जीवन खरेपणाने वाचविणारे रक्त
आतापर्यंत पाहिलेल्या माहितीवरून काही मुद्दे स्पष्ट झाले आहेत. रक्त संक्रमणे ही लोकांच्या मते जीवन वाचविणारी असली तरी त्यात धोके आहेत. दर वर्षी संक्रमणामुळे हजारो मरतात, आणि इतर पुष्कळजण अत्यंत आजारी पडतात व त्यांना दीर्घकालीन परिणामांना तोंड द्यावे लागते. यामुळेच, अगदी भौतिक कारणांसाठीही, ‘रक्तापासून दूर रहा,’ या पवित्र शास्त्राच्या नियमाकडे लक्ष देण्यात आजही शहाणपणा आहे.—प्रे. कृत्ये १५:२८, २९.
रक्तविरहीत वैद्यकीय उपाय योजनांची मागणी केल्यास रूग्णांचे अनेक धोक्यापासून संरक्षण होते. यहोवाच्या साक्षीदारांवर ही गोष्ट लागू करण्याचे आव्हान स्वीकारलेल्या डॉक्टरांनी कामाचा सुरक्षित व परिणामकारक स्तर निर्माण केला आहे असे अनेक वैद्यकीय अहवालांवरून दिसून आले आहे. रक्ताविना दर्जेदार वैद्यकीय सेवा देणाऱ्या डॉक्टरांनी अमूल्य वैद्यकीय तत्त्वांना धोक्यात टाकलेले नाही. तर आपल्या शरीराला व जीवाला काय केले जावे याविषयी त्यांना मान्य असलेली निवड करता यावी म्हणून रूग्णाला जोखीम व फायदे माहीत असण्याच्या हक्काला ते आदर प्रदर्शित करीत असतात.
या बाबतीत आम्ही अतिभाबडेपणा करीत नाही, कारण या दृष्टीकोणाशी सर्वजण सहमत होणार नाहीत हे आम्हाला समजते. सद्सद्विवेक बुद्धी, नैतिक मूल्ये व वैद्यकीय दृष्टीकोण यांच्या बाबतीत लोकांमध्ये फरक असतो. या कारणास्तव, काही डॉक्टरांसह इतरांना, रक्तापासून दूर राहण्याचा रूग्णाचा निर्णय स्वीकारणे कठीण जाईल. न्यूयॉर्क येथील एका सर्जनने लिहिलेः “१५ वर्षापूर्वी मदतनीस-विद्यार्थी म्हणून, आंत्रव्रणाने रक्तस्राव होऊन मरत असलेल्या एका यहोवाच्या साक्षीदाराच्या खाटेजवळ मी उभा होतो. हे मी कधीही विसरणार नाही. त्या रूग्णाच्या इच्छेचा आदर केला गेला व संक्रमणे दिली गेली नाहीत, परंतु एक डॉक्टर या नात्याने मला आलेले प्रचंड नैराश्य मला अजूनही आठवते.”
रक्त जीवनप्रदायक ठरले असते अशी त्यांची धारणा होती यात शंका नाही. परंतु त्यांनी हे लिहिल्यानंतर एका वर्षाने द ब्रिटीश जर्नल ऑफ सर्जरी (ऑक्टोबर १९८६) या नियतकालिकाने सांगितले की, संक्रमणाचा उदय होण्यापूर्वी जठर व आतड्यांच्या रक्तस्रावाने “मरणाऱ्यांचे प्रमाण फक्त २.५ टक्के” होते. संक्रमणाचा पायंडा पडल्यापासून ‘बहुतेक विस्तृत अभ्यास मृत्युचे प्रमाण १० टक्के’ दर्शवतात. हे मृत्युचे प्रमाण चौपट का झाले? त्या संशोधकांनी सुचविलेः “रक्ताचे संक्रमण सुरुवातीलाच केल्यास, रक्तस्रावास प्रतिक्रिया म्हणून रक्त जलद गोठण्याची क्रिया उलटते, व रक्तस्रावाला उत्तेजन मिळते असे भासते.” यावरून हे दिसते की, रक्तस्राव होणारा आंत्रव्रण असलेल्या साक्षीदाराने रक्त घेण्याचे नाकारले तेव्हा त्याच्या निवडीमुळे प्रत्यक्षात त्याची वाचण्याची संभावना जास्तीत जास्त दिसत होती.
त्याच सर्जनने नंतर म्हटलेः “कालांतराने व अनेक रूग्णांवर उपचार केल्याने माणसाचा सापेक्ष दृष्टीकोण बदलतो. आणि आज, रूग्ण व त्याचा डॉक्टर यांच्यामधील विश्वास तसेच रूग्णाच्या इच्छेचा आदर करण्याचे कर्तव्य या गोष्टी, आपल्या सभोवार असलेल्या नव्या वैद्यकीय तंत्रज्ञानापेक्षा मला कितीतरी अधिक महत्त्वाच्या वाटतात. . . . नैराश्याची जागा आता त्या विशिष्ट रूग्णाच्या अटळ विश्वासाबद्दल भीतीयुक्त आदर व पूज्यभाव यांनी घेतली आहे, ही बाब चित्तवेधक आहे.” शेवटी त्या डॉक्टरांनी म्हटलेः ‘माझ्या भावना व परिणाम काहीही असले तरी आपण रूग्णाच्या वैयक्तीक व धार्मिक इच्छांचा नेहमी आदर केला पाहिजे याची मला ते आठवण करून देतात.’
अनेक डॉक्टरांना “कालांतराने व अनेक रूग्णांवर उपचार केल्याने” जे उमगले त्याविषयीची जाणीव तुम्हाला आतापर्यंत झाली असेल. अगदी सर्वोत्तम हॉस्पिटलमध्ये सर्वोत्तम वैद्यकीय सेवा मिळूनही कधी ना कधी लोक मरतात. रक्त संक्रमण करुन वा त्याच्याविना ते मरतात. आपण सर्व वृद्ध होत आहोत व जीवनाचा अंत जवळ येत आहे हे आपल्याला दिसते. हे दैववादी नव्हे, तर वास्तववादी आहे. मृत्यु हे जीवनातील एक सत्य आहे.
रक्तासंबंधीच्या देवाच्या नियमाचा अनादर करणाऱ्या लोकांना अनेकदा तत्काळ वा उशीराने का होईना, नुकसान भोगावे लागते; काही तर त्या रक्तानेच मरतात. जे वाचतात त्यांना अनंत जीवन लाभलेले नसते. याचा अर्थ, रक्ताच्या संक्रमणाने जीवन कायमचे वाचत नाही.
धार्मिक आणि/वा वैद्यकीय कारणांसाठी रक्त नाकारुन पर्यायी वैद्यकीय उपचार पद्धती स्वीकारणाऱ्या बहुतेक लोकांचे बरे होते. अशा रितीने ते आपले आयुष्य अनेक वर्षे वाढवू शकतात; पण त्याचा शेवट होत नाही, असे नाही.
सर्व माणसे अपूर्ण असून हळू हळू मरत आहेत ही गोष्ट आपल्याला, पवित्र शास्त्रामध्ये रक्ताविषयी म्हटल्या गेलेल्या मध्यवर्ती सत्याकडे नेते. हे सत्य आपण समजावून घेतले व त्याविषयी रसिकता बाळगली तर रक्ताने आपले जीवन खरोखर कसे वाचू शकते व तेही सर्वकाळासाठी, ते आपल्याला दिसेल.
जीवन वाचविणारे एकमेव रक्त
आधी नमूद केल्याप्रमाणे देवाने सर्व मानवजातीला सांगितले होते की, त्यांनी रक्त खाऊ नये. का बरे? कारण रक्त जीवनाचे प्रतीक आहे. (उत्पत्ती ९:३-६) इस्राएलांना दिलेल्या नियमशास्त्रात त्याने याचे अधिक स्पष्टीकरण केले. नियमशास्त्र लागू करण्यास मंजूरी देताना बळी दिलेल्या प्राण्यांचे रक्त वेदीवर वापरले गेले. (निर्गम २४:३-८) त्या नियमशास्त्राने सर्व माणसे अपूर्ण असल्याचे आणि पवित्र शास्त्र म्हणते त्याप्रमाणे ते पापी असल्याचे सूचित केले होते. देवाने इस्राएल लोकांना सांगितले की, त्यांनी त्याला वाहिलेल्या प्राण्यांच्या अर्पणाद्वारे आपली पापे झाकण्याची गरज असल्याच्या जाणीवेचे ते प्रदर्शन करू शकत होते. (लेवीय ४:४-७, १३-१८, २२-३०) या गोष्टीची देवाने पूर्वी त्या लोकांकडून अपेक्षा केली होती व ती तो आजच्या त्याच्या खऱ्या भक्तांकडून करीत नाही, हे कबूल. पण त्या गोष्टीचा आजही आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचा अर्थ आहे.
त्या अर्पणांच्या मुळाशी असलेल्या तत्त्वाचे स्पष्टीकरण स्वतः देवाने याप्रकारे दिलेः “शरीराचे जीवन तर रक्तात असते, आणि तुमच्या जीवांबद्दल वेदीवर प्रायश्चित्त करण्यासाठी ते मी तुम्हाला दिले आहे. कारण रक्तात जीव असल्याकारणाने रक्तानेच प्रायश्चित्त होते. म्हणून मी इस्राएल लोकांना म्हटले आहे की, तुमच्यातील कोणी रक्त सेवन करू नये.”—लेवीय १७:११, १२.
प्रायश्चित्ताचा दिवस म्हटलेल्या प्राचीन काळच्या सणाच्या दिवशी प्रमुख याजक होमबलीच्या प्राण्याचे रक्त, देवाच्या उपासनेचे केंद्र असलेल्या मंदिराच्या परमपवित्र भागात नेई. तसे करणे म्हणजे लाक्षणिक रितीने लोकांच्या पापांवर पांघरुण घालण्याची विनंती देवाला करणे होते. (लेवीय १६:३-६, ११-१६) त्या अर्पणांमुळे सर्व पापे प्रत्यक्षात नाहीशी होत नव्हती. त्यामुळेच दर वर्षी पुन्हा अर्पणे द्यावी लागत असत. तरीही, रक्ताच्या या वापराने एक अर्थपूर्ण कित्ता घालून दिला.
सर्व विश्वासू लोकांच्या पापांचे पूर्ण प्रायश्चित करण्यासाठी देव एका सिद्ध अर्पणाची योजना करील हे पवित्र शास्त्रातील एक महत्त्वाचे शिक्षण आहे. त्याला खंडणी असे म्हणतात; ती भाकित करण्यात आलेल्या मसीहावर किंवा ख्रिस्तावर केंद्रित आहे.
प्रायश्चित्ताच्या दिवशी जे केले जाई त्याच्याशी मसीहाच्या भूमिकेची तुलना पवित्र शास्त्र करते. ते म्हणतेः “ख्रिस्त हा पुढे होणाऱ्या चांगल्या गोष्टींसंबंधी प्रमुख याजक होऊन आला व . . . हातांनी केलेले नाही, . . . अशा अधिक श्रेष्ठ व पूर्ण [मंदिरा]तून, आणि बकरे व वासरे ह्यांचे नव्हे, तर स्वतःचे रक्त अर्पण करून एकदाच परमपवित्र स्थानात [स्वर्गात] गेला, आणि त्याने आपणासाठी सार्वकालिक मुक्ती मिळविली. नियमशास्त्राप्रमाणे रक्ताने बहुतेक सर्व काही शुद्ध होते, आणि रक्त ओतल्यावाचून पापक्षमा होत नाही.”—इब्रीयांस ९:११, १२, २२.
अशा रितीने, रक्ताबद्दल देवाचा दृष्टीकोण आपण का ध्यानात घ्यावा हे स्पष्ट होते. सृष्टीकर्ता या नात्याने त्याच्या हक्कानुसार रक्ताचा एकमेव उपयोग त्याने ठरवला आहे. प्राण्यांचे व माणसांचे रक्त न घेतल्यामुळे प्राचीन इस्राएलांना बराच स्वास्थ्य लाभ झाला असेल, परंतु तो सर्वात महत्त्वाचा मुद्दा नव्हता. (यशया ४८:१७) आपले जीवन रक्ताने टिकवून ठेवणे त्यांनी टाळायचे होते ते मूलतः, तसे न करणे हे आरोग्याला अपायकारक होते म्हणून नव्हे तर ते देवाच्या दृष्टीने अपवित्र होते म्हणून करण्यास हवे होते. शिवाय त्यांनी रक्तापासून दूर राहायचे होते ते रक्त दूषित होते म्हणून नव्हे तर पापक्षालन मिळविण्यासाठी ते अमूल्य होते.
खंडणीबद्दल प्रेषित पौलाने असे स्पष्टीकरण दिलेः “त्याच्या [ख्रिस्त] कृपेच्या संपत्तीच्या प्रमाणाने त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली आमची सुटका, म्हणजे आमच्या अपराधांची क्षमा, आम्हाला प्राप्त झाली आहे.” (इफिसकर १:७) तेथे वापरलेल्या मूळ ग्रीक शब्दाचे योग्य भाषांतर “रक्त” आहे. परंतु पवित्र शास्त्राची अनेक भाषांतरे तेथे “मृत्यु” हा शब्द वापरुन चूक करतात. यामुळे सृष्टीकर्त्याच्या रक्ताबद्दलच्या दृष्टीकोनावर दिलेला भर तसेच त्याने त्याला जोडलेले बलिदानाचे मूल्य वाचकांच्या नजरेतून सुटण्याचा संभव आहे.
एक सिद्ध खंडणीचे अर्पण या नात्याने ख्रिस्त मरण पावला, परंतु मृत राहिला नाही या वस्तुस्थिती भोवती पवित्र शास्त्राची मध्यवर्ती कल्पना गुंफलेली आहे. देवाने घालून दिलेल्या प्रायश्चित्ताच्या दिवसाच्या कित्त्यानुसार “आपल्यासाठी देवासमोर उभे राहण्यास” येशूला स्वर्गात नेण्यात आले. तेथे त्याने आपल्या बलिदानाच्या रक्ताचे मोल अर्पण केले. (इब्रीयांस ९:२४) ज्यामुळे ‘देवाच्या पुत्राला पायाखाली तुडवले जाईल व त्याच्या रक्ताला हलके मानले जाईल’ असा कोणताही मार्ग आपण टाळला पाहिजे यावर पवित्र शास्त्र जोर देते. केवळ याच रितीने आपल्याला देवाशी चांगला व सलोख्याचा संबंध ठेवता येईल.—इब्रीयांस १०:२९; कलस्सैकर १:२०.
रक्ताने वाचविण्यात आलेल्या जीवनाचा आनंद लुटा
रक्ताविषयी देव जे म्हणतो ते समजल्यावर त्याच्या जीवनदायी मूल्यावर आपल्याला सर्वाधिक आदर वाटू लागतो. पवित्र शास्त्र ख्रिस्ताविषयीचे वर्णन देताना म्हणते की, तो ‘आपल्यावर प्रीती करणारा व आपल्या रक्ताने तुम्हाआम्हाला पापातून मुक्त करणारा’ असा आहे. (प्रकटीकरण १:५; योहान ३:१६) होय, येशूच्या रक्तामार्फत आपल्याला आपल्या पापांची संपूर्ण व चिरकालिक क्षमा मिळू शकते. प्रेषित पौलाने लिहिलेः “तर आता त्याच्या रक्ताने नीतीमान ठरविण्यात आल्यामुळे आपण विशेषेकरुन त्याच्या द्वारे देवाच्या क्रोधापासून तारले जाणार आहो.” अशा रितीने रक्ताद्वारे चिरकालिकपणे जीवन वाचणे शक्य आहे.—रोमकर ५:९; इब्रीयांस ९:१४.
यहोवा देवाने खूप पूर्वी असे आश्वासन दिले की, ख्रिस्ताद्वारे ‘पृथ्वीवरची सर्व राष्ट्रे आशीर्वादित होऊ शकतील.’ (उत्पत्ती २२:१८) त्या आशीर्वादात पृथ्वीला नंदनवनाच्या अवस्थेला पुन्हा आणण्याचा समावेश होता. तेव्हा विश्वासधारी मानवजातीला पुन्हा कधीही आजारपण, म्हातारपण व मृत्युही येणार नाही. सध्या वैद्यकीय अधिकारी आपल्याला देऊ करीत असलेल्या तात्पुरत्या मदतीपेक्षा कितीतरी उत्तम आशीर्वादांचा ते आनंद लुटतील. आपल्याला हे अद्भुत अभिवचन मिळाले आहेः “तो त्यांच्या डोळ्यांचे सर्व अश्रु पुसून टाकील; ह्यापुढे मरण नाही; शोक, रडणे व कष्ट हीही नाहीत; कारण पहिल्या गोष्टी होऊन गेल्या.”—प्रकटीकरण २१:४.
असे असता, देव जे अपेक्षितो ते आमच्या हृदयात खोलवर रुजवून घेणे हे किती सूज्ञतेचे आहे! यामध्ये रक्ताबद्दल त्याच्या नियमांचे, वैद्यकीय गरजेच्या प्रसंगीही त्याचा दुरुपयोग न करता, पालन करण्याचा समावेश होतो. यामुळे आपण काही क्षणासाठी जगणार नाही. उलटपक्षी, मानवी सिद्धतेतील अनंत जीवनाच्या भावी शक्यतेसह, जीवनाबद्दल खोलवर आदर प्रकट करीत राहू.
[२५ पानांवरील चौकट]
देवाच्या लोकांनी रक्ताने आपले जीवन टिकवून ठेवण्याला नकार दिला ते यासाठी नव्हे की, रक्त आरोग्याला अपायकारक होते, तर तसे करणे हे अपवित्र होते; तसेच ते प्रदुषित होते म्हणून नव्हे तर मोलवान होते म्हणून नकार दिला.
[२४ पानांवरील चित्रं]
“त्याच्या [येशू] कृपेच्या संपत्तीच्या प्रमाणाने त्याच्या रक्ताच्या द्वारे खंडणी भरून मिळविलेली आमची सुटका, म्हणजे आमच्या अपराधांची क्षमा, आम्हाला प्राप्त झाली आहे.”—इफिसकर १:७.
[२६ पानांवरील चित्रं]
येशूच्या रक्ताने जीवन वाचविण्यामुळे पृथ्वीवरील नंदनवनातील अनंतकालिक व आरोग्यदायी जीवनाचा मार्ग उघडा होतो