योहान
२ मग, तिसऱ्या दिवशी गालीलमधील काना इथे एका लग्नाची मेजवानी होती; आणि येशूची आई तिथे होती. २ येशूला आणि त्याच्या शिष्यांनाही त्या मेजवानीसाठी आमंत्रित करण्यात आले होते.
३ मेजवानीत द्राक्षारस कमी पडला तेव्हा येशूची आई त्याला म्हणाली: “त्यांच्याजवळ द्राक्षारस नाही.” ४ पण, येशू तिला म्हणाला: “बाई, याच्याशी तुझं आणि माझं काय घेणंदेणं?* माझी वेळ अजून आली नाही.” ५ तेव्हा त्याची आई वाढणाऱ्यांना म्हणाली: “तुम्हाला तो जसं सांगेल तसं करा.” ६ त्या ठिकाणी, शुद्धीकरणाच्या नियमांनुसार सहा दगडी रांजणे ठेवली होती. प्रत्येक रांजण ४४ ते ६६ लीटर* पाणी मावेल इतके मोठे होते. ७ येशू त्यांना म्हणाला: “रांजणांत पाणी भरा.” तेव्हा त्यांनी ती काठोकाठ भरली. ८ मग तो त्यांना म्हणाला: “आता त्यातलं थोडं काढून मेजवानीची देखरेख करणाऱ्याकडे न्या.” तेव्हा ते त्याच्याकडे घेऊन गेले. ९ द्राक्षारसात बदललेले पाणी मेजवानीची देखरेख करणाऱ्याने चाखून पाहिले. तो द्राक्षारस कुठून आणला होता हे त्याला माहीत नव्हते (अर्थात, रांजणातून पाणी काढणाऱ्या सेवकांना ते माहीत होते). तेव्हा, त्याने वराला बोलावले १० आणि तो त्याला म्हणाला: “प्रत्येक जण चांगला द्राक्षारस आधी देतो, आणि मग लोकांना नशा चढल्यावर हलक्या प्रतीचा द्राक्षारस देतो. पण, तू तर चांगला द्राक्षारस आतापर्यंत राखून ठेवला आहेस.” ११ अशा प्रकारे, येशूने गालीलमधील काना इथे पहिला चमत्कार* करून आपले सामर्थ्य प्रकट केले आणि त्याच्या शिष्यांनी त्याच्यावर विश्वास ठेवला.
१२ यानंतर तो, त्याची आई, भाऊ व त्याचे शिष्य खाली कफर्णहूमला गेले; पण, ते जास्त दिवस तिथे राहिले नाहीत.
१३ यहुद्यांचा वल्हांडण सण आता जवळ आला होता; म्हणून येशू वर यरुशलेमला गेला. १४ तिथे त्याला गुरे, मेंढरे आणि कबुतरे विकणारे, तसेच पैसे बदलून देणारे मंदिरात बसलेले दिसले. १५ तेव्हा, त्याने दोऱ्यांचा चाबूक बनवून त्या सगळ्यांना त्यांच्या गुराढोरांसहित मंदिरातून हाकलून लावले, पैसे बदलून देणाऱ्यांची नाणी जमिनीवर टाकून दिली व त्यांचे मेज उलटून टाकले. १६ आणि कबुतरे विकणाऱ्यांना तो म्हणाला: “काढून टाका हे सगळं इथून! माझ्या पित्याच्या घराची बाजारपेठ करू नका!” १७ तेव्हा शिष्यांना त्याच्याविषयी लिहिलेले हे शब्द आठवले, की “तुझ्या मंदिराविषयीचा आवेश मला झपाटून टाकेल.”
१८ हे पाहून यहुद्यांनी त्याला म्हटले: “तुला हे सगळं करण्याचा अधिकार आहे हे सिद्ध करण्यासाठी आम्हाला एखादं चिन्ह दाखव.” १९ येशू त्यांना म्हणाला: “हे मंदिर पाडून टाका आणि तीन दिवसांत मी ते पुन्हा उभं करीन.” २० तेव्हा यहुदी त्याला म्हणाले: “हे मंदिर बांधायला ४६ वर्षं लागली आणि तू ते तीन दिवसांत उभं करशील?” २१ खरेतर मंदिर असे म्हणताना तो आपल्या शरीराविषयी बोलत होता. २२ त्याला मेलेल्यांतून उठवण्यात आल्यानंतर त्याच्या शिष्यांना हे आठवले, की तो पूर्वी असे म्हणायचा आणि त्यांनी शास्त्रावर आणि येशूने सांगितलेल्या गोष्टीवर विश्वास ठेवला.
२३ वल्हांडण सणाच्या वेळी तो यरुशलेममध्ये होता तेव्हा तो करत असलेले चमत्कार पाहून अनेकांनी त्याच्या नावावर विश्वास ठेवला. २४ पण, येशूने त्यांच्यावर पूर्णपणे भरवसा ठेवला नाही, कारण तो सर्वांना ओळखून होता २५ आणि लोकांबद्दल जाणून घेण्यासाठी त्याला कोणत्याही माणसाची गरज नव्हती, कारण माणसाच्या मनात काय असते हे त्याला माहीत होते.