लूक
२ त्या दिवसांत, कैसर* औगुस्त याने असा हुकूम काढला, की त्याच्या संपूर्ण साम्राज्यातील* लोकांच्या नावांची नोंदणी केली जावी. २ (क्विरीनिय हा सूरियाचा राज्यपाल असताना ही पहिली नावनोंदणी करण्यात आली.) ३ त्यामुळे सर्व लोक नावनोंदणी करण्यासाठी आपापल्या मूळ गावी गेले. ४ मग, योसेफसुद्धा गालीलातील नासरेथ शहरातून यहूदीयातील दावीदच्या बेथलेहेम शहरात गेला; कारण तो दावीदच्या घराण्यातला व कुळातला होता. ५ तो आपली बायको, मरीया हिच्यासोबत नावनोंदणी करण्यासाठी गेला. ती गरोदर असून लवकरच बाळाला जन्म देणार होती. ६ ते तिथे असतानाच तिची बाळंतपणाची वेळ आली. ७ आणि तिने तिच्या पहिल्या मुलाला जन्म दिला. तिने त्याला कापडांत गुंडाळले आणि गव्हाणीत* ठेवले, कारण मुक्काम करण्यासाठी त्यांना कुठेही जागा मिळाली नाही.
८ त्याच भागात, काही मेंढपाळ रानात राहून रात्रीच्या वेळी आपल्या कळपांची राखण करत होते. ९ अचानक यहोवाचा* दूत त्यांच्यासमोर उभा राहिला आणि यहोवाचे* तेज त्यांच्याभोवती चमकू लागले आणि ते अतिशय घाबरले. १० पण, देवदूताने त्यांना म्हटले: “घाबरू नका, कारण पाहा! जो मोठा आनंद सर्व लोकांना होणार आहे त्याबद्दलचा आनंदाचा संदेश मी तुम्हाला सांगत आहे. ११ कारण आज दावीदच्या शहरात एक तारणकर्ता जन्मला आहे. तो ख्रिस्त प्रभू आहे. १२ आणि तुमच्यासाठी ही खूण असेल: कापडांत गुंडाळलेलं आणि गव्हाणीत ठेवलेलं एक बाळ तुम्हाला आढळेल.” १३ मग अचानक, त्या देवदूतासोबत स्वर्गातील मोठे सैन्य दिसले आणि ते देवाची स्तुती करत होते व म्हणत होते: १४ “स्वर्गातील देवाला गौरव आणि ज्यांच्याविषयी तो संतुष्ट* आहे त्या पृथ्वीवरील लोकांना शांती मिळो!”
१५ मग, देवदूत तिथून निघून स्वर्गात परत गेले तेव्हा मेंढपाळ एकमेकांना म्हणू लागले: “चला आपण बेथलेहेमला जाऊन घडलेली जी गोष्ट यहोवाने* आपल्याला कळवली आहे, ती पाहू या.” १६ तेव्हा, ते घाईघाईने गेले आणि त्यांना मरीया व योसेफ आणि गव्हाणीत झोपलेले बाळ दिसले. १७ हे पाहिल्यावर, त्या लहान बाळाविषयी देवदूताने जे काही म्हटले होते ते त्यांनी सांगितले. १८ मग, मेंढपाळांनी सांगितलेल्या गोष्टी ज्यांनी ऐकल्या, ते सर्व लोक चकित झाले. १९ पण, मरीयाने या सर्व गोष्टी आपल्या मनात जपून ठेवल्या आणि त्यांचा काय अर्थ असेल याचा ती विचार करू लागली. २० मग, ऐकलेल्या व पाहिलेल्या सर्व गोष्टींविषयी देवाचा गौरव व स्तुती करून मेंढपाळ परत गेले. त्यांना जसे सांगण्यात आले होते अगदी तसेच सर्व घडले होते.
२१ आठ दिवसांनंतर बाळाची सुंता करण्याची वेळ आली तेव्हा त्याचे नाव येशू असे ठेवण्यात आले. हे नाव देवदूताने त्याची गर्भधारणा होण्यापूर्वीच ठेवले होते.
२२ मग, मोशेच्या नियमशास्त्रानुसार त्यांच्या शुद्धीकरणाची वेळ आली तेव्हा ते त्याला यहोवापुढे* सादर करण्यासाठी यरुशलेमला घेऊन आले. २३ यहोवाच्या* नियमशास्त्रात सांगितलेल्या या आज्ञेप्रमाणे त्यांनी केले: “प्रत्येक प्रथम जन्मलेला नर यहोवासाठी* पवित्र म्हटला जावा.” २४ आणि यहोवाच्या* नियमशास्त्रात सांगितल्याप्रमाणे त्यांनी बलिदान अर्पण केले: “पारव्यांची जोडी किंवा कबुतरांची दोन पिल्ले.”
२५ आणि पाहा! यरुशलेमेत शिमोन नावाचा एक नीतिमान व देवभीरू मनुष्य होता. तो इस्राएलचे सांत्वन होण्याची वाट पाहत होता आणि त्याच्यावर पवित्र आत्मा होता.* २६ शिवाय, पवित्र आत्म्याद्वारे देवाने त्याला हे दाखवून दिले होते, की यहोवाने* पाठवलेल्या ख्रिस्ताला पाहिल्याशिवाय त्याला मरण येणार नाही. २७ मग, पवित्र आत्म्याच्या सामर्थ्याने तो मंदिरात आला. नियमशास्त्रात सांगितलेल्या रिवाजाप्रमाणे करण्यासाठी बाळ येशूचे आईवडील त्याला घेऊन आले, २८ तेव्हा त्याने त्या मुलाला आपल्या हातांत घेतले आणि देवाची स्तुती करून म्हटले: २९ “हे सर्वोच्च प्रभू, आता तुझा दास शांतीने मरू शकतो, कारण तू सांगितल्याप्रमाणे, ३० ज्याच्याद्वारे तू तारण करणार आहेस त्याला मी पाहिलं आहे, ३१ ज्याला तू अशासाठी दिलं आहेस की सर्व राष्ट्रांतील लोकांनी त्याला पाहावं. ३२ तो राष्ट्रांच्या डोळ्यांवरील पडदा दूर करणारा प्रकाश आणि तुझे लोक इस्राएल यांचा गौरव आहे.” ३३ बाळाविषयी सांगितलेल्या या सर्व गोष्टींमुळे त्याचे आईवडील आश्चर्यचकित झाले. ३४ मग, शिमोनने त्यांना आशीर्वाद दिला आणि मुलाच्या आईला, मरीयाला तो म्हणाला: “पाहा! हा इस्राएलमध्ये अनेकांच्या पडण्याचं व पुन्हा उठण्याचं कारण ठरेल आणि एक असं चिन्ह बनेल ज्याच्याविरुद्ध लोक बोलतील. ३५ (आणि तुझ्याविषयी म्हणावं, तर एक लांब तलवार तुझ्यातून* आरपार जाईल), आणि त्याद्वारे अनेकांच्या मनातील विचार प्रकट होतील.”
३६ तिथे हन्ना नावाची एक संदेष्टी होती. ती आशेर वंशातील फनूएलची मुलगी होती. ती फार वृद्ध झाली होती. लग्नानंतर सात वर्षे आपल्या नवऱ्यासोबत राहिल्यावर ३७ ती विधवा झाली होती आणि आता ८४ वर्षांची होती. तिने मंदिरात जाण्याचे सोडले नव्हते आणि उपास व याचना करून ती रात्रंदिवस पवित्र सेवा करायची. ३८ त्याच वेळी ती बाळाच्या आईवडिलांजवळ आली व देवाचे आभार मानू लागली, आणि यरुशलेमच्या सुटकेची वाट पाहणाऱ्या सर्वांना त्या मुलाविषयी सांगू लागली.
३९ मग, यहोवाच्या* नियमशास्त्रानुसार सर्वकाही पार पाडल्यानंतर ते गालीलमधील नासरेथ या आपल्या शहरात परत गेले. ४० पुढे तो लहान मुलगा वाढत गेला आणि सुदृढ व बुद्धिमान बनत गेला आणि देवाची कृपा त्याच्यावर होती.
४१ दरवर्षी, वल्हांडण सणासाठी यरुशलेमला जाण्याची त्याच्या आईवडिलांची रीतच होती. ४२ त्याप्रमाणे, तो बारा वर्षांचा असताना सणाच्या रिवाजानुसार ते वर यरुशलेमला गेले. ४३ सणाचे दिवस पूर्ण झाल्यानंतर ते परत जात असताना त्यांचा मुलगा येशू यरुशलेममध्येच मागे राहिला. पण, हे त्याच्या आईवडिलांच्या लक्षात आले नाही. ४४ तो प्रवास करणाऱ्या लोकांच्या घोळक्यातच असेल असा विचार करून ते एका दिवसाचे अंतर पार करून गेले आणि मग ते नातेवाइकांमध्ये व ओळखीच्या लोकांमध्ये त्याला शोधू लागले. ४५ पण, तो सापडला नाही तेव्हा ते पुन्हा यरुशलेमला गेले आणि त्यांनी त्याला सगळीकडे शोधले. ४६ मग, तीन दिवसांनंतर त्यांना तो मंदिरात सापडला. तो गुरूजनांमध्ये बसून त्यांचे ऐकत व त्यांना प्रश्न विचारत होता. ४७ पण, त्याचे बोलणे ऐकणारे सर्व जण त्याच्या समजबुद्धीमुळे आणि त्याच्या उत्तरांमुळे अगदी थक्क झाले होते. ४८ त्याच्या आईवडिलांनी त्याला तिथे पाहिले तेव्हा त्यांना आश्चर्य वाटले आणि त्याची आई त्याला म्हणाली: “बाळा, तू आमच्याशी असा का वागलास? तुझे वडील आणि मी किती काळजीत होतो, आणि तुला कुठे-कुठे शोधत होतो!” ४९ पण, तो त्यांना म्हणाला: “तुम्ही मला का शोधत होता? मी माझ्या पित्याच्या घरात असेन हे तुम्हाला माहीत नव्हतं का?” ५० पण तो काय म्हणत आहे हे त्यांना समजले नाही.
५१ मग तो त्यांच्यासोबत खाली नासरेथला गेला आणि त्यांच्या आज्ञेत* राहिला. तसेच, त्याच्या आईने या सर्व गोष्टी आपल्या मनात जपून ठेवल्या. ५२ आणि येशू बुद्धीने व शरीराने वाढत गेला; तसेच, देवाच्या व माणसांच्या कृपेतही तो वाढत गेला.