इफिसकर
४ त्यामुळे, प्रभूसाठी कैदी असलेला मी, तुम्हाला विनंती करतो, की तुम्हाला बोलावण्यात आले असल्यामुळे, देवाने बोलावलेल्या लोकांना शोभेल असे चाला. २ नेहमी नम्रता,* सौम्यता व सहनशीलता दाखवून प्रेमाने एकमेकांचे सहन करा. ३ तुम्हाला एकमेकांशी बांधून ठेवणाऱ्या शांतीच्या बंधनात, पवित्र आत्म्यामुळे उत्पन्न होणारी एकता टिकवून ठेवण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करत राहा. ४ ज्याप्रमाणे तुम्हाला एकाच आशेसाठी बोलावण्यात आले होते, त्याप्रमाणे एकच शरीर आणि एकच पवित्र आत्मा आहे; ५ एकच प्रभू, एकच विश्वास, एकच बाप्तिस्मा;* ६ तसेच, जो सर्वांवर आहे, आणि जो सर्वांद्वारे व सर्वांमध्ये कार्य करतो तो आपला देव व पिताही एकच आहे.
७ आता, ख्रिस्ताने कृपादान वाटून दिल्याप्रमाणे आपल्यापैकी प्रत्येकावर अपार कृपा करण्यात आली आहे. ८ कारण असे म्हटले आहे: “तो उच्चस्थानी चढून गेला तेव्हा त्याने आपल्यासोबत बंदिवानांना नेले; त्याने माणसांच्या रूपात देणग्या दिल्या.” ९ आता, ‘तो चढून गेला’ या शब्दांचा काय अर्थ होतो? तो खालच्या प्रदेशांत अर्थात पृथ्वीवरही उतरला, असा त्याचा अर्थ होत नाही का? १० जो खाली उतरला तोच सबंध स्वर्गाहून वर चढला, यासाठी की त्याने सर्व गोष्टी पूर्णतेला आणाव्यात.
११ आणि त्याने काही प्रेषित, काही संदेष्टे, काही प्रचारक,* तर काही मेंढपाळ व शिक्षक म्हणून मंडळ्यांना दिले; १२ त्याने त्यांना यासाठी दिले, की त्यांनी पवित्र जनांची सुधारणूक करावी,* इतरांची सेवा करावी आणि ख्रिस्ताच्या शरीराची उन्नती करावी; १३ आणि हे तोपर्यंत करावे, जोपर्यंत आपल्या सर्वांच्या विश्वासात व देवाच्या पुत्राविषयीच्या अचूक ज्ञानात ऐक्य येत नाही; आणि जोपर्यंत आपण प्रौढता प्राप्त करून* ख्रिस्ताच्या पूर्णतेची उंची गाठत नाही. १४ त्यामुळे, यापुढे आपण लहान मुलांसारखे असू नये; म्हणजे धूर्त, चलाख माणसांकडून फसवले जाऊन, लाटांमुळे हेलकावे खाणारे व प्रत्येक शिकवणीच्या वाऱ्याने इकडेतिकडे वाहवत जाणारे असे असू नये. १५ याउलट, आपण नेहमी खरे बोलावे आणि ख्रिस्त जो आपले मस्तक आहे त्याच्यामध्ये सर्व गोष्टींत प्रेमापोटी वाढत जावे. १६ ख्रिस्ताद्वारे सबंध शरीर जोडले गेले आहे. तो आवश्यकतेनुसार आधार देणाऱ्या प्रत्येक सांध्याद्वारे शरीराच्या निरनिराळ्या भागांना एकमेकांशी सहकार्य करायला लावतो. जेव्हा प्रत्येक अवयव उचित प्रकारे कार्य करतो, तेव्हा शरीराची वाढ होते आणि ते प्रेमात स्वतःची उन्नती करत राहते.
१७ म्हणून मी तुम्हाला सांगतो आणि प्रभूसमोर असा आर्जव करतो, की विदेशी लोक आपल्या पोकळ* विचारसरणीनुसार वागतात तसे तुम्ही यापुढे वागू नका. १८ त्यांच्या अज्ञानामुळे व त्यांची मने कठोर* झाल्यामुळे, त्यांची बुद्धी अंधकारमय झाली आहे आणि देवाकडून मिळणाऱ्या जीवनापासून ते दुरावले आहेत. १९ नैतिकतेच्या सर्व मर्यादा ओलांडून, ते लोभीपणाने सर्व प्रकारची अशुद्ध कामे करत राहण्यासाठी निर्लज्ज वर्तनाच्या* आहारी गेले आहेत.
२० पण, तुम्ही ख्रिस्ताविषयी असे शिकला नाही. २१ अर्थात, तुम्ही खरोखरच त्याचे ऐकले असेल आणि त्याच्याकडून शिकून घेतले असेल तरच; कारण सत्य येशूमध्ये आहे. २२ तुमच्या पूर्वीच्या आचरणानुसार असलेले व त्याच्या फसव्या इच्छांमुळे भ्रष्ट होत असलेले तुमचे जुने व्यक्तिमत्त्व तुम्ही टाकून द्यावे, असे तुम्हाला शिकवण्यात आले होते. २३ आणि तुमच्या विचारांना दिशा देणाऱ्या मनोवृत्तीत* तुम्ही सतत नवीन होत जावे, २४ आणि देवाच्या इच्छेनुसार निर्माण करण्यात आलेले, तसेच खरे नीतिमत्त्व आणि एकनिष्ठता यांवर आधारित असलेले नवे व्यक्तिमत्त्व तुम्ही धारण करावे.
२५ आता तुम्ही खोटेपणा सोडून दिला आहे; त्यामुळे यापुढे तुमच्यापैकी प्रत्येकाने आपल्या शेजाऱ्याशी खरे बोलावे, कारण आपण सर्व एकाच शरीराचे अवयव आहोत. २६ तुम्ही कधी क्रोधित झाला, तरी पाप करू नका; सूर्य मावळेपर्यंत तुमचा राग राहू नये; २७ सैतानाला* संधी* देऊ नका. २८ चोरी करणाऱ्याने यापुढे चोरी करू नये; उलट, त्याने मेहनत करावी आणि आपल्या हातांनी प्रामाणिकपणे काम करावे, म्हणजे एखाद्या गरजू व्यक्तीला देण्यासाठी त्याच्याजवळ काहीतरी असेल. २९ तुमच्या तोंडून कोणताही वाईट* शब्द निघू नये; तर, गरजेप्रमाणे इतरांना प्रोत्साहन मिळू शकेल अशाच गोष्टी तुम्ही बोलाव्यात, जेणेकरून ऐकणाऱ्यांना त्यांपासून फायदा होईल. ३० तसेच, देवाच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण खंडणी देऊन मुक्त करण्याच्या दिवसासाठी याच आत्म्याद्वारे तुमच्यावर शिक्का मारण्यात आला आहे.
३१ सर्व प्रकारचा द्वेष, राग, क्रोध, आरडाओरडा, शिवीगाळ, तसाच सर्व दुष्टपणा आपल्यामधून काढून टाका. ३२ आणि त्याऐवजी एकमेकांशी प्रेमाने वागा व कोमलतेने सहानुभूती दाखवा; तसेच, देवाने जशी ख्रिस्ताद्वारे तुम्हाला मोठ्या मनाने क्षमा केली, तशीच तुम्हीही एकमेकांना मोठ्या मनाने क्षमा करा.