योहान
४ येशूने योहानच्या तुलनेत जास्त लोकांना शिष्य बनवले आहे आणि तो त्यांना बाप्तिस्मा देत आहे हे परूश्यांच्या कानावर गेल्याचे प्रभूला कळले, २ (अर्थात, येशू स्वतः बाप्तिस्मा देत नव्हता, तर शिष्य देत होते) ३ तेव्हा त्याने यहूदीया सोडले आणि तो परत गालीलकडे निघाला. ४ पण त्याला शोमरोनातून जावे लागणार होते. ५ त्यामुळे, तो शोमरोनातील सूखार नावाच्या शहरात आला. हे शहर याकोबने आपला मुलगा योसेफ याला दिलेल्या शेताजवळ होते. ६ आणि तिथेच याकोबची विहीरसुद्धा होती. प्रवास करून थकलेला येशू त्या विहिरीजवळ* जाऊन बसला. तेव्हा दुपारचे सुमारे बारा वाजले होते.*
७ तितक्यात शोमरोनाची एक स्त्री तिथे पाणी भरायला आली. येशूने तिला म्हटले: “मला प्यायला पाणी दे.” ८ (कारण त्याचे शिष्य अन्न विकत घेण्यासाठी शहरात गेले होते.) ९ शोमरोनी स्त्री त्याला म्हणाली: “तुम्ही यहुदी असून माझ्याकडे पाणी कसं काय मागता, कारण मी तर एक शोमरोनी स्त्री आहे?” (यहुदी लोक शोमरोनी लोकांशी कोणतेही व्यवहार करत नाहीत.) १० येशूने तिला उत्तर दिले: “तुला देवाच्या कृपादानाबद्दल माहीत असतं आणि ‘मला प्यायला पाणी दे’ असं म्हणणारा मुळात कोण आहे याची तुला जाणीव असती, तर तू स्वतःच त्याला पाणी मागितलं असतं आणि त्याने तुला जीवनाचं पाणी दिलं असतं.” ११ ती त्याला म्हणाली: “तुमच्याजवळ तर पाणी काढायला बादलीही नाही आणि विहीरही खोल आहे. तर मग तुम्ही मला हे जीवनाचं पाणी कुठून द्याल? १२ ही विहीर आम्हाला आमचा पूर्वज याकोब याने दिली आहे. तो व त्याची मुलं आणि त्याची गुरंढोरंसुद्धा या विहिरीचं पाणी प्यायले. मग, तुम्ही त्याच्यापेक्षाही मोठे आहात का?” १३ येशूने तिला उत्तर दिले: “हे पाणी जो पिईल, त्या प्रत्येकाला पुन्हा तहान लागेल. १४ पण मी दिलेलं पाणी जो कोणी पिईल त्याला पुन्हा कधीही तहान लागणार नाही. तर, ते पाणी त्याच्यामध्ये, सर्वकाळाचं जीवन देणाऱ्या एखाद्या खळखळत्या झऱ्यासारखं होईल.” १५ ती स्त्री त्याला म्हणाली: “मला हे पाणी द्या, म्हणजे मला कधीही तहान लागणार नाही आणि पाणी काढायला पुन्हापुन्हा या ठिकाणी यावं लागणार नाही.”
१६ तो तिला म्हणाला: “जा आणि आपल्या नवऱ्यालाही इथे बोलावून आण.” १७ स्त्रीने उत्तर दिले: “मला नवरा नाही.” तेव्हा येशू तिला म्हणाला: “‘मला नवरा नाही,’ हे तू बरोबर बोललीस. १८ कारण तुला पाच नवरे होते आणि आता जो तुझ्याबरोबर आहे तो तुझा नवरा नाही, हे तू खरं सांगितलंस.” १९ ती स्त्री त्याला म्हणाली: “प्रभुजी, तुम्ही नक्कीच एक संदेष्टा असाल. २० आमच्या पूर्वजांनी तर या डोंगरावर उपासना केली, पण तुम्ही लोक म्हणता की यरुशलेममध्येच उपासना केली पाहिजे.” २१ येशू तिला म्हणाला: “बाई, मी तुला सांगतो, अशी वेळ येत आहे जेव्हा तुम्ही या डोंगरावर किंवा यरुशलेममध्येही पित्याची उपासना करणार नाही. २२ तुम्ही न जाणता उपासना करता; आम्ही आमच्याजवळ असलेल्या ज्ञानानुसार उपासना करतो; कारण तारण हे यहुद्यांपासूनच सुरू होतं. २३ पण, अशी वेळ येत आहे, उलट आली आहे, जेव्हा खरे उपासक आत्म्याने व सत्याने पित्याची उपासना करतील. कारण खरं पाहता पिता अशाच प्रकारे उपासना करणाऱ्यांना शोधत आहे. २४ देव आत्मिक व्यक्ती आहे आणि जे त्याची उपासना करतात त्यांनी ती आत्म्याने व सत्याने केली पाहिजे.” २५ ती स्त्री त्याला म्हणाली: “मसीहा, म्हणजे ज्याला ख्रिस्त म्हणतात, तो येणार आहे हे मला माहीत आहे. तो येईल तेव्हा आमच्यासाठी सर्व गोष्टी उघडपणे घोषित करेल.” २६ येशू तिला म्हणाला: “तुझ्याशी बोलत असलेला मीच तो आहे.”
२७ तेवढ्यात त्याचे शिष्य आले आणि तो एका स्त्रीशी बोलत आहे हे पाहून त्यांना नवल वाटले. अर्थात, “तुला काही पाहिजे होतं का?” किंवा “तू तिच्याशी का बोलत आहेस?” असे कोणीही त्याला विचारले नाही. २८ तेव्हा ती स्त्री आपली घागर तिथेच ठेवून शहरात गेली आणि लोकांना म्हणू लागली: २९ “माझ्यासोबत चला आणि त्या माणसाला भेटा, ज्याने मी केलेलं सर्वकाही मला सांगितलं. हाच तर ख्रिस्त नसावा?” ३० तेव्हा ते शहरातून त्याच्याकडे जायला निघाले.
३१ इकडे, शिष्य त्याला “रब्बी,* काहीतरी खाऊन घे,” असा आग्रह करत होते. ३२ पण तो त्यांना म्हणाला: “माझ्याजवळ असं अन्न आहे ज्याविषयी तुम्हाला माहीत नाही.” ३३ तेव्हा शिष्य एकमेकांना म्हणू लागले: “कोणी त्याला खायला काहीतरी आणून दिलं की काय?” ३४ येशू त्यांना म्हणाला: “ज्याने मला पाठवलं त्याच्या इच्छेनुसार करणं आणि त्याने दिलेलं काम पूर्ण करणं हेच माझं अन्न आहे. ३५ कापणीला अजून चार महिन्यांचा अवकाश आहे असं तुम्ही म्हणता ना? मी तुम्हाला सांगतो: आपले डोळे वर करून शेतं पाहा, ती पांढरी झाली आहेत आणि कापणीसाठी तयार आहेत. ३६ कापणी करणाऱ्याला आतापासूनच त्याची मजुरी मिळाली आहे आणि तो सर्वकाळाच्या जीवनाचं पीक गोळा करत आहे, यासाठी की पेरणाऱ्याने व कापणी करणाऱ्याने सोबत मिळून आनंद करावा. ३७ कारण या बाबतीत ही म्हण खरी ठरते, की पेरणी करणारा एक जण आहे आणि कापणी करणारा दुसराच आहे. ३८ तुम्ही ज्यासाठी परिश्रम केले नाहीत त्याची कापणी करण्यासाठी मी तुम्हाला पाठवत आहे. इतरांनी परिश्रम केले आणि तुम्ही त्यांच्या परिश्रमाचं फळ उपभोगत आहात.”
३९ “मी केलेलं सर्वकाही त्याने मला सांगितलं,” अशी साक्ष देणाऱ्या स्त्रीच्या बोलण्यावरून त्या शहरातल्या बऱ्याच शोमरोनी लोकांनी येशूवर विश्वास ठेवला. ४० म्हणून शोमरोनी त्याच्याकडे आले, तेव्हा त्यांनी त्याला आपल्यासोबत राहण्याची विनंती केली आणि तो दोन दिवस तिथे राहिला. ४१ याचा परिणाम असा झाला, की त्याने शिकवलेल्या गोष्टी ऐकून आणखी अनेक जणांनी विश्वास ठेवला, ४२ आणि ते त्या स्त्रीला म्हणाले: “आता आम्ही फक्त तू जे सांगितलंस त्यामुळे विश्वास ठेवत नाही; कारण आम्ही स्वतः आमच्या कानांनी ऐकलं आहे, आणि हा मनुष्य खरोखरच जगाचा तारणारा आहे याची आम्हाला खातरी पटली आहे.”
४३ दोन दिवसांनी येशू तिथून निघून गालीलला गेला. ४४ पण त्यानेच अशी साक्ष दिली होती, की संदेष्ट्याचा स्वतःच्या गावात आदर केला जात नाही. ४५ तो गालीलात आला तेव्हा गालीलच्या लोकांनी त्याचे स्वागत केले, कारण सणासाठी यरुशलेमला गेलेले असताना त्याने केलेल्या सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या होत्या.
४६ मग त्याने जिथे पाण्याचा द्राक्षारस केला होता, त्या ठिकाणी म्हणजे गालीलच्या काना इथे तो पुन्हा आला. इथे राजाचा एक अधिकारी होता ज्याचा मुलगा कफर्णहूमात आजारी होता. ४७ जेव्हा या मनुष्याने ऐकले की येशू यहूदीयातून गालील इथे आला आहे, तेव्हा तो त्याच्याकडे गेला आणि त्याने येशूला खाली कफर्णहूमला येऊन आपल्या मुलाला बरे करण्याची विनंती केली. कारण, त्याचा मुलगा मरायला टेकला होता. ४८ पण येशूने त्याला म्हटले: “चिन्हे व चमत्कार पाहिल्याशिवाय तुम्ही लोक कधीही विश्वास ठेवणार नाही.” ४९ राजाचा अधिकारी त्याला म्हणाला: “प्रभू, माझं लेकरू मरण्याआधी खाली चला.” ५० येशू त्याला म्हणाला: “जा; तुझा मुलगा बरा झाला आहे.” त्या मनुष्याने येशूच्या शब्दावर विश्वास ठेवला आणि तो तिथून निघून गेला. ५१ पण, तो खाली कफर्णहूमला जात असताना त्याचे दास त्याला भेटायला आले आणि त्याचा मुलगा बरा झाला आहे* असे त्यांनी सांगितले. ५२ तेव्हा तो नेमका किती वाजता बरा झाला, असे त्याने त्यांना विचारले. ते म्हणाले: “काल सुमारे एक वाजता* त्याचा ताप उतरला.” ५३ तेव्हा मुलाच्या वडिलाला आठवले की अगदी त्याच वेळी येशूने त्याला म्हटले होते: “तुझा मुलगा बरा झाला आहे.” त्यामुळे त्याने व त्याच्या सबंध घराण्याने विश्वास ठेवला. ५४ यहूदीयातून गालीलला आल्यानंतर येशूने केलेला हा दुसरा चमत्कार* होता.