अध्याय दोन
तो “देवाबरोबर चालला”
१, २. नोहा आणि त्याचं कुटुंब कोणत्या मोठ्या कामात गुंतले होते, आणि त्यांना कोणकोणत्या समस्यांना तोंड द्यावं लागलं?
काम करून दमलेला नोहा क्षणभर विश्रांती घेण्यासाठी एका रुंद लाकडी फळीवर जाऊन बसतो आणि तारवाच्या त्या मोठ्या बांधकामावर नजर टाकतो. डांबराचा उग्र वास हवेत पसरला आहे आणि बांधकामाच्या हत्यारांचा आवाज सर्वत्र ऐकू येत आहे. तारू बांधण्याच्या त्या मोठ्या प्रकल्पावर त्याची मुलं अगदी मन लावून वेगवेगळी कामं करत असल्याचं त्याला दिसतं. त्याची मुलं, सुना आणि त्याची प्रिय पत्नी हे सर्व जण कित्येक वर्षांपासून या कामात त्याला मदत करत आहेत. पण, तरीसुद्धा अजून बरंच काम बाकी आहे.
२ लोकांना मात्र नोहा आणि त्याच्या कुटुंबातले लोक अगदीच मूर्ख वाटत होते. तारू आकार घेऊ लागलं तसतसे लोक त्यांना जास्तच हसू लागले. नोहा त्यांना येणाऱ्या संकटाविषयी सतत सांगत होता. पण, सबंध पृथ्वीवर एक जलप्रलय येणार यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. त्यांना ते एखाद्या काल्पनिक कथेसारखं वाटत होतं. नोहासारखा माणूस आपलं स्वतःचं आणि आपल्या कुटुंबाचं आयुष्य अशा निरर्थक कामात का वाया घालवत आहे हेच त्यांना कळत नव्हतं. पण यहोवा देवाचा नोहाकडे पाहण्याचा दृष्टिकोन अगदीच वेगळा होता.
३. नोहा कोणत्या अर्थानं देवाबरोबर चालला?
३ बायबल आपल्याला सांगतं की, “नोहा देवाबरोबर चालला.” (उत्पत्ति ६:९ वाचा.) याचा काय अर्थ होतो? देव पृथ्वीवर आला किंवा नोहा स्वर्गात गेला, असा याचा अर्थ होत नाही. तर, नोहानं देवाच्या आज्ञांचं काटेकोरपणे पालन केलं आणि त्याचं देवावर मनापासून प्रेम होतं; यामुळे देवासोबत त्याचा अगदी जवळचा नातेसंबंध निर्माण झाला. आणि या अर्थी तो देवाबरोबर चालला. पुढं हजारो वर्षांनंतर, बायबलमध्ये नोहाबद्दल असं सांगण्यात आलं: “विश्वासाच्या द्वारे त्याने जगाला दोषी ठरवले.” (इब्री ११:७) नोहानं विश्वासाच्या द्वारे जगाला दोषी कसं ठरवलं? आणि विश्वासाच्या बाबतीत त्याच्या उदाहरणावरून आज आपण काय शिकू शकतो?
दुष्ट जगातही निर्दोष
४, ५. नोहाच्या काळात परिस्थिती कशा प्रकारे बिघडतच गेली?
४ नोहा लहानाचा मोठा होत असताना जगाची परिस्थिती दिवसेंदिवस बिघडतच चालली होती. नोहाच्या आधी, देवाबरोबर चाललेला आणखीन एक नीतिमान मनुष्य म्हणजे नोहाचा पणजोबा हनोख. त्याच्या काळातसुद्धा परिस्थिती बिकट होती. दुष्ट लोकांचा नाश करण्यासाठी देवाच्या न्यायाचा दिवस येईल असं हनोखानं आधीच सांगितलं होतं. आणि आता तर नोहाच्या काळात परिस्थिती आणखीनच वाईट झाली होती. पृथ्वी अत्याचारानं इतकी भरली होती, की यहोवाच्या दृष्टीनं ती पूर्णपणे भ्रष्ट झाली होती. (उत्प. ५:२२; ६:११; यहू. १४, १५) पण, नेमक्या कोणत्या कारणामुळे परिस्थिती इतकी वाईट झाली होती?
५ देवाच्या आत्मिक पुत्रांच्या अर्थात देवदूतांच्या बाबतीत एक गंभीर, दुःखद गोष्ट घडली होती. त्यांच्यापैकी एकानं आधीच यहोवाविरुद्ध बंड केलं होतं. देवाच्या नावाची बदनामी करून, तसंच आदाम आणि हव्वेला पाप करण्यास प्रवृत्त करून तो ‘दियाबल सैतान’ बनला होता. पुढं नोहाच्या काळात, इतर देवदूतही यहोवाच्या न्यायी शासनाविरुद्ध बंड करू लागले. स्वर्गात त्यांना देवानं नेमलेलं स्थान सोडून ते पृथ्वीवर आले. त्यांनी मानवी शरीरं धारण केली आणि पृथ्वीवरील सुंदर स्त्रिया बायका करून घेतल्या. अशा रीतीनं त्या गर्विष्ठ, स्वार्थी, बंडखोर देवदूतांचा विषारी प्रभाव मानवांत पसरला.—उत्प. ६:१, २; यहू. ६, ७.
६. नेफिलीममुळे जगाची परिस्थिती कशी झाली, आणि यहोवानं काय करायचं ठरवलं?
६ शिवाय, मानवी शरीरं धारण केलेल्या देवदूतांच्या आणि मानवी स्त्रियांच्या अनैसर्गिक संबंधांतून जी मुलं झाली ती पुढं राक्षसांसारखी धिप्पाड आणि शक्तिशाली बनली. बायबलमध्ये त्यांना ‘नेफिलीम’ म्हटलं आहे. याचा शब्दशः अर्थ, इतरांना “पाडणारे” असा होतो. अतिशय क्रूरपणे अत्याचार करणाऱ्या या नेफिलीममुळे जगातल्या दुष्टाईमध्ये आणखीनच भर पडली. म्हणूनच, “पृथ्वीवर मानवांची दुष्टाई फार आहे, त्यांच्या मनातील . . . सर्व कल्पना केवळ एकसारख्या वाईट असतात” हे पाहून देवानं त्या दुष्ट जगाचा १२० वर्षांनंतर नाश करण्याचं ठरवलं.—उत्पत्ति ६:३-५ वाचा.
७. दुष्ट प्रभावापासून आपल्या मुलांचं पूर्णपणे रक्षण करणं नोहा आणि त्याच्या पत्नीसाठी सोपं का नसावं?
७ अशा दुष्ट जगात कुटुंबाला सांभाळणं किती कठीण असेल याची कल्पना करा! पण, नोहा याबाबतीत यशस्वी ठरला. त्यानं देवाला भिऊन वागणाऱ्या एका स्त्रीशी लग्न केलं आणि तो ५०० वर्षांचा झाल्यावर त्यांना तीन मुलं झाली.a त्यांची नावं, शेम, हाम आणि याफेथ अशी होती. नोहानं आणि त्याच्या पत्नीनं आजूबाजूच्या दुष्ट प्रभावापासून मुलांचं संरक्षण करण्याचा नक्कीच खूप प्रयत्न केला असेल. मुलं सहसा शक्तिशाली, प्रसिद्ध लोकांना पाहून खूप प्रभावित होतात. आणि नेफिलीम असेच होते. त्यांच्या प्रभावापासून मुलांचं पूर्णपणे संरक्षण करणं कदाचित नोहाला आणि त्याच्या पत्नीला शक्य नसेल; कारण त्या राक्षसांनी केलेल्या पराक्रमांच्या बातम्या मुलांच्या कानावर येतच असतील. पण, यहोवा देवाबद्दलचं सत्य नोहा व त्याच्या पत्नीनं मुलांना नक्कीच शिकवलं असेल. जगातला अत्याचार आणि बंडखोरपणा पाहून यहोवाला खूप वाईट वाटतं हेही त्यांनी मुलांना शिकवलं असेल.—उत्प. ६:६.
वाईट प्रभावांपासून नोहाला आणि त्याच्या पत्नीला आपल्या मुलांचं संरक्षण करावं लागलं
८. आजचे पालक नोहा आणि त्याच्या पत्नीच्या उदाहरणाचं अनुकरण कसं करू शकतात?
८ नोहा आणि त्याच्या पत्नीसमोर जी समस्या होती ती आजचे पालक चांगल्या प्रकारे समजू शकतात. आजसुद्धा जगात अत्याचार आणि बंडखोरीचं विष पसरलं आहे. हल्ली शहरांमध्ये गुंड प्रवृत्तीच्या युवकांच्या टोळ्यांबद्दल बरंच ऐकायला मिळतं. तसंच, लहान मुलांसाठी असलेले चित्रपट, व्हिडिओ गेम्स यांतसुद्धा हिंसाचार ठासून भरलेला असतो. अशा प्रभावांपासून आपल्या मुलांचं संरक्षण करण्याचा आजचे पालक खूप प्रयत्न करतात. आपल्या शांतिप्रिय देवाला, यहोवाला अशा हिंसक कृत्यांचा वीट आहे आणि तो लवकरच त्यांचा अंत करेल हे ते आपल्या मुलांना शिकवतात. (स्तो. ११:५; ३७:१०, ११) नोहा आणि त्याची पत्नी आपल्या मुलांचं संगोपन करण्यात यशस्वी ठरले असं म्हणता येईल. कारण त्यांची मुलं मोठी होऊन यहोवाचे उपासक बनली. आणि त्यांनी त्यांच्याप्रमाणेच यहोवाला जीवनात पहिलं स्थान देणाऱ्या स्त्रियांशी लग्न केलं. तेव्हा, आजचे पालकसुद्धा या दुष्ट जगात आपल्या मुलांचं चांगलं संगोपन करण्यात नक्कीच यशस्वी ठरू शकतात.
तारू बांधण्याची आज्ञा
९, १०. (क) यहोवानं दिलेल्या कोणत्या आज्ञेमुळे नोहाचं जीवन बदलून गेलं? (ख) तारवाची रचना आणि ते बांधण्यामागचा उद्देश याबद्दल यहोवानं नोहाला काय सांगितलं?
९ एके दिवशी, नोहाच्या जीवनात अशी एक घटना घडली ज्यामुळे त्याचं जीवन कायमचं बदलून गेलं. यहोवा आपल्या या प्रिय सेवकाशी बोलला आणि त्या काळातल्या जगाचा अंत करण्याचा आपला उद्देश त्यानं त्याला सांगितला. देवानं नोहाला अशी आज्ञा दिली: “तू आपल्यासाठी गोफेर लाकडाचे तारू कर.”—उत्प. ६:१४.
१० नोहाचं तारू हे काहींना वाटतं त्याप्रमाणे एखाद्या जहाजासारखं नव्हतं. खरंतर, ते तारू म्हणजे एक अवाढव्य पेटी होती. तारवाचं अचूक मोजमाप व त्याच्या रचनेबद्दलची काही माहिती यहोवानं नोहाला दिली होती; तसंच, त्याला आतून-बाहेरून डांबर लावावं असं देवानं त्याला सांगितलं. शिवाय, याचं कारणही देवानं त्याला सांगितलं. त्यानं म्हटलं: “मी पृथ्वीवर प्रलयाचे पाणी आणतो; पृथ्वीवर जे काही आहे ते नष्ट होईल.” पण, त्याच वेळी यहोवानं नोहासोबत एक करार केला. त्यानं म्हटलं: “तू आपले मुलगे, आपली स्त्री व आपल्या सुना यांस घेऊन तारवात जा.” तसंच, देवानं त्याला सर्व प्रकारच्या प्राण्यांच्या जोड्या तारवात न्यायला सांगितल्या. कारण जे तारवात असतील केवळ त्यांचाच येणाऱ्या जलप्रलयातून बचाव होणार होता!—उत्प. ६:१७-२०.
देवाच्या आज्ञांचं पालन करण्यासाठी नोहानं आणि त्याच्या कुटुंबानं एकत्र मिळून काम केलं
११, १२. नोहासमोर कोणतं मोठं काम होतं आणि त्याबद्दल त्याला कसं वाटलं?
११ नोहासमोर प्रचंड मोठं काम होतं. देवानं त्याला जे तारू बांधायला सांगितलं होतं ते अतिशय अवाढव्य असणार होतं. त्याची लांबी सुमारे ४३७ फूट, रुंदी ७३ फूट आणि उंची ४४ फूट इतकी असणार होती. त्याअर्थी, आजच्या काळातील सगळ्यात मोठ्या लाकडी जहाजांपेक्षाही ते तारू कितीतरी पटीनं मोठं असणार होतं. मग, आपल्याला हे काम जमणार नाही असं नोहानं म्हटलं का? किंवा हे अतिशय कठीण आहे अशी कुरकूर त्यानं केली का? किंवा आपलं काम सोपं करण्यासाठी त्यानं देवाच्या सूचनांमध्ये काही फेरफार केले का? नाही. उलट बायबल म्हणतं: “देवाने त्याला जे काही सांगितले ते त्याने केले.”—उत्प. ६:२२.
१२ तारू बांधायला सुमारे चाळीस-पन्नास वर्षं लागली. झाडं तोडणं, मोठमोठी लाकडं बांधकामाच्या ठिकाणापर्यंत आणणं आणि लाकडांपासून खांब, फळ्या तयार करून जोडणं अशी बरीच मेहनतीची कामं त्यांना करावी लागली. तारू तीन मजली होतं, त्यात बऱ्याच खोल्या होत्या आणि तारवाच्या एका बाजूला दार होतं. वरच्या मजल्याला खिडक्या होत्या आणि छतावरून पाणी सहज वाहून जाण्यासाठी त्याला मधोमध हलकासा उंचवटा देण्यात आला होता.—उत्प. ६:१४-१६.
१३. तारू बांधण्याच्या कामापेक्षाही कठीण असं कोणतं काम नोहानं केलं, आणि लोकांची प्रतिक्रिया काय होती?
१३ वर्षं उलटत गेली तसं तारू आकार घेऊ लागलं. या प्रचंड मोठ्या कामात आपल्याला कुटुंबाचीही साथ आहे याबद्दल नोहाला किती आनंद झाला असेल याची कल्पना करा! तारू बांधण्याचं काम कठीण असलं, तरी त्याहून कठीण असं आणखी एक काम नोहानं केलं. देवाला न मानणाऱ्या त्या दुष्ट जगातील लोकांचा, देव लवकरच नाश करणार आहे असा नोहानं धैर्यानं इशारा दिला. म्हणूनच बायबल त्याला “नीतिमत्त्वाचा उपदेशक” म्हणतं. (२ पेत्र २:५ वाचा.) पण, लोकांनी त्याचं ऐकलं का? नोहाच्या काळाविषयी बोलताना येशू ख्रिस्तानं म्हटलं, की त्यांनी त्याच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष केलं. रोजच्या गोष्टींमध्ये, जसं की खाणं, पिणं, लग्न करणं यांत पूर्णपणे गुरफटून गेल्यामुळे, नोहा काय सांगत होता याकडे त्यांनी लक्षच दिलं नाही. (मत्त. २४:३७-३९) उलट, अनेकांनी त्याची आणि त्याच्या कुटुंबाची थट्टा केली असेल यात शंका नाही; काहींनी त्याला धमकावलं असेल किंवा त्याच्यावर हल्लाही केला असेल. इतकंच काय, तर बांधकामाचा प्रकल्प थांबवण्याचाही त्यांनी प्रयत्न केला असेल.
देव नोहाला आशीर्वादित करत आहे याचा पुरावा पाहूनसुद्धा लोकांनी त्याची थट्टा केली आणि त्याच्या संदेशाकडे दुर्लक्ष केलं
१४. नोहा व त्याच्या कुटुंबापासून आजची ख्रिस्ती कुटुंबं काय शिकू शकतात?
१४ पण, नोहानं आणि त्याच्या कुटुंबानं हार मानली नाही. तारू बांधण्याचं काम हे त्यांच्या जीवनातलं सगळ्यात महत्त्वाचं काम होतं. लोकांनी मात्र त्यांना वेड्यात काढलं. त्यांच्या दृष्टीनं ते काम निरर्थक होतं. पण असं असलं, तरी नोहा आणि त्याचं कुटुंब प्रामाणिकपणे आपलं काम करत राहिले. म्हणूनच, त्यांनी दाखवलेल्या विश्वासावरून आज ख्रिस्ती कुटुंबं बरंच काही शिकू शकतात. कारण बायबलमध्ये म्हटल्याप्रमाणे आपणही आज जगाच्या शेवटल्या काळात राहत आहोत. (२ तीम. ३:१) येशूनं सांगितलं होतं, की आपला काळ हा नोहाच्या काळासारखाच असेल. त्यामुळे आज लोक राज्याच्या संदेशात रस घेत नाहीत, आपली थट्टा किंवा छळ करतात तेव्हा आपण नोहाची आठवण करू शकतो. त्यानं या समस्यांना यशस्वीपणे तोंड दिलं हे जाणून आपल्याला नक्कीच दिलासा मिळेल.
तारवात जाण्याची आज्ञा
१५. नोहा जवळपास ६०० वर्षांचा होता तेव्हा त्याच्या जीवनात कोणत्या दुःखद घटना घडल्या?
१५ शेवटी, तारू बांधून तयार झालं. नोहा जवळपास ६०० वर्षांचा होता तेव्हा त्याच्या जीवनात काही दुःखद घटना घडल्या. आधी, त्याचा पिता लामेख याचा मृत्यू झाला.b त्याच्या पाच वर्षांनंतर नोहाचा आजोबा मथुशलह वयाच्या ९६९ व्या वर्षी मरण पावला. बायबलमध्ये उल्लेख केलेल्या व्यक्तींपैकी तो सगळ्यात जास्त वर्षं जगला. (उत्प. ५:२७) मथुशलह आणि लामेख हे दोघंही आदामाच्या काळापासून होते.
१६, १७. (क) नोहा ६०० वर्षांचा असताना त्याला यहोवा देवाकडून कोणती नवीन सूचना मिळाली? (ख) नोहा आणि त्याच्या कुटुंबानं कोणतं अविस्मरणीय दृश्य पाहिलं?
१६ नोहा ६०० वर्षांचा असताना त्याला यहोवा देवाकडून एक नवीन सूचना मिळाली. देवानं त्याला म्हटलं: “तू आपल्या सर्व कुटुंबीयांसह तारवात जा.” (सुबोधभाषांतर) तसंच, देवानं त्याला सर्व प्रकारचे प्राणीही तारवात न्यायला सांगितले. सर्व शुद्ध पशूंच्या म्हणजे बलिदानासाठी योग्य असलेल्या पशूंच्या सातसात जोड्या आणि इतर पशूंच्या दोनदोन जोड्या तारवात घेऊन जाव्यात असं देवानं सांगितलं.—उत्प. ७:१-३.
१७ ते दृश्य किती अविस्मरणीय असेल! वेगवेगळ्या आकाराचे आणि स्वभावाचे प्राणी हजारोंच्या संख्येनं तारवाकडे येत होते; काही चालत, काही उडत, तर काही सावकाश, रमतगमत. प्राण्यांना सहसा बंदिस्त ठिकाणी राहायला आवडत नाही. त्यामुळं त्यांना तारवात आणता-आणता नोहाच्या नाकी नऊ आले असतील असं कदाचित आपल्याला वाटेल. पण, तसं झालं नाही. बायबल म्हणतं, की “नर व मादी अशी जोडीजोडीने, . . . तारवात त्याजकडे गेली.”—उत्प. ७:९.
१८, १९. (क) शंका घेणाऱ्या लोकांच्या प्रश्नांना आपण कशा प्रकारे उत्तर देऊ शकतो? (ख) प्राण्यांचं संरक्षण करण्यासाठी देवानं जो मार्ग निवडला त्यातून त्याची बुद्धी कशी दिसून येते?
१८ पण, बायबलवर शंका घेणारे काही जण म्हणतील: ‘असं कसं होऊ शकतं? वेगवेगळ्या प्रकारचे, वेगवेगळ्या स्वभावाचे प्राणी एकाच ठिकाणी एकत्र कसे राहू शकतात?’ पण जरा विचार करा: ज्यानं हे अफाट विश्व उभं केलं त्या निर्माणकर्त्यासाठी प्राण्यांना शांत ठेवणं, त्यांना काबूत ठेवणं फार मोठी गोष्ट आहे का? शेवटी, प्राण्यांना यहोवा देवानंच निर्माण केलं आहे. ज्यानं पुढं तांबडा समुद्र दुभागला, सूर्य स्थिर केला तो नोहाच्या वृत्तान्तात सांगितलेली प्रत्येक घटना घडवून आणू शकत नव्हता का? नक्कीच आणू शकत होता, आणि त्यानं नेमकं तेच केलं!
१९ अर्थात, आपण निर्माण केलेल्या प्राण्यांना यहोवा दुसऱ्या एखाद्या मार्गानंसुद्धा वाचवू शकला असता. पण, यहोवानं जो मार्ग निवडला त्यातून त्याची बुद्धी दिसून येते. सुरुवातीला देवानं मानवांना बनवलं तेव्हा पृथ्वीवरील सर्व जीवसृष्टीचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यानं त्यांच्यावरच सोपवली होती याची आठवण करा. (उत्प. १:२८) त्यामुळं जलप्रलयाच्या वेळी प्राण्यांचं संरक्षण करण्याची जबाबदारी नोहावर सोपवण्याद्वारे यहोवानं पुन्हा एकदा मानवांवर असलेला आपला भरवसा दाखवून दिला. आणि म्हणूनच, यहोवानं निर्माण केलेल्या प्राण्यांचं आणि मानवांचं जीवन त्याच्या नजरेत अनमोल आहे हे मुलांना शिकवण्यासाठी आजचे पालक नोहाच्या कथेचा उपयोग करतात.
२०. नोहा आणि त्याच्या कुटुंबासाठी जलप्रलयाच्या आधीचा आठवडा धावपळीचा का असेल?
२० यहोवानं नोहाला सांगितलं की एका आठवड्यानंतर जलप्रलयाची सुरुवात होईल. नोहाच्या कुटुंबासाठी तो किती धावपळीचा काळ असेल याची कल्पना करा! प्राण्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी; तसंच, चारा-पाणी आणि कुटुंबासाठी लागणारी अन्नसामग्री व सामानसुमान व्यवस्थित ठेवण्यासाठी त्यांना बरंच काम करावं लागलं असेल. कुटुंबाला तारवात व्यवस्थित राहता यावं म्हणून नोहाची पत्नी आणि सुना आवश्यक ती कामं करण्यात व्यस्त झाल्या असतील.
२१, २२. (क) नोहाच्या काळातील लोकांनी त्याची थट्टा केली याचं आपल्याला आश्चर्य का वाटू नये? (ख) थट्टा करणाऱ्या लोकांची तोंडं केव्हा बंद झाली?
२१ पण, बाकीच्या लोकांबद्दल काय म्हणता येईल? देव नोहाला आणि त्याच्या प्रयत्नांना आशीर्वादित करत आहे याचे भरपूर पुरावे पाहूनसुद्धा त्यांनी लक्ष दिलं नाही. प्राणी कशा प्रकारे सहज तारवात गेले हे त्यांनी आपल्या डोळ्यांनी पाहिलं होतं. पण, याचा त्यांच्यावर काहीच परिणाम झाला नाही. अर्थात, या गोष्टीचं आपल्याला आश्चर्य वाटायला नको. कारण आजसुद्धा लोक अशीच मनोवृत्ती दाखवतात. आपण या दुष्ट जगाच्या शेवटल्या दिवसांत जगत आहोत याचा भरपूर पुरावा डोळ्यांसमोर असूनसुद्धा लोक त्याकडे लक्ष देत नाहीत. उलट, प्रेषित पेत्रानं भाकीत केल्याप्रमाणे देवाच्या इशाऱ्याकडे लक्ष देणाऱ्या लोकांची ते थट्टा करतात. (२ पेत्र ३:३-६ वाचा.) अगदी अशाच प्रकारे लोकांनी नोहाची आणि त्याच्या कुटुंबाचीही थट्टा केली असेल.
२२ मग, या थट्टा करणाऱ्या लोकांची तोंडं कधी बंद झाली? बायबल म्हणते, की नोहानं आपल्या कुटुंबाला आणि प्राण्यांना तारवात आणल्यानंतर यहोवानं स्वतः तारवाचं दार बंद केलं. थट्टा करणाऱ्यांपैकी ज्यांनी हे पाहिलं असेल त्यांचं तोंड नक्की बंद झालं असेल. किंवा मग, पाऊस सुरू झाला तेव्हा तर नक्कीच झालं असेल! कारण यहोवानं सांगितल्याप्रमाणे, मुसळधार पाऊस सुरू झाला आणि पाहता पाहता संपूर्ण पृथ्वी पाण्याखाली आली.—उत्प. ७:१६-२१.
२३. (क) दुष्ट लोकांचा नाश करण्यात यहोवाला आनंद झाला नाही असं का म्हणता येईल? (ख) नोहाच्या विश्वासाचं अनुकरण करणं सुज्ञपणाचं का आहे?
२३ त्या दुष्ट लोकांचा नाश करण्यात यहोवाला आनंद वाटला का? मुळीच नाही! (यहे. ३३:११) उलट, यहोवानं त्यांना आपले चुकीचे मार्ग बदलून योग्य ते करण्याची भरपूर संधी दिली होती. पण, त्यांना असं करणं खरोखरच शक्य होतं का? नोहाच्या जीवनक्रमावरून दिसून येतं की आपले मार्ग बदलून योग्य ते करणं त्यांना नक्कीच शक्य होतं. नोहा यहोवाबरोबर चालला आणि प्रत्येक गोष्टीत त्यानं देवाच्या आज्ञांचं पालन केलं. त्याच्याप्रमाणेच इतर जणसुद्धा देवाच्या इच्छेनुसार वागण्याद्वारे जलप्रलयातून वाचू शकत होते हे नोहानं दाखवून दिलं. म्हणूनच बायबल असं म्हणतं, की नोहानं आपल्या विश्वासाच्या द्वारे त्या काळातील जगाला दोषी ठरवलं; एका अर्थी, त्याच्या विश्वासूपणामुळे त्याच्या काळातील लोकांचा दुष्टपणा अधिकच ठळकपणे दिसून आला. नोहाच्या विश्वासामुळे त्याचा आणि त्याच्या कुटुंबाचाही जीव वाचला. तुम्ही जर नोहाच्या विश्वासाचं अनुकरण केलं, तर तुम्हाला आणि तुमच्या प्रियजनांनाही अनेक आशीर्वाद मिळतील. शिवाय, नोहाप्रमाणे तुम्हीही यहोवा देवासोबत मैत्रीचं नातं जोडू शकाल. एक अशी मैत्री जी कायम टिकून राहील!
a देवानं आदाम आणि हव्वेला जे परिपूर्ण जीवन दिलं होतं ते त्यांनी गमावलं. पण, नोहा आणि त्याच्या काळातले लोक त्या परिपूर्ण जीवनाच्या जवळ असल्यामुळे साहजिकच जास्त वर्षं जगायचे.
b नोहाचं नाव त्याच्या पित्यानं, लामेखानं ठेवलं होतं. या नावाचा अर्थ, “विसावा” किंवा समाधान असा होऊ शकतो. शापित भूमीतून उपज मिळवण्यासाठी मानवाला खूप कष्ट करावे लागतील, असं देवानं सांगितलं होतं. या परिस्थितीतून मानवजातीला विसावा देऊन नोहा आपल्या नावाला पूर्णपणे जागेल असं लामेखानं भाकीत केलं. (उत्प. ५:२८, २९, NW) अर्थात, ही भविष्यवाणी पूर्ण झाली तोपर्यंत लामेखाचा मृत्यू झाला होता. नोहाच्या आईचा व भावंडांचा जलप्रलयात नाश झाला असेल.