याकोब
१ ठिकठिकाणी विखुरलेल्या बारा वंशांना, देव आणि प्रभू येशू ख्रिस्त यांचा दास याकोब याचा
नमस्कार!
२ माझ्या बांधवांनो, तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षाप्रसंगांचा सामना करावा लागतो तेव्हा आनंदच माना, ३ कारण तुम्हाला माहीत आहे, की तुमच्या विश्वासाची अशी पारख झाल्याने धीर उत्पन्न होतो. ४ पण, धीराला आपले कार्य पूर्ण करू द्या म्हणजे तुम्ही सर्व बाबतींत परिपूर्ण ठराल आणि तुमच्यात कोणताही दोष राहणार नाही.
५ तर मग, तुमच्यापैकी कोणाला बुद्धीची गरज असल्यास त्याने ती देवाजवळ मागत राहावी म्हणजे त्याला ती दिली जाईल, कारण देव कोणालाही कमी न लेखता* सर्वांना उदारपणे बुद्धी देतो. ६ पण, त्याने मनात कोणतीही शंका न बाळगता विश्वासाने मागत राहावे, कारण शंका घेणारा वाऱ्याने इकडेतिकडे हेलकावणाऱ्या समुद्रातील लाटेसारखा आहे. ७ खरेतर, त्याने यहोवाकडून* काहीही मिळण्याची अपेक्षा करू नये; ८ तो मनुष्य चंचल मनाचा आणि आपल्या सर्व कार्यांत अस्थिर आहे.
९ गरीब बांधवाने आपल्याला उंचावण्यात आल्याबद्दल आनंद* करावा, १० तर श्रीमंताने नमवण्यात आल्याबद्दल, कारण तो रानातल्या फुलासारखा नाहीसा होईल. ११ ज्याप्रमाणे सूर्याच्या उष्णतेमुळे रोप कोमेजून जाते आणि त्याचे फूल गळून पडते व त्याची शोभा नष्ट होते, त्याचप्रमाणे श्रीमंत मनुष्यही आपल्या उद्योगांच्या भरात नाहीसा होईल.
१२ जो मनुष्य धीराने परीक्षा सहन करतो तो सुखी! कारण परीक्षा पार केल्यावर त्याला जीवनाचा मुकुट मिळेल; यहोवाने* आपल्यावर निरंतर प्रेम करणाऱ्यांना हा मुकुट देण्याचे वचन दिले आहे. १३ परीक्षाप्रसंगात, “देव माझी परीक्षा घेत आहे,” असे कोणी म्हणू नये. कारण कोणीही वाईट गोष्टींनी देवाची परीक्षा घेऊ शकत नाही आणि तोसुद्धा वाईट गोष्टींनी कोणाची परीक्षा घेत नाही. १४ तर प्रत्येक जण स्वतःच्याच इच्छेमुळे ओढला जाऊन भुलवला जातो* तेव्हा परीक्षेत पडतो. १५ मग इच्छा गर्भवती होऊन पापाला जन्म देते; आणि पाप घडल्यावर मृत्यू ओढवतो.
१६ माझ्या प्रिय बांधवांनो, फसू नका. १७ प्रत्येक उत्तम देणगी व परिपूर्ण दान वरून, म्हणजे स्वर्गीय प्रकाशाच्या* पित्याकडून येते, जो बदलत जाणाऱ्या सावल्यांप्रमाणे कधीही बदलत नाही. १८ त्याची इच्छा असल्यामुळेच त्याने आपल्याला सत्य वचनाद्वारे जन्माला आणले, यासाठी की त्याने निर्माण केलेल्यांपैकी आपण एक प्रकारे प्रथमफळ बनावे.
१९ माझ्या प्रिय बांधवांनो, ही गोष्ट समजून घ्या. प्रत्येकाने ऐकण्यास उत्सुक व बोलण्यात संयमी असावे; रागावण्यात उतावीळ असू नये, २० कारण रागाच्या आहारी जाणारा मनुष्य देवाच्या नीतिमत्त्वानुसार कार्य करू शकत नाही. २१ तेव्हा, सर्व प्रकारची अशुद्धता व वाईटपणाचा अंशही* आपल्यातून काढून टाका आणि नम्र होऊन, तुमचे तारण करण्यास* समर्थ असलेली वचने देवाला तुमच्या हृदयात रुजवू द्या.
२२ पण, खोट्या तर्काने स्वतःची फसवणूक करून वचन ऐकणारेच बनू नका, तर त्यानुसार चालणारेही बना. २३ कारण जो वचन ऐकतो, पण त्यानुसार चालत नाही तो आरशात आपला चेहरा पाहणाऱ्या माणसासारखा आहे. २४ कारण तो स्वतःला पाहून निघून जातो आणि आपण कशा प्रकारची व्यक्ती आहोत हे लगेच विसरून जातो. २५ पण जो कोणी स्वातंत्र्याच्या परिपूर्ण नियमाचे बारकाईने परीक्षण करतो आणि त्याचे पालन करत राहतो तो ऐकून विसरणारा नाही, तर त्यानुसार चालणारा बनतो आणि असे केल्याने त्याला आनंद मिळेल.
२६ आपण देवाचे उपासक* आहोत असे समजणारा एखादा मनुष्य आपल्या जिभेला लगाम घालत नसेल,* तर तो स्वतःची फसवणूक करत आहे आणि त्याची उपासना व्यर्थ आहे. २७ आपला देव आणि पिता याच्या दृष्टीने शुद्ध आणि निर्मळ उपासना हीच आहे, की आपण अनाथ व विधवा यांची संकटात काळजी घ्यावी आणि स्वतःला या जगात निष्कलंक ठेवावे.