वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • ds पृ. ४-११
  • दोन शब्द

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • दोन शब्द
  • जा, लोकांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या
जा, लोकांना शिष्य करा आणि त्यांना बाप्तिस्मा द्या
ds पृ. ४-११

ख्रिस्ती पालकांसाठी दोन शब्द:

पालक या नात्याने, नक्कीच तुमचीही मनापासून इच्छा असेल की तुमच्या लाडक्या मुलांच्या मनात यहोवाबद्दल प्रेम उत्पन्‍न व्हावं आणि त्यांनी आपलं जीवन त्याला समर्पित करावं. मग, बाप्तिस्मा घेण्याची तयारी करायला तुम्ही त्यांना कशी मदत करू शकता? हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यासाठी ते तयार आहेत असं केव्हा म्हणता येईल?

येशूने त्याच्या शिष्यांना असं सांगितलं होतं: “सर्व राष्ट्रांच्या लोकांना शिष्य करा आणि त्यांना . . . बाप्तिस्मा द्या.” (मत्त. २८:१९) याचा अर्थ, बाप्तिस्मा घेण्यासाठी पहिली अट म्हणजे, त्या व्यक्‍तीने एक शिष्य असणं गरजेचं आहे. शिष्य असण्याचा अर्थ फक्‍त ख्रिस्ताच्या शिकवणी जाणून घेणं आणि त्यांवर विश्‍वास असणं इतकाच होत नाही. तर, त्या शिकवणींचं काळजीपूर्वक पालन करणंही महत्त्वाचं आहे. आणि जे अजून वयाने लहान आहेत तेसुद्धा हे करू शकतात.

मुलांसमोर स्वतःचं चांगलं उदाहरण ठेवा आणि यहोवाच्या शिकवणी त्यांच्या मनात रुजवण्याचा प्रयत्न करा. (अनु. ६:६-९) यासाठी तुम्ही कायम जीवनाचा आनंद घ्या!  या पुस्तकाचा उपयोग करू शकता. या पुस्तकाच्या मदतीने तुम्ही आपल्या मुलांना बायबलमधल्या महत्त्वाच्या शिकवणींचं ज्ञान देऊ शकता. त्यासोबतच, बायबलमधल्या तत्त्वांच्या आधारावर तर्क करायला आणि त्यांनुसार जीवन जगायलाही तुम्ही त्यांना शिकवू शकता. तुमच्या मुलांना आपल्या विश्‍वासांबद्दल स्वतःच्या शब्दांत समजावून सांगता यावं, म्हणून त्यांना मदत करा. (१ पेत्र ३:१५) तुमच्याकडून, तसंच वैयक्‍तिक अभ्यास, कौटुंबिक उपासना, मंडळीच्या सभा आणि चांगले सोबती यांच्याकडून मिळालेलं ज्ञान आणि प्रोत्साहन यांमुळे तुमच्या मुलांना बाप्तिस्मा घेण्यासाठीच नाही, तर पुढेही प्रगती करत राहण्यासाठी मदत मिळेल. यहोवाशी आपलं नातं आणखी मजबूत कसं करता येईल याबद्दल नेहमी विचार करायला त्यांना मदत करा.

नीतिसूत्रे २०:११ यात म्हटलं आहे: “वृत्ती शुद्ध आहे की नाही, नीट आहे की नाही, हे मूलसुद्धा आपल्या कृत्यांनी उघड करते.” मग एखादी लहान मुलगी किंवा मुलगा येशू ख्रिस्ताचा शिष्य बनला आहे आणि बाप्तिस्मा घ्यायला पात्र आहे, हे कोणत्या गोष्टींवरून दिसून येईल?

बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करणारी मुलं आपल्या पालकांच्या आज्ञेत असली पाहिजेत. (प्रे. कार्ये ५:२९; कलस्सै. ३:२०) येशूही १२ वर्षांचा असताना, त्याच्या आईवडिलांच्या “आज्ञेत राहिला” असं बायबलमध्ये सांगितलं आहे. (लूक २:५१) तुमचं मूल परिपूर्ण नाही हे आठवणीत ठेवा. पण, ज्यांना बाप्तिस्मा घेण्याची इच्छा आहे, अशा मुलांनी येशूच्या उदाहरणाचं अनुकरण करायचा प्रयत्न केला पाहिजे. आणि ती आपल्या आईवडिलांच्या आज्ञेत आहेत हे इतरांनाही दिसून आलं पाहिजे.

बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करणाऱ्‍या मुलांना बायबलच्या शिकवणींबद्दल जाणून घ्यायची इच्छा असली पाहिजे. (लूक २:४६) तुमच्या मुलाला किंवा मुलीला सभांना जाण्याची आणि सभेत उत्तरं देण्याची उत्सुकता असते का? (स्तो. १२२:१) नियमितपणे बायबल वाचण्याची आणि वैयक्‍तिक अभ्यास करण्याची त्याला किंवा तिला आवड आहे का?—मत्त. ४:४.

बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रगती करणारी मुलं देवाच्या राज्याशी संबंधित असलेल्या गोष्टींना जीवनात इतर गोष्टींपेक्षा जास्त महत्त्व देण्याचा प्रयत्न करतात. (मत्त. ६:३३) आपल्या विश्‍वासांबद्दल इतरांना साक्ष द्यायची जबाबदारी आपल्यावर आहे याची त्यांना जाणीव असते. ती सेवाकार्याच्या वेगवेगळ्या प्रकारांत सहभागी होतात आणि शिक्षकांना व शाळासोबत्यांना आपण यहोवाचे साक्षीदार असल्याचं सांगायला त्यांना संकोच वाटत नाही. जीवन आणि सेवाकार्य सभेत नेमल्या जाणाऱ्‍या भागांची चांगली तयारी करून हे भाग उत्तम प्रकारे सादर करण्याचा ते प्रयत्न करतात.

यासोबतच, ही मुलं वाईट संगती टाळून नैतिक रीत्या शुद्ध राहण्याचा प्रयत्न करतात. (नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३) करमणुकीसाठी संगीत, चित्रपट, टीव्ही कार्यक्रम, व्हिडिओ गेम निवडताना आणि इंटरनेटचा वापर करतानाही ते याची काळजी घेतात.

आईवडिलांनी मेहनतीने केलेल्या प्रयत्नांना प्रतिसाद देऊन कित्येक मुलांनी सत्याचा मनापासून स्वीकार केला आहे आणि लहान वयातच ते बाप्तिस्मा घ्यायला पात्र ठरले आहेत. यहोवासोबत जवळचं नातं जोडण्यात बाप्तिस्मा हे एक महत्त्वाचं पाऊल आहे. हे पाऊल उचलायला तुम्ही आपल्या मुलांना मदत करत असताना, यहोवाने तुमच्या सर्व प्रयत्नांवर आशीर्वाद द्यावा हीच आमची प्रार्थना आहे.

बाप्तिस्मा न झालेल्या प्रचारकासाठी दोन शब्द:

बाप्तिस्मा न झालेला प्रचारक या नात्याने मंडळीसोबत सेवा करणं ही एक सन्मानाची गोष्ट आहे. आतापर्यंत तुम्ही जी आध्यात्मिक प्रगती केली आहे त्याबद्दल आम्ही तुमची प्रशंसा करतो. देवाच्या वचनाचा अभ्यास करून तुम्ही देवाबद्दल जाणून घेतलं आहे आणि त्याच्या अभिवचनांवर तुमचा विश्‍वास असल्याचं तुमच्या कार्यांतून दिसून आलं आहे.—योहा. १७:३; इब्री ११:६.

यहोवाच्या साक्षीदारांसोबत अभ्यास करायला सुरुवात करण्याआधी, कदाचित दुसऱ्‍या एखाद्या धार्मिक संघटनेशी तुमचा संबंध असेल. किंवा मग धर्माशी तुमचा कोणताही संबंध नसेल. कदाचित, तुम्ही बायबल तत्त्वांच्या विरोधात असलेल्या काही गोष्टी करत असाल. पण, आता तुम्ही पश्‍चात्ताप आणि परिवर्तन करून आपला विश्‍वास कार्यांतून दाखवला आहे. पश्‍चात्ताप म्हणजे पूर्वी केलेल्या चुकीच्या गोष्टींबद्दल मनापासून दुःख वाटणं. तर, परिवर्तन म्हणजे चुकीच्या मार्गावर चालायचं सोडून, देवाच्या नजरेत जे योग्य आहे ते करण्याचा निश्‍चय करणं.—प्रे. कार्ये ३:१९.

दुसरीकडे पाहता, कदाचित तुम्हाला “बालपणापासून पवित्र लिखाणांचे ज्ञान” असेल. यामुळे ख्रिस्ती लोकांसाठी योग्य नसलेल्या गोष्टी करण्यापासून आणि गंभीर पापात अडकण्यापासून तुमचं संरक्षण झालं असेल. (२ तीम. ३:१५) यहोवाच्या नजरेत चुकीच्या गोष्टी करण्यासाठी मित्रांकडून येणाऱ्‍या दबावाचा आणि इतर मोहांचा प्रतिकार करायचं तुम्ही शिकून घेतलं आहे. खऱ्‍या उपासनेला पाठिंबा देऊन आणि आपल्या विश्‍वासांबद्दल इतरांना सांगून तुम्ही आपला विश्‍वास दाखवून दिला आहे. ख्रिस्ती सेवाकार्य कसं करायचं हे तुम्ही शिकून घेतलं आहे. आणि आता तुम्ही बाप्तिस्मा न झालेला प्रचारक म्हणून यहोवाची सेवा करण्याचा वैयक्‍तिक निर्णय घेतला आहे.

तुम्ही लहानपणापासूनच यहोवाचे मार्ग शिकला असला, किंवा यहोवाबद्दल जाणून घेण्याची संधी तुम्हाला जीवनात नंतर मिळाली असली, तरी आता तुम्ही आध्यात्मिक प्रगती करण्यासाठी पुढची दोन पावलं उचलायचा कदाचित विचार करत असाल. ती म्हणजे समर्पण आणि बाप्तिस्मा. समर्पण म्हणजे यहोवाला प्रार्थना करून हे सांगणं, की आपण जीवनभर फक्‍त त्याचीच उपासना करण्याचा निर्णय घेतला आहे. (मत्त. १६:२४) मग, हे समर्पण सर्वांसमोर जाहीर करण्यासाठी तुम्ही पाण्यात बाप्तिस्मा घेता. (मत्त. २८:१९, २०) समर्पण आणि बाप्तिस्मा झाल्यावर तुम्ही यहोवा देवाचा एक नियुक्‍त सेवक बनता. खरंच, किती मोठा सन्मान!

पण, बायबलच्या अभ्यासातून तुमच्या लक्षात आलंच असेल, की तुम्हाला बऱ्‍याच समस्यांना तोंड द्यावं लागू शकतं. तुम्हाला आठवत असेल, येशूचा बाप्तिस्मा झाल्यावर लगेच “पवित्र आत्म्याने [त्याला] ओसाड प्रदेशात नेले आणि तिथे सैतानाने त्याची परीक्षा घेतली.” (मत्त. ४:१) त्यामुळे ख्रिस्ताचा शिष्य म्हणून तुमचा बाप्तिस्मा झाल्यावर तुमच्यावरही आणखी अनेक परीक्षा येऊ शकतात. (योहा. १५:२०) या परीक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या असू शकतात. कदाचित तुम्हाला तुमच्या कुटुंबाकडून विरोध सहन करावा लागेल. (मत्त. १०:३६) किंवा शाळासोबती, सहकर्मचारी, आणि पूर्वीचे तुमचे मित्र तुमची टिंगल करतील. पण मार्क १०:२९, ३० या वचनांतले येशूचे शब्द नेहमी आठवणीत ठेवा: “मी तुम्हाला खरं सांगतो, माझ्यासाठी आणि आनंदाच्या संदेशासाठी ज्यांनी घरदार, बहीणभाऊ, आईवडील, मुलंबाळं किंवा शेतीवाडी यांचा त्याग केला आहे, त्यांपैकी प्रत्येकाला सध्याच्या काळात छळासोबत शंभरपटीने घरंदारं, बहीणभाऊ, आईवडील, मुलंबाळं व शेतीवाडी, आणि येणाऱ्‍या जगाच्या व्यवस्थेत सर्वकाळाचं जीवन मिळाल्याशिवाय राहणार नाही.” तेव्हा, यहोवासोबत जवळचा नातेसंबंध टिकवून ठेवण्याचा आणि त्याच्या नीतिनियमांनुसार चालत राहण्याचा नेहमी प्रयत्न करत राहा.

बाप्तिस्मा घ्यावा असं तुम्हाला वाटेल, तेव्हा वडील वर्गाच्या संयोजकाला याबद्दल सांगा. मग, या पुस्तिकेतल्या प्रश्‍नांच्या मदतीने वडील तुमच्यासोबत चर्चा करतील आणि तुम्ही बाप्तिस्मा घ्यायला पात्र आहात का, हे ठरवतील. त्याआधी तुम्ही आपल्या नियमित वैयक्‍तिक अभ्यासात स्वतःहून या प्रश्‍नांची उजळणी करायला सुरुवात करू शकता.

या चर्चांसाठी तयारी करताना, दिलेली वचनं वाचा आणि त्यांवर विचार करा. हवं तर तुम्ही या पुस्तिकेतच किंवा इतर ठिकाणी काही नोट्‌स लिहून ठेवू शकता. मग, वडिलांसोबत चर्चा करताना तुम्ही त्या नोट्‌सची मदत घेऊ शकता आणि ही पुस्तिकासुद्धा उघडी ठेवू शकता. एखाद्या प्रश्‍नाचा अर्थ समजला नाही, तर तुमच्यासोबत बायबलचा अभ्यास करणाऱ्‍याला किंवा वडिलांना त्याबद्दल विचारायला लाजू नका.

वडिलांसोबत चर्चा करत असताना, लांबलचक उत्तरं दिली पाहिजेत असा विचार करू नका. विचारलेल्या प्रश्‍नाचं तुमच्या स्वतःच्या शब्दांत साधं, सरळ उत्तर द्या. शक्यतो प्रश्‍नांची उत्तरं देताना दिलेल्या शास्त्रवचनांपैकी एक किंवा दोन वचनांचा उपयोग करून बायबलच्या आधारावर उत्तर देणं चांगलं राहील.

बायबलच्या महत्त्वाच्या शिकवणींचं तुम्हाला अजून पुरेसं ज्ञान नाही असं दिसून आलं, तर वडील तुम्हाला याबाबतीत मदत देण्याची व्यवस्था करतील. यामुळे काही काळाने तुम्हाला बायबलमधून समजलेल्या गोष्टी स्वतःच्या शब्दांत व्यक्‍त करता येतील आणि तुम्ही पुढे बाप्तिस्मा घ्यायला पात्र ठरू शकाल.

[मंडळीच्या वडिलांसाठी सूचना: बाप्तिस्मा घेण्याची इच्छा असलेल्या व्यक्‍तींसोबत चर्चा करण्यासंबंधी सूचनांसाठी पृष्ठं ५४-५८ पाहा.]

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा