वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 ऑगस्ट पृ. २०-२५
  • तुम्ही चुकीच्या इच्छांविरुद्धची लढाई जिंकू शकता!

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • तुम्ही चुकीच्या इच्छांविरुद्धची लढाई जिंकू शकता!
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • आपण काय विचार करावा असं सैतानाला वाटतं?
  • आपण पापी असल्यामुळे आपल्याला कसं वाटू शकतं?
  • आपण ही लढाई कशी जिंकू शकतो?
  • स्वतःची “पारख करत राहा”
  • मोहात पडू नये म्हणून सावध राहा
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • बाप्तिस्म्यानंतरही येशूच्या ‘मागे चालत राहा’
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • पापी माणसांना सोडवायला यहोवाने काय केलंय?
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२४
  • कसा कराल मोहाचा सामना?
    सावध राहा!—२०१५
अधिक माहिती पाहा
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 ऑगस्ट पृ. २०-२५

अभ्यास लेख ३५

गीत १२१ आत्मसंयम ठेऊ या

तुम्ही चुकीच्या इच्छांविरुद्धची लढाई जिंकू शकता!

“मरणाच्या अधीन असलेल्या तुमच्या शरीरात पापाला राजा म्हणून राज्य करू देऊ नका. आणि आपल्या शरीराच्या वासनांच्या आहारी जाऊ नका.”—रोम. ६:१२.

या लेखात:

आपल्या मनात जेव्हा चुकीच्या इच्छा येतात तेव्हा निराश न व्हायला आपल्याला कशामुळे मदत होईल आणि चुकीच्या इच्छांना बळी न पडायला आपण काय करू शकतो, ते पाहू या.

१. आपल्या सगळ्यांनाच कोणत्या गोष्टीशी झगडावं लागतं?

यहोवाला आवडत नाही अशी एखादी गोष्ट करायची तुम्हाला कधी तीव्र इच्छा झाली आहे का? जर असं असेल, तर निराश होऊ नका. कारण बायबल म्हणतं, की “माणसांवर सहसा येते त्यापेक्षा वेगळी परीक्षा तुमच्यावर आली नाही.” (१ करिंथ. १०:१३) याचा अर्थ, तुम्ही ज्या चुकीच्या इच्छांशी झगडत आहात त्या इच्छांशी इतरांनासुद्धा झगडावं लागतंय. त्यामुळे तुम्ही एकटे नाही. यहोवाच्या मदतीने तुम्ही ही लढाई नक्कीच जिंकू शकता!

२. काही भाऊबहिणींना आणि बायबल विद्यार्थ्यांना कोणत्या मोहांचा सामना करावा लागू शकतो? (चित्रंसुद्धा पाहा.)

२ बायबल असंसुद्धा म्हणतं, की “प्रत्येक जण स्वतःच्याच इच्छेमुळे ओढला जाऊन भुलवला जातो तेव्हा परीक्षेत पडतो.” (याको. १:१४) या वचनावरून कळतं, की प्रत्येक जण वेगवेगळ्या इच्छांनी भुलवला जातो. उदाहरणार्थ, काही ख्रिश्‍चनांना विरुद्धलिंगी व्यक्‍तीसोबत अनैतिक गोष्टी करायचा मोह होऊ शकतो. तर काहींना समान लिंगी व्यक्‍तीसोबत तसं करावंसं वाटू शकतं. ज्यांना आधी पोर्नोग्राफी म्हणजे, अश्‍लील चित्रं किंवा व्हिडिओ बघायची सवय होती, त्यांना पुन्हा त्या गोष्टी बघाव्याशा वाटू शकतात. तसंच, ज्यांना आधी ड्रग्सचं किंवा दारूचं व्यसन होतं, त्यांना पुन्हा एकदा त्या गोष्टी करायचा मोह होऊ शकतो. या आणि यांसारख्या इतर बऱ्‍याच गोष्टींचा काही भाऊबहिणींना आणि बायबल विद्यार्थ्यांना मोह होऊ शकतो. त्यामुळे आपल्यापैकी प्रत्येकाला कधी न्‌ कधी प्रेषित पौलसारखं वाटलं असेल. त्याने म्हटलं: “योग्य ते करायची माझी इच्छा असते, तेव्हा मला स्वतःमध्ये वाईटच दिसतं.”—रोम. ७:२१.

मोह कधीही आणि कुठेही अचानक येऊ शकतो (परिच्छेद २ पाहा)c


३. जेव्हा एका व्यक्‍तीला सतत एखाद्या चुकीच्या इच्छेविरुद्ध लढावं लागतं तेव्हा तिला कसं वाटू शकतं?

३ जेव्हा तुम्हाला सतत एखाद्या चुकीच्या इच्छेविरुद्ध लढावं लागतं, तेव्हा तुम्हाला दुर्बळ असल्यासारखं वाटू शकतं; जणू काय योग्य ते करण्यासाठी आपल्यात ताकदच नाही असं वाटू शकतं. तसंच, कदाचित तुम्हाला आशाहीन असल्यासारखंसुद्धा वाटू शकतं; जणू काय फक्‍त चुकीची इच्छा मनात आल्यामुळे यहोवा देव तुम्हाला नवीन जगात जाऊ देणार नाही असं वाटू शकतं. पण याची खातरी ठेवा, की यापैकी काहीही खरं नाही. असं आपण का म्हणू शकतो? याचं कारण जाणून घ्यायला आपण या लेखामध्ये दोन प्रश्‍नांवर चर्चा करणार आहोत: (१) आपल्याला दुर्बळ असल्यासारखं आणि आशाहीन असल्यासारखं का वाटू शकतं? (२) चुकीच्या इच्छांविरुद्धचा लढा आपण कसा जिंकू शकतो?

आपण काय विचार करावा असं सैतानाला वाटतं?

४. (क) आपल्याला दुर्बळ असल्यासारखं वाटावं असं सैतानाला का वाटतं? (ख) आपण मोहांचा प्रतिकार करू शकतो याची खातरी आपल्याला कशावरून मिळते?

४ आपल्यावर मोह येतो तेव्हा आपल्याला दुर्बळ असल्यासारखं वाटावं अशी सैतानाची इच्छा आहे. येशूने जेव्हा त्याच्या शिष्यांना प्रार्थना करायला शिकवलं होतं, तेव्हा त्यानेसुद्धा हीच गोष्ट स्पष्ट केली. त्याने म्हटलं: “आम्हाला मोहात पडू देऊ नकोस, तर त्या दुष्टापासून वाचव.” (मत्त. ६:१३) सैतानाचं असं म्हणणं आहे, की माणसांवर चुकीच्या गोष्टी करायचा मोह आल्यावर ते यहोवाच्या आज्ञेत राहणार नाहीत. (ईयो. २:४, ५) पण खरंतर, सैतान स्वतःच त्याच्या इच्छेने भुलवला गेला आणि यहोवाच्या विरोधात गेला. त्यामुळे त्याला असं वाटतं, की आपणसुद्धा त्याच्यासारखेच वागू आणि मोह आल्यावर यहोवाला सहज सोडून देऊ. सैतानाला तर असंही वाटलं होतं, की देवाचा मुलगासुद्धा मोहाला बळी पडेल. (मत्त. ४:८, ९) पण विचार करा, आपण खरंच इतके दुर्बळ आहोत का, की आपण मोहांचा प्रतिकार करू शकणार नाही? मुळीच नाही! कारण यहोवा आपल्याला वाईट इच्छांशी लढायला मदत करेल. प्रेषित पौलने याबद्दल म्हटलं: “जो मला सामर्थ्य देतो त्याच्याद्वारे सगळ्या गोष्टी करण्याची मला शक्‍ती मिळते.”—फिलिप्पै. ४:१३.

५. आपण चुकीच्या इच्छांविरुद्ध लढू शकतो, अशी यहोवाला खातरी आहे हे कशावरून म्हणता येईल?

५ सैतानाच्या अगदी उलट, यहोवाला याची पूर्ण खातरी आहे, की आपण चुकीच्या इच्छांविरुद्ध लढू शकतो. असं आपल्याला कशावरून म्हणता येईल? यहोवाने अशी भविष्यवाणी केली आहे, की विश्‍वासू लोकांचा एक मोठा लोकसमुदाय मोठ्या संकटातून बाहेर पडेल. याचा काय अर्थ होतो याचा विचार करा. कधीही खोटं न बोलणारा यहोवा देव असं म्हणतो, की थोडेथोडके नाही, तर एक मोठा लोकसमुदाय शुद्ध विवेकाने नवीन जगात प्रवेश करेल. आणि त्या लोकांनी “आपले झगे कोकऱ्‍याच्या रक्‍तात धुऊन शुभ्र” केलेले असतील. (प्रकटी. ७:९, १३, १४) तर हे स्पष्टच आहे, की आपण दुर्बळ आहोत आणि आपल्याला आपल्या चुकीच्या इच्छांविरुद्ध लढता येणार नाही, असं यहोवाला अजिबात वाटत नाही.

६-७. आपल्याला आशाहीन वाटावं असं सैतानाला का वाटतं?

६ आपल्याला आशाहीन वाटावं, असंसुद्धा सैतानाला वाटतं. त्याला वाटतं की फक्‍त चुकीच्या इच्छा मनात आल्यामुळे, यहोवा आपल्याला नवीन जगात जाऊ देणार नाही असा आपण विचार करावा. पण खरंतर सैतानच आशाहीन आहे. कारण यहोवाने त्याचा न्याय केलाय आणि तो त्याचा लवकरच नाश करणार आहे. (उत्प. ३:१५; प्रकटी. २०:१०) सैतानाला भविष्याची कोणतीच आशा नाही. पण आपल्याला कायम जीवनाची आशा असल्यामुळे सैतानाचा जळफळाट होतो. म्हणूनच आपल्याला आशाहीन असल्यासारखं वाटावं असं त्याला वाटतं. पण आपण आशाहीन मुळीच नाही. उलट, बायबल आपल्याला खातरी देतं, की आपल्याला नवीन जगात जायला मदत करायची यहोवाची इच्छा आहे. कारण “कोणाचाही नाश व्हावा अशी त्याची इच्छा नाही, तर सगळ्यांनी पश्‍चात्ताप करावा असं त्याला वाटतं.”—२ पेत्र ३:९.

७ तर मग स्पष्टच आहे, चुकीच्या इच्छांविरुद्धच्या लढाईत आपण दुर्बळ आहोत किंवा आशाहीन आहोत असा आपण विचार केला तर सैतानाचा हेतू साध्य होईल. आणि सैतानाला हेच तर हवंय! ही गोष्ट समजून घेतल्यामुळे सैतानाविरुद्ध ठाम उभं राहायला आपल्याला मदत होईल.—१ पेत्र ५:८, ९.

आपण पापी असल्यामुळे आपल्याला कसं वाटू शकतं?

८. पाप म्हणजे काय? (स्तोत्र ५१:५) (“शब्दाचा अर्थ” पाहा.)

८ आणखी एका गोष्टीमुळे आपल्याला दुर्बळ आणि आशाहीन असल्यासारखं वाटू शकतं. ती गोष्ट कोणती आहे? आदाम आणि हव्वा यांच्यामुळे आपल्यात आलेलं पाप.a—ईयो. १४:४; स्तोत्र ५१:५ वाचा.

९-१०. (क) आदाम आणि हव्वाने पाप केल्यामुळे त्यांना कसं वाटलं? (चित्रसुद्धा पाहा.) (ख) आपल्या पापी अवस्थेमुळे आपल्याला कसं वाटतं?

९ आदाम आणि हव्वाने पाप केल्यावर त्यांना कसं वाटलं याचा विचार करा. यहोवाच्या आज्ञा मोडल्यावर ते लपले आणि त्यांनी त्यांचं शरीर झाकण्याचा प्रयत्न केला. याबद्दल इन्साइट पुस्तकात असं म्हटलंय: “पापामुळे त्यांना दोषी असल्यासारखं वाटलं, त्यांना चिंता वाटली, भीती वाटली आणि लाजसुद्धा वाटली.” या चार भावना जणू काय एका घरातल्या चार खोल्यांसारख्या होत्या आणि आदाम-हव्वा त्या घरात बंदिस्त होते. ते एका खोलीतून दुसऱ्‍या खोलीत जाऊ शकत होते. पण ते त्या घराच्या बाहेर पडू शकत नव्हते. म्हणजेच ते त्यांच्या पापापासून पळ काढू शकत नव्हते.

१० हे खरं आहे, की आपली परिस्थिती आदाम आणि हव्वासारखी नाही. कारण खंडणीच्या तरतुदीचा त्यांना फायदा होणार नाही. पण, आपल्याला मात्र खंडणीमुळे पापांची क्षमा मिळू शकते आणि आपण यहोवासोबत एक जवळचं नातं जोडू शकतो. (१ करिंथ. ६:११) असं असलं तरी, वारशाने मिळालेलं पाप आपल्यात आहेच. त्यामुळे आपल्या हातून चूक घडते, तेव्हा आपल्यालासुद्धा दोषी असल्यासारखं वाटतं, चिंता वाटते, भीती वाटते आणि लाजसुद्धा वाटते. खरंतर बायबल असं म्हणतं, की माणसांवर पापाचं राज्य आहे आणि ज्यांनी “आदामसारखं पाप केलं नव्हतं,” त्यांच्यावरसुद्धा पाप राज्य करतं. (रोम. ५:१४) या गोष्टींमुळे आपण कदाचित निराश होऊ. पण आपल्याला दुर्बळ आणि आशाहीन असल्यासारखं वाटून घ्यायची काहीच गरज नाही. कारण, आपण चुकीच्या विचारांना धुडकावून लावू शकतो. ते कसं?

आदाम आणि हव्वा शर्मेने एदेन बाग सोडत आहेत आणि त्यांनी प्राण्यांच्या चामड्याचे कपडे घातलेत.

पाप केल्यामुळे आदाम आणि हव्वाला दोषी वाटलं, चिंता वाटली, भीती वाटली आणि लाज वाटली (परिच्छेद ९ पाहा)


११. आपल्याला जेव्हा दुर्बळ असल्यासारखं वाटतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे आणि का? (रोमकर ६:१२)

११ जेव्हा आपल्याला दुर्बळ असल्यासारखं वाटतं आणि आपण चुकीच्या इच्छांविरुद्धच्या आपल्या लढाईत विजयी होऊ शकत नाही असं वाटतं, तेव्हा जणू काय आपल्यातली पापी स्थितीच आपल्याला हे सांगत असते. पण आपण तिचं मुळीच ऐकू नये. आपण असं का केलं पाहिजे? कारण बायबल आपल्याला सांगतं, की आपण पापाला आपल्यावर “राजा म्हणून राज्य” करू देऊ नये. (रोमकर ६:१२ वाचा.) याचा अर्थ, आपण चुकीच्या इच्छांनुसार काम न करायचं निवडू शकतो. (गलती. ५:१६) यहोवाला पूर्ण खातरी आहे की आपण मोहांचा प्रतिकार करू शकतो. जर त्याला अशी खातरी नसती तर त्याने आपल्याकडून तशी अपेक्षाच केली नसती. (अनु. ३०:११-१४; रोम. ६:६; १ थेस्सलनी. ४:३) तर स्पष्टच आहे, चुकीच्या इच्छांविरुद्धच्या आपल्या लढाईत आपण दुर्बळ नाही.

१२. आपल्याला जेव्हा आशाहीन असल्यासारखं वाटतं तेव्हा आपण काय केलं पाहिजे आणि का?

१२ त्याच प्रकारे जेव्हा आपल्याला आशाहीन असल्यासारखं वाटतं आणि आपल्या मनात फक्‍त चुकीच्या इच्छा आल्यामुळे यहोवा आपल्याला नवीन जगात जाऊ देणार नाही असं वाटतं, तेव्हा जणू काय आपल्यातली पापी स्थितीच आपल्याला हे सांगत असते. पण आपण तिचं मुळीच ऐकू नये. आपण असं का केलं पाहिजे? कारण बायबल आपल्याला सांगतं की यहोवा आपली पापी स्थिती समजू शकतो. (स्तो. १०३:१३, १४) त्याला आपल्याबद्दल “सर्वकाही माहीत आहे.” त्याला हेसुद्धा माहीत आहे, की आपल्याला वारशाने मिळालेल्या पापाचा आपल्यापैकी प्रत्येकावर वेगवेगळ्या पद्धतीने प्रभाव होतो. (१ योहा. ३:१९, २०) त्यामुळे जोपर्यंत आपण आपल्या चुकीच्या इच्छांना खतपाणी घालून पापी स्थितीला बळी पडत नाही, तोपर्यंत यहोवा आपल्याला नीतिमान समजेल. पण आपण हे इतक्या खातरीने का म्हणू शकतो?

१३-१४. आपल्या मनात फक्‍त चुकीच्या इच्छा आल्या तर याचा अर्थ असा होतो का, की आपण यहोवाला दुखावतोय? समजावून सांगा.

१३ बायबल आपल्याला सांगतं, की चुकीच्या इच्छा मनात येणं आणि त्या इच्छेनुसार काम करणं या दोन गोष्टींमध्ये खूप मोठा फरक आहे. चुकीच्या इच्छा मनात येऊ न देणं नेहमीच आपल्या हातात नसतं. पण त्यानुसार काम करायचं की नाही हे ठरवणं आपल्या हातात असतं. उदाहरणार्थ, पहिल्या शतकातल्या करिंथ मंडळीतले काही ख्रिस्ती आधी समलैंगिक होते. पौलने त्यांच्याबद्दल असं म्हटलं: “तुमच्यापैकी काही जण पूर्वी असे होते.” मग याचा अर्थ असा होतो का, की त्यांच्या मनात त्या चुकीच्या इच्छा पुन्हा कधीच आल्या नाहीत? असं आपण म्हणू शकत नाही. कारण यांसारख्या इच्छा मनात खोलवर रुजलेल्या असतात. पण ज्या ख्रिश्‍चनांमध्ये आत्मसंयमाचा गुण होता आणि ज्यांनी त्या इच्छांनुसार काम केलं नाही त्यांना यहोवाने स्वीकारलं. त्याने त्यांना “धुऊन शुद्ध” केलेले असं समजलं. (१ करिंथ. ६:९-११) आपल्या बाबतीतही असंच होऊ शकतं.

१४ तुम्ही कोणत्याही चुकीच्या इच्छेविरुद्ध लढत असला, तरी तुम्ही त्यावर यशस्वीपणे मात करू शकता. तुम्हाला जरी ती इच्छा तुमच्या मनातून पूर्णपणे काढून टाकता आली नाही, तरी तुम्ही आत्मसंयमाचा गुण वाढवू शकता. तसंच, तुम्ही ‘आपल्या शरीराच्या इच्छा पूर्ण करण्यापासून आणि आपल्या विचारांप्रमाणे वागण्यापासून’ दूर राहू शकता. (इफिस. २:३) मग तुम्ही चुकीच्या इच्छांविरुद्धचा हा लढा कसा जिंकू शकता?

आपण ही लढाई कशी जिंकू शकतो?

१५. तुम्हाला जर चुकीच्या इच्छांविरुद्धच्या लढाईत विजयी व्हायचं असेल, तर तुम्ही काय केलं पाहिजे आणि का?

१५ चुकीच्या इच्छांविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी तुम्हाला तुमच्या कमतरता प्रामाणिकपणे मान्य करणं गरजेचं आहे. म्हणून “खोट्या तर्काने” स्वतःला फसवण्यापासून सावध राहा. (याको. १:२२) उदाहरणार्थ, ज्या व्यक्‍तीला जास्त दारू प्यायची सवय आहे, ती कदाचित असा तर्क करेल: ‘इतर जण तर माझ्यापेक्षा जास्त पितात.’ किंवा ज्या व्यक्‍तीला पोर्नोग्राफी पाहायची सवय असते ती कदाचित दुसऱ्‍यांवर दोष लावून असं म्हणेल: ‘माझी बायको जर माझ्यावर प्रेम करत असती, तर मी असं केलंच नसतं.’ अशा प्रकारचा तर्क केल्यामुळे तुम्ही सहज मोहांना बळी पडू शकता. म्हणून तुमच्या चुकीच्या कामांना योग्य ठरवण्याचा प्रयत्न करू नका; अगदी तुमच्या विचारांतही. लक्षात ठेवा, तुमच्या कामांसाठी दुसरे नाही तर तुम्ही स्वतः जबाबदार असता.—गलती. ६:७.

१६. तुम्ही योग्य ते करायचा तुमचा निश्‍चय कसा पक्का करू शकता?

१६ स्वतःशी प्रामाणिक असण्यासोबतच, चुकीच्या इच्छांविरुद्ध लढण्याचा निश्‍चय पक्का करणंही गरजेचं आहे. (१ करिंथ. ९:२६, २७; १ थेस्सलनी. ४:४; १ पेत्र १:१५, १६) तुम्हाला कोणत्या गोष्टीचा सगळ्यात जास्त मोह होतो आणि तो कधी होतो, याचा विचार करा. कदाचित तुम्हाला एखादा विशिष्ट प्रकारचा मोह होत असेल किंवा दिवसाच्या एखाद्या विशिष्ट वेळी तुम्हाला ती गोष्ट करायची तीव्र इच्छा होत असेल. उदाहरणार्थ, जेव्हा तुम्ही थकलेले असता किंवा रात्री खूप उशीर झालेला असतो, तेव्हा तुम्हाला एखादी गोष्ट करायचा खूप मोह होतो का? मोह येण्याआधीच ठरवा की तुम्ही मोह आल्यावर काय कराल. यामुळे तुम्हाला मोहांचा चांगल्या प्रकारे प्रतिकार करता येईल.—नीति. २२:३.

१७. योसेफच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो? (उत्पत्ती ३९:७-९) (चित्रंसुद्धा पाहा.)

१७ मोहांचा प्रतिकार करण्याच्या बाबतीत योसेफचं आपल्यासमोर खूप चांगलं उदाहरण आहे. जेव्हा पोटीफरच्या बायकोने त्याला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्याने लगेच नकार दिला. (उत्पत्ती ३९:७-९ वाचा.) यावरून आपल्याला काय समजतं? पोटीफरच्या बायकोने योसेफला मोहात पाडण्याआधीच त्याने योग्य ते करायचा निश्‍चय पक्का केला होता. त्याच प्रकारे मोहात पडण्यासारखी परिस्थिती आपल्यावर येण्याआधीच आपण योग्य ते करायचा आपला निश्‍चय पक्का करू शकतो. यामुळे मोह आल्यावर आपल्याला योग्य ते करायला सोपं जाईल.

कोलाज: १. योसेफ पोटीफरच्या बायकोपासून पळतोय आणि तिच्या हातात त्याच्या अंगावरचं कापड आहे. २. एका भावाच्या शाळेतली मुलगी त्याला इशारे करत आहे, पण तो भाऊ तिला नकार देतो.

योसेफप्रमाणे लगेच मोहाचा प्रतिकार करा! (परिच्छेद १७ पाहा)


स्वतःची “पारख करत राहा”

१८. वाईट इच्छांविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी तुम्ही काय करू शकता? (२ करिंथकर १३:५)

१८ वाईट इच्छांविरुद्धची लढाई जिंकण्यासाठी, तुम्हाला स्वतःची ‘पारख करत राहणं’ गरजेचंय. म्हणजेच, वेळोवेळी स्वतःला तपासत राहणं गरजेचंय. (२ करिंथकर १३:५ वाचा.) यासाठी तुम्ही कशा प्रकारे विचार करता आणि कसं वागता, हे तुम्हाला वारंवार तपासून पाहावं लागेल. तसंच, जिथे सुधारणा करायची गरज आहे तिथे तुम्हाला सुधारणा करावी लागेल. उदाहरणार्थ, तुम्ही यशस्वीपणे मोहाचा सामना केला असला, तरी स्वतःला विचारा: ‘या मोहाचा प्रतिकार करायला मला किती वेळ लागला?’ जर तुमच्या लक्षात आलं की तुम्हाला बराच वेळ लागलाय, तर स्वतःला दोष देऊ नका. याउलट, पुढच्या वेळी तुम्हाला आणखी चांगल्या प्रकारे मोहाचा सामना कसा करता येईल याचा विचार करा. तसंच, स्वतःला विचारा: ‘जेव्हा माझ्या मनात चुकीचे विचार येतात, तेव्हा मी ते लवकरात लवकर मनातून काढून टाकतो का? मी ज्या प्रकारचं मनोरंजन करतो, त्यामुळे मला मोहाचा सामना करायला जास्त कठीण जातं का? जेव्हा अनैतिक दृश्‍यं माझ्या डोळ्यांसमोर येतात, तेव्हा मी लगेच माझी नजर त्यांपासून वळवतो का? यहोवाचे स्तर पाळण्यासाठी मला आत्मसंयमाचा गुण वाढवावा लागला आणि त्यासाठी मेहनत घ्यावी लागली, तरी ते माझ्या फायद्याचंच आहे हे मला समजलंय का?’—स्तो. १०१:३.

१९. छोटेछोटे चुकीचे निर्णय घेतल्यामुळे आपल्याला वाईट इच्छांशी लढणं कठीण का जाऊ शकतं?

१९ स्वतःची पारख करत असताना, वाईट कामं करण्यासाठी कारणं शोधू नका. बायबल म्हणतं: “हृदय सगळ्यात जास्त धोका देणारं आहे आणि ते उतावळं आहे.” (यिर्म. १७:९) येशूने म्हटलं की त्यातून “दुष्ट विचार निघतात.” (मत्त. १५:१९) उदाहरणार्थ, ज्या व्यक्‍तीने पोर्नोग्राफी पाहायचं सोडून दिलंय ती कदाचित काही काळाने असा विचार करेल, की अनैतिक इच्छा वाढवणारे फोटो पाहण्यात काही हरकत नाही, कारण त्यात लोकांना नग्न दाखवलेलं नसतं. किंवा ती कदाचित असा विचार करेल, की ‘जोपर्यंत मी एखादं वाईट काम करत नाही, तोपर्यंत त्याबद्दल विचार करत राहणं चुकीचं नाही.’ असं करून त्या व्यक्‍तीचं हृदय एका अर्थाने “शरीराच्या वासना पूर्ण करायच्या योजना” करत असतं. (रोम. १३:१४) मग तुम्ही या गोष्टी करायचं कसं टाळू शकता? लक्षात ठेवा, छोटेछोटे चुकीचे निर्णय घेतल्यामुळे तुमच्या हातून एक मोठी चूक होऊ शकते. त्यामुळे सावध राहा.b तसंच वाईट कामं करण्यासाठी कारणं शोधू नका. याउलट, अशा ‘दुष्ट विचारांना’ लगेच मनातून काढून टाका.

२०. आपल्याला भविष्यात कोणती आशा आहे आणि आज आपल्याला कोणती मदत उपलब्ध आहे?

२० आपण शिकलो की मोहांचा प्रतिकार करण्यासाठी यहोवा आपल्याला ताकद देतो. तसंच, त्याच्या दयेमुळे आपल्याला नवीन जगात कायम जीवनाची आशा आहे. खरंच, नवीन जगात आपण शुद्ध मनाने यहोवाची सेवा करू शकतो. यामुळे आपल्याला किती आनंद होईल याचा विचार करा! तोपर्यंत चुकीच्या इच्छांविरुद्धच्या लढाईत आपण दुर्बळ किंवा आशाहीन नाही, याची आपण खातरी बाळगू शकतो. यहोवाच्या आशीर्वादाने आणि आपल्या मेहनतीने आपण ही लढाई नक्कीच जिंकू शकतो!

तुमचं उत्तर काय असेल?

  • दुर्बलतेच्या आणि आशाहीनतेच्या भावनांशी लढण्यासाठी आपल्याला कोणत्या गोष्टीमुळे मदत होऊ शकते?

  • पापाने आपल्यावर “राजा म्हणून राज्य” करू नये म्हणून आपण काय करू शकतो?

  • आपण स्वतःची ‘पारख कशी करत राहू’ शकतो?

गीत १२२ निर्भय व निश्‍चयी राहा!

a शब्दाचा अर्थ: बायबलमध्ये “पाप” हा शब्द सहसा एखाद्या चुकीच्या कामाला सूचित करण्यासाठी वापरण्यात आलाय. जसं की चोरी करणं, व्यभिचार करणं किंवा खून करणं. (निर्ग. २०:१३-१५; १ करिंथ. ६:१८) पण काही वचनांमध्ये “पाप” हा शब्द आपल्या पापी स्थितीला सूचित करण्यासाठीसुद्धा वापरण्यात आलाय. हे पाप आपल्यामध्ये जन्मतः आहे. कारण ते आपल्याला वारशाने मिळालंय. त्यामुळे एखाद्या व्यक्‍तीने कुठलंही वाईट काम केलेलं नसलं, तरीही ती पापी असते.

b याकडेही लक्ष द्या, नीतिवचनं ७:७-२३ मधल्या तरुणाने अनैतिक लैंगिक कृत्यासारखा एक मोठा चुकीचा निर्णय घेण्याआधी काही छोटेछोटे चुकीचे निर्णय घेतले होते.

c चित्रांचं वर्णन: डावीकडे: एक तरुण भाऊ हॉटेलमध्ये दोन पुरुषांना हातात हात घेऊन बसलेले पाहतो. उजवीकडे: एक बहीण दोन जणांना सिगरेट ओढताना बघते.

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा