वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ia अध्या. १९ पृ. १८७-१९७
  • विश्‍वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • विश्‍वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख
  • त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • योसेफानं आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं
  • योसेफानं आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं
  • योसेफ आणि मरीया “कष्टी” होतात
  • योसेफ शेवटपर्यंत देवाला विश्‍वासू राहिला
  • त्याने ईश्‍वरी मार्गदर्शन स्वीकारले
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—१९९५
  • त्याने एक अतिशय मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतली
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • “मी देवाच्या ठिकाणी आहे काय?”
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक—२०१५
  • तो मोहाला बळी पडला नाही
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
अधिक माहिती पाहा
त्यांच्या विश्‍वासाचं अनुकरण करा
ia अध्या. १९ पृ. १८७-१९७
योसेफ

अध्याय एकोणीस

विश्‍वासूपणे पालनपोषण करणारा आदर्श कुटुंबप्रमुख

१, २. (क) योसेफ आणि मरीया यांना कोणकोणत्या बदलांना तोंड द्यावं लागणार होतं? (ख) योसेफाला कोणती धक्कादायक बातमी आपल्या पत्नीला सांगावी लागणार होती?

योसेफानं आणखी एक गाठोडं गाढवावर लादलं. मग, त्या दांडग्या प्राण्याच्या पाठीवर थाप मारून त्यानं अंधारात बुडालेल्या बेथलेहेम शहराकडे एक चौफेर नजर टाकली. त्या क्षणी, योसेफाच्या मनात पुढच्या लांब प्रवासाचे अनेक विचार घोळत असतील. इजिप्तसारख्या (मिसर) परक्या देशात गेल्यावर तिथली अनोळखी माणसं, त्यांची भाषा, त्यांचे रीतिरिवाज या सगळ्या गोष्टींशी आपल्या कुटुंबाला जुळवून घेता येईल का?

२ पण, ते इजिप्तला का निघाले होते? कारण, एका देवदूतानं स्वप्नाद्वारे त्याला सांगितलं होतं, की हेरोद राजा त्यांच्या लहान मुलाच्या जिवावर टपलेला होता! त्यामुळं थोडाही उशीर न करता लगेच निघणं भाग होतं. (मत्तय २:१३, १४ वाचा.) ही धक्कादायक बातमी आपल्या प्रिय पत्नीला, मरीयेला कशी सांगावी असा प्रश्‍न योसेफाला पडला होता. शेवटी, धैर्य एकवटून त्यानं ती बातमी तिला सांगितली. ते ऐकून मरीयेच्या काळजात धस्स झालं. आपल्या निष्पाप, निरागस मुलाचा जीव घेऊन कुणाला काय मिळेल, हे त्या दोघांनाही समजत नव्हतं. पण, यहोवानं सांगितलेल्या गोष्टीवर त्यांना भरवसा होता आणि त्यामुळं ते बेथलेहेममधून निघायची तयारी करू लागले.

३. योसेफ आणि त्याचं कुटुंब बेथलेहेममधून निघतानाचं वर्णन करा. (चित्रही पाहा.)

३ हेरोदाच्या दुष्ट योजनेबद्दल काहीएक कल्पना नसलेले बेथलेहेमचे लोक गाढ झोपलेले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेऊन योसेफ आपल्या कुटुंबासोबत तिथून निघाला. ते दक्षिणेच्या दिशेनं प्रवास करू लागले. सूर्य हळूहळू वर येऊ लागला तेव्हा योसेफाच्या मनात नक्कीच असंख्य प्रश्‍न आले असतील. ‘माझ्यासारखा साधासुधा सुतार अशा शक्‍तिशाली शत्रूंपासून कुटुंबाचं रक्षण कसं काय करू शकेल? मला माझ्या कुटुंबाचं पुढेही चांगलं पालनपोषण करता येईल का? यहोवानं त्याच्या मुलाचं संगोपन करण्याची माझ्यावर सोपवलेली मोठी जबाबदारी मला चांगल्या प्रकारे पार पाडता येईल का?’ खरोखर, योसेफासमोर अनेक मोठी आव्हानं होती. पण, त्या प्रत्येक आव्हानाचा त्यानं धैर्यानं सामना केला. यावरून, आज कुटुंबात वडील आणि एकंदर आपण सर्वच त्याच्या विश्‍वासाचं अनुकरण कसं करू शकतो, ते आपण पाहू या.

योसेफानं आपल्या कुटुंबाचं रक्षण केलं

४, ५. (क) योसेफाचं जीवन कशा प्रकारे बदललं? (ख) एक अतिशय मोठी जबाबदारी स्वीकारण्यास देवदूतानं योसेफाला कशी मदत केली?

४ दीडएक वर्षापूर्वी, नासरेथ या आपल्या गावी राहत असताना एलीची मुलगी मरीया हिच्याशी योसेफाची मागणी झाली होती. त्यानंतर, त्याचं जीवन पूर्णपणे बदललं. मरीया ही देवाला भिऊन वागणारी एक प्रामाणिक तरुणी होती हे त्याला माहीत होतं. पण, तिला दिवस गेल्याचं कळल्यावर लोकांमध्ये तिची बदनामी होऊ नये म्हणून त्यानं तिला गुपचूप सोडचिठ्ठी देण्याचं ठरवलं होतं.a पण, मरीयेच्या पोटी असलेला गर्भ यहोवाच्या पवित्र आत्म्यामुळं आहे, हे देवदूतानं योसेफाला स्वप्नाद्वारे सांगितलं. देवदूतानं त्याला असंही सांगितलं, की मरीयेचा पत्नी म्हणून स्वीकार करण्यास मागंपुढं पाहू नकोस.—मत्त. १:१८-२१.

५ योसेफ एक देवभीरू आणि आज्ञाधारक मनुष्य होता. त्यामुळं देवदूतानं सांगितल्याप्रमाणे त्यानं केलं. त्यानं एक अतिशय मोठी जबाबदारी स्वीकारली. ती म्हणजे, स्वतःचा नसलेल्या पण देवाला परमप्रिय असलेल्या मुलाचं संगोपन करणं. पुढं, राजानं काढलेल्या एका आदेशानुसार तो आणि त्याची गरोदर पत्नी, नाव नोंदवण्यासाठी बेथलेहेमला गेले. तिथंच, त्यांच्या बाळाचा जन्म झाला.

६-८. (क) कोणत्या घटनेमुळं योसेफ आणि मरीया यांच्या कुटुंबात आणखी एक बदल घडून आला? (ख) ज्योतिष्यांना आकाशात दिसलेला तारा सैतानानं पाठवला होता हे कशावरून दिसून येतं? (तळटीपही पाहा.)

६ पण, बाळाचा जन्म झाल्यावर योसेफ आपल्या कुटुंबाला घेऊन नासरेथला परत गेला नाही; तर जेरूसलेमपासून जवळपास दहा किलोमीटरच्या अंतरावर असलेल्या बेथलेहेममध्येच ते स्थायिक झाले. तिथं ते एका छोट्याशा घरात राहू लागले. ते गरीब असले, तरी योसेफानं मरीयेला आणि येशूला कधीच काही कमी पडू दिलं नाही. त्यांचं संरक्षण करण्यासाठी त्यानं त्याच्या परीनं होताहोईल तितका प्रयत्न केला. पुढं येशू थोडा मोठा झाल्यानंतर, म्हणजे दीडएक वर्षाचा असताना अचानक पुन्हा एकदा त्यांच्या जीवनात एक बदल घडून आला.

७ पूर्वेकडून, बहुधा दूरच्या बॅबिलोनहून काही ज्योतिषी त्यांच्याकडे आले. त्यांना आकाशात एक तारा दिसला होता आणि त्या ताऱ्‍यामुळंच ते योसेफाच्या आणि मरीयेच्या घरापर्यंत पोहचू शकले होते. खरंतर, पुढं जो यहुद्यांचा राजा बनणार होता अशा एका लहान मुलाच्या शोधात ते इथपर्यंत आले होते. योसेफाच्या कुटुंबाशी ते अतिशय आदरानं वागले.

८ पण, कळत नकळत त्या ज्योतिष्यांनी लहानग्या येशूचा जीव धोक्यात घातला होता. कारण आकाशात दिसलेल्या त्या ताऱ्‍यानं त्यांना थेट बेथलेहेमला नाही, तर आधी जेरूसलेमला नेलं.b तिथं गेल्यानंतर त्यांनी दुष्ट हेरोद राजाला सांगितलं, की ते अशा एका मुलाच्या शोधात होते जो पुढं यहुद्यांचा राजा बनणार आहे. हे ऐकून हेरोद ईर्ष्येनं पेटून उठला.

९-११. (क) योसेफ आणि मरीयेच्या पाठीशी यहोवा होता असं का म्हणता येईल? (ख) काही लिखाणांमध्ये त्यांच्या प्रवासाचं वर्णन कसं करण्यात आलं आहे, पण मुळात त्यांचा प्रवास कसा होता?

९ पण दिलासा देणारी गोष्ट म्हणजे, हेरोद किंवा सैतान यांसारख्या शत्रूंपेक्षा कितीतरी शक्‍तिशाली असलेला यहोवा देव योसेफ आणि मरीया यांच्या पाठीशी होता. योसेफ आणि मरीयेच्या घरी आलेल्या त्या पाहुण्यांनी त्यांच्या लहान मुलाला पाहिलं तेव्हा त्यांनी त्याला बऱ्‍याच भेटवस्तू दिल्या आणि त्याच्या बदल्यात कशाचीही अपेक्षा केली नाही. “सोने, ऊद व गंधरस,” यांसारख्या मौल्यवान वस्तू एकाएकी मिळाल्यानंतर योसेफ आणि मरीयेला किती आश्‍चर्य वाटलं असेल! खरंतर, यहुद्यांचा राजा बनणार असलेला मुलगा आपल्याला नेमका कुठं भेटला, हे हेरोदाला जाऊन सांगण्याचा त्या ज्योतिष्यांचा विचार होता. पण, यहोवानं असं घडू दिलं नाही. त्यानं एका स्वप्नाद्वारे त्यांना वेगळ्या मार्गानं आपल्या घरी जाण्याची सूचना दिली.—मत्तय २:१-१२ वाचा.

१० ज्योतिषी गेल्यानंतर देवदूतानं लगेच योसेफाला एक धोक्याचा इशारा दिला. त्यानं म्हटलं: “ऊठ, बाळक व त्याची आई यांना घेऊन मिसर देशास पळून जा, आणि मी तुला सांगेपर्यंत तेथेच राहा; कारण बाळकाचा घात करण्यासाठी हेरोद त्याचा शोध करणार आहे.” (मत्त. २:१३) आपण सुरुवातीला पाहिल्याप्रमाणे योसेफानं देवदूताच्या सांगण्यावरून लगेच पाऊल उचललं. आपल्या मुलाचं संरक्षण करणं ही त्याच्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती आणि त्यामुळं तो आपल्या कुटुंबाला घेऊन इजिप्तला जायला निघाला. या लांबच्या प्रवासात आणि इजिप्तमध्ये राहताना आपल्या गरजा भागवण्यासाठी ज्योतिष्यांनी दिलेल्या महागड्या वस्तूंचा त्यांना नक्कीच फायदा झाला असेल.

रात्रीच्या अंधारात निघण्याची तयारी करत असताना, योसेफ लहानग्या येशूला मरीयेकडे देतो

आपल्या मुलाच्या संरक्षणासाठी योसेफानं विलंब न लावता निःस्वार्थीपणे पाऊल उचललं

११ योसेफ आणि त्याच्या कुटुंबानं इजिप्तचा जो प्रवास केला त्याचं काही लिखाणांमध्ये खूप रंगवून वर्णन करण्यात आलं आहे. त्यात असं सांगण्यात आलं आहे, की लहानग्या येशूनं चमत्कारिक रीत्या तो लांबचा प्रवास कमी केला आणि लुटारूंना पळवून लावलं. तसंच, वाटेत खजुराच्या झाडांवरून त्याच्या आईला सहजपणे खजूर तोडता यावेत म्हणून त्यानं खजुरांची झाडं चमत्कारिक रीतीनं खाली वाकवली.c पण, वास्तवात इजिप्तसारख्या परक्या देशात जाण्याचा त्यांचा प्रवास अतिशय लांबचा आणि खडतर होता.

कुटुंबाच्या सुखासाठी योसेफानं स्वतःच्या सुखसोयी बाजूला सारल्या

१२. आज आईवडील योसेफाच्या उदाहरणावरून काय शिकू शकतात?

१२ योसेफाच्या उदाहरणावरून आजचे पालक बरंच काही शिकू शकतात. आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्यासाठी योसेफानं आपलं काम, स्वतःच्या सुखसोयी बाजूला सारल्या. खरोखरच, त्याच्यासाठी त्याचं कुटुंब ही देवाकडून मिळालेली एक अमूल्य देणगी होती. आज पालकांना एका अतिशय धोकादायक जगात आपल्या मुलांना वाढवावं लागतं. सैतानाच्या या जगात अशा अनेक वाईट गोष्टी आहेत ज्या मुलांना चुकीचं वागण्यास प्रवृत्त करून त्यांचं जीवन उद्‌ध्वस्त करू शकतात. पण, अशा वाईट प्रभावांपासून मुलांचं संरक्षण करण्यासाठी आईवडील योसेफाप्रमाणे लगेच पावलं उचलतात हे किती प्रशंसनीय आहे!

योसेफानं आपल्या कुटुंबाचं पालनपोषण केलं

१३, १४. कुटुंबाचं संगोपन करण्यासाठी योसेफ आणि मरीया नासरेथला का परतले?

१३ योसेफ आणि त्याचं कुटुंब जास्त काळ इजिप्तमध्ये राहिलं नाही असं दिसतं, कारण इजिप्तमध्ये गेल्यानंतर काही काळातच देवदूतानं हेरोदाचा मृत्यू झाल्याचं योसेफाला सांगितलं. त्यामुळं योसेफ आणि त्याचं कुटुंब आपल्या गावी परत गेले. एका प्राचीन भविष्यवाणीत असं सांगण्यात आलं होतं, की यहोवा “मिसर देशातून” आपल्या पुत्राला बोलवेल. (मत्त. २:१५) योसेफ आपल्या कुटुंबाला घेऊन इजिप्तमधून बाहेर पडला तेव्हा ही भविष्यवाणी पूर्ण झाली. पण, इजिप्त सोडल्यानंतर योसेफ आपल्या कुटुंबाला घेऊन कुठं गेला?

१४ योसेफ हा अनावश्‍यक धोका ओढवून घेणाऱ्‍यांपैकी नव्हता. हेरोदाच्या मृत्यूनंतर त्याच्या जागी राजा झालेला अर्खेलाव याच्याबद्दल योसेफाच्या मनात भीती होती. आणि मुळात हा अर्खेलावसुद्धा हेरोदासारखाच दुष्ट व खुनशी वृत्तीचा होता. मग, देवाकडून मिळालेल्या सूचनेनुसार योसेफ आणि त्याचं कुटुंब जेरूसलेमपासून व तिथल्या सर्व शत्रूंपासून दूर उत्तरेकडे म्हणजे गालीलमधील नासरेथ या आपल्या गावी परतले. तिथंच योसेफानं आणि मरीयेनं आपल्या कुटुंबाचं संगोपन केलं.—मत्तय २:१९-२३ वाचा.

१५, १६. योसेफाचा व्यवसाय काय होता, आणि त्यानं कोणत्या हत्यारांचा उपयोग केला असेल?

१५ नासरेथमधील त्यांचं जीवन साधं असलं, तरी सोपं मुळीच नव्हतं. योसेफ व्यवसायानं सुतार होता असं बायबल आपल्याला सांगतं. सुतार या नात्यानं, रानात जाऊन लाकडं तोडणं आणि ती ओढून आणणं; तसंच ही लाकडं वाळवून त्यांपैसून घरं, नावा, छोटे पूल, गाड्या, चाकं, जू आणि शेतीची अवजारं बनवणं अशी बरीच कामं योसेफानं केली असतील. (मत्त. १३:५५) ते खरोखर खूप कष्टाचं काम होतं. बायबलच्या काळात, सुतार सहसा आपल्या घरासमोर किंवा घराला लागून असलेल्या खोलीत काम करायचा.

१६ हे काम करत असताना योसेफानं वेगवेगळ्या प्रकारची हत्यारं वापरली असतील. त्यांपैकी काही हत्यारं त्याला कदाचित त्याच्या वडिलांकडून मिळाली असतील. काटकोन पाहण्याचं उपकरण, ओळंबा, हातोडी, छिन्‍नी, करवत, लाकडी हातोडा, तासणी, छिद्र पाडण्याचं हत्यार, वेगवेगळ्या प्रकारचे डिंक आणि काही खिळ्यांचाही त्यानं उपयोग केला असेल. अर्थात, त्या काळी खिळे खूप महाग असायचे.

१७, १८. (क) योसेफानं लहानग्या येशूला कोणती कामं शिकवली असतील? (ख) योसेफाला आणखी कष्ट का करावे लागले असतील?

१७ आपले वडील काम करत असताना चिमुकला येशू किती कौतुकानं त्यांना पाहत असेल! डोळे विस्फारून तो योसेफाची प्रत्येक हालचाल निरखून पाहत असेल. आपल्या वडिलांचे मजबूत खांदे, त्यांचे पिळदार स्नायू, त्यांच्या हातातलं कौशल्य, त्यांचा एकाग्रपणा या सगळ्या गोष्टींचा त्याला खरंच किती अभिमान वाटत असेल! योसेफानं कदाचित लहानग्या येशूला छोटीमोठी कामं शिकवली असतील. जसं की, माशाच्या वाळलेल्या कातडीनं लाकूड गुळगुळीत कसं करावं हे योसेफानं त्याला शिकवलं असेल. तसंच सिकामोर जातीच्या अंजीराचं लाकूड, ओक झाडाचं लाकूड किंवा मग जैतुनाचं लाकूड यांतला फरक कसा ओळखायचा हेसुद्धा योसेफानं त्याला शिकवलं असेल.

योसेफ येशूला सुतारकाम शिकवताना

योसेफानं आपल्या मुलाला सुतारकाम शिकवलं

१८ अंगमेहनतीचं काम अगदी सहजतेनं करणारे आपले वडील, मनानं किती कोमल आहेत हे येशूच्या लक्षात आल्याशिवाय राहिलं नसेल. आपल्याबद्दल, आपल्या आईबद्दल आणि भावंडांबद्दल त्यांच्या मनात अपार प्रेम आणि आपुलकी आहे हे त्यानं नक्कीच पाहिलं असेल. आतापर्यंत योसेफ आणि मरीया यांचं कुटुंब वाढलं होतं. येशूला सोडून त्यांना कमीतकमी आणखी सहा मुलं झाली होती. (मत्त. १३:५५, ५६) साहजिकच, त्या सगळ्यांचं संगोपन करण्यासाठी योसेफाला खूप कष्ट करावे लागले असतील.

आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा भागवणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे हे योसेफानं ओळखलं

१९. योसेफानं आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा कशा भागवल्या?

१९ पण, या सगळ्यापेक्षा आपल्या कुटुंबाच्या आध्यात्मिक गरजा भागवणं सर्वात महत्त्वाचं आहे हे योसेफाला माहीत होतं. त्यामुळं आपल्या मुलाबाळांना यहोवा देवाबद्दल आणि त्याच्या नियमांबद्दल शिकवण्यासाठी त्यानं वेळ काढला. तो आणि मरीया नियमितपणे त्यांना जवळच्या सभास्थानात घेऊन जायचे. तिथं नियमशास्त्राचं वाचन केलं जायचं आणि ते समजावून सांगितलं जायचं. सभास्थानातून घरी आल्यानंतर कदाचित येशूच्या मनात असंख्य प्रश्‍न असतील. योसेफानं नक्कीच त्याच्या प्रश्‍नांची उत्तरं आपल्या परीनं देण्याचा प्रयत्न केला असेल. याशिवाय, योसेफ दरवर्षी आपल्या कुटुंबाला वार्षिक सण साजरे करण्यासाठी जेरूसलेमला घेऊन जायचा. वल्हांडण सण साजरा करण्यासाठी जाऊन-येऊन १२० किलोमीटरचा प्रवास करण्यासाठी त्यांना कदाचित दोन आठवडे लागत असतील.

योसेफ आणि मरीया आपल्या कुटुंबासह जेरूसलेमच्या मंदिरात उपासना करायला जाताना

योसेफ नियमितपणे आपल्या कुटुंबाला जेरूसलेमच्या मंदिरात उपासना करण्यासाठी घेऊन जायचा

२०. आज ख्रिस्ती कुटुंबप्रमुख योसेफाचं अनुकरण कसं करू शकतात?

२० आज ख्रिस्ती कुटुंबप्रमुखसुद्धा तेच करतात. आपल्या कुटुंबाच्या शारीरिक गरजा भागवण्यासाठी त्यांना कष्ट करावे लागतात, तरीसुद्धा मुलांना यहोवाबद्दल शिकवण्यासाठी ते वेळात वेळ काढतात. खरंतर, या गोष्टीला ते सगळ्यात जास्त महत्त्व देतात. घरात कौटुंबिक उपासना करण्यासाठी, तसंच मुलांना सभांना आणि संमेलनांना घेऊन जाण्यासाठी ते आपल्या परीनं जमेल ते करतात. मुलांना आध्यात्मिक गोष्टी शिकवणं हाच सगळ्यात मौल्यवान ठेवा आहे ही गोष्ट योसेफाप्रमाणेच तेही ओळखतात.

योसेफ आणि मरीया “कष्टी” होतात

२१. वल्हांडण सणासाठी जेरूसलेमला जाण्याचा प्रवास कसा असायचा, आणि येशू आपल्यासोबत नाही हे योसेफ आणि मरीयेच्या केव्हा लक्षात आलं?

२१ येशू १२ वर्षांचा असताना योसेफ नेहमीप्रमाणे वल्हांडण सण साजरा करण्यासाठी आपल्या कुटुंबाला घेऊन जेरूसलेमला गेला. सणासुदीचा काळ असल्यामुळं मोठमोठी कुटुंबं एकत्र प्रवास करत होती. वसंत ऋतूच्या या काळात, शहरापासून थोडं गावाबाहेर गेलं तर सगळीकडे गर्द हिरवाई दिसायची. पण, जसजसं ते जेरूसलेम शहराजवळ यायचे तसतशी हिरवाई कमी होऊन काहीसा ओसाड प्रदेश दिसू लागायचा. उंचावर वसलेल्या जेरूसलेम शहराकडे चढून जात असताना सहसा इस्राएली लोक काही खास प्रकारची स्तोत्रं गायचे, ज्यांना आरोहण स्तोत्रं म्हटलं जातं. (स्तो. १२०–१३४) शहरात हजारोंच्या संख्येनं लोक आले होते. मग, वल्हांडण सण साजरा करून सर्व कुटुंबं आपापल्या घरी परतू लागली. योसेफ आणि मरीया यांना, कदाचित खूप व्यस्त असल्यामुळं, येशू आपल्यासोबत नाही हे सुरुवातीला लक्षात आलं नाही. कदाचित तो नातेवाइकांसोबत असेल असं त्यांना वाटलं असावं. पण, जेरूसलेम सोडून एक पूर्ण दिवस उलटल्यानंतर एक धक्कादायक गोष्ट त्यांच्या लक्षात आली. ती म्हणजे, येशू हरवला होता!—लूक २:४१-४४.

२२, २३. आपला मुलगा हरवला आहे हे लक्षात येताच योसेफ आणि मरीयेनं काय केलं, आणि शेवटी तो सापडला तेव्हा मरीयेनं काय म्हटलं?

२२ हे लक्षात येताच, योसेफ आणि मरीया अगदी सैरावैरा होऊन त्याला शोधू लागले. त्याला शोधत-शोधत ते पुन्हा थेट जेरूसलेमपर्यंत गेले. आता त्यांना ते शहर किती सुनंसुनं वाटलं असेल! आपल्या मुलाला हाका मारत ते शहरातल्या ओसाड गल्ली-बोळांतून फिरले असतील. कुठं गेला असेल हा मुलगा? हा प्रश्‍न त्यांना राहून-राहून सतावत असेल. तीन दिवस शोधाशोध करूनसुद्धा येशू सापडला नाही तेव्हा योसेफाची कशी अवस्था झाली असेल याची कल्पना करा. यहोवानं इतक्या भरवशानं आपल्यावर सोपवलेली जबाबदारी पूर्ण करण्यात आपण अपयशी झालो, असं त्याला वाटलं असेल का? शेवटी, संपूर्ण शहर पालथं घातल्यानंतर योसेफ आणि मरीया त्याला शोधायला मंदिरात गेले. तिथं एका मोठ्या खोलीत, नियमशास्त्राचं भरपूर ज्ञान असलेल्या गुरुजनांमध्ये लहानगा येशू बसलेला त्यांना दिसला. किती हायसं वाटलं असेल योसेफ आणि मरीयेला!—लूक २:४५, ४६.

२३ त्या ज्ञानी लोकांमध्ये बसून येशू त्यांचं बोलणं ऐकत होता आणि त्यांना उत्सुकतेनं प्रश्‍न विचारत होता. त्या लहान मुलाची समजशक्‍ती आणि त्याची उत्तरं ऐकून ते खूप थक्क झाले. पण, मरीया आणि योसेफाला मात्र येशूच्या अशा वागण्याचा धक्का बसला होता. त्या वेळी, योसेफ काय म्हणाला याबद्दल बायबलमध्ये काही सांगितलेलं नाही. पण, मरीयेच्या शब्दांवरून त्या दोघांच्याही भावना लक्षात येतात. ती म्हणाली: “बाळा, तू आमच्याबरोबर असा का वागलास? पाहा, तुझा बाप व मी कष्टी होऊन तुझा शोध करत आलो.”—लूक २:४७, ४८.

२४. बायबलमध्ये पालकांच्या जबाबदारीचं कशा प्रकारे एक वास्तविक चित्र उभं करण्यात आलं आहे?

२४ मरीयेच्या या एकाच वाक्यातून बायबल आपल्यासमोर पालकांच्या जबाबदारीचं एक वास्तविक चित्र उभं करतं. खरंच, मुलांचं संगोपन करणं हे ‘कष्टाचं’ काम आहे. येशूसारख्या परिपूर्ण मुलाचं संगोपन करणंसुद्धा त्याच्या आईवडिलांसाठी सोपं नव्हतं. आणि सध्याच्या या धोकादायक जगात तर मुलांना वाढवताना पालकांना “कष्टी” करणारे अनेक प्रसंग येऊ शकतात. पण, आईवडिलांची जबाबदारी सोपी नसते ही गोष्ट बायबलसुद्धा कबूल करते, हे पालकांसाठी किती दिलासादायक आहे!

२५, २६. येशूनं आपल्या आईवडिलांना काय म्हटलं, आणि त्याविषयी योसेफाला कसं वाटलं असेल?

२५ पण, मुळात येशू दुसरीकडे कुठंही न जाता मंदिरात का गेला असावा? कारण तिथंच त्याला आपल्या स्वर्गीय पित्याच्या अगदी जवळ असल्यासारखं वाटलं. तसंच, यहोवा देवाबद्दल शिकून घेण्यास तो खूप उत्सुक होता. त्यामुळं अगदी प्रामाणिकपणे तो आपल्या आईवडिलांना म्हणाला: “तुम्ही माझा शोध करत राहिला हे कसे? माझ्या पित्याच्या घरात मी असावे हे तुमच्या ध्यानात आले नाही काय?”—लूक २:४९.

२६ येशूच्या या शब्दांवर योसेफानं कितीतरी वेळा विचार केला असेल. कदाचित त्याला याविषयी अभिमानही वाटला असेल. कारण आपल्या मुलाच्या मनात यहोवा देवाबद्दल अशाच भावना उत्पन्‍न करण्याचा त्यानं मनापासून प्रयत्न केला होता. येशू बारा वर्षांचा होईपर्यंत, एक प्रेमळ पिता काय असतो हे बऱ्‍याच अंशी योसेफासोबतच्या निकट सहवासामुळंच त्याला समजलं होतं.

२७. पिता या नात्यानं तुम्हाला कोणता सुहक्क लाभला आहे, आणि तुम्ही योसेफाचं अनुकरण कसं करू शकता?

२७ तुम्हीही एक पिता आहात का? तर मग, मुलांवर प्रेम करणारा, त्यांचं संरक्षण करणारा पिता काय असतो, हे त्यांच्या मनावर बिंबवण्याचा किती मोठा सुहक्क तुम्हाला लाभला आहे याची तुम्हाला जाणीव आहे का? तसंच, तुम्हाला सावत्र किंवा दत्तक मुलं असतील, तर योसेफाचं उदाहरण नेहमी डोळ्यांसमोर ठेवा आणि प्रत्येक मूल वेगळं आहे हे लक्षात घेऊन त्याच्याशी वागा. आणि आपला स्वर्गीय पिता, यहोवा देव याच्याशी जवळचा नातेसंबंध जोडण्यास मुलांना मदत करा.—इफिसकर ६:४ वाचा.

योसेफ शेवटपर्यंत देवाला विश्‍वासू राहिला

२८, २९. (क) लूक २:५१, ५२ यातील शब्दांवरून योसेफाबद्दल आपल्याला काय समजतं? (ख) येशूच्या ज्ञानात भर घालण्यासाठी योसेफानं काय केलं?

२८ योसेफाच्या पुढच्या जीवनाबद्दल बायबल आपल्याला फारसं काही सांगत नाही. पण, जे काही सांगतं ते खरंच लक्षात घेण्यासारखं आहे. अहवाल म्हणतो, की येशू “त्यांच्या” म्हणजे त्याच्या पालकांच्या “आज्ञेत राहिला.” तसंच, “येशू ज्ञानाने, शरीराने आणि देवाच्या व माणसांच्या कृपेत वाढत गेला,” असंही अहवालात सांगितलं आहे. (लूक २:५१, ५२ वाचा.) यावरून योसेफाबद्दल आपल्याला काय समजतं? बऱ्‍याच गोष्टी. एकतर, कुटुंबप्रमुख या नात्यानं योसेफानं पुढंही आपली जबाबदारी चांगल्या प्रकारे हाताळली हे आपल्याला समजतं. कारण परिपूर्ण असलेल्या त्याच्या पुत्रानं आपल्या पित्याच्या अधिकाराचा आदर केला आणि त्याच्या आज्ञेत राहिला.

२९ पुढं अहवालावरून दिसून येतं, की येशू ‘ज्ञानानं वाढत गेला.’ त्याच्या ज्ञानात भर घालण्यात योसेफाचा नक्कीच मोलाचा वाटा असेल. त्या काळी, यहुद्यांमध्ये एक जुनी, पण प्रचलित म्हण होती. त्या म्हणीचा अर्थ असा होता, की ज्यांच्या हातात पैसा आणि सत्ता असते तेच खऱ्‍या अर्थानं ज्ञानी असतात; पण सुतार, शेतकरी आणि लोहार यांच्यासारखे साधेसुधे लोक मात्र “न्याय-नीतीच्या गोष्टी करू शकत नाहीत; शिवाय, जिथं ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या जातात तिथं हे लोक कधीच पाहायला मिळत नाहीत.” पण ही म्हण किती चुकीची आहे हे येशूनं पुढं सिद्ध केलं. योसेफ एक साधासुधा सुतार असला, तरी लहानग्या येशूनं आपल्या या पित्याला कितीतरी वेळा यहोवाच्या “न्याय-नीतीच्या गोष्टी” प्रभावीपणे शिकवताना ऐकलं होतं.

३०. योसेफानं कुटुंबप्रमुखांसाठी कोणतं उदाहरण मांडलं?

३० येशूची शारीरिक वाढ होण्यातही योसेफाचा मोठा वाटा होता असं म्हणता येईल. योसेफानं नक्कीच त्याचा चांगल्या प्रकारे सांभाळ केला असेल. त्यामुळंच येशू पुढं एक सुदृढ पुरुष बनला. तसंच, योसेफानं त्याच्या या पुत्राला कामात तरबेज होण्यासही शिकवलं असेल. कारण येशूला केवळ सुताराचा पुत्र नव्हे, तर “सुतार” म्हणूनही ओळखलं जायचं. (मार्क ६:३) यावरून दिसून येतं, की योसेफानं त्याला उत्तम प्रशिक्षण दिलं होतं. आज कुटुंबप्रमुख आपल्या मुलांची चांगली काळजी घेतात आणि त्यांना स्वतःच्या पायांवर उभं राहण्यास मदत करतात तेव्हा ते योसेफाच्या उत्तम उदाहरणाचं अनुकरण करत असतात.

३१. (क) पुराव्यावरून योसेफाच्या मृत्यूबद्दल काय दिसून येतं? (चौकटही पाहा.) (ख) योसेफानं कशा प्रकारे आपल्या सर्वांसमोर एक चांगलं उदाहरण मांडलं?

३१ वयाच्या तिसाव्या वर्षी येशूचा बाप्तिस्मा झाल्यानंतर पुढं कुठंच योसेफाचा उल्लेख आढळत नाही. पुराव्यावरून दिसून येतं, की येशूनं आपलं सेवाकार्य सुरू केलं तोपर्यंत मरीया विधवा झाली होती. (“योसेफाचा मृत्यू केव्हा झाला?” ही चौकट पाहा.) पण योसेफानं आपल्या कुटुंबाचं संरक्षण करण्याद्वारे, त्यांचं पालनपोषण करण्याद्वारे आणि शेवटपर्यंत विश्‍वासू राहण्याद्वारे नक्कीच एक अतिशय उत्तम उदाहरण मांडलं. प्रत्येक पिता, प्रत्येक कुटुंबप्रमुख, खरंतर प्रत्येक ख्रिस्ती व्यक्‍ती योसेफाच्या विश्‍वासाचं अनुकरण करू शकते.

योसेफाचा मृत्यू केव्हा झाला?

येशू १२ वर्षांचा असताना योसेफ जिवंत होता हे आपल्याला माहीत आहे. या वयात सहसा यहुदी मुलं आपल्या वडिलांचा व्यवसाय शिकू लागायचे आणि १५ वर्षांचे झाल्यावर वडिलांच्या हाताखाली शिकाऊ म्हणून काम करायचे. ज्याअर्थी येशू एक सुतार बनला त्याअर्थी तो या कामासाठी तयार होईपर्यंत तरी योसेफ जिवंत असावा. पुढं, येशूनं सुमारे ३० वर्षांचा असताना आपलं सेवाकार्य सुरू केलं तेव्हा योसेफ हयात होता का? तशी शक्यता फार कमी आहे. कारण त्या वेळी, येशूची आई, बहीण, भाऊ हे सर्व जण असल्याचा उल्लेख करण्यात आला आहे, पण योसेफाचा उल्लेख आढळत नाही. एकदा तर येशूला योसेफाचा नाही, तर “मरीयेचा मुलगा,” असंही म्हटलं आहे. (मार्क ६:३) तसंच, मरीया नंतर स्वतः पुढाकार घेऊन काही गोष्टी करत असल्याचा उल्लेखही आढळतो. (योहा. २:१-५) बायबलच्या काळात, पती जिवंत असल्यास कुटुंबात सहसा तोच पुढाकार घ्यायचा. यावरून, मरीया विधवा झाली असावी असं दिसतं. शेवटी, येशू वधस्तंभावर असताना त्यानं आपल्या आईची काळजी घेण्याची जबाबदारी प्रेषित योहानावर सोपवली. (योहा. १९:२६, २७) योसेफ जर जिवंत असता तर येशूला असं करण्याची गरजच पडली नसती. यावरून लक्षात येतं, की येशू कोवळ्या वयाचा असतानाच योसेफाचा मृत्यू झाला असावा. योसेफाच्या मृत्यूनंतर, कुटुंबातला सर्वात मोठा मुलगा या नात्यानं येशूनं नक्कीच बाप्तिस्मा होईपर्यंत सुताराचा व्यवसाय पुढं चालवला असेल आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेतली असेल.

a त्या काळी, मागणी झालेल्या जोडप्यांकडे लग्न झालेल्यांप्रमाणेच पाहिलं जायचं.

b ज्योतिष्यांना आकाशात दिसलेला तारा हा नेहमी दिसणारा तारा नव्हता; किंवा तो देवानंही पाठवलेला नव्हता. त्यावरून स्पष्ट दिसून येतं, की ही सैतानाचीच कुयुक्‍ती होती. येशूचा मृत्यू घडवून आणण्यासाठी त्यानंच हा असाधारण तारा पाठवला होता.

c बायबलमध्ये स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे, की येशूच्या चिन्हांचा “प्रारंभ” म्हणजेच त्याचा पहिला चमत्कार त्यानं त्याच्या बाप्तिस्म्यानंतर केला.—योहा. २:१-११.

यावर विचार करा. . .

  • योसेफानं कशा प्रकारे आपल्या कुटुंबाचं संरक्षण केलं?

  • योसेफानं आपल्या कुटुंबाचं पालनपोषण कसं केलं?

  • देवाकडून मिळालेली जबाबदारी योसेफानं विश्‍वासूपणे पार पाडली असं का म्हणता येईल?

  • तुम्हाला कोणकोणत्या मार्गांनी योसेफाच्या उदाहरणाचं अनुकरण करायला आवडेल?

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा