१ तीमथ्य
२ तर सर्वात आधी मी असा आर्जव करतो, की सर्व प्रकारच्या माणसांसाठी याचना, प्रार्थना, इतरांच्या वतीने विनवण्या आणि उपकारस्तुतीच्या प्रार्थना केल्या जाव्यात. २ राजे आणि उच्च पदांवर असलेले अधिकारी यांच्याकरताही प्रार्थना केल्या जाव्यात, यासाठी की आपल्याला पूर्ण सुभक्तीने व गांभीर्याने, शांतपणे जीवन जगता यावे. ३ आपला तारणकर्ता देव याच्या दृष्टीत हे चांगले व योग्य आहे. ४ त्याची अशी इच्छा आहे, की सर्व प्रकारच्या लोकांचे तारण व्हावे* आणि त्यांना सत्याचे अचूक ज्ञान मिळावे. ५ कारण, एकच देव आहे आणि देव व मानव यांच्यामध्ये एकच मध्यस्थ आहे, जो एक मानव, अर्थात ख्रिस्त येशू आहे. ६ त्याने सर्वांच्या* मोबदल्यात खंडणी म्हणून स्वतःला अर्पण केले. या गोष्टीविषयी नियुक्त वेळ आल्यावर साक्ष दिली जाईल. ७ हीच साक्ष देण्यासाठी, मला घोषणा करणारा व प्रेषित, अर्थात विश्वास व सत्य यांविषयी सांगण्यासाठी विदेश्यांचा शिक्षक म्हणून नेमण्यात आले आहे. मी खरे बोलतो, खोटे बोलत नाही.
८ म्हणून माझी अशी इच्छा आहे, की सर्व ठिकाणी पुरुषांनी राग व वादविवाद सोडून, देवाला एकनिष्ठ राहावे आणि हात वर करून प्रार्थना करत राहावे. ९ त्याच प्रकारे, स्त्रियांनी उचित* पेहराव करून, शालीनतेने व विचारशीलपणे* स्वतःला सजवावे. त्यांनी खास प्रकारच्या केशरचना करून,* तसेच सोने, मोती किंवा महागडे कपडे घालून नाही, १० तर स्वतःला देवाचे उपासक म्हणवणाऱ्या स्त्रियांना शोभेल अशा प्रकारे, अर्थात चांगली कामे करून आपले सौंदर्य वाढवावे.
११ स्त्रीने पूर्ण अधीनतेने शांत* राहून शिकावे. १२ मी स्त्रीला शिकवण्याची किंवा पुरुषावर अधिकार चालवण्याची परवानगी देत नाही. तिने शांत* राहावे. १३ कारण आधी आदामला, आणि मग हव्वाला बनवण्यात आले. १४ तसेच, आदाम फसवला गेला नाही, तर स्त्री ही पूर्णपणे फसली आणि अपराधी बनली. १५ तरीसुद्धा, मुलांना जन्म देण्याद्वारे ती सुरक्षित राहील. अर्थात, यासाठी तिने* विचारशीलपणा,* तसेच विश्वास, प्रेम व पवित्रता यांत टिकून राहणे गरजेचे आहे.