अभ्यास लेख ३३
गीत ४ “यहोवा माझा मेंढपाळ”
यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे यावर विश्वास ठेवा
“एकनिष्ठ प्रेमाने मी तुला जवळ घेतलंय.”—यिर्म. ३१:३.
या लेखात:
यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावर विश्वास ठेवणं का गरजेचंय आणि तो विश्वास आपण कसा मजबूत करू शकतो, ते पाहा.
१. तुम्हाला यहोवाला समर्पण करावंसं का वाटलं? (चित्रसुद्धा पाहा.)
तुम्हाला तुमची समर्पणाची प्रार्थना आठवते का? तुम्ही समर्पणाचा निर्णय घेतला, कारण तुम्ही यहोवाला जाणून घेतलं होतं आणि तुमचं त्याच्यावर प्रेम होतं. तुम्ही त्याला वचन दिलं होतं, की तुम्ही फक्त त्याच्याच इच्छेला आपल्या जीवनात पहिली जागा द्याल आणि पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण बुद्धीने आणि पूर्ण शक्तीने त्याच्यावर पुढेही प्रेम करत राहाल. (मार्क १२:३०) तेव्हापासून आत्तापर्यंत त्याच्यावरचं तुमचं प्रेम दिवसेंदिवस वाढत गेलंय. मग जर कोणी तुम्हाला विचारलं, “तुमचं यहोवावर खरंच प्रेम आहे का?” तर तुम्ही मागचा-पुढचा विचार न करता म्हणाल, “माझं यहोवावर सगळ्यात जास्त प्रेम आहे.”
जेव्हा तुम्ही आपलं जीवन समर्पित करून बाप्तिस्मा घेतला, तेव्हा तुमचं त्याच्यावर किती प्रेम होतं हे तुम्हाला आठवतं का? (परिच्छेद १ पाहा)
२-३. आपल्याला कशाची खातरी असावी असं यहोवाला वाटतं आणि या लेखात आपण काय पाहणार आहोत? (यिर्मया ३१:३)
२ पण जर कोणी तुम्हाला असा प्रश्न विचारला, की “यहोवाचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे का?” तर तुम्ही काय उत्तर द्याल? तुम्ही उत्तर द्यायला कचराल का? कदाचित तुम्हाला असं वाटेल, की आपण यहोवाच्या प्रेमाच्या लायक नाही. एका बहिणीच्या उदाहरणाचा विचार करा. तिला लहानपणी प्रेम मिळालं नाही. ती म्हणते: “माझं यहोवावर प्रेम आहे याबद्दल मला जराही शंका नाही. पण मला कधीकधी असा प्रश्न पडतो, की यहोवाचं खरंच माझ्यावर प्रेम असेल का?” जर तुम्हालाही या बहिणीसारखं वाटत असेल, तर यहोवाला नेमकं कसं वाटतं हे तुम्ही कसं जाणून घेऊ शकता?
३ यहोवाचं आपल्यापैकी प्रत्येकावर प्रेम आहे याची आपल्याला खातरी असावी असं त्याला वाटतं. (यिर्मया ३१:३ वाचा.) खरंतर यहोवाने स्वतः तुम्हाला त्याच्याकडे आणलंय. जेव्हा तुम्ही आपलं जीवन यहोवाला समर्पित केलं आणि बाप्तिस्मा घेतला, तेव्हा तुम्हाला एक मौल्यवान गोष्ट मिळाली. ती म्हणजे, यहोवाचं एकनिष्ठ प्रेम. हे प्रेम गहिरं आहे आणि कायम टिकणारं आहे. याच प्रेमामुळे यहोवा त्याच्या सर्व विश्वासू सेवकांना म्हणजे तुम्हालाही “मौल्यवान संपत्ती” समजायला प्रवृत्त होतो. (मला. ३:१७, तळटीप) प्रेषित पौलला यहोवाच्या प्रेमाची जशी खातरी होती, तशीच तुम्हालाही असावी अशी यहोवाची इच्छा आहे. पौलने अगदी आत्मविश्वासाने असं लिहिलं: “मला खातरी आहे, की कोणतीही गोष्ट म्हणजे मृत्यू, जीवन, स्वर्गदूत, कोणतंही सरकार, सध्याच्या गोष्टी, भविष्यातल्या गोष्टी, सामर्थ्य, उंची, खोली, किंवा सृष्टीतली दुसरी कोणतीही गोष्ट आपल्याला देवाच्या त्या प्रेमापासून वेगळं करू शकत नाही.” (रोम. ८:३८, ३९) मग यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावरचा विश्वास मजबूत करणं का गरजेचंय? आणि हा विश्वास आपण कसा मजबूत करू शकतो? या प्रश्नांची उत्तरं आपण या लेखात पाहणार आहोत.
यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावर विश्वास ठेवणं का गरजेचंय?
४. आपण सैतानाचा विरोध कसा करू शकतो?
४ यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीवर जर आपण विश्वास ठेवला, तर आपण सैतानाच्या “डावपेचांविरुद्ध” स्थिर उभं राहू शकतो. (इफिस. ६:११) सैतानाची इच्छा आहे की आपण यहोवाची सेवा करणं सोडून द्यावं आणि त्यासाठी तो कोणत्याही थराला जाऊ शकतो. इतकंच काय, तर यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही, यावर तो आपल्याला विचार करायला लावतो. पण हे खोटं आहे. बायबलमध्ये सैतानाची तुलना सिंहाशी करण्यात आली आहे. (१ पेत्र ५:८, ९) सिंह अशा जनावरांवर हल्ला करतात, जे कमजोर असतात आणि जे स्वतःचं संरक्षण करू शकत नाही. त्याच प्रकारे सैतान सहसा अशा लोकांवर हल्ला करतो, जे आधीच्या वाईट अनुभवांमुळे, आत्ताच्या समस्यांमुळे किंवा मग भविष्यातल्या चिंतांमुळे खूप दुःखी असतात, निराश असतात आणि कमजोर असतात. (नीति. २४:१०) सैतानाची इच्छा आहे, की आपण इतकं कमजोर व्हावं की शेवटी आपण यहोवाची सेवा करणंच सोडून द्यावं. पण यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीवर आपला विश्वास वाढवण्यासाठी आपण जमेल ते सगळं केलं पाहिजे. असं करून आपण सैतानाचा आणि त्याच्या डावपेचांचा “विरोध” करू शकतो.—याको. ४:७.
५. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे आणि त्याला आपली कदर आहे याची आपल्याला जाणीव असणं इतकं का महत्वाचं आहे?
५ यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावर जर आपण विश्वास ठेवला, तर आपण त्याच्या जवळ जाऊ शकतो. ते कसं? आपण इतरांवर प्रेम करावं आणि त्यांनीही आपल्यावर प्रेम करावं अशा प्रकारे यहोवाने आपल्याला बनवलंय. त्यामुळे जेव्हा एखादी व्यक्ती आपल्यावर प्रेम करते, तेव्हा आपणही तिच्यावर प्रेम करायला प्रवृत्त होतो. त्याच प्रकारे, यहोवाचं प्रेम आपल्याला जितकं जास्त जाणवतं, तितकं जास्त आपण त्याच्यावर प्रेम करायला प्रवृत्त होतो. (१ योहा. ४:१९) जसजसं त्याच्यावरचं आपलं प्रेम वाढत जातं, तसतसं त्याचंही आपल्यावरचं प्रेम वाढत जाईल. म्हणूनच बायबल स्पष्टपणे सांगतं: “देवाच्या जवळ या म्हणजे तो तुमच्या जवळ येईल.” (याको. ४:८) तर मग, यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावरचा भरवसा आपण कसा मजबूत करू शकतो?
यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावर विश्वास ठेवायला कशामुळे मदत होईल?
६. यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे याबद्दल तुमच्या मनात शंका असेल तर तुम्ही काय करू शकता?
६ यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे हे समजून घ्यायला त्याला सतत प्रार्थना करा. (लूक १८:१: रोम. १२:१२) यहोवाला आपल्याबद्दल काय वाटतं हे समजावं, म्हणून तुम्हाला दिवसातून बऱ्याचदा प्रार्थना करावी लागेल. कदाचित कमीपणाची भावना असल्यामुळे यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे या गोष्टीवर विश्वास ठेवणं तुम्हाला कठीण जात असेल. पण लक्षात ठेवा, की यहोवा तुमच्या मनापेक्षा मोठा आहे. (१ योहा. ३:१९, २०) तो तुम्हाला तुमच्यापेक्षाही चांगलं ओळखतो. कदाचित तुमच्यातले चांगले गुण तुमच्या लक्षात येणार नाहीत, पण यहोवाला ते माहीत आहेत. (१ शमु. १६:७; २ इति. ६:३०) त्यामुळे प्रार्थनेत त्याच्यासमोर आपलं “मन मोकळं” करायला कचरू नका आणि त्याचं तुमच्यावर प्रेम आहे यावर विश्वास ठेवायला त्याच्याकडे मदत मागा. (स्तो. ६२:८) मग खाली दिलेले सल्ले लागू करून आपल्या प्रार्थनेनुसार काम करायचा प्रयत्न करा.
७-८. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे याची खातरी आपल्याला स्तोत्रांमधून कशी मिळते?
७ यहोवा जे सांगतो त्यावर विश्वास ठेवा. यहोवाने बायबलच्या लेखकांना, तो जसा आहे तसंच त्याचं वर्णन करायला प्रेरित केलं. यहोवाला आपली किती काळजी आहे याबद्दल दावीदने त्याच्या एका स्तोत्रात खूप सुंदर वर्णन केलंय. तो म्हणतो, “यहोवा दुःखी लोकांच्या जवळ असतो, निराश असलेल्यांना तो वाचवतो.” (स्तो. ३४:१८, तळटीप) जेव्हा तुम्ही निराश होऊन जाता तेव्हा तुम्हाला कदाचित खूप एकटं वाटू शकतं. पण अशा काळात यहोवा तुमच्या मदतीसाठी असतो. कारण त्या काळात तुम्हाला त्याच्या मदतीची किती गरज आहे हे त्याला माहीत असतं. आणखी एका स्तोत्रात दावीद म्हणतो, “माझे अश्रू तुझ्या बुधलीत जमा कर.” (स्तो. ५६:८) याचा काय अर्थ होतो? ज्या प्रकारे वाळवंटातून प्रवास करणाऱ्या माणसासाठी त्याच्या पाण्याच्या बाटलीतला प्रत्येक थेंब मोलाचा असतो, त्याच प्रकारे यहोवासाठी तुमचे अश्रू मोलाचे आहेत. तुम्ही कोणत्या त्रासातून जात आहात हे यहोवा पाहतो. त्याला तुमची मनापासून काळजी आहे आणि तुम्हाला सहन कराव्या लागणाऱ्या वेदना त्याला कळतात. तुम्ही जेव्हाजेव्हा रडला, जेव्हाजेव्हा दुःखात होता, तो प्रत्येक क्षण त्याच्या लक्षात आहे. स्तोत्र १३९:३ मध्ये म्हटलंय, “माझे सर्व मार्ग तू जाणतोस.” हो, यहोवाला तुमचे सगळे मार्ग ठाऊक आहेत. पण तो फक्त तुमच्या चांगल्या गोष्टींकडेच लक्ष देतो. (इब्री ६:१०) कारण त्याला खूश करण्यासाठी तुम्ही जी मेहनत घेत आहात त्याची त्याला कदर आहे.a
८ यहोवा त्याच्या वचनातल्या अशा सांत्वन देणाऱ्या शब्दांचा वापर करून आपल्याला एका अर्थाने म्हणतोय, “माझं तुझ्यावर प्रेम आहे आणि मला तुझी काळजी आहे, हे तुला कळावं असं मला वाटतं.” पण आधी पाहिल्याप्रमाणे यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही यावर आपण विश्वास ठेवावा असं सैतानाला वाटतं. त्यामुळे जर आपल्याला यहोवाच्या प्रेमाबद्दल कधी शंका वाटली, तर थोडं थांबून स्वतःला विचारा, ‘मी कोणावर विश्वास ठेवेन, “खोटेपणाच्या बापावर“ की “सत्याच्या देवावर?”’—योहा. ८:४४; स्तो. ३१:५.
९. जे यहोवावर प्रेम करतात त्यांना तो कोणती खातरी देतो? (निर्गम २०:५, ६)
९ आपलं यहोवावर प्रेम आहे याबद्दल त्याला कसं वाटतं याचा विचार करा. यहोवाने मोशेला आणि इस्राएली लोकांना काय म्हटलं हे आठवायचा प्रयत्न करा. (निर्गम २०:५, ६ वाचा.) त्याने वचन दिलं की जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तो एकनिष्ठ प्रेम करत राहील. यहोवा एकनिष्ठ असल्यामुळे आपण याची खातरी बाळगू शकतो, की जे त्याच्यावर प्रेम करतात त्यांच्यावर तो नक्कीच प्रेम करेल. (नहे. १:५) त्यामुळे यहोवा आपल्यावर प्रेम करतो की नाही यावर जर तुम्हाला कधी शंका वाटली, तर थोडं थांबून स्वतःला विचारा: ‘माझं यहोवावर प्रेम आहे का?’ मग विचार करा, जर तुमचं यहोवावर प्रेम आहे आणि त्याला खूश करण्यासाठी तुम्ही जमेल ते सगळं करत आहात, तर यहोवा तुम्हाला खातरी देतो की त्याचंही तुमच्यावर मनापासून प्रेम आहे. (दानी. ९:४; १ करिंथ. ८:३) दुसऱ्या शब्दांत, आपलं यहोवावर प्रेम आहे यावर जर आपल्याला शंका नसेल, तर मग यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे की नाही यावर आपण शंका का घ्यावी? यहोवा आपल्यावर प्रेम करतो आणि तो आपल्याला कधीच सोडून देणार नाही याबद्दल आपण पूर्ण खातरी बाळगू शकतो.
१०-११. आपण खंडणीबद्दल कसा विचार करावा असं यहोवाला वाटतं? (गलतीकर २:२०)
१० खंडणी बलिदानावर मनन करा. येशू ख्रिस्ताचं खंडणी बलिदान ही यहोवाकडून संपूर्ण मानवजातीसाठी असलेली सर्वात मोठी भेट आहे. (योहा. ३:१६) पण ही भेट खास तुमच्यासाठीही आहे का? नक्कीच. प्रेषित पौलचा विचार करा. ख्रिस्ती बनण्याआधी त्याने काही गंभीर पापं केली होती आणि त्याला स्वतःच्याच अपरिपूर्णतांशी सतत लढावं लागत होतं. (रोम. ७:२४, २५; १ तीम. १:१२-१४) असं असलं तरी, खंडणीची भेट यहोवाने खास आपल्यासाठी दिली आहे असं तो समजत होता. (गलतीकर २:२० वाचा.) अजून एक गोष्ट लक्षात घ्या, की यहोवाने प्रेषित पौलला हे शब्द लिहून काढण्याची प्रेरणा दिली. तसंच आपल्याला हेही माहीत आहे की बायबलमध्ये लिहिलेल्या सगळ्या गोष्टी आपल्या शिक्षणासाठी आहेत. (रोम. १५:४) पौलच्या शब्दांवरून आपल्याला यहोवाची इच्छा कळते. यहोवाला वाटतं, की खंडणी खास आपल्यासाठी देण्यात आलेली भेट आहे असं आपण समजावं. जेव्हा तुम्ही खंडणीकडे या दृष्टिकोनातून बघता, तेव्हा यहोवाचं खास तुमच्यावर प्रेम आहे या गोष्टीवरचा तुमचा भरवसा आणखी मजबूत होतो.
११ यहोवाने त्याच्या मुलाला या पृथ्वीवर आपल्यासाठी बलिदान द्यायला पाठवलं. म्हणून आपण त्याचे खरंच खूप आभारी आहोत. पण येशू फक्त खंडणी बलिदान द्यायलाच नाही, तर इतरांना देवाबद्दलचं सत्य सांगायलाही या पृथ्वीवर आला होता. (योहा. १८:३७) यहोवाचं त्याच्या सगळ्या मुलांवर किती प्रेम आहे हेसुद्धा एक सत्य आहे आणि त्याबद्दलही येशूने शिकवलं.
यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावर विश्वास ठेवायला येशू आपल्याला कशी मदत करतो?
१२. येशूने यहोवाबद्दल जे सांगितलं त्यावर आपण पूर्णपणे भरवसा का ठेवू शकतो?
१२ पृथ्वीवर असताना येशूने लोकांना, यहोवा नेमका कसा आहे याबद्दल आनंदाने सांगितलं. (लूक १०:२२) येशूने यहोवाबद्दल जे काही सांगितलं त्यावर आपण पूर्णपणे भरवसा ठेवू शकतो. कारण येशू लाखो-करोडो वर्षं यहोवासोबत स्वर्गात होता. (कलस्सै. १:१५) यहोवाचं त्याच्या विश्वासू मुलामुलींवर किती प्रेम आहे हे येशूने स्वतः अनुभवलंय आणि पाहिलंय. मग येशूने इतरांना देवाचं त्यांच्यावर प्रेम आहे यावर विश्वास ठेवायला कशी मदत केली?
१३. आपण यहोवाकडे कोणत्या दृष्टिकोनातून पाहावं असं येशूला वाटतं?
१३ येशू ज्या दृष्टिकोनातून यहोवाकडे पाहतो तसंच आपणही पाहावं असं येशूला वाटतं. आनंदाच्या संदेशाच्या पुस्तकांमध्ये येशूने १६० पेक्षा जास्त वेळा यहोवाचा उल्लेख “पिता” म्हणून केला. तसंच त्याच्या शिष्यांशी बोलताना त्याने ‘तुमचा पिता’ किंवा “स्वर्गातला तुमचा पिता,” यांसारख्या शब्दांचा वापर केला. (मत्त. ५:१६; ६:२६) येशू पृथ्वीवर येण्याआधी यहोवाचे विश्वासू सेवक, यहोवासाठी ‘सर्वशक्तिमान,’ ‘सर्वोच्च देव,’ ‘महान निर्माणकर्ता’ यांसारख्या मोठमोठ्या पदव्यांचा वापर करायचे. पण येशू बऱ्याचदा यहोवाला ‘पिता’ असं म्हणायचा. यावरून आपल्याला काय कळतं? एका लहान मुलाला त्याच्या प्रेमळ पित्याच्या जवळ असल्यासारखं वाटतं, तसंच आपल्यालाही यहोवाबद्दल वाटावं अशी यहोवाची इच्छा आहे. यावरून स्पष्ट होतं की येशूसाठी यहोवा आपल्या मुलांवर प्रेम करणाऱ्या प्रेमळ पित्यासारखा आहे आणि आपणही त्याच दृष्टिकोनातून यहोवाकडे पाहावं असं त्याला वाटतं. तर चला आता आपण अशा दोन प्रसंगांचा विचार करू या, ज्या वेळी येशूने यहोवाला “पिता” असं म्हटलं.
१४. आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या नजरेत त्याचा प्रत्येक सेवक मौल्यवान आहे, हे येशूने कसं दाखवून दिलं? (मत्तय १०:२९-३१) (चित्रसुद्धा पाहा.)
१४ सगळ्यात आधी मत्तय १०:२९-३१ (वाचा.) मधल्या येशूच्या शब्दांचा विचार करा. या ठिकाणी येशू चिमण्यांचं उदाहरण देतो. चिमण्या आकाराने खूप छोट्या असतात. त्या कधीच यहोवावर प्रेम करू शकत नाहीत किंवा त्याची उपासना करू शकत नाहीत, तरी यहोवाला त्यांच्याबद्दल एकूण एक गोष्ट माहीत आहे. इतकंच काय तर, कोणतीच चिमणी त्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही. जर यहोवाला छोट्याशा चिमणीची इतकी काळजी आहे, तर मग त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या त्याच्या प्रत्येक विश्वासू सेवकाची त्याला काळजी नसेल का? लक्ष द्या, येशू पुढे म्हणतो: “तुमच्या डोक्यावरचे सगळे केससुद्धा मोजलेले आहेत.” यावरून आपल्याला काय समजतं? यहोवाला आपल्याबद्दल बारीक-सारीक गोष्टी माहीत आहेत. यावरून आपण ही खातरी ठेवू शकतो, की त्याला त्याच्या प्रत्येक सेवकाची काळजी आहे. यात काहीच शंका नाही, की आपल्या स्वर्गातल्या पित्याच्या नजरेत प्रत्येक जण मौल्यवान आहे, यावर आपण विश्वास ठेवावा असं येशूला वाटतं.
यहोवाच्या नजरेत चिमणी अनमोल आहे. इतकी की कोणतीच चिमणी त्याच्या नकळत जमिनीवर पडत नाही. जर असं असेल, तर मग त्याच्यावर मनापासून प्रेम करणाऱ्या त्याच्या प्रत्येक विश्वासू सेवकाची त्याला काळजी नसेल का? (परिच्छेद १४ पाहा)
१५. योहान ६:४४ मध्ये असलेल्या येशूच्या शब्दांवरून आपल्याला आपल्या स्वर्गातल्या पित्याबद्दल काय कळतं?
१५ आता दुसऱ्या एका प्रसंगाचा विचार करा. (योहान ६:४४ वाचा.) आपल्या स्वर्गातल्या पित्याने, यहोवाने स्वतः तुम्हाला अगदी प्रेमाने सत्याकडे आकर्षित केलंय. त्याने असं का केलं? कारण त्याने तुमच्यामध्ये योग्य मनोवृत्ती पाहिली. (प्रे. कार्यं १३:४८) जेव्हा येशूने योहान ६:४४ मधले शब्द म्हटले, तेव्हा तो कदाचित यिर्मया ३१:३ मध्ये दिलेल्या यहोवाच्या शब्दांचा उल्लेख करत असावा. तिथे यहोवा म्हणतो: “एकनिष्ठ प्रेमाने मी तुला जवळ घेतलंय [किंवा, मी तुझ्यावर एकनिष्ठ प्रेम करत आलोय].” (यिर्म. ३१:३; तळटीप; होशेय ११:४ सोबत तुलना करा.) या शब्दांचा काय अर्थ होतो याचा विचार करा. आपल्यातल्या चांगल्या गोष्टी कदाचित आपल्याला दिसणार नाहीत. पण आपला स्वर्गातला पिता सतत त्या पाहतो.
१६. (क) येशू एका अर्थाने आपल्याला काय म्हणतो आणि आपण त्याच्यावर भरवसा का ठेवला पाहिजे? (ख) यहोवा सगळ्यात चांगला पिता आहे, याबद्दल खातरी बाळगायला आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते? (“सगळ्यात चांगला पिता—यहोवा” ही चौकट पाहा.)
१६ यहोवाला आपल्या सगळ्यांचा पिता म्हणून, येशू एका अर्थाने आपल्याला असं म्हणतोय: “यहोवा फक्त माझाच पिता नाही, तर तो तुमचाही पिता आहे. आणि मी तुम्हाला याची खातरी देतो की तुमच्या प्रत्येकावर त्याचं प्रेम आहे आणि त्याला तुमची काळजी आहे.” त्यामुळे जर कधी तुम्हाला यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे की नाही, याबद्दल शंका वाटली तर थोडं थांबून स्वतःला विचारा, ‘जो मुलगा आपल्या पित्याला सगळ्यात चांगलं ओळखतो आणि जो नेहमी खरं बोलतो, त्याच्यावर मी भरवसा ठेवू नये का?’—१ पेत्र २:२२.
यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे, यावरचा विश्वास मजबूत करत राहा
१७. यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे यावरचा विश्वास मजबूत करत राहणं का गरजेचंय?
१७ यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे, यावरचा आपला विश्वास आपण मजबूत करत राहिलं पाहिजे. कारण आधी पाहिल्याप्रमाणे आपण यहोवाची सेवा करायचं सोडून द्यावं, म्हणून धूर्त असलेला आपला शत्रू सैतान वाटेल ते करायला तयार असतो. आपल्या विश्वासाला तडे जावे, असं सैतानाला वाटतं. त्यामुळे यहोवाचं आपल्यावर प्रेम नाही असा विचार आपण करावा, यासाठी तो नेहमी प्रयत्न करत राहील. पण आपण सैतानाचे हे प्रयत्न कधीच यशस्वी होऊ देऊ नये!—ईयो. २७:५.
१८. यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे यावरचा विश्वास मजबूत करण्यासाठी तुम्ही काय करू शकता?
१८ मग या लेखात आपण काय पाहिलं? यहोवाचं तुमच्यावर प्रेम आहे यावर तुम्ही विश्वास कसा ठेवू शकता, ते आपण पाहिलं. यासाठी त्याला प्रार्थना करा. तसंच यहोवा तुमच्यात जे चांगले गुण पाहतो, ते तुम्हालाही पाहता यावेत यासाठी त्याच्याकडे मदत मागा. शिवाय, यहोवाच्या प्रेरणेने बायबलच्या लेखकांनी त्याच्या प्रेमाबद्दल जे सुंदर वर्णन केलंय, त्यावरही मनन करत राहा. हेसुद्धा लक्षात ठेवा की जे यहोवावर प्रेम करतात त्यांच्यावर तो नेहमी प्रेम करतो. तसंच खंडणी ही यहोवाने खास तुमच्यासाठी दिलेली भेट आहे हे कधीच विसरू नका. आणि येशूने सांगितल्याप्रमाणे यहोवा तुमचाही पिता आहे यावर भरवसा ठेवा. मग जर कोणी तुम्हाला विचारलं, की “यहोवाचं खरंच तुमच्यावर प्रेम आहे का?” तर तुम्ही आत्मविश्वासाने म्हणू शकाल, “हो, यहोवाचं माझ्यावर प्रेम आहे. आणि माझंही यहोवावर प्रेम आहे हे दाखवण्यासाठी मी दररोज जमेल ते सगळं करतो.”
गीत १५४ अनंत प्रेम
a यहोवाचं आपल्यावर प्रेम आहे याची खातरी पटवून देणाऱ्या आणखी वचनांसाठी ख्रिस्ती जीवनासाठी उपयोगी शास्त्रवचनं या प्रकाशनातला “कमीपणाची भावना” हा विषय पाहा.