यहोवा आपल्यावर प्रेमळपणे नजर ठेवतो, याची तुम्ही कदर करता का?
“परमेश्वराचे नेत्र सर्वत्र आहेत. ते बरेवाईट पाहत असतात.”—नीति. १५:३.
१, २. यहोवाची आपल्यावर असलेली नजर व गुप्त कॅमेरे यात काय फरक आहे?
अनेक देशांमध्ये, वाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी आणि एखादा अपघात घडल्यास त्याचे छायाचित्र काढण्यासाठी मोठ्या प्रमाणात गुप्त कॅमेरे वापरले जात आहेत. एखाद्याला धडक देऊन जर वाहनचालक पळून गेला आणि त्याचे छायाचित्र कॅमेऱ्यामध्ये असेल, तर त्याला शोधण्यास व अटक करण्यास अधिकाऱ्यांना साहाय्य होते. सर्व ठिकाणी अशा प्रकारचे गुप्त कॅमेरे असल्यामुळे, अपराध करणाऱ्यांना शिक्षेपासून वाचणे खूप कठीण झाले आहे.
२ आज मोठ्या प्रमाणात वापरल्या जाणाऱ्या गुप्त कॅमेऱ्यांची तुलना आपला प्रेमळ पिता यहोवा आपल्यावर जी नजर ठेवतो तिच्याशी करता येईल का? बायबल आपल्याला सांगते की त्याचे नेत्र “सर्वत्र आहेत.” (नीति. १५:३) पण, याचा अर्थ असा होतो का, की तो आपल्या प्रत्येक हालचालीवर नजर ठेवतो? देव आपल्यावर त्याचे नियम लादण्याच्या व शिक्षा देण्याच्या हेतूनेच नजर ठेवतो का? (यिर्म. १६:१७; इब्री ४:१३) असे मुळीच नाही. याउलट यहोवाचे आपल्यावर प्रेम आहे आणि त्याला आपली काळजी आहे म्हणून तो आपल्यावर नजर ठेवतो.—१ पेत्र ३:१२.
३. यहोवा कोणत्या पाच मार्गांनी आपली प्रेमळपणे काळजी घेतो?
३ यहोवाचे आपल्यावर प्रेम असल्यामुळे तो आपल्यावर नजर ठेवतो याची कदर करण्यासाठी कोणती गोष्ट आपल्याला मदत करेल? यासाठी आपण पाहू या की तो हे कसे करतो. तो पुढील मार्गांनी असे करतो: (१) जेव्हा आपला कल वाइटाकडे वळतो तेव्हा तो आपल्याला ताकीद देतो, (२) आपण एखादे चुकीचे पाऊल उचलल्यास तो आपले ताडन करतो, (३) त्याच्या वचनांतील तत्त्वांच्या माध्यमाने तो आपले मार्गदर्शन करतो, (४) समस्येचा सामना करत असताना तो आपले साहाय्य करतो, आणि (५) आपल्यात काही चांगल्या गोष्टी दिसल्यास तो त्याचे प्रतिफळ देतो.
देव आपल्याला ताकीद देतो
४. “दाराशी पाप टपूनच आहे,” अशी यहोवाने काइनाला जी ताकीद दिली त्यामागे त्याचा काय हेतू होता?
४ सर्वात आधी आपण पाहू या, की जेव्हा आपले मन वाईट गोष्टींकडे वळू लागते तेव्हा देव आपल्याला कशी ताकीद देतो. (१ इति. २८:९) यहोवा घेत असलेल्या काळजीबद्दलच्या या पैलूची कदर बाळगण्यासाठी तो काइनासोबत कशा प्रकारे वागला ते आपण पाहू या. देवाने काइनाचे अर्पण स्वीकारले नाही आणि यामुळे तो “संतापला.” (उत्पत्ति ४:३-७ वाचा.) तेव्हा यहोवाने काइनाला त्याच्या मनातील विचार बदलण्यास आर्जवले. यहोवाने त्याला बजावले की जर त्याने त्याचे विचार बदलले नाहीत तर “दाराशी पाप टपूनच आहे.” देवाने त्याला “त्यास दाबात ठेव,” असे सांगितले. त्याची इच्छा होती की काइनाने त्याच्या इशाऱ्याकडे लक्ष द्यावे आणि त्यानुसार स्वतःत सुधारणा करावी. देवाची पसंती मिळवल्याने देवासोबतचा त्याचा नातेसंबंध टिकून राहिला असता.
५. आपल्या मनात एखादी चुकीची प्रवृत्ती असल्यास यहोवा कोणत्या मार्गांनी आपल्याला ताकीद देतो?
५ आज आपल्या बाबतीत काय? यहोवाचे नेत्र मनाचे परीक्षण करू शकतात आणि म्हणून आपल्या मनातील विचारांना व हेतूंना आपण त्याच्यापासून लपवू शकत नाही. आपल्या प्रेमळ पित्याची इच्छा आहे की आपण नीतीच्या मार्गाने चालावे. असे असले तरी, आपले मार्ग बदलण्यास तो आपल्यावर दबाव आणत नाही. आपण जेव्हा चुकीच्या मार्गाकडे जाऊ लागतो तेव्हा तो बायबलचा उपयोग करून आपल्याला ताकीद देतो. तो हे कसे करतो? दररोजच्या बायबल वाचनादरम्यान, बरेचदा असा एखादा उतारा आपल्या वाचण्यात येतो ज्यामुळे आपल्याला मनातील वाईट इच्छा आणि चुकीच्या प्रवृत्तींवर मात करण्यास मदत होते. त्यासोबतच कधीकधी आपल्या प्रकाशनांत अशा एखाद्या समस्येबद्दल सांगण्यात येते जिचा आपण स्वतः सामना करत असतो. त्या प्रकाशनातील माहिती आपल्याला त्या समस्येवर मात करण्यास मदत करते. आणि आपल्या मंडळीच्या सभांमध्येदेखील आपल्याला अगदी योग्य वेळेवर काही चांगले सल्ले मिळतात.
६, ७. (क) लाखो लोकांसाठी तयार करण्यात येत असलेल्या साहित्यांद्वारे यहोवा वैयक्तिक रीत्या आपल्याबद्दल काळजी व्यक्त करतो असे का म्हणता येईल? (ख) यहोवा वैयक्तिक रीत्या जी काळजी व्यक्त करतो तिचा तुम्ही फायदा कसा घेऊ शकता?
६ यहोवा आपल्याला अशा प्रकारे जी ताकीद देतो त्यावरून हे दिसून येते की तो आपल्यापैकी प्रत्येकाची वैयक्तिक रीत्या काळजी घेतो. हे खरे आहे की बायबल लिहून बरीच शतके उलटून गेली आहेत, देवाच्या संघटनेद्वारे तयार करण्यात आलेली प्रकाशने लाखो लोकांकरता लिहिण्यात येतात आणि सभांमध्ये मिळणारे मार्गदर्शन हे मंडळीतील सर्वांसाठी असते. असे असले तरी, या सर्व मार्गांद्वारे यहोवाने तुमचे लक्ष त्याच्या वचनाकडे वळवले ज्यामुळे तुम्ही तुमच्या विचारांत फेरबदल करू शकला. आणि म्हणून, आपण असे म्हणू शकतो की हे सर्व मार्ग या गोष्टीचा पुरावा आहेत की यहोवा आपली वैयक्तिक रीत्या काळजी घेतो.
बायबल प्रशिक्षित विवेक आपल्याला अवतीभोवती असलेले अनेक धोके टाळण्यास मदत करतो (परिच्छेद ६, ७ पाहा)
७ यहोवा आपल्याला देत असलेल्या ताडनाचा फायदा घेण्यासाठी सर्वात आधी, आपल्याला याची जाणीव झाली पाहिजे की त्याला खरोखरच आपली काळजी आहे. त्यानंतर आपण त्याच्या ताडनाला योग्य प्रतिसाद दिला पाहिजे आणि त्याला न आवडणारे काही विचार असतील तर त्यांना आपल्या मनातून काढून टाकण्याचा कसोशीने प्रयत्न केला पाहिजे. (यशया ५५:६, ७ वाचा.) आपण जर त्याच्या इशाऱ्यांकडे लक्ष दिले तर बऱ्याच वाईट परिणामांपासून आपले संरक्षण होते. पण जेव्हा आपल्या हातून चूक घडते, तेव्हा आपला प्रेमळ पिता आपल्याला कशी मदत पुरवतो?
प्रेमळ पिता आपले ताडन करतो
८, ९. यहोवा त्याच्या सेवकांद्वारे जे ताडन देतो त्यामुळे तो आपली अगदी मनापासून काळजी घेतो हे कसे स्पष्ट होते? उदाहरण द्या.
८ जेव्हा आपले ताडन केले जाते, तेव्हा खासकरून आपल्याला यहोवाच्या काळजीची जाणीव होते. (इब्री लोकांस १२:५, ६ वाचा.) हे खरे आहे की ताडन किंवा शिक्षा कोणालाही आवडत नाही. (इब्री १२:११) असे असले तरी, आपले ताडन करणाऱ्याला कोणकोणत्या गोष्टींचा विचार करावा लागतो हे लक्षात घ्या. आपल्या कोणत्या कृत्यामुळे यहोवासोबतचा आपला नातेसंबंध धोक्यात येऊ शकतो याकडे त्याला लक्ष द्यावे लागते. त्यासोबतच त्याला आपल्या भावनांचीही दखल घ्यावी लागते. इतकेच नाही तर, आपल्याला आपले मार्ग सुधारण्यास व देवाला आवडेल त्यानुसार वागण्यास बायबलची कोणती वचने मदत करू शकतील हे दाखवण्यासाठी त्याला वेळ काढावा लागतो व श्रम घ्यावे लागतात. अशा प्रकारच्या ताडनाचा स्रोत मुळात यहोवा देव आहे आणि त्याला आपली मनापासून काळजी असल्यामुळेच तो आपल्याला हे ताडन देतो.
९ मानवी सल्लागार कसे यहोवासारखी व्यक्तिगत काळजी दाखवू शकतात, याचे एक उदाहरण पाहू या. एक बांधव सत्यात येण्याआधी नेहमी पोर्नोग्राफी (अश्लील चित्रे) पाहायचा, पण त्याने ही सवय सोडली. असे असले तरी, अशा साहित्याबद्दलची त्याची आवड अजूनही पूर्णपणे नाहीशी झाली नव्हती. आणि जेव्हा त्याने एक नवीन मोबाईल फोन घेतला तेव्हा ती पुन्हा जागृत झाली. (याको. १:१४, १५) तो त्याच्या मोबाईलचा वापर इंटरनेटवरील अश्लील साईट्स पाहण्यासाठी करू लागला. एके दिवशी, टेलिफोनद्वारे साक्षकार्य करत असताना त्याने त्याचा मोबाईल मंडळीतील एका वडिलांना काही पत्ते पाहण्यासाठी दिला. जेव्हा ते वडील मोबाईलचा वापर करू लागले तेव्हा त्यांना त्यात काही संशयास्पद साईट्स दिसू लागल्या. ही गोष्ट खरेतर आध्यात्मिक रीत्या धोक्यात असलेल्या आपल्या त्या बांधवासाठी एक आशीर्वादच ठरली. त्याला योग्य वेळी सल्ला देण्यात आला, त्याने ते ताडन स्वीकारले आणि शेवटी त्याने त्या वाईट सवयीवर मात केली. आपली काळजी घेणाऱ्या स्वर्गीय पित्याचे आपण किती कृतज्ञ असले पाहिजे, कारण आपण गुप्तपणे करत असलेल्या चुकादेखील तो पाहतो आणि आपल्या हातून मोठे पाप घडण्याआधीच आपली सुधारणा करतो!
बायबल तत्त्वांचा अवलंब केल्याने आपला फायदा होतो
१०, ११. (क) आपण यहोवाकडून मार्गदर्शन कसे मिळवू शकतो? (ख) यहोवाच्या मार्गदर्शनाचे पालन केल्यामुळे एका कुटुंबाला कसा फायदा झाला?
१० स्तोत्रकर्त्याने एका गीतात यहोवाला असे म्हटले: “तू बोध करून मला मार्ग दाखवशील.” (स्तो. ७३:२४) आपल्याला जेव्हाही मार्गदर्शनाची गरज असते तेव्हा आपण देवाच्या वचनाचे परीक्षण केले पाहिजे आणि आपल्या समस्येबद्दल यहोवाचे काय मत आहे हे विचारात घेतले पाहिजे. बायबल तत्त्वांचे पालन केल्याने आपल्याला आध्यात्मिक रीत्या तर फायदा होतोच, पण कधीकधी आपल्या भौतिक गरजांकडे लक्ष देण्यासही साहाय्य मिळते.—नीति. ३:६.
११ यहोवाने कशा प्रकारे काहींना मार्गदर्शन दिले याचे एक उदाहरण पाहू या. फिलिपीन्झमधील मासबाती या डोंगराळ भागात राहणाऱ्या एका शेतकऱ्याच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. तो दुसऱ्या माणसाची जमीन भाड्याने घेऊन शेती करायचा. त्याने व त्याच्या पत्नीनेही मोठ्या कुटुंबाचे पालनपोषण करत असताना सामान्य पायनियर म्हणून सेवा केली आहे. एके दिवशी अचानक जमीनदाराने त्यांना जागा सोडण्याची नोटीस पाठवली. त्याने असे का केले? त्यांच्यावर अप्रामाणिकपणे वागण्याचा आळ घेण्यात आला होता. आता कुटुंबाला घेऊन कोठे जावे याची जरी बांधवाला चिंता होती, तरीसुद्धा त्याने असे म्हटले: “यहोवा आम्हाला मदत करेल. परिस्थिती कशीही असली, तरी तो नेहमीच आमच्या गरजा पुरवतो.” बांधवाचा हा विश्वास फोल ठरला का? नाही. काही दिवसांनंतर या कुटुंबाला कळले की त्यांना आता ती जागा सोडावी लागणार नाही. जमीनदाराने त्याचा विचार का बदलला होता? हे कुटुंब बायबलच्या तत्त्वांचे पालन करत असल्यामुळे, जेव्हा त्यांच्यावर खोटा आरोप लावण्यात आला तेव्हादेखील त्यांनी भांडणतंटा न करता मालकाप्रती असलेला आदर तसाच ठेवला. हे पाहून जमीनदार अतिशय प्रभावित झाला आणि त्याने त्यांना तिथे राहण्याची परवानगी तर दिलीच पण त्यासोबतच त्यांना शेती करण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त जमीनही दिली. (१ पेत्र २:१२ वाचा.) खरोखर, यहोवा त्याच्या वचनातील मार्गदर्शनाद्वारे जीवनातील समस्यांचा सामना करण्यास आपल्याला मदत करतो.
धीर धरण्यास यहोवा आपली मदत करतो
१२, १३. देवाचे आपल्या समस्येवर लक्ष नाही, असे एखाद्या व्यक्तीला केव्हा वाटू शकते?
१२ कधीकधी एखादी समस्या बराच काळ राहते. आपण कदाचित एखाद्या दीर्घकालिक आजाराचा सामना करत असू, आपल्या कुटुंबाचे सदस्य अनेक दिवसांपासून आपला विरोध करत असतील किंवा आपल्याला बऱ्याच काळापासून छळ सोसावा लागत असेल. इतकेच नाही तर कधीकधी मंडळीमध्येही एखाद्याशी मतभेद झाल्यास आपल्याला ते त्रासदायक वाटू शकते.
१३ कदाचित एखाद्याच्या बोलण्यामुळे तुमच्या भावना दुखावल्या असतील आणि तो मुद्दामहून तुम्हाला दुखावण्यासाठी तसे बोलला असे तुम्हाला वाटत असेल. ‘देवाच्या संघटनेत तरी असं व्हायला नको!’ असे तुम्ही म्हणाल. पण, तरीसुद्धा त्या बांधवाला मंडळीत अनेक सुहक्क मिळत असतील आणि इतर बांधवही त्याचा आदर करत असतील. तुम्ही विचार कराल, ‘असं कसं होऊ शकतं? देवाला हे दिसत नाही का? तो याबद्दल काहीच करणार नाही का?’—स्तो. १३:१, २; हब. १:२, ३.
१४. यहोवा आपल्या समस्येत हस्तक्षेप करत नाही याचे एक कारण काय असू शकते?
१४ यहोवाजवळ आपल्या समस्येत हस्तक्षेप न करण्याची कदाचित अनेक रास्त कारणे असतील. उदाहरणार्थ, कदाचित तुमच्या मते तो बांधव जास्त दोषी असेल, पण यहोवा याकडे वेगळ्या दृष्टिकोनाने पाहत असेल. यहोवाच्या नजरेत कदाचित तुम्ही जास्त दोषी असाल आणि याची तुम्हाला जाणीवही नसेल. तुम्हाला जे बोलणे खूप कठोर वाटले ते खरेतर त्याच्याकडून तुम्हाला मिळालेले ताडन असेल ज्याकडे तुम्ही लक्ष दिले पाहिजे. बंधू कार्ल क्लाईन जे नियमन मंडळाचे सदस्य होते त्यांनी त्यांच्या जीवनकथेत अशा एका प्रसंगाचा उल्लेख केला आहे जेव्हा बंधू जे. एफ. रदरफोर्ड यांनी त्यांना ताडन दिले होते. काही दिवसांनंतर बंधू रदरफोर्ड यांनी क्लाईन यांना हसतहसत “हॅलो कार्ल,” असे अभिवादन केले. पण बंधू क्लाईन यांच्या मनात त्यांच्याबद्दल अजूनही कटू भावना होत्या आणि म्हणून त्यांनी वरवर, पुटपुटत त्यांना उत्तर दिले. रदरफोर्ड यांच्या लक्षात आले की बंधू क्लाईनच्या मनात अजूनही राग आहे आणि म्हणून त्यांनी त्यांना सांगितले की जर त्यांनी मनातून राग काढून टाकला नाही तर ते सैतानाच्या पाशाला बळी पडतील. बंधू क्लाईनने नंतर असे लिहिले: “जबाबदारीच्या पदावर असलेल्या बांधवांना आपले ताडन करण्याचा अधिकार असतो, पण जर त्यांच्या बोलण्याचा आपण मनात राग बाळगला तर आपण सैतानाच्या पाशाला बळी पडण्याची जोखीम घेत असतो.”a
१५. समस्येचा सामना करत असताना कोणती गोष्ट तुम्हाला धीर धरण्यास साहाय्य करेल?
१५ आपल्या समस्या जेव्हा थांबण्याचे नाव घेत नाहीत तेव्हा आपल्याला धीर धरणे अवघड जाते. अशा वेळेस आपण काय करू शकतो? समजा तुम्ही महामार्गावर कार चालवत आहात आणि वाहनांच्या कोंडीत सापडता. ही कोंडी किती वेळ राहील हे तुम्हाला माहीत नसते. जर तुम्ही वैतागलात आणि दुसरा मार्ग शोधण्याचा प्रयत्न केला तर कदाचित तुम्ही मार्ग भटकू शकता किंवा मग ठरवलेल्या ठिकाणी पोहचण्यास तुम्हाला जास्त वेळ लागू शकतो. तेच, जर तुम्ही तेथेच थांबून वाट पाहिली असती तर कदाचित लवकर पोचला असता. त्याच प्रकारे जर तुम्ही देवाच्या वचनातील मार्गदर्शनानुसार चालत राहिला, तर तुम्हाला संकटादरम्यान धीर धरणे शक्य होईल.
१६. यहोवा आपल्या समस्येत हस्तक्षेप करत नाही याचे आणखी एक कारण काय असू शकते?
१६ यहोवा आपल्या समस्येत हस्तक्षेप करत नाही याचे आणखी एक कारण असू शकते. आपल्याला आवश्यक असलेले प्रशिक्षण मिळावे अशी कदाचित त्याची इच्छा असू शकते. (१ पेत्र ५:६-१० वाचा.) पण हे नेहमी लक्षात असू द्या की देव कधीही आपल्यावर समस्या आणत नाही. (याको. १:१३) बायबल म्हणते: “तुमचा शत्रू सैतान” बहुतेक समस्यांचे मूळ आहे. असे असले तरी, देव या संधीचा उपयोग करून आपल्याला आध्यात्मिक रीत्या मजबूत होण्यास मदत करतो. तुमच्या दुःखांची त्याला जाणीव आहे आणि त्याला “तुमची काळजी” असल्यामुळे तो या गोष्टीची खातरी करेल की हे दुःख फक्त “थोडा काळ” राहील. समस्यांचा सामना करत असताना यहोवाच्या काळजीची तुम्ही कदर करता का, आणि तो नक्कीच काही मार्ग काढेल याची तुम्हाला खातरी आहे का?—२ करिंथ. ४:७-९.
यहोवाची कृपापसंती मिळवणे
१७. यहोवा कोणाच्या शोधात आहे व का?
१७ यहोवा आपल्या जीवनाचे परीक्षण करतो याचे आणखी एक चांगले कारण आहे. त्याने हानानी द्रष्ट्याद्वारे राजा आसाला सांगितले: “परमेश्वराचे नेत्र अखिल पृथ्वीचे निरीक्षण करत असतात, जे कोणी सात्विक चित्ताने त्याच्याशी वर्ततात त्यांचे साहाय्य करण्यात तो आपले सामर्थ्य प्रगट करतो.” (२ इति. १६:९) यहोवाने राजा आसा याचे परीक्षण केले तेव्हा त्याचे मन सात्विक नसल्याचे त्याला दिसून आले. पण तुम्ही जर योग्य ते करत राहिलात तर यहोवा तुमच्यासाठी त्याचे “सामर्थ्य प्रगट” करेल.
१८. तुमच्या कामाची कोणी कदर करत नाही असे वाटते, तेव्हा यहोवाबद्दल तुम्ही कोणती गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे? (लेखाच्या सुरुवातीला दिलेले चित्र पाहा.)
१८ देवाची इच्छा आहे की आपण “बऱ्याच्या मागे” लागले पाहिजे, “बऱ्याची आवड” धरली पाहिजे आणि “बरे ते” केले पाहिजे जेणेकरून तो आपल्यावर “दया करेल.” (आमो. ५:१४, १५; १ पेत्र ३:११, १२) यहोवाचे नीतिमानांकडे लक्ष असते आणि तो त्यांना आशीर्वाद देतो. (स्तो. ३४:१५) इब्री सुइणी शिप्रा आणि पुवा यांच्या उदाहरणाकडे लक्ष द्या. जेव्हा इस्राएली लोक इजिप्तच्या गुलामीत होते तेव्हा फारोने असे फर्मान काढले होते की जर इब्री बायकांनी मुलाला जन्म दिला तर सुइणींनी त्याला मारून टाकावे. पण शिप्रा व पुवा यांना फारोपेक्षा यहोवाचे जास्त भय होते आणि त्यांनी जन्माला आलेल्या मुलांना जिवंतच ठेवले. शिप्रा आणि पुवा यांच्या या कार्यामुळे देवाने “त्यांची घराणी स्थापित केली.” (निर्ग. १:१५-१७, २०, २१) त्यांचे चांगले काम यहोवाच्या सर्वत्र असलेल्या नजरेतून लपून राहिले नाही. कधीकधी आपल्याला असे वाटू शकते की आपल्या चांगल्या कामाची कोणालाच कदर नाही. पण हे लक्षात असू द्या की यहोवाला काळजी आहे. आपण करत असलेल्या प्रत्येक चांगल्या कामाची तो नोंद घेतो आणि त्यासाठी तो नक्कीच आपल्याला प्रतिफळ देईल.—मत्त. ६:४, ६; १ तीम. ५:२५; इब्री ६:१०.
१९. आपले चांगले काम यहोवाच्या नजरेतून सुटत नाही हे एका बहिणीने कसे अनुभवले?
१९ ऑस्ट्रियामधील एका बहिणीने हे अनुभवले की तिचे कष्ट यहोवाच्या नजरेतून सुटले नाही. ती हंगेरीयन वंशाची असल्यामुळे क्षेत्रातील एका हंगेरीयन व्यक्तीची भेट घेण्यासाठी तिला तिचा पत्ता देण्यात आला. ती लगेच त्या ठिकाणी गेली, पण त्या घरात कोणीच नव्हते. ती पुन्हापुन्हा तेथे जात राहिली. कधीकधी तिला जाणवायचे की आत कुणीतरी आहे पण दार उघडत नव्हते. ती त्या घरात साहित्य, पत्रे, स्वतःबद्दलची माहिती असे बरेच काही ठेवून यायची. दीड वर्षांपर्यंत सतत दिलेल्या भेटींनंतर शेवटी एकदा त्या घराचे दार उघडले! एका स्त्रीने आनंदाने बहिणीचे स्वागत केले. ती बहिणीला म्हणाली: “आत या ना. तुम्ही जे काही ठेवून जायच्या ते मी वाचायचे. खरंतर, मी तुमची वाटच पाहत होते.” ती स्त्री किमोथेरपीचा उपचार घेत होती आणि म्हणून ती लोकांना भेटू शकत नव्हती. बहिणीने तिच्यासोबत बायबल अभ्यास सुरू केला. देवाने खरेच त्या बहिणीला तिच्या कष्टाचे प्रतिफळ दिले!
२०. यहोवाची आपल्यावर जी प्रेमळ नजर आहे त्याबद्दल तुम्हाला कसे वाटते?
२० आपण जे काही करतो त्याकडे यहोवाचे लक्ष असते आणि कालांतराने तो नक्कीच आपल्याला त्याचे प्रतिफळ देईल. यहोवाचे नेत्र सदैव आपल्यावर असतात यामुळे घाबरून जाण्याचे कारण नाही. कारण तुम्ही एखाद्या निर्जीव गुप्त कॅमेऱ्याच्या निरीक्षणाखाली नाही. याउलट, यहोवाला खरोखरच तुमची काळजी आहे आणि म्हणून तो तुमच्यावर नजर ठेवतो. जर तुम्ही याची जाणीव बाळगली तर तुम्हाला दिवसेंदिवस त्याच्या आणखी जवळ जाण्यास मदत होईल.
a बंधू क्लाईन यांची जीवनकथा १ ऑक्टोबर १९८४ च्या टेहळणी बुरूजच्या (इंग्रजी) अंकात प्रकाशित करण्यात आली आहे.