद होतो,* तितका दुसऱ्या कोणत्याही गोष्टीने होत नाही.
५ प्रिय बांधवा, तुझ्यासाठी अनोळखी असलेल्या बांधवांसाठीही, तू जे काही करतोस त्यातून तुझा विश्वासूपणा दिसून येतो. ६ तू दाखवलेल्या प्रेमाबद्दल त्यांनी मंडळीसमोर साक्ष दिली आहे. कृपा करून, जाताना त्यांना देवाच्या दृष्टीने योग्य ठरेल अशा पद्धतीने निरोप दे. ७ कारण ते त्याच्याच नावाने बाहेर पडले आणि जगातल्या लोकांकडून त्यांनी कोणत्याही गोष्टीची अपेक्षा केली नाही. ८ त्यामुळे, अशा बांधवांचा पाहुणचार करण्याचे आपले कर्तव्यच आहे. असे केल्याने आपण सत्यात त्यांचे सहकारी बनू.
९ मी मंडळीला काही गोष्टी लिहिल्या; पण, इतरांपेक्षा वरचढ होण्याचा प्रयत्न करणारा दियत्रफेस आम्ही सांगितलेल्या कोणत्याही गोष्टीची कदर करत नाही. १० म्हणूनच, मी जर आलो तर त्याची कार्ये उघडकीस आणीन. कारण तो आमची बदनामी करण्यासाठी आमच्याविषयी वाईट बोलतो.* शिवाय, एवढ्यानेच त्याचे समाधान होत नाही. तो स्वतः तर बांधवांचे आदराने स्वागत करतच नाही, पण ज्यांना असे करण्याची इच्छा आहे त्यांनाही तो अडवण्याचा आणि मंडळीतून बहिष्कृत करण्याचा प्रयत्न करतो.
११ प्रिय बांधवा, वाइटाचे अनुकरण करू नकोस, तर चांगल्याचे अनुकरण कर. जो चांगले करतो तो देवापासून आहे. पण, जो वाईट करतो त्याने देवाला पाहिलेले नाही. १२ देमेत्रिय याच्याविषयी सगळे बांधव चांगलेच बोलले आहेत आणि तो सत्यात ज्या प्रकारे चालत आहे, त्यावरूनही ही गोष्ट खरी असल्याचे दिसून येते. खरेतर, आम्हीसुद्धा त्याच्याविषयी साक्ष देत आहोत, आणि आमची साक्ष खरी आहे हे तुला माहीत आहे.
१३ मला आणखी बऱ्याच गोष्टी तुला लिहायच्या होत्या. पण, मला त्या लेखणीने आणि शाईने लिहायच्या नाहीत. १४ तर, तुला प्रत्यक्षात भेटून तुझ्याशी बोलण्याची माझी इच्छा आहे.
तुला शांती असो.
सर्व मित्र तुला नमस्कार सांगतात. तिथल्या मित्रांना ज्याच्या त्याच्या नावाने माझा नमस्कार सांग.