वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w14 ७/१५ पृ. २३-२७
  • “तुम्ही माझे साक्षी आहा”

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • “तुम्ही माझे साक्षी आहा”
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • प्राचीन काळातील देवाचे साक्षीदार
  • “पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे”
  • देवाच्या नावाचा अर्थ
  • कृतज्ञता व्यक्‍त करणे
  • यहोवाच्या थोर नावाचे गौरव करा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१३
  • खोट्या दैवतांविरुद्ध साक्षीदार
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • यहोवाचं नाव आपल्यासाठी किती महत्त्वाचं आहे?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • आम्हाला यहोवाचे साक्षीदार का म्हणतात?
    यहोवाच्या इच्छेनुसार आज कोण कार्य करत आहेत?
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१४
w14 ७/१५ पृ. २३-२७
१९३१ साली बायबल विद्यार्थ्यांचे झालेले अधिवेशन. त्या वेळी यहोवाचे साक्षीदार हे नाव धारण करण्यात आले

“तुम्ही माझे साक्षी आहा”

“यहोवा म्हणतो, तुम्ही माझे साक्षी आहा.”—यश. ४३:१०, पं.र.भा.

तुम्ही उत्तर देऊ शकता का?

  • इस्राएली लोक कोणत्या अर्थाने यहोवाचे साक्षी होते?

  • देवाच्या नावाचा काय अर्थ होतो?

  • देवाच्या पवित्र नावाने ओळखले जाण्याच्या बहुमानाबद्दल आपण कदर कशी दाखवू शकतो?

१, २. (क) साक्षी असण्याचा काय अर्थ होतो, आणि जगातील प्रसारमाध्यमांनी कोणत्या महत्त्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष केले आहे? (ख) यहोवा जगातील प्रसारमाध्यमांवर अवलंबून का नाही?

साक्षी असण्याचा काय अर्थ होतो? एका शब्दकोशात साक्षी किंवा साक्षीदार या शब्दाची पुढीलप्रमाणे व्याख्या केली आहे: “स्वतः पाहिलेल्या घटनेचे वर्णन करणारी व्यक्‍ती.” उदाहरणार्थ, दक्षिण आफ्रिकेतील एका शहरात एक वर्तमानपत्र मागील १६० वर्षांपासून प्रकाशित होत आहे. त्या वर्तमानपत्राचे नाव साक्षी असे आहे. हे नाव अगदी योग्य आहे कारण कोणत्याही वर्तमानपत्राचा उद्देश जगभरात चाललेल्या घडामोडींचे अचूक वृत्त देणे हा असतो. साक्षी या वर्तमानपत्राची सुरुवात करताना त्याचे संस्थापक व संपादक यांनी असा निर्धार केला होता की आम्ही लोकांना नेहमी “सत्य सांगू, पूर्ण सत्य सांगू आणि केवळ सत्यच सांगू.”

२ पण दुःखाची गोष्ट ही आहे की मानवी इतिहासातील सर्वात महत्त्वाच्या सत्यांकडे जगभरातील प्रसारमाध्यमांनी दुर्लक्ष केले आहे किंवा त्यांत फेरफार करून ती जगापुढे आणली आहेत. उदाहरणार्थ, सर्वसमर्थ देवाने यहेज्केल नावाच्या संदेष्ट्याद्वारे असे सांगितले होते: “राष्ट्रे जाणतील की मी यहोवा . . . आहे.” (यहे. ३९:७, पं.र.भा.) पण जगातील प्रसारमाध्यमांनी हे सत्य लोकांपुढे आणले नाही. अर्थात, विश्‍वाच्या सर्वोच्च राजाला त्याचे नाव इतरांपर्यंत पोचवण्यास प्रसारमाध्यमांवर अवलंबून राहण्याची गरज नाही. कारण जगभरात यहोवाचे जवळजवळ ८० लाख उपासक आहेत, जे त्याच्याविषयी व आतापर्यंत त्याने मानवांसोबत कशा प्रकारे व्यवहार केला आहे त्याविषयी इतरांना सांगतात. तसेच, यहोवाने भविष्यात मानवांकरता काय राखून ठेवले आहे हेदेखील ते इतरांना सांगतात. साक्ष देण्याच्या या कार्याला जीवनात प्राधान्य देण्याद्वारे आपण आपल्या नावाला जागतो. हे नाव यशया ४३:१० या वचनात दिलेले आहे. तेथे असे म्हटले आहे: “यहोवा म्हणतो, तुम्ही माझे साक्षी आहा, आणि जो माझा सेवक मी निवडला आहे तो साक्षी आहे.”

३, ४. (क) बायबल विद्यार्थ्यांनी यहोवाचे साक्षीदार हे नाव कोणत्या साली स्वीकारले, आणि याबद्दल त्यांची कशी प्रतिक्रिया होती? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.) (ख) आपण कोणत्या प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत?

३ यहोवाच्या नावाने ओळखले जाण्याचा किती मोठा सुहक्क आपल्याला मिळाला आहे! कारण तो “सनातन” म्हणजेच सर्वकाळचा राजा आहे जो असे म्हणतो की, यहोवा “हेच माझे सनातन नाव आहे व याच नावाने पिढ्यानपिढ्या माझे स्मरण होईल.” (१ तीम. १:१७; निर्ग. ३:१५; उपदेशक २:१६ पडताळून पाहा.) बायबल विद्यार्थ्यांनी १९३१ साली यहोवाचे साक्षीदार हे नाव स्वीकारले. यानंतर बांधवांची कृतज्ञता व्यक्‍त करणारी बरीच पत्रे टेहळणी बुरूज मासिकांत प्रकाशित करण्यात आली. कॅनडा येथील एका मंडळीने असे लिहिले की, “आम्ही आता यहोवाचे साक्षीदार या नावाने ओळखले जाऊ हे ऐकून आम्हाला खूप आनंद झाला आहे, आणि या नावाला जागण्याचा आमचा निर्धार आता आणखी दृढ झाला आहे.”

४ देवाच्या नावाने ओळखले जाण्याचा तुम्हाला जो बहुमान मिळाला आहे त्यासाठी तुम्ही कदर कशी दाखवू शकता? तसेच, यहोवाचे साक्षीदार हे आपले नाव ज्या वचनातून घेण्यात आले आहे त्यात यहोवाने आपल्या लोकांना “तुम्ही माझे साक्षी आहा” असे का म्हटले होते हे तुम्ही स्पष्ट करू शकता का?

प्राचीन काळातील देवाचे साक्षीदार

५, ६. (क) इस्राएली पालकांनी कोणत्या मार्गाने यहोवाविषयी साक्ष दिली? (ख) त्यांना आणखी काय करण्यास आज्ञा देण्यात आली होती, आणि आजदेखील ख्रिस्ती पालकांनी ती आज्ञा पाळणे गरजेचे का आहे?

५ यशयाच्या काळातील प्रत्येक इस्राएली व्यक्‍तीला यहोवाचा “साक्षी,” आणि राष्ट्र या नात्याने इस्राएलला देवाचा “सेवक” असे म्हणण्यात आले. (यश. ४३:१०) देवाने आपल्या पूर्वजांशी कशा प्रकारे व्यवहार केला हे इस्राएली पालक आपल्या मुलांना शिकवायचे, तेव्हा एक प्रकारे ते यहोवाविषयी साक्षच द्यायचे. उदाहरणार्थ, दरवर्षी वल्हांडण सण कसा साजरा केला जावा याविषयी त्यांना असे सांगण्यात आले: “तुमचे मुलगे तुम्हाला विचारतील, तुम्ही ही सेवा का करता? तेव्हा तुम्ही असे म्हणा, हा यहोवाचा वल्हांडणाचा यज्ञ आहे, त्याने मिसऱ्‍यांना मारले तेव्हा तो मिसरात इस्राएलाच्या संतानांची घरे ओलांडून गेला, आणि त्याने आमची घरे वाचवली.” (निर्ग. १२:२६, २७, पं.र.भा.) मोशेने जेव्हा इस्राएली लोकांना अरण्यात घेऊन जाण्याची फारोजवळ पहिल्यांदा परवानगी मागितली तेव्हा काय झाले त्याबद्दलही या पालकांनी आपल्या मुलांना सांगितले असेल. फारोने तेव्हा असे उत्तर दिले होते की, “यहोवा कोण आहे की मी इस्राएलास जाऊ देण्यासंबंधी त्याचा शब्द ऐकावा?” (निर्ग. ५:२, पं.र.भा.) तसेच, दहा पीडांनी इजिप्त देश उद्‌ध्वस्त झाल्यावर व तांबडा समुद्र पार केल्यानंतर फारोच्या प्रश्‍नाचे उत्तर सर्वांसमोर अगदी स्पष्ट झाले, हेदेखील त्या पालकांनी आपल्या मुलांना सांगितले असेल. यहोवा हा सर्वशक्‍तिमान होता आणि आजही आहे. इस्राएल राष्ट्र हे या गोष्टीची साक्ष देणारे जिवंत उदाहरण होते की यहोवा हाच खरा देव आहे आणि तो दिलेली अभिवचने नेहमी पूर्ण करतो.

६ यहोवाच्या नावाने ओळखले जाण्याच्या बहुमानाची कदर ज्या इस्राएली लोकांनी बाळगली त्यांनी यहोवाने केलेल्या या अद्‌भुत गोष्टी फक्‍त त्यांच्या मुलांनाच नाही तर त्यांचे दास झालेल्या विदेशी लोकांनादेखील नक्कीच सांगितल्या असतील. यासोबतच त्यांना अशीही आज्ञा देण्यात आली होती की त्यांनी आपल्या मुलांना पवित्रतेविषयी यहोवाचे नीतिनियम पाळण्यास शिकवावे. यहोवाने इस्राएली लोकांना असे सांगितले होते: “तुम्ही पवित्र असावे, कारण मी परमेश्‍वर तुमचा देव पवित्र आहे.” (लेवी. १९:२; अनु. ६:६, ७) आजच्या ख्रिस्ती पालकांसाठी हे किती चांगले उदाहरण आहे. इस्राएली पालकांसारखेच त्यांनीही आपल्या मुलांना देवाच्या पवित्रतेविषयी शिकवले पाहिजे. असे केल्यास यहोवाच्या महान नावाला महिमा आणण्यास ते त्यांच्या मुलांना मदत करत असतील.—नीतिसूत्रे १:८; इफिसकर ६:४ वाचा.

इस्राएली पालक आपल्या मुलांना पवित्र राहण्याबद्दलचे देवाचे स्तर शिकवत असताना

आपल्या मुलांना यहोवाबद्दल शिकवण्याद्वारे आपण त्याच्या नावाला आदर देत असतो (परिच्छेद ५, ६ पाहा)

७. (क) इस्राएल राष्ट्र जेव्हा यहोवाला विश्‍वासू होते तेव्हा इतर राष्ट्रांवर त्याचा कसा प्रभाव पडला? (ख) देवाच्या नावाने ओळखले जाणाऱ्‍या सर्वांवर कोणती मोठी जबाबदारी आहे?

७ अशा प्रकारे, इस्राएली लोक जोपर्यंत यहोवाला विश्‍वासू राहिले तोपर्यंत त्यांनी इतरांना त्याच्या नावाची चांगली साक्ष दिली. त्यांना असे सांगण्यात आले होते: “पृथ्वीचे सर्व लोक पाहतील की, तुला यहोवाचे नाव ठेवले आहे, आणि ते तुला भीतील.” (अनु. २८:१०, पं.र.भा.) पण, दुःखाची गोष्ट म्हणजे इस्राएली लोकांच्या इतिहासावरून हे दिसून येते की ते बऱ्‍याचदा अविश्‍वासूपणे वागले. ते वारंवार यहोवाला सोडून मानवनिर्मित दैवतांच्या उपासनेकडे वळायचे. त्यासोबतच, ते ज्या कनानी दैवतांची उपासना करत होते त्यांसारखेच ते क्रूर बनले. ते आपल्या मुलांचा बळी देत होते व गरिबांवर जुलूम करत होते. हा आपल्यासाठी किती महत्त्वाचा धडा आहे! आपण ज्याच्या नावाने ओळखले जातो, त्या परमपवित्र देवाचे अनुकरण करून नेहमी पवित्र राहण्याचा प्रयत्न करत राहिले पाहिजे.

“पाहा, मी एक नवीन गोष्ट करणार आहे”

८. यहोवाने यशयावर कोणती जबाबदारी सोपवली, आणि त्याबद्दल त्याची प्रतिक्रिया काय होती?

८ यहोवाने असे भाकीत केले होते की तो इस्राएल राष्ट्राला बंदीवासातून सोडवण्यासाठी जी अद्‌भुत गोष्ट करेल तिचे इस्राएली लोक साक्षी होतील. (यश. ४३:१९) जेरूसलेम आणि त्याच्या आजूबाजूची शहरे यांच्यावर निश्‍चितच येणाऱ्‍या संकटाविषयीच्या सूचना यशयाच्या पुस्तकातील पहिल्या सहा अध्यायांमध्ये देण्यात आल्या आहेत. हृदय पारखणारा देव यहोवा याने या सूचना लोकांना सांगत राहण्याची यशयाला आज्ञा दिली, मग त्याबद्दल लोकांची नकारात्मक प्रतिक्रिया असली तरीही. या सूचना ऐकून यशया थक्क झाला व देवाचे निवडलेले राष्ट्र कधीपर्यंत देवाविरुद्ध पाप करत राहील, असे त्याने यहोवाला विचारले. यहोवाचे उत्तर काय होते? त्याने म्हटले की जोपर्यंत “नगरे निर्जन होतील, घरे निर्मनुष्य होतील, जमीन ओसाड व वैराण होईल” तोपर्यंत.—यशया ६:८-११ वाचा.

९. (क) जेरूसलेमविषयी यशयाने जी भविष्यवाणी केली होती तिची पूर्णता कधी झाली? (ख) आज आपल्याला जागरूक राहण्याची गरज का आहे?

९ राजा उज्जीयाच्या कारकिर्दीच्या शेवटल्या वर्षी, म्हणजेच इ.स.पू. ७७८ यादरम्यान यशयाला या सूचना सांगण्याची जबाबदारी देण्यात आली. संदेष्टा या नात्याने त्याने जवळजवळ ४६ वर्षे कार्य केले म्हणजेच इ.स.पू. ७३२ पर्यंत. त्या वेळी हिज्किया हा राजा होता. याअर्थी इ.स.पू. ६०७ मध्ये जेरूसलेमचा नाश झाला त्याच्या १२५ वर्षांआधी यशयाने या सूचना इस्राएल राष्ट्राला सांगितल्या. यावरून आपल्याला हे कळते की देवाच्या लोकांना आधीच सांगण्यात आले होते की भविष्यात त्यांच्या राष्ट्रावर कोणते संकट येईल. आजदेखील यहोवाने आपल्या लोकांद्वारे, भविष्यात काय घडणार आहे याविषयी खूप आधीच सांगितले आहे. टेहळणी बुरूज मासिकाची पहिली प्रत प्रकाशित झाली तेव्हापासून, म्हणजेच मागील १३५ वर्षांपासून वाचकांना सांगण्यात येत आहे की लवकरच सैतानाचे राज्य संपुष्टात येईल व त्याजागी येशू ख्रिस्ताचे हजार वर्षांचे शासन सुरू होईल; आणि यामुळे त्यांनी नेहमी जागरूक राहावे.—प्रकटी. २०:१-३, ६.

१०, ११. बॅबिलोनमध्ये असलेल्या इस्राएली लोकांनी यशयाच्या भविष्यवाणीची पूर्णता कशी पाहिली?

१० जे विश्‍वासू यहुदी बॅबिलोनी लोकांना शरण गेले ते जेरूसलेमच्या नाशातून बचावले आणि त्यांच्यापैकी अनेकांना बंदी बनवून बॅबिलोनला नेण्यात आले. (यिर्म. २७:११, १२) तेथे ७० वर्षांनंतर देवाच्या लोकांनी एका अद्‌भुत भविष्यवाणीची पूर्णता स्वतः अनुभवली. यहोवाने भाकीत केले होते की, “तुमचा उद्धारकर्ता इस्राएलचा पवित्र प्रभू असे म्हणतो: तुमची सुटका करण्यासाठी मी बाबिलोनविरुद्ध लढायला सैन्य पाठवेन; तेथल्या वेशींचे अडसर मोडून टाकेन.”—यश. ४३:१४, मराठी कॉमन लँग्वेज.

११ या भविष्यवाणीच्या पूर्णतेत इ.स.पू. ५३९ मध्ये ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीला एका रात्री जगाला हादरवून टाकणारी घटना घडली. जेरूसलेमच्या मंदिरातून आणलेल्या पवित्र पात्रांतून जेव्हा बॅबिलोनचा राजा व त्याचे अधिकारी द्राक्षारस सेवन करत होते व त्यांच्या दैवतांची स्तुती करत होते तेव्हा, मेद आणि पारस यांच्या सैन्याने बॅबिलोन काबीज केले. इ.स.पू. ५३८ किंवा ५३७ मध्ये बॅबिलोनवर विजय मिळवणारा कोरेश याने बंदीवासात असलेल्या यहुदी लोकांना जेरूसलेमला परतून देवाचे मंदिर पुन्हा बांधण्यास सांगितले. या सर्व घटनांविषयी यशयाने आधीच भाकीत केले होते. त्याने हेदेखील सांगितले होते की यहुदी लोक जेरूसलेमला परतताना यहोवा त्यांच्या गरजा पुरवेल व त्यांचे संरक्षण करेल. यहोवाने त्यांच्याविषयी असे म्हटले होते की, “मी आपल्यासाठी निर्माण केलेले लोक माझे स्तवन करतील.” (यश. ४३:२१; ४४:२६-२८) बंदीवासातून आलेल्या या यहुदी लोकांनी जेव्हा जेरूसलेमच्या मंदिराची पुनर्बांधणी केली तेव्हा ते या गोष्टीचे साक्षी बनले की एकच खरा देव यहोवा हा दिलेला शब्द नेहमी पाळतो.

१२, १३. (क) यहोवाची उपासना पुन्हा सुरू करण्यामध्ये इस्राएली लोकांसोबतच आणखी कोणाचा समावेश करण्यात आला? (ख) देवाच्या इस्राएलला सहकार्य करत असताना दुसऱ्‍या मेंढरांकडून काय अपेक्षा केली जाते, आणि त्यांना कोणती आशा आहे?

१२ जेरूसलेमला परतलेल्या इस्राएलांमध्ये यहुदी नसलेले हजारो लोकदेखील होते. तसेच, नंतर इतर अनेक विदेशी लोक यहुदी मतानुसारी बनले. (एज्रा २:५८, ६४, ६५; एस्ते. ८:१७) आज येशूच्या दुसऱ्‍या मेंढरांचा एक “मोठा लोकसमुदाय” अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांना विश्‍वासूपणे सहकार्य करतो. हे अभिषिक्‍त ख्रिस्ती म्हणजेच ‘देवाचे इस्राएल’ आहे. (प्रकटी. ७:९, १०; योहा. १०:१६; गलती. ६:१६) अभिषिक्‍त ख्रिश्‍चनांसोबतच मोठा लोकसमुदायदेखील यहोवाचे साक्षीदार या देवाने दिलेल्या नावाने ओळखला जातो.

१३ ख्रिस्ताच्या हजार वर्षांच्या शासनादरम्यान मोठ्या लोकसमुदायाला एक अवर्णनीय आनंद अनुभवायला मिळेल. तो म्हणजे सैतानाच्या दुष्ट जगाच्या शेवटल्या दिवसांत यहोवाचे साक्षीदार असण्यात काय सामील होते हे पुनरुत्थित झालेल्या लोकांना सांगणे. पण आज जर आपण आपल्या नावाला जागलो नाही व पवित्र राहण्याचा प्रयत्न केला नाही तर आपल्याला हा आनंद अनुभवणे शक्य होणार नाही. त्यासोबतच यहोवाच्या पवित्र स्तरांनुसार वागण्याचा कितीही प्रयत्न केला तरी आपल्या हातून चुका या होतीलच. त्यामुळे आपण दररोज यहोवाकडे क्षमा मागितली पाहिजे. आपण हे नेहमी ध्यानात ठेवले पाहिजे की आपण पापी आहोत आणि देवाच्या नावाने ओळखले जाणे हा आपल्याला मिळालेला एक खूप मोठा बहुमान आहे.—१ योहान १:८, ९ वाचा.

देवाच्या नावाचा अर्थ

१४. यहोवा या नावाचा काय अर्थ होतो?

१४ यहोवाच्या नावाने ओळखले जाण्याच्या बहुमानाबद्दल आपल्या मनातील कदर वाढवण्यासाठी या नावाचा अर्थ जाणून घेणे व त्यावर मनन करणे महत्त्वाचे आहे. देवाचे नाव “यहोवा” हे एका इब्री क्रियापदापासून आले आहे, ज्याचे भाषांतर “होणे” असे करता येईल. त्यामुळे यहोवा या नावाचा अर्थ “तो व्हायला लावतो” असा समजला जातो. यहोवा या संपूर्ण विश्‍वाचा व प्राणिमात्रांचा निर्माणकर्ता आहे. तसेच, तो त्याचा उद्देश कोणत्याही परिस्थितीत पूर्ण करतो. “तो व्हायला लावतो” या त्याच्या नावाच्या अर्थात या दोन्ही गोष्टींचा समावेश होतो. यहोवा आपली इच्छा आणि उद्देश पूर्ण करण्यासाठी घडणाऱ्‍या घटनांनुरूप पावले उचलतो. त्याची इच्छा पूर्ण करण्यामध्ये सैतानाने किंवा इतर विरोधकाने कोणत्याही प्रकारे व्यत्यय आणला, तरीही यहोवा आपला उद्देश पूर्ण व्हायला लावतो.

१५. यहोवाने मोशेला जे सांगितले त्यावरून यहोवाच्या नावाबद्दल आपल्याला काय समजते? (“एक अर्थपूर्ण नाव” ही चौकट पाहा.)

१५ यहोवाने मोशेला आपल्या नावाचा अर्थ आणखी स्पष्ट करून सांगितला. आपल्या लोकांना इजिप्तमधून बाहेर आणण्याची आज्ञा देताना, त्याने मोशेला म्हटले: “मला जे व्हायचे आहे ते मी होईन.” त्याने पुढे असे म्हटले: “तू इस्राएलवंशजांस सांग ‘मी होईन’ याने मला तुमच्याकडे पाठवले आहे.” (निर्ग. ३:१४, NW) याचा अर्थ, आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी यहोवाला जे काही व्हावे लागेल ते तो होईल. इस्राएली लोकांसाठी एक तारणकर्ता, रक्षक व मार्गदर्शक होण्याकरता आणि त्यांच्या सर्व शारीरिक व आध्यात्मिक गरजा पुरवण्याकरता जे काही आवश्‍यक होते ते यहोवाने केले.

कृतज्ञता व्यक्‍त करणे

१६, १७. (क) देवाच्या नावाने ओळखले जाण्याच्या बहुमानाबद्दल आपण कृतज्ञता कशी दाखवू शकतो? (ख) आपण पुढील लेखात कोणत्या गोष्टीवर चर्चा करणार आहोत?

१६ आजही आपल्या सर्व आध्यात्मिक व शारीरिक गरजा पुरवण्याद्वारे यहोवा त्याच्या नावानुसार कार्य करत आहे. यहोवाच्या नावावरून आपल्याला त्याच्याविषयी आणखी एक गोष्ट समजते. ती म्हणजे, यहोवा त्याचा उद्देश पूर्ण करण्यासाठी त्याच्या साक्षीदारांच्या कार्यासंबंधाने जे काही आवश्‍यक असेल ते व्हायला लावतो. या गोष्टीवर मनन केल्यास आपल्या नावानुसार जगत राहण्यास आपल्याला मदत मिळेल. मागील ७० वर्षांपासून नॉर्वे या देशात आवेशी प्रचारक असलेले कोरा नावाचे बांधव ज्यांचे वय आता ८४ आहे, ते असे म्हणतात: “सर्वकाळचा राजा यहोवा, याची सेवा करणं आणि त्याच्या पवित्र नावानं ओळखल्या जाणाऱ्‍या लोकांमध्ये असणं ही मोठ्या सन्मानाची गोष्ट आहे असं मला वाटतं. इतरांना बायबलमधील सत्यं समजावून सांगणं हा खूप मोठा बहुमान आहे. आणि जेव्हा त्यांना ही सत्यं समजतात तेव्हा त्यांच्या चेहऱ्‍यावर आनंद दिसून येतो. उदाहरणार्थ, ख्रिस्ताच्या खंडणी बलिदानाचा आपल्याला कसा फायदा होतो आणि त्याद्वारे आपल्याला शांतिदायक व नीतिवान जगात सर्वकाळचं जीवन कसं मिळेल हे इतरांना समजावून सांगताना मला खूप समाधान मिळतं.”

१७ हे खरे आहे की काही क्षेत्रांत देवाविषयी शिकून घेण्याची इच्छा असणारे लोक सापडणे कठीण होत चालले आहे. पण एखादी व्यक्‍ती आपले ऐकून घेण्यास तयार होते आणि तिला यहोवाच्या नावाविषयी शिकवण्याची आपल्याला संधी मिळते, तेव्हा आपल्यालाही कोरा यांच्यासारखाच आनंद होत नाही का? या लेखात चर्चा केल्याप्रमाणे आपण यहोवाचे साक्षीदार तर आहोतच, पण त्याच वेळी आपण येशूचे साक्षीदार कसे असू शकतो? या प्रश्‍नाचे उत्तर आपण पुढील लेखात पाहू या.

एक अर्थपूर्ण नाव

या नावाचा काय अर्थ होतो?

  • “तो व्हायला लावतो”

हे नाव योग्य का आहे?

  • यहोवाने संबंध सृष्टी बनवली

  • त्याची इच्छा व त्याचा उद्देश पूर्ण व्हावा म्हणून तो आजही पावले उचलत आहे

हे नाव आपल्याला यहोवाबद्दल कोणती माहिती देते?

  • दिलेला शब्द पूर्ण करण्यासाठी यहोवाला जे काही करावे लागेल ते तो करेल

  • आपली इच्छा पूर्ण करण्यासाठी तो आपल्या निर्मितीचा उपयोग करतो

  • आपला उद्देश पूर्ण करण्यासाठी अशी कोणतीही गोष्ट नाही जी तो करू शकत नाही किंवा व्हायला लावू शकत नाही

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा