गलतीकर
२ मग चौदा वर्षांनंतर मी बर्णबासोबत पुन्हा एकदा यरुशलेमला गेलो. तीतलाही मी आपल्यासोबत घेतले. २ एका प्रकटीकरणाद्वारे मला आज्ञा देण्यात आल्यामुळे मी तिथे गेलो, आणि जो आनंदाचा संदेश मी विदेश्यांमध्ये घोषित करत आहे तो त्यांना सांगितला. पण, ज्यांना अतिशय आदरणीय समजले जाते, केवळ त्या बांधवांसमोरच मी या गोष्टी सांगितल्या. मी करत असलेली किंवा आजवर केलेली सेवा* व्यर्थ ठरणार नाही, याची मला खातरी करायची होती. ३ पण, माझ्यासोबत असलेला तीत हा ग्रीक असूनसुद्धा, त्यालादेखील सुंता* करण्यासाठी भाग पाडण्यात आले नाही. ४ पण, हा मुद्दा निघाला, तो केवळ मंडळीत गुपचूप शिरलेल्या खोट्या बांधवांमुळे. आम्ही ख्रिस्त येशूसोबत ऐक्यात राहून जे स्वातंत्र्य उपभोगतो, त्याविषयी लपूनछपून माहिती काढण्यासाठी आणि आम्हाला पूर्णपणे गुलामगिरीत जखडण्यासाठी ते मंडळीत घुसले होते; ५ आम्ही त्यांचे ऐकून त्यांच्या अधीन झालो नाही, अगदी एका क्षणासाठीही नाही; यासाठी की, आनंदाच्या संदेशाचे सत्य तुमच्यामध्ये कायम राहावे.
६ पण प्रतिष्ठित समजल्या जाणाऱ्या त्या बांधवांबद्दल बोलायचे, तर ते तसे असले किंवा नसले, तरी मला काही फरक पडत नाही, कारण देव कोणत्याही व्यक्तीचे बाहेरील स्वरूप पाहत नाही. खरेतर, अतिशय आदरणीय मानल्या जाणाऱ्या त्या बांधवांनी मला नवीन असे काहीही सांगितले नाही. ७ उलट, ज्या प्रकारे पेत्रला सुंता* झालेल्यांकडे पाठवण्यात आले होते, त्याच प्रकारे मला सुंता न झालेल्यांना आनंदाचा संदेश सांगण्याचे काम सोपवण्यात आले आहे हे त्यांनी पाहिले. ८ कारण ज्याने पेत्रला सुंता झालेल्यांसाठी प्रेषित होण्यास समर्थ केले, त्यानेच मलाही विदेश्यांकरता प्रेषित होण्यास समर्थ केले. ९ तर जेव्हा त्यांनी हे पाहिले आणि माझ्यावर अपार कृपा झाली आहे हे ओळखले, तेव्हा याकोब, केफा* व योहान जे मंडळीचे आधारस्तंभ मानले जात होते, त्यांनी या कार्यात आपण सर्व सहभागी* आहोत हे दर्शवण्यासाठी बर्णबासोबत व माझ्यासोबत उजवा हात मिळवला; तसेच, आम्ही विदेश्यांकडे तर त्यांनी सुंता झालेल्यांकडे जावे असेही त्यांनी मान्य केले. १० त्यांनी केवळ इतकीच विनंती केली, की आम्ही गरिबांची आठवण ठेवावी, आणि ही गोष्ट करण्याचा मी आजवर प्रामाणिकपणे प्रयत्न करत आलो आहे.
११ पण, केफा* अंत्युखियाला आला तेव्हा मी समोरासमोर त्याला अडवले,* कारण त्याचे चुकले होते* हे अगदी स्पष्ट होते. १२ कारण याकोबकडील काही माणसे येण्याआधी तो विदेशी लोकांसोबत बसून जेवायचा; पण ती माणसे आल्यावर मात्र त्याने असे करण्याचे बंद केले आणि सुंता झालेल्यांच्या भीतीमुळे तो त्यांच्यापासून वेगळा राहू लागला. १३ बाकीच्या यहुद्यांनीही त्याच्यासोबत हे ढोंग करण्यास सुरुवात केली. इतके, की बर्णबासुद्धा त्यांचा ढोंगीपणा पाहून त्यांच्यासारखाच वागू लागला. १४ पण त्यांचे हे वागणे आनंदाच्या संदेशाच्या सत्यानुसार नाही हे मी पाहिले, तेव्हा मी त्या सर्वांच्यासमोर केफाला* म्हणालो: “जर तू यहुदी असून यहुद्यांसारखा न वागता विदेश्यांसारखा वागतोस, तर मग तू विदेशी लोकांना यहुद्यांच्या रीतीप्रमाणे चालण्यास कसा काय भाग पाडू शकतोस?”
१५ आपण जे जन्माने यहुदी आहोत, आणि पापी असलेल्या विदेश्यांपैकी नाही, १६ ते आपण ही गोष्ट ओळखतो की कोणताही मनुष्य नियमशास्त्रातील कार्यांद्वारे नाही, तर केवळ येशू ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे नीतिमान ठरवला जातो. म्हणूनच, आपण ख्रिस्त येशूवर विश्वास ठेवला आहे, यासाठी की नियमशास्त्रातील कार्यांद्वारे नाही तर ख्रिस्तावरील विश्वासाद्वारे आपल्याला नीतिमान ठरवले जावे. कारण, नियमशास्त्रातील कार्यांद्वारे कोणालाही नीतिमान ठरवले जाणार नाही. १७ पण आता, जर ख्रिस्ताद्वारे नीतिमान ठरवले जाण्याचा प्रयत्न करत असतानादेखील आपण पापी असल्याचे आढळलो, तर याचा अर्थ ख्रिस्त आपल्याला पाप करण्यासाठी प्रोत्साहन देत आहे का? निश्चितच नाही! १८ ज्या गोष्टी मी एकेकाळी स्वतःच पाडून टाकल्या होत्या, त्या जर मी पुन्हा उभ्या करत असलो, तर मी एक अपराधी असल्याचे दाखवून देतो. १९ कारण नियमशास्त्राद्वारे मी नियमशास्त्रासाठी मरण पावलो, यासाठी की मी देवासाठी जिवंत व्हावे. २० मला ख्रिस्तासोबत वधस्तंभावर* खिळण्यात आले आहे. मी जो जगत आहे, तो यापुढे मी नसून माझ्यासोबत ऐक्यात राहणारा ख्रिस्त आहे. खरोखर, या शरीरात जे जीवन मी सध्या जगत आहे ते देवाच्या पुत्रावरील विश्वासानेच जगत आहे, ज्याने माझ्यावर प्रेम केले आणि स्वतःला माझ्यासाठी अर्पण केले. २१ देवाची अपार कृपा मी नाकारत* नाही, कारण जर माणसाला नियमशास्त्राद्वारे नीतिमान ठरवले जात असेल, तर मग ख्रिस्ताचे बलिदान व्यर्थ ठरले आहे.