जीवन कथा
लाजाळूपणावर मात करून मिशनरी सेवा करण्यापर्यंतचा माझा प्रवास
लहानपणी मी खूप लाजाळू होते आणि मला लोकांचीही खूप भीती वाटायची. पण जसजसा वेळ गेला, तसतसं यहोवाने मला लोकांवर प्रेम करायला आणि एक मिशनरी बनायला मदत केली. सुरुवातीला, त्याने मला माझ्या वडिलांकडून मार्गदर्शन देऊन मदत केली. नंतर त्याने एका तरुण बहिणीच्या उदाहरणातून आणि शेवटी माझ्या पतीचा वापर करून मला मदत केली. माझे पती माझ्याशी खूप धीराने आणि प्रेमाने वागले. तर चला, माझा हा प्रवास कसा होता ते तुम्हाला सांगते.
१९५१ ला ऑस्ट्रियाच्या व्हिएन्नामध्ये एका कॅथोलिक कुटुंबात माझा जन्म झाला. स्वभावाने लाजाळू असल्यामुळे मी लोकांशी जास्त बोलत नव्हते, तरी प्रार्थनेत मी देवाशी मनमोकळेपणाने बोलायचे. नऊ वर्षांची असताना माझ्या वडिलांनी साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करायला सुरुवात केली आणि नंतर माझी आईसुद्धा त्यांच्यासोबत बायबल अभ्यास करू लागली.
माझी बहीण एलिझाबेथसोबत (डावीकडे)
त्यानंतर आम्ही व्हिएन्नामधल्या डब्लिंग मंडळीला जाऊ लागलो. एक कुटुंब म्हणून आम्ही बऱ्याच गोष्टी एकत्र केल्या. आम्ही बायबल वाचायचो, त्याचा अभ्यास करायचो, सभांना जायचो, तसंच संमेलनांमध्ये स्वयंसेवक म्हणून काम करायचो. लहान असताना माझ्या वडिलांनी मला यहोवावर मनापासून प्रेम करायला शिकवलं. तुम्हाला माहीत आहे? माझे वडील यहोवाला प्रार्थना करायचे, की मी आणि माझ्या बहिणीने पायनियर बनावं. पण मला तसं काही करायचं नव्हतं.
पूर्ण वेळेची सेवा सुरू करणं
१९६५ मध्ये, १४ वर्षांची असताना माझा बाप्तिस्मा झाला. पण मला प्रचारात अनोळखी लोकांशी बोलायला खूप कठीण जायचं. तसंच माझ्या वयाचे इतर जण माझ्यापेक्षा चांगले आहेत, असं मला वाटायचं. आणि त्यांनी मला त्यांच्यासारखंच समजावं असंही मला वाटायचं. म्हणून माझा बाप्तिस्मा झाल्यानंतर काही काळाने मी यहोवाची सेवा करत नसलेल्या मुलामुलींसोबत जास्त वेळ घालवू लागले. मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत असलं, तरी माझं मन मला खायचं. कारण मला माहीत होतं, की मी जे करत आहे ते बरोबर नाही. पण मला माझ्यात बदल करायची अजिबात हिंमत नव्हती. असं असलं तरी, मला एका गोष्टीमुळे खूप मदत झाली.
डोरोथीकडून (डावीकडे) मला खूप शिकायला मिळालं
आमच्या मंडळीत डोरोथी नावाची १६ वर्षांची एक मुलगी होती. ती खूप आवेशाने घरोघरचा प्रचार करायची आणि त्याचा माझ्यावर खूप जबरदस्त प्रभाव पडला. ती माझ्यापेक्षा लहान होती, पण आवेशाबद्दल सांगायचं झालं, तर तो तिच्यात खूप जास्त होता आणि माझ्यात मात्र तेवढा आवेश नव्हता. मी विचार केला, माझे आईवडील तर साक्षीदार आहेत. पण डोरोथीच्या घरातलं तर कोणीच सत्यात नाही. तिची आई आजारी असते, तरी ती नेहमी प्रचाराला येते. तिच्या या उदाहरणामुळे मला यहोवासाठी आणखी जास्त करायचं प्रोत्साहन मिळालं. त्यानंतर लगेचच डोरोथी आणि मी सहायक पायनियर सेवा करू लागलो. मग आम्ही पायनियर बनलो. डोरोथीचा आवेश बघून मलाही आवेशाने प्रचार करावासा वाटायचा. तिने मला माझा पहिला बायबल अभ्यास सुरू करायलासुद्धा मदत केली. नंतर मला घरोघरी, रस्त्यावर किंवा इतर ठिकाणी भेटणाऱ्या लोकांबरोबर बोलायला सोपं जाऊ लागलं.
मी पायनियर बनले त्या वर्षीच हेन्झ नावाचा ऑस्ट्रियाचा एक भाऊ आमच्या मंडळीत आला. तो कॅनडात त्याच्या भावाला भेटायला गेला होता, तेव्हा त्याला त्याच्या भावाकडूनच सत्य समजलं. हेन्झला व्हिएन्नामधल्या आमच्या मंडळीत खास पायनियर म्हणून पाठवण्यात आलं होतं. सुरुवातीपासूनच मला तो खूप आवडायचा. पण त्याला मिशनरी बनायचं होतं आणि माझा तसा काही विचार नव्हता. म्हणून सुरुवातीला मी माझ्या भावना त्याला कळू दिल्या नाहीत. पण नंतर मी आणि हेन्झ डेटिंग करू लागलो. मग आमचं लग्न झालं आणि आम्ही सोबत मिळून ऑस्ट्रियामध्ये पायनियर सेवा करू लागलो.
मिशनरी बनायचं ध्येय
हेन्झ मला बऱ्याचदा त्याच्या मिशनरी बनण्याच्या ध्येयाबद्दल सांगायचा. पण त्याने मला याची कधी जबरदस्ती केली नाही. उलट ते ध्येय ठेवायला मला प्रोत्साहन मिळेल असे प्रश्न तो मला विचारायचा. जसं, “आपल्याला मुलं नाहीयेत, तर आपण यहोवाची आणखी सेवा करू शकतो का?” हे खरंय, की मी लाजाळू असून पायनियर सेवा करत होते. पण मिशनरी बनणं खूप कठीण आहे असं मला वाटायचं. पण हेन्झ नेहमी याबद्दल माझ्याशी बोलायचा आणि मला मिशनरी कसं बनता येईल, यावर विचार करायला मदत करायचा. तसंच, तो मला स्वतःपेक्षा इतरांचा जास्त विचार करायचंसुद्धा प्रोत्साहन द्यायचा. त्याने माझ्यासाठी जे काही केलं, त्यामुळे मला खरंच खूप मदत झाली.
१९७४ ला ऑस्ट्रियाच्या जाल्त्सबुर्ग इथल्या युगोस्लाव्हियन भाषेच्या छोट्या मंडळीत हेन्झ टेहळणी बुरूज अभ्यास घेताना
पण हळूहळू माझ्यात मिशनरी बनायची इच्छा वाढू लागली. म्हणून आम्ही गिलियड प्रशालेसाठी अर्ज भरला. पण शाखा सेवकांनी मला आधी माझी इंग्रजी सुधारायचा सल्ला दिला. मी तीन वर्षं ही भाषा शिकण्यासाठी मेहनत घेतली आणि आश्चर्याची गोष्ट म्हणजे, आम्हाला ऑस्ट्रियाच्या जाल्त्सबुर्ग इथल्या सर्बो-क्रोएशियन भाषेच्या मंडळीत नेमणूक मिळाली. मग पुढची सात वर्षं आम्ही तिथल्या लोकांना प्रचार केला. आणि त्यांतलं एक वर्ष आम्ही विभागीय कार्यात होतो. सर्बो-क्रोएशियन भाषा खूप अवघड होती, पण तरी आमच्याकडे बरेच बायबल अभ्यास होते.
१९७९ मध्ये शाखेत पुढाकार घेणाऱ्या भावांनी आम्हाला काही काळासाठी बल्गेरियाला जायला सांगितलं. तिथे आपल्या कामावर बंदी असल्यामुळे आम्ही तिथे सुट्टीसाठी आलोय, असं आम्हाला दाखवायचं होतं. तसंच तिथे प्रचार करू नका; तर सोफिया या राजधानी शहरात राहणाऱ्या आपल्या पाच बहिणींसाठी छोट्या आकाराची आपली प्रकाशनं गुपचूपपणे घेऊन जा, असं आम्हाला सांगण्यात आलं. सुरुवातीला मला खूप भीती वाटली. पण यहोवाने मला मदत केली. सोफियामध्ये राहणाऱ्या या बहिणी खरंच खूप धाडसी होत्या. तुरुंगात जायचा धोका असूनसुद्धा त्या नेहमी आनंदी असायच्या. त्यांचं हे धाडस आणि आनंद पाहून यहोवाची संघटना मला जे काही करायला सांगते, ते अगदी मनापासून करायची मला हिंमत मिळाली.
काही काळानंतर आम्ही गिलियड प्रशालेसाठी पुन्हा अर्ज भरला. पण या वेळी आम्हाला आमंत्रण मिळालं. आम्हाला वाटलं, की आम्हाला आता अमेरिकेत इंग्रजी प्रशालेसाठी जावं लागेल. पण नोव्हेंबर १९८१ ला संघटनेने जर्मनीतही जर्मन भाषेत या प्रशालेची सुरुवात केली. त्यामुळे आम्हाला जर्मन भाषेत ही प्रशाला करता आली. ही भाषा माझ्यासाठी सोपी होती. मग त्यानंतर आम्हाला एक नवीन नेमणूक मिळाली.
युद्धग्रस्त देशात मिशनरी सेवा
आमची नवीन नेमणूक केनियामध्ये होती. पण आम्ही शेजारच्या देशात म्हणजे युगांडामध्ये जाऊन सेवा करू शकतो का, असं केनियाच्या शाखेने आम्हाला विचारलं. तिथे दहा पेक्षा जास्त वर्षांआधी इडी अमिन नावाच्या एका सैन्यधिकाऱ्याने युगांडाच्या सरकारचा ताबा घेतला होता. त्याच्या शासनकाळात हजारो लोक मेले होते आणि लाखोंना कठीण समस्यांचा सामना करावा लागला होता. त्यानंतर १९७९ मध्ये इडी अमिनच्या काही विरोधकांनी त्याला तो देश सोडून जायला भाग पाडलं आणि अशा प्रकारे त्याचं शासन संपलं. अशा देशात जायला मला भीती वाटत होती. याचं कारण तुम्ही समजूच शकता. पण गिलियडने आम्हाला यहोवावर भरवसा ठेवायला शिकवलं होतं. म्हणून आम्ही हो म्हटलं.
युगांडामधली परिस्थिती खूप खराब होती. तिथलं सरकार तिथल्या लोकांना वीज-पाणी आणि गरजेच्या इतर गोष्टी पुरवू शकत नव्हतं. तिथे फोनसुद्धा चालत नव्हते. कोणीही गोळीबार आणि लूटमार करायचं; खासकरून रात्रीच्या वेळी. म्हणून अंधार पडायला लागल्यावर सगळे आपापल्या घरीच राहायचे. घरफोडी होऊ नये किंवा जीवहानी होऊ नये अशी ते प्रार्थना करायचे. इतक्या वेगवेगळ्या समस्या असूनसुद्धा तिथले भाऊबहीण आनंदाने यहोवाची सेवा करायचे.
वाइस्वा कुटुंबाच्या घरी जेवण बनवताना
१९८२ मध्ये मी आणि हेन्झ युगांडाची राजधानी असलेल्या कंपाला शहरात आलो. पहिले पाच महिने आम्ही सॅम आणि क्रिस्टिना वाइस्वा या जोडप्याच्या घरी राहिलो. त्यांच्या घरात त्यांची पाच मुलं आणि चार नातेवाईक राहत होते. या जोडप्याकडे आणि त्यांच्या कुटुंबाकडे परिस्थितीमुळे बऱ्याचदा फक्त एक वेळचं जेवण असायचं. पण असं असूनही ते आमचा पाहुणचार करायचे, ही गोष्ट आम्हाला खूप विशेष वाटायची. त्या कुटुंबाकडून आम्हाला बरेच व्यावहारिक धडे शिकायला मिळाले आणि त्याचा आमच्या मिशनरी सेवेसाठी आम्हाला खूप फायदा झाला. जसं की, आम्ही पाणी जपून वापरायला शिकलो. ते कुटुंब थोड्याच पाण्यात अंघोळ करून ते पाणी शौचालयासाठी वापरायचं. मग १९८३ ला आम्हा दोघांना कंपालामध्ये एक घर मिळालं.
ते ठिकाण राहण्यासाठी बऱ्यापैकी सुरक्षित होतं. आम्हाला तिथे प्रचार करायला खूप मजा यायची. मला आठवतं आम्ही एका महिन्यात ४,००० पेक्षा जास्त मासिकं दिली होती. पण यापेक्षाही जबरदस्त गोष्ट म्हणजे, तिथले लोक चांगलं ऐकून घ्यायचे. त्यांची देवावर श्रद्धा होती आणि बायबलबद्दल बोलायला त्यांना आवडायचं. त्यामुळे, आमच्या दोघांकडे प्रत्येकी १० ते १५ तरी बायबल अभ्यास असायचेच. आम्ही आमच्या विद्यार्थ्यांकडून खूप गोष्टी शिकलो. जसं की, त्यांना दर आठवडी सभांना चालत यावं लागायचं, तरीही ते कधी कुरकुर करायचे नाही, उलट नेहमी हसतमुख असायचे.
१९८५ आणि १९८६ ला युगांडामध्ये दोन युद्धं झाली. आम्हाला बऱ्याचदा लहान मुलं मोठमोठ्या बंदुका घेऊन जाताना दिसायची. त्यांना सैनिक म्हणून वापरलं जायचं आणि लोकांची झडती घेण्यासाठी चौक्यांवर उभं केलं जायचं. त्या वेळी प्रचाराच्या क्षेत्रात आस्थेवाइकांना शोधायला आम्हाला बुद्धी मिळावी आणि आमचं मन शांत राहावं, म्हणून आम्ही प्रार्थना करायचो. आणि यहोवाने आमच्या प्रार्थनांची उत्तरं दिलीसुद्धा. कित्येकदा असं व्हायचं, की चांगलं ऐकून घेणारी व्यक्ती जशी भेटायची, तशी आमची भीती कुठल्या कुठे पळून जायची.
मी आणि हेन्झ तेत्यानासोबत (मधे)
दुसऱ्या देशातून आलेल्या लोकांना प्रचार करायलासुद्धा आम्हाला खूप आवडायचं. मध्य रशियातल्या मुरत आणि दिलबर नावाच्या एका जोडप्यासोबत आम्ही अभ्यास करू लागलो. मुरत डॉक्टर होता. पुढे हे जोडपं सत्यात आलं आणि ते तेव्हापासून आतापर्यंत विश्वासूपणे यहोवाची सेवा करतंय. नंतर आम्ही युक्रेनच्या, तेत्याना विलेस्का नावाच्या एका स्त्रीला भेटलो. जेव्हा आम्ही तिला भेटलो तेव्हा ती इतकी निराश होती, की ती आत्महत्या करायचा विचार करत होती. तेत्यानाच्या बाप्तिस्म्यानंतर ती परत युक्रेनला गेली आणि नंतर तिने आपल्या प्रकाशनांच्या भाषांतराचं कामसुद्धा केलं.
नवीन समस्या
१९९१ मध्ये मी आणि हेन्झ ऑस्ट्रियाला फिरायला गेलो होतो, तेव्हा तिथल्या शाखेने आम्हाला संपर्क करून हे कळवलं की आता आमची नेमणूक बल्गेरियामध्ये असेल. बऱ्याच वर्षांपासून युरोपमधल्या काही देशांमध्ये प्रचाराच्या कामावर बंदी होती, पण आता परिस्थिती बदलल्यामुळे यहोवाचे साक्षीदार त्या देशांमध्ये प्रचार करू शकत होते. बल्गेरिया या देशांपैकीच एक होतं. जसं मी आधी सांगितलं होतं, मी आणि हेन्झने बल्गेरियामध्ये आपल्या कामावर बंदी असताना तिथे आपली प्रकाशनं लपूनछपून नेली होती. पण आता आम्हाला तिथे प्रचारासाठी पाठवलं जात होतं.
ऑस्ट्रियाच्या शाखेने आम्हाला युगांडाला न जाता थेट बल्गेरियाला जायला सांगितलं. म्हणून आम्ही युगांडामधल्या आमच्या घरातलं सामान घ्यायला किंवा तिथल्या भाऊबहिणींना शेवटचं भेटायलासुद्धा गेलो नाही. उलट, आम्ही जर्मनीमधल्या बेथेलला गेलो, तिथून एक गाडी घेतली आणि थेट बल्गेरियाला गेलो. आम्हाला सोफियामधल्या जवळपास २० प्रचारक असलेल्या एका गटात नेमण्यात आलं.
बल्गेरियामध्ये आम्हाला बऱ्याच नवीन समस्यांना तोंड द्यावं लागलं. एक तर आम्हाला ती भाषा येत नव्हती आणि दुसरं म्हणजे त्या भाषेत आपली फक्त दोनच प्रकाशनं होती. एक तर, सत्य जे चिरकालिक जीवनाप्रत निरविते आणि दुसरं म्हणजे बायबल कथांचं माझं पुस्तक. आणखीन एक समस्या म्हणजे, आम्हाला बायबल अभ्यास सुरू करायला खूप अवघड जायचं. इतक्या समस्या असूनपण साक्षीदारांचा तो छोटासा गट खूप आवेशी होता आणि चांगली प्रगती करत होता. पण ही गोष्ट तिथल्या चर्चच्या लोकांच्या लक्षात आली आणि त्यानंतर खरी समस्या सुरू झाली.
१९९४ मध्ये बल्गेरियाच्या सरकारने यहोवाच्या साक्षीदारांना आता इथून पुढे धर्म म्हणून ओळखलं जाणार नाही असं सांगितलं. त्यामुळे तिथल्या बऱ्याच लोकांना आपण त्यांच्यासाठी धोकादायक आहोत असं वाटू लागलं. काही भावांना अटक करण्यात आली आणि मीडियानेसुद्धा आपल्याबद्दल बऱ्याच खोट्या गोष्टी पसरवल्या. आपण रक्त घेत नसल्यामुळे त्यांनी आपल्यावर आरोप लावला, की आपण आपल्या मुलांना मरू देतो आणि इतर साक्षीदारांनासुद्धा स्वतःचा जीव घ्यायला प्रवृत्त करतो. म्हणून मला आणि हेन्झला प्रचार करायला खूप भीती वाटायची. प्रचारात गेल्यावर लोक आमच्यावर ओरडायचे आणि पोलिसांनाही बोलवायचे. काही जण तर आम्हाला काहीही फेकून मारायचे. या सगळ्या गोष्टींमुळे त्या देशात आपली प्रकाशनं नेणं अशक्य झालं होतं. आणि आपल्या सभांसाठीसुद्धा एखादा हॉल भाड्याने घेणं खूप अवघड झालं होतं. तिथल्या पोलिसांनी आपलं एक अधिवेशनसुद्धा बंद पाडलं होतं. आम्हा दोघांना अशा वातावरणाची सवय नव्हती. कारण युगांडामधले लोक खूप चांगलं ऐकून घ्यायचे. पण तरीही आम्हाला इथे आनंदी राहायला मदत झाली.
तिथल्या भाऊबहिणींसोबत वेळ घालवल्यामुळे आम्हाला खूप मदत झाली. त्यांना सत्य कळल्यामुळे ते खूप खूश होते आणि आमच्या मदतीची त्यांना खूप कदर होती. आम्ही सगळे एकमेकांचा विचार करायचो, प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावून जायचो. मी आणि हेन्झ या अनुभवांतून हेच शिकलो की जर आपण स्वतःच्या समस्यांऐवजी इतरांचा विचार केला, तर आपण कोणत्याही नेमणुकीत खूश राहू शकतो.
२००७ साली बल्गेरिया शाखेत
पण काही वर्षांनी तिथली परिस्थिती सुधारू लागली. १९९८ मध्ये सरकारने यहोवाच्या साक्षीदारांना पुन्हा एकदा एक धर्म म्हणून मान्यता दिली आणि बल्गेरियन भाषेतही आपली बरीच प्रकाशनं येऊ लागली. मग २००४ मध्ये नवीन शाखेचं समर्पण झालं. आज बल्गेरियामध्ये ५७ मंडळ्या आहेत आणि त्यात २,९५३ प्रचारक आहेत. मागच्या सेवा वर्षात एकूण ६,४७५ लोक स्मारकविधीला हजर राहिले होते. एके काळी सोफियामध्ये फक्त पाच बहिणी होत्या. पण आता तिथे नऊ मंडळ्या झाल्या आहेत! बायबलमध्ये म्हटलंय, की “जो सगळ्यात लहान, तो हजार होईल.” हे शब्द खरे होताना आम्ही पाहिलेत.—यश. ६०:२२.
आरोग्याच्या समस्यांना तोंड देणं
मला आरोग्याच्या बऱ्याच समस्यांचा सामना करावा लागलाय. मला खूपदा ट्यूमर झालाय आणि एक तर माझ्या मेंदूत होता. त्यासाठी मला एक त्रासदायक उपचार घ्यावा लागला. तसंच, मला भारतात जाऊन १२ तासांचं ऑपरेशन करावं लागलं. त्यामुळे ट्यूमरची गाठ बऱ्यापैकी निघाली. ऑपरेशननंतर मला बरं वाटेपर्यंत, आम्ही काही काळ भारतातल्या बेथलमध्ये थांबलो. मग आम्ही बल्गेरियामध्ये आमच्या नेमणुकीला परतलो.
या दरम्यान हेन्झला एक वेगळाच आनुवंशिक आजार झाला. त्यामुळे त्याला चालता-फिरता यायचं नाही. तसंच त्याचा त्याच्या हालचालींवरही ताबा नसायचा. हा आजार जसजसा वाढू लागला तसतसं हेन्झ माझ्यावर जास्त अवलंबून राहू लागला. कधीकधी माझ्यासाठी हे सगळं खूप जास्त व्हायचं आणि पुढे कसं होईल याची मला चिंता वाटायची. पण बॉबी नावाचा एक तरुण भाऊ नेहमी हेन्झला प्रचारासाठी घेऊन जायचा. कधीकधी हेन्झला प्रचारात बोलता यायचं नाही किंवा त्याचा त्याच्या हालचालींवर ताबा राहायचा नाही. पण बॉबीला या सगळ्याची लाज वाटायची नाही. तसंच मला जेव्हा हेन्झला मदत करायला जमायचं नाही, तेव्हा बॉबी नेहमी आमच्या मदतीला असायचा. या जगात मी आणि हेन्झने मुलं न होऊ द्यायचा निर्णय घेतला असला, तरी बॉबी आम्हाला आमच्या मुलासारखाच होता. आणि खरंच ही यहोवाकडून एक भेटच होती!—मार्क १०: २९, ३०.
हेन्झला कॅन्सरसुद्धा झाला होता आणि २०१५ मध्ये त्याचा मृत्यू झाला. मला माझ्या नवऱ्याची खूप आठवण येते. मी जेव्हा चिंतेत असायचे तेव्हा तोच माझ्या पाठीशी उभा असायचा. तो आता माझ्यासोबत नाही यावर विश्वास ठेवणं मला खूप कठीण गेलं. पण माझ्या आठवणीत तो अजूनही जिवंत आहे! (लूक २०:३८) त्याच्या प्रेमळ शब्दांची, त्याच्या चांगल्या सल्ल्याची मला दिवसभरात बऱ्याचदा आठवण होते. आम्हाला बरीच वर्षं एकत्र मिळून यहोवाची विश्वासूपणे सेवा करता आली, यासाठी मी यहोवाचे खरंच खूप आभार मानते.
यहोवाच्या मदतीसाठी आभारी
माझ्या सर्व परीक्षांमध्ये यहोवाने मला टिकून राहायला मदत केली आहे, हे मी खातरीने म्हणू शकते. तसंच त्याने मला माझ्या लाजाळू स्वभावावर मात करायला आणि लोकांवर प्रेम करणारी मिशनरी बनायला मदत केली आहे. (२ तीम. १:७) मी खरंच यहोवाचे खूप आभार मानते, कारण त्याच्या मदतीमुळेच मी आणि माझी लहान बहीण आम्ही दोघीही पूर्ण वेळेच्या सेवेत आहोत. आज माझी बहीण आणि तिचा पती युरोपमधल्या सर्बियाच्या विभागात सेवा करत आहेत. आमच्या लहानपणी माझ्या वडिलांनी केलेली प्रार्थना पूर्ण झाली आहे.
बायबलच्या अभ्यासामुळे मला मनाची शांती मिळते. तसंच मी शिकले, की मी कठीण काळात येशूप्रमाणेच “कळकळीने प्रार्थना” केली पाहिजे. (लूक २२:४४) सोफियामधल्या नादेजदा मंडळीचे भाऊबहीण माझ्यावर खूप प्रेम करतात. हे माझ्या प्रार्थनांचंच उत्तर आहे. हे भाऊबहीण मला त्यांच्यासोबत वेळ घालवायला बोलवतात. तसंच, त्यांचं माझ्यावर किती प्रेम आहे, हे ते मला बऱ्याचदा सांगतात. हे सगळं पाहून मला खूप आनंद होतो.
मी बऱ्याचदा पुनरुत्थानाच्या आशेवर मनन करते. मी कल्पना करते की माझे आईवडील आमच्या घरासमोर उभे आहेत. त्यांच्या लग्नाच्या दिवशी ते जितके सुंदर दिसत होते, तितकेच सुंदर ते दिसत आहेत. माझी बहीण जेवण बनवत आहे. हेन्झ त्याच्या घोड्याच्या बाजूला उभा आहे. अशा प्रकारे कल्पना केल्यामुळे माझ्या मनातले नकारात्मक विचार कुठल्या कुठे पळून जातात आणि माझं मन यहोवासाठी कृतज्ञतेने भरून जातं.
मागे वळून पाहताना आणि भविष्याचा विचार करताना मला स्तोत्र २७:१३, १४ मध्ये दावीदने जे म्हटलं तसंच वाटतं. त्याने म्हटलं: “मी जिवंतांच्या देशात यहोवाचा चांगुलपणा पाहीन, असा विश्वास मला नसता, तर आज मी कुठे असतो? यहोवावर आशा ठेव; धैर्यवान हो आणि आपलं मन खंबीर कर. हो, यहोवावर आशा ठेव.”