याकोब
३ माझ्या बांधवांनो, तुमच्यापैकी पुष्कळांनी शिक्षक होऊ नये, कारण आपला अधिक कडकपणे न्याय केला जाईल हे आपल्याला माहीत आहे. २ मुळात आपण सर्वच अनेकदा चुकतो.* जर कोणी बोलण्यात चुकत नसेल, तर तो मनुष्य परिपूर्ण असून आपल्या संपूर्ण शरीराला ताब्यात ठेवू शकतो.* ३ आपण घोड्यांना आपल्या मनासारखे वागवण्यासाठी त्यांच्या तोंडांत लगाम घालून त्यांच्या संपूर्ण शरीरावर नियंत्रण ठेवतो. ४ तसेच जहाजांचाही विचार करा: ती प्रचंड मोठी असून जोरदार वाऱ्यांनी लोटली जातात, तरी जहाजाचा चालक अगदी लहानशा सुकाणूने हव्या त्या दिशेला ते वळवतो.
५ त्याचप्रमाणे, जीभसुद्धा शरीराचा अगदी लहानसा अवयव आहे, पण ती मोठमोठ्या गोष्टी करते. पाहा, लहानशा ठिणगीने मोठ्या जंगलात केवढा वणवा पेटतो! ६ जीभसुद्धा आगच आहे. शरीराच्या सर्व अवयवांपैकी जीभ ही सर्व अनीतीचे उगमस्थान आहे, कारण ती सबंध शरीराला दूषित करते व संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करते आणि गेहेन्नाच्या* आगीप्रमाणे सर्वनाश करते. ७ कारण सर्व प्रकारची जंगली जनावरे आणि पक्षी, सरपटणारे प्राणी आणि समुद्रातील जीव यांना वश केले जाऊ शकते आणि माणसाने त्यांना वश केलेही आहे. ८ पण, जिभेला मात्र कोणताही माणूस वश करू शकत नाही. ती अनावर व घातक असून जीवघेण्या विषाने भरलेली आहे. ९ याच जिभेने आपण आपला पिता, यहोवा* याची स्तुती करतो आणि “देवाच्या प्रतिरूपात” निर्माण करण्यात आलेल्या माणसांना शिव्याशापही देतो. १० एकाच तोंडातून आशीर्वाद व शाप दोन्ही निघतात.
माझ्या बांधवांनो, असे घडत राहणे योग्य नाही. ११ एकाच झऱ्यातून गोड आणि कडू पाणी कधीच निघत नाही, निघते का? १२ माझ्या बांधवांनो, अंजिराच्या झाडाला जैतून किंवा द्राक्षवेलीला अंजीर कधीच येणार नाहीत, येतील का? शिवाय, खाऱ्या पाण्यातून गोड पाणी कधीही मिळू शकत नाही.
१३ तुमच्यापैकी बुद्धिमान व समजदार कोण आहे? त्याने बुद्धीमुळे उत्पन्न होणाऱ्या सौम्यतेने चांगली कार्ये करून आपल्या वागणुकीतून हे दाखवावे. १४ पण, तुमच्या मनात तीव्र ईर्ष्या आणि द्वेष* असेल, तर बढाई मारू नका आणि सत्याच्या विरोधात खोटे बोलू नका. १५ ही वरून येणारी बुद्धी नाही, तर या जगाची, शारीरिक व सैतानी आहे. १६ कारण जिथे ईर्ष्या आणि द्वेष* असतो, तिथे अव्यवस्था आणि प्रत्येक वाईट गोष्टही असते.
१७ पण वरून येणारी बुद्धी ही सर्वात आधी शुद्ध, मग शांतिप्रिय, समजूतदार, आज्ञाधारक, दया व चांगल्या फळांनी परिपूर्ण, सर्वांना समान लेखणारी* व निष्कपट असते. १८ शिवाय, नीतिमत्त्वाचे बी शांतिपूर्ण परिस्थितीत पेरले जाते आणि शांतीसाठी झटणाऱ्यांना त्याचे फळ मिळते.