इफिसकर
६ मुलांनो, देवाच्या इच्छेनुसार आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत राहा, कारण असे करणे योग्य आहे. २ “आपल्या वडिलांचा व आईचा आदर कर,” ही पहिली आज्ञा आहे जिच्यासोबत असे अभिवचन देण्यात आले आहे: ३ “म्हणजे तुझे भले होईल* आणि तुला पृथ्वीवर दीर्घायुष्य लाभेल.” ४ आणि वडिलांनो, आपल्या मुलांना चीड आणू नका, तर त्यांना यहोवाच्या* शिस्तीत व शिक्षणात* वाढवत राहा.
५ दासांनो, जसे तुम्ही ख्रिस्ताच्या आज्ञेत राहता तसेच भीतभीत व थरथर कापत, प्रामाणिक मनाने आपल्या मालकांच्याही आज्ञेत राहा; ६ केवळ माणसांना खुश करण्यासाठी ते पाहत असतानाच नाही,* तर संपूर्ण मनाने देवाची इच्छा पूर्ण करणाऱ्या ख्रिस्ताच्या दासांप्रमाणे आज्ञेत राहा. ७ आपण माणसांची नाही, तर यहोवाची* सेवा करत आहोत असे समजून चांगल्या मनोवृत्तीने आपल्या मालकांची सेवा करा. ८ कारण प्रत्येक जण जे काही चांगले करतो त्याचे प्रतिफळ त्याला यहोवाकडून* मिळेल, मग तो दास असो किंवा स्वतंत्र मनुष्य. ९ मालकांनो, तुम्हीसुद्धा त्यांच्याशी तसेच वागा; त्यांना धमकावू नका. कारण जो त्यांचा व तुमचाही मालक आहे, तो स्वर्गात असून भेदभाव करत नाही.
१० शेवटी, प्रभूकडून त्याच्या महान सामर्थ्याद्वारे ताकद मिळवत जा. ११ सैतानाच्या* डावपेचांविरुद्ध* तुम्हाला स्थिर उभे राहता यावे म्हणून देवाकडून मिळणारी संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा; १२ कारण आपली लढाई* हाडामांसाच्या मनुष्यांबरोबर नाही, तर सरकारांबरोबर, अधिकाऱ्यांबरोबर, सध्याच्या अंधकारातल्या जगातील शासकांबरोबर आणि आकाशांतील दुष्ट आत्मिक शक्तींबरोबर आहे. १३ त्यामुळे, देवाकडील संपूर्ण शस्त्रसामग्री धारण करा म्हणजे तुम्हाला दुष्ट काळाचा सामना करता येईल आणि सर्वकाही साध्य केल्यानंतर तुम्हाला स्थिर उभे राहता येईल.
१४ म्हणून, आपल्या कंबरेभोवती सत्याचा पट्टा बांधा आणि नीतिमत्त्वाचे कवच* घालून स्थिर उभे राहा; १५ तसेच, शांती देणारा आनंदाचा संदेश घोषित करण्यासाठी तुमची तयारी दाखवणारे जोडे पायांत घाला व स्थिर उभे राहा. १६ याशिवाय, विश्वासाची मोठी ढाल हाती घ्या, ज्याद्वारे तुम्ही त्या दुष्टाचे* सर्व जळते बाण विझवू शकाल. १७ तसेच, तारणाचा टोप आणि आत्म्याची तलवार, अर्थात देवाचे वचन स्वीकारा. १८ यासोबतच, प्रत्येक प्रसंगी आत्म्याच्या मार्गदर्शनानुसार सर्व प्रकारच्या प्रार्थना व याचना करत राहा. आणि जागृत राहा व सर्व पवित्र जनांसाठी सतत याचना करा. १९ माझ्यासाठीही अशी प्रार्थना करा, की मी बोलण्यासाठी तोंड उघडेन तेव्हा मला शब्द सुचावेत; म्हणजे, आनंदाच्या संदेशाचे पवित्र रहस्य जाहीर करण्यासाठी मी धैर्याने बोलू शकेन. २० या संदेशासाठीच, मी साखळ्यांमध्ये जखडलेला राजदूत म्हणून सेवा करत आहे. माझ्यासाठी प्रार्थना करा, की त्याविषयी मला जसे बोलले पाहिजे तसे धैर्याने बोलता यावे.
२१ आता, मी कसा आहे आणि माझे कसे चालले आहे, हे तुम्हाला समजावे म्हणून आपला प्रिय भाऊ आणि प्रभूचा विश्वासू सेवक असलेला तुखिक तुम्हाला याविषयी सर्वकाही सांगेल. २२ याच उद्देशाने मी त्याला तुमच्याकडे पाठवत आहे, यासाठी की, आम्ही कसे आहोत हे तुम्हाला कळावे आणि त्याने तुम्हाला दिलासा द्यावा.
२३ देव जो आपला पिता आणि प्रभू येशू ख्रिस्त यांच्याकडून मिळणारी शांती आणि विश्वासासहित असलेले प्रेम बांधवांना मिळो. २४ आपल्या प्रभू येशू ख्रिस्तावर अनंत प्रेम करणाऱ्यांना अपार कृपा लाभो.