प्रेषितांची कार्यं
८ शौलला मात्र त्याची ही हत्या मान्य होती.
त्या दिवशी यरुशलेम इथे असलेल्या मंडळीविरुद्ध छळाची लाट उसळली; प्रेषितांशिवाय बाकी सर्व जण यहूदीया व शोमरोनच्या प्रदेशांत विखुरले गेले. २ पण, काही देवभीरू माणसांनी स्तेफनला नेऊन पुरले आणि त्यांनी त्याच्यासाठी खूप शोक केला. ३ त्याच वेळी, शौल मंडळीला सतावू लागला. तो घरोघरी जाऊन पुरुषांना व स्त्रियांनाही बाहेर ओढून काढायचा आणि त्यांना तुरुंगात डांबायचा.
४ पण, जे विखुरले गेले होते ते सबंध देशात वचनाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करत गेले. ५ मग फिलिप्प शोमरोनच्या शहरात* जाऊन तिथल्या लोकांना ख्रिस्ताविषयी शिकवू लागला. ६ सर्व लोकांनी फिलिप्पने सांगितलेल्या गोष्टींकडे लक्ष दिले. ते त्याचे बोलणे मन लावून ऐकत होते आणि त्याने केलेले चमत्कार* पाहत होते. ७ कारण बरेच जण दुरात्म्यांनी पीडित होते. आणि त्यांच्यामधून ते दुरात्मे मोठ्याने ओरडून बाहेर निघायचे. शिवाय, बऱ्याच लुळ्यापांगळ्या लोकांनाही बरे करण्यात आले. ८ यामुळे त्या शहरातल्या लोकांना खूप आनंद झाला.
९ त्याच शहरात शिमोन नावाचा एक माणूस राहत होता. तो पूर्वी जादूटोणा करून शोमरोनी लोकांना थक्क करायचा आणि आपण कोणीतरी महान आहोत असे सर्वांना सांगायचा. १० आणि लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्व जण त्याचे लक्षपूर्वक ऐकायचे आणि म्हणायचे: “हा माणूस म्हणजे देवाची महाशक्ती आहे.” ११ त्याने बऱ्याच काळापासून त्यांना आपल्या जादूटोण्याने चकित केले असल्यामुळे ते त्याचे लक्षपूर्वक ऐकायचे. १२ पण देवाच्या राज्याविषयीचा आणि येशू ख्रिस्ताच्या नावाविषयीचा आनंदाचा संदेश घोषित करणाऱ्या फिलिप्पवर जेव्हा त्या लोकांचा विश्वास बसला, तेव्हा बऱ्याच स्त्रीपुरुषांनी बाप्तिस्मा घेतला. १३ खुद्द शिमोननेही विश्वास ठेवला आणि त्याचा बाप्तिस्मा झाल्यानंतर तो फिलिप्पच्या सहवासात राहू लागला; फिलिप्पच्या हातून घडणारे चमत्कार आणि अद्भुत कार्ये पाहून त्याला फार आश्चर्य वाटायचे.
१४ शोमरोनच्या लोकांनी देवाचे वचन स्वीकारल्याचे यरुशलेममध्ये असलेल्या प्रेषितांनी ऐकले, तेव्हा त्यांनी पेत्र व योहान यांना त्यांच्याकडे पाठवले. १५ आणि त्यांनी तिथे जाऊन त्यांना पवित्र आत्मा मिळावा म्हणून प्रार्थना केली. १६ कारण केवळ प्रभू येशूच्या नावाने त्यांचा बाप्तिस्मा झाला होता, पण अजून त्यांच्यापैकी कोणावरही पवित्र आत्मा आला नव्हता. १७ मग, पेत्र व योहानने त्यांच्यावर हात ठेवले आणि त्यांना पवित्र आत्मा मिळाला.
१८ प्रेषितांनी हात ठेवल्यावर लोकांना पवित्र आत्मा मिळत असल्याचे शिमोनने पाहिले, तेव्हा त्याने त्यांना पैसे देऊन म्हटले: १९ “मलाही हा अधिकार द्या, म्हणजे ज्या कोणावर मी हात ठेवीन त्याला पवित्र आत्मा मिळेल.” २० पण पेत्र त्याला म्हणाला: “तुझ्या चांदीचा तुझ्यासोबत नाश होवो, कारण देवाचं हे कृपादान पैशांनी विकत घेण्याचा तू विचार केला. २१ या गोष्टीत तुझा कोणताही सहभाग किंवा वाटा नाही, कारण तुझं मन देवाच्या दृष्टीत सरळ नाही. २२ म्हणून, या दुष्टपणाबद्दल पश्चात्ताप कर आणि यहोवाकडे* याचना कर, म्हणजे तू आपल्या मनात ही दुष्ट कल्पना आणल्याबद्दल कदाचित तुला क्षमा मिळेल; २३ कारण तू एक जहाल विष* आहेस आणि अनीतीचा गुलाम आहेस असं मला दिसतं.” २४ तेव्हा शिमोन त्यांना म्हणाला: “तुम्ही सांगितलेल्या या कोणत्याही गोष्टी माझ्यावर येऊ नयेत, म्हणून माझ्याकरता यहोवाकडे* याचना करा.”
२५ मग, त्या ठिकाणी पूर्णपणे साक्ष दिल्यावर आणि यहोवाचे* वचन लोकांना सांगितल्यावर, ते यरुशलेमला जायला निघाले. आणि जाताना त्यांनी शोमरोनच्या बऱ्याच गावांत आनंदाच्या संदेशाची घोषणा केली.
२६ पण, यहोवाच्या* दूताने फिलिप्पला म्हटले: “ऊठ आणि दक्षिणेकडे, यरुशलेमपासून गज्जाला जाणाऱ्या रस्त्यावर जा.” (हा वाळवंटातून जाणारा रस्ता आहे.) २७ तेव्हा फिलिप्प उठला आणि तिथे गेला. आणि पाहा! एक कूशी षंढ,* जो कूशी लोकांची राणी कांदके हिच्या दरबारातला एक अधिकारी होता, आणि तिच्या सर्व खजिन्यावर देखरेख करायचा, तो यरुशलेमला उपासना करण्यासाठी गेला होता. २८ आणि आता तो परत जात होता व आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याचे पुस्तक मोठ्याने वाचत होता. २९ तेव्हा आत्म्याने फिलिप्पला म्हटले: “त्या रथाजवळ जा.” ३० म्हणून फिलिप्प जाऊन त्या रथासोबत धावू लागला आणि त्याने त्या माणसाला यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातून वाचत असल्याचे ऐकले. तेव्हा तो त्याला म्हणाला: “तुम्ही जे वाचत आहात ते तुम्हाला खरंच समजतं का?” ३१ तो म्हणाला: “कोणी समजावून सांगितल्याशिवाय ते मला कसं समजेल?” म्हणून त्याने फिलिप्पला रथात चढून आपल्यासोबत बसण्याचा आग्रह केला. ३२ तो शास्त्रातून हा भाग वाचत होता: “एखाद्या मेंढराप्रमाणे कत्तल करण्यासाठी त्याला नेण्यात आलं आणि लोकर कातरणाऱ्यापुढे गप्प राहणाऱ्या कोकऱ्याप्रमाणे त्याने आपलं तोंड उघडलं नाही. ३३ त्याचा अपमान होत असताना, न्याय त्याच्यापासून काढून घेण्यात आला. त्याच्या पिढीबद्दलची माहिती कोण सांगेल? कारण पृथ्वीवरून त्याचं जीवन काढून घेण्यात आलं.”
३४ तेव्हा त्या षंढाने फिलिप्पला म्हटले: “संदेष्टा कोणाविषयी बोलत आहे, हे कृपा करून मला सांगा. तो स्वतःबद्दल बोलत आहे की दुसऱ्या एखाद्या माणसाबद्दल?” ३५ मग फिलिप्प बोलू लागला आणि या वचनापासून सुरुवात करून त्याने त्याला येशूविषयीचा आनंदाचा संदेश सांगितला. ३६ मग ते रस्त्याने जात असताना एका तळ्याजवळ आले. तेव्हा षंढ म्हणाला: “पाहा! इथे पाणी आहे; मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?” ३७ *— ३८ त्याने रथ थांबवण्याची आज्ञा दिली आणि फिलिप्प व षंढ दोघेही पाण्यात उतरले व फिलिप्पने त्याला बाप्तिस्मा दिला. ३९ ते पाण्यातून बाहेर आले तेव्हा यहोवाच्या* आत्म्याने लगेच फिलिप्पला दुसरीकडे नेले आणि षंढाला तो पुन्हा दिसला नाही. पण, तो आनंद करत आपल्या मार्गाने निघून गेला. ४० फिलिप्प मात्र अश्दोद नगरात पोचला आणि कैसरीया इथे पोचेपर्यंत तो त्या सबंध क्षेत्रातल्या शहरांत आनंदाचा संदेश घोषित करत राहिला.