वॉचटावर ऑनलाइन लायब्ररी
वॉचटावर
ऑनलाइन लायब्ररी
मराठी
  • बायबल
  • प्रकाशने
  • सभा
  • w25 जून पृ. २-७
  • याकोबच्या भविष्यवाणीतून शिका—भाग १

या भागासाठी व्हिडिओ उपलब्ध नाही.

माफ करा. काही तांत्रिक कारणांमुळे व्हिडिओ चालू होऊ शकला नाही.

  • याकोबच्या भविष्यवाणीतून शिका—भाग १
  • टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • उपशिर्षक
  • मिळती जुळती माहिती
  • रऊबेन
  • शिमोन आणि लेवी
  • यहूदा
  • याकोबच्या भविष्यवाणीतून शिका—भाग २
    टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
  • कुटुंबाला वाचवण्यासाठी त्याने धाडस दाखवलं
    धैर्याने देवाची उपासना करत राहा!
  • याकोब आणि एसावचं भांडण मिटलं
    बायबलमधून शिकू या!
  • याकोबाचं मोठं कुटुंब
    बायबल कथांचं माझं पुस्तक
टेहळणी बुरूज यहोवाच्या राज्याचा प्रकाशक (अभ्यास)—२०२५
w25 जून पृ. २-७

अभ्यास लेख २४

गीत ९८ देवाच्या प्रेरणेने लिहिलेलं शास्त्र

याकोबच्या भविष्यवाणीतून शिका—भाग १

“सगळे एकत्र जमा म्हणजे पुढे तुमच्यासोबत काय होईल, हे मी तुम्हाला सांगीन.”—उत्प. ४९:१.

या लेखात:

याकोबने त्याच्या मृत्यूच्या आधी रऊबेन, शिमोन, लेवी आणि यहूदा यांच्या बाबतीत जी भविष्यवाणी केली होती तिच्यातून आपण काय शिकू शकतो ते पाहा.

१-२. आपल्याकडे फार कमी वेळ उरलाय हे जाणवल्यावर याकोबने काय केलं? आणि का? (चित्रसुद्धा पाहा.)

याकोब जेव्हा खूप म्हातारा होतो, तेव्हा तो आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत कनानहून इजिप्तला जातो. तो तिथे जवळपास १७ वर्षं यहोवाची विश्‍वासूपणे सेवा करत राहतो. (उत्प. ४७:२८) त्या वेळी आपल्या प्रिय मुलाला, योसेफला पुन्हा भेटून आणि आपल्या सगळ्या मुलांना एकत्र पाहून त्याला खूप आनंद होतो. पण आता त्याला जाणवतं, की त्याच्याकडे फार कमी वेळ उरलाय. म्हणून तो त्याच्या सर्व मुलांना एकत्र बोलवतो.—उत्प. ४९:२८.

२ त्या काळात एक कुटुंबप्रमुख आपल्या मृत्यूच्या आधी आपल्या संपूर्ण कुटुंबाला सूचना देण्यासाठी त्यांना एकत्र बोलवायचा. (यशा. ३८:१) त्यांना एकत्र बोलवून पुढचा कुटुंबप्रमुख कोण असेल याचीही सूचना तो त्यांना देत असावा.

याकोब मृत्यूआधी त्याच्या १२ मुलांबद्दल भविष्यवाणी करतोय (परिच्छेद १-२ पाहा)


३. उत्पत्ती ४९:१, २ प्रमाणे याकोबने जे म्हटलं ते इतकं महत्त्वाचं का होतं?

३ उत्पत्ती ४९:१, २ वाचा. याकोबने आपल्या कुटुंबाला फक्‍त सूचना देण्यासाठीच बोलवलं नव्हतं. तो एक संदेष्टा होता. आणि त्या वेळी तो यहोवाच्या प्रेरणेने आपल्या मुलांना त्यांच्या आणि त्यांच्या येणाऱ्‍या पिढ्यांच्या भविष्याबद्दल काही महत्त्वाच्या गोष्टी सांगणार होता.

४. याकोबच्या भविष्यवाणीचा अभ्यास केल्यामुळे आपल्याला काय फायदा होईल? (“याकोबचं कुटुंब” ही चौकटसुद्धा पाहा.)

४ याकोब त्याच्या चार मुलांना म्हणजेच रऊबेन, शिमोन, लेवी आणि यहूदा यांना काय म्हणाला, हे या लेखात आपण पाहणार आहोत. तसंच, पुढच्या लेखात याकोब त्याच्या बाकीच्या आठ मुलांना काय म्हणाला ते पाहणार आहोत. हे पाहत असताना आपल्या लक्षात येईल, की याकोबने फक्‍त आपल्या मुलांबद्दलच नाही, तर त्यांच्या येणाऱ्‍या पिढ्यांबद्दलही भविष्यवाणी केली. आणि याच पिढ्यांचं मिळून पुढे इस्राएलचं मोठं राष्ट्र बनणार होतं. या इस्राएल राष्ट्रासोबत काय घडलं याचा अभ्यास केल्यामुळे, याकोबची भविष्यवाणी कशी खरी ठरली हे आपल्याला कळेल. तसंच, आपल्याला स्वर्गातल्या आपल्या पित्याला यहोवाला कसं खूश करता येईल याबद्दलचे मौल्यवान धडेही आपल्याला शिकायला मिळतील.

या तक्त्यात याकोबची वंशावळ दाखवली आहे. त्याला दोन पत्नी आहेत. त्यांचं नाव लेआ आणि राहेल आहे आणि दोन उपपत्नीसुद्धा आहेत. त्यांचं नाव बिल्हा आणि जिल्पा आहे. याकोबला लेआपासून रऊबेन, शिमोन, लेवी, यहूदा, इस्साखार, जबुलून आणि दीना ही मुलं झाली. राहेलपासून त्याला योसेफ आणि बन्यामीन ही मुलं झाली. बिल्हापासून त्याला दान आणि नफताली ही मुलं झाली. आणि जिल्पापासून त्याला गाद आणि आशेर ही मुलं झाली.

रऊबेन

५. आपल्याला काय मिळेल असं रऊबेनला वाटलं असावं?

५ याकोब सगळ्यात आधी रऊबेनशी बोलतो. तो त्याला म्हणतो: “तू माझा प्रथमपुत्र आहेस.” (उत्प. ४९:३) प्रथमपुत्र किंवा पहिला मुलगा असल्यामुळे रऊबेनला वाटलं असेल, की त्याला त्याच्या पित्याच्या संपत्तीचा दुप्पट वाटा मिळेल. त्याला असंही वाटलं असेल, की त्याच्या पित्याच्या मृत्यूनंतर तोच कुटुंबप्रमुख बनेल आणि भविष्यात त्याची मुलं कुटुंबप्रमुख बनतील.

६. रऊबेनने प्रथमपुत्राचा हक्क का गमावला? (उत्पत्ती ४९:३, ४)

६ पण रऊबेनने त्याचा प्रथमपुत्र असण्याचा हक्क गमावला होता. (१ इति. ५:१) का बरं? राहेलच्या मृत्यूच्या काही काळानंतर रऊबेनने तिच्या दासीसोबत म्हणजेच बिल्हासोबत संबंध ठेवले होते. (उत्प. ३५:१९, २२) राहेलने याकोबला बिल्हा बायको म्हणून दिली होती. पण, रऊबेनने बिल्हासोबत संबंध का ठेवले असावेत. रऊबेन हा राहेलच्या बहिणीचा म्हणजेच लेआचा मुलगा होता. त्यामुळे त्याला कदाचित असं वाटलं असावं की संबंध ठेवल्यामुळे याकोब बिल्हाचा द्वेष करेल आणि त्याच्या आईवर जास्त प्रेम करेल. किंवा कदाचित रऊबेन बिल्हाकडे आकर्षित झाला असावा. आणि त्याला त्याच्या मनातल्या चुकीच्या विचारांवर ताबा ठेवता आला नसावा. कारण काहीही असलं, तरी रऊबेनने जे केलं होतं ते याकोबला अजिबात आवडलं नव्हतं. आणि ते यहोवालाही मुळीच आवडलं नाही.—उत्पत्ती ४९:३, ४ वाचा.

७. रऊबेन आणि त्याच्या वंशजांचं काय झालं? (“याकोबने मृत्यूआधी केलेली भविष्यवाणी” ही चौकटसुद्धा पाहा.)

७ याकोब रऊबेनला म्हटला: “तू श्रेष्ठ ठरणार नाहीस.” आणि हे शब्द खरे ठरले. रऊबेनच्या वंशातलं कोणीही राजा बनल्याचं, याजक बनल्याचं किंवा संदेष्टा बनल्याचं आपल्याला कुठेच वाचायला मिळत नाही. पण तरीही याकोबने आपल्या मुलाकडे पाठ फिरवली नाही. रऊबेनचे वंशज इस्राएल राष्ट्राचा भाग बनले. (यहो. १२:६) रऊबेनने ती चूक केली असली तरी इतर वेळी तो चांगला वागला आणि त्याने परत अनैतिक काम केल्याचं आपण बायबलमध्ये कुठेच वाचत नाही.—उत्प. ३७:२०-२२; ४२:३७.

याकोबने मृत्यूआधी केलेली भविष्यवाणी

रऊबेन.

मुलगा

रऊबेन

भविष्यवाणी

“तू श्रेष्ठ ठरणार नाहीस.”—उत्प. ४९:४.

पूर्णता

रऊबेनच्या वंशजांनी कधीच इस्राएलचं नेतृत्व केलं नाही.—१ इति. ५:१, २.

८. आपण रऊबेनच्या उदाहरणातून काय शिकू शकतो?

८ आपण काय शिकतो? आपण स्वतःमध्ये आत्मसंयमाचा गुण वाढवायला आणि अनैतिक लैंगिक कृत्यांपासून दूर राहायला मेहनत घेणं गरजेचं आहे. आपल्याला जर पाप करायचा मोह झालाच तर आपण थांबून विचार केला पाहिजे, की आपण जे करू त्यामुळे यहोवाला, आपल्या कुटुंबाला आणि इतरांना किती दुःख होईल. तसंच आपण हेसुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे, की “एखादा माणूस जे काही पेरतो, त्याचीच तो कापणीही करेल.” (गलती. ६:७) रऊबेनकडून आपण यहोवाच्या दयेबद्दलही खूप काही शिकू शकतो. आपल्या चुकांमुळे होणाऱ्‍या वाईट परिणामांपासून यहोवा आपल्याला वाचवत नसला, तरी आपण योग्य ते करण्यासाठी जी मेहनत घेतो त्यावर तो नक्की आशीर्वाद देतो.

शिमोन आणि लेवी

९. याकोब, शिमोन आणि लेवीवर का नाराज होता? (उत्पत्ती ४९:५-७)

९ उत्पत्ती ४९:५-७ वाचा. नंतर याकोब, शिमोन आणि लेवीशी बोलला. पण तो त्यांच्याशी जे काही बोलला त्यावरून तो त्यांच्यावर नाराज असल्याचं दिसून आलं. काही वर्षांपूर्वी, शखेम नावाच्या एका कनानी माणसाने याकोबच्या मुलीचा म्हणजे दीनाचा बलात्कार केला होता. साहजिकच, यामुळे याकोबच्या सगळ्या मुलांना खूप राग आला. पण शिमोन आणि लेवी यांना आपल्या रागावर नियंत्रण ठेवता आलं नाही. त्यांनी कट रचून शखेम आणि त्याच्या माणसांना सांगितलं की त्यांनी जर सुंता केली, तर ते त्यांचं काहीच नुकसान करणार नाही. शखेमच्या माणसांनी ते ऐकलं आणि तसं केलंही. पण सुंता केल्यामुळे वेदना होत असतानाच शिमोन आणि लेवीने “आपापली तलवार घेतली आणि शहरात जाऊन सर्व बेसावध पुरुषांची कत्तल केली.”—उत्प. ३४:२५-२९.

१०. शिमोन आणि लेवीच्या बाबतीत याकोबची भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (“याकोबने मृत्यूआधी केलेली भविष्यवाणी” ही चौकटसुद्धा पाहा.)

१० याकोबला त्याच्या या दोन मुलांची क्रूरता पाहून खूप राग आला. त्याने त्यांच्याबद्दल अशी भविष्यवाणी केली, की त्यांची संपूर्ण इस्राएलमध्ये पांगापांग होईल आणि ते विखुरले जातील. ही भविष्यवाणी २०० पेक्षा जास्त वर्षांनंतर म्हणजे इस्राएल राष्ट्र वचन दिलेल्या देशात गेल्यानंतर पूर्ण झाली. शिमोनच्या वंशजांना वारशात जी शहरं मिळाली होती, ती यहूदाच्या वंशाला मिळालेल्या क्षेत्रात दूरदूरच्या ठिकाणी विखुरली होती. (यहो. १९:१) आणि लेवीच्या वंशजांना मिळालेली ४८ शहरं संपूर्ण इस्राएलमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी विखुरली होती.—यहो. २१:४१.

याकोबने मृत्यूआधी केलेली भविष्यवाणी

शिमोन.

मुलगा

शिमोन

भविष्यवाणी

“मी याकोबच्या देशात त्यांची पांगापांग करीन.”—उत्प. ४९:७.

पूर्णता

शिमोनच्या वंशजांना वारशात जी शहरं मिळाली होती, ती यहूदाच्या वंशाला मिळालेल्या क्षेत्रात दूरदूरच्या ठिकाणी विखुरली होती.—यहो. १९:१-८.

लेवी.

मुलगा

लेवी

भविष्यवाणी

“[मी] इस्राएलच्या देशात त्यांना विखरून टाकीन.”—उत्प. ४९:७.

पूर्णता

लेवी वंश संपूर्ण इस्राएलमध्ये ४८ वेगवेगळ्या शहरांमध्ये विखुरला गेला.—यहो. २१:४१.

११. शिमोन आणि लेवी यांच्या वंशाने कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या?

११ शिमोन आणि लेवीने ज्या चुका केल्या होत्या त्या त्यांच्या वंशजांनी केल्या नाहीत. लेवीच्या वंशजांनी एकनिष्ठपणे खऱ्‍या उपासनेला पाठिंबा दिला. ज्या वेळी मोशेला सीनाय पर्वतावर यहोवाकडून नियमशास्त्र मिळालं, त्या वेळी बऱ्‍याच इस्राएली लोकांनी वासराची उपासना केली. पण लेवी वंशाने मात्र तसं करायला नकार दिला. तसंच, त्यांनी नंतर मोशेला ती मूर्ती नष्ट करायला मदत केली. (निर्ग. ३२:२६-२९) त्यामुळे यहोवाने याजक म्हणून सेवा करायचा बहुमान देऊन त्यांना वेगळं केलं. (निर्ग. ४०:१२-१५; गण. ३:११, १२) नंतर, वचन दिलेला देश काबीज करण्यासाठी शिमोनच्या वंशाने कनानी लोकांविरुद्ध लढण्यासाठी यहूदाच्या वंशाला मदत केली. आणि हे यहोवाच्या उद्देशाप्रमाणे होतं.—शास्ते १:३, १७.

१२. शिमोन आणि लेवीच्या उदाहरणातून आपण काय शिकू शकतो?

१२ आपण काय शिकतो? आपण आपल्या रागावर ताबा ठेवला पाहिजे. जर कोणी आपल्याशी किंवा आपल्या जवळच्या व्यक्‍तीशी चुकीचं वागलं असेल तर वाईट वाटणं साहजिकच आहे. (स्तो. ४:४) असं असलं तरी, आपण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवली पाहिजे. ती म्हणजे आपण रागाच्या भरात काही बोललो किंवा काही केलं तर ते यहोवाला मुळीच आवडणार नाही. (याको. १:२०) कधीकधी आपल्याला अन्यायाचा सामना करावा लागू शकतो; मग तो मंडळीतून असो किंवा मंडळी बाहेरून. असं झालं तरी आपण यहोवाला खूश करायचा प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे इतरांचं नुकसान होईल असं आपण काहीही बोलणार किंवा करणार नाही. (रोम. १२:१७, १९; १ पेत्र ३:९) तुमचे आईवडील जरी यहोवाला न आवडणाऱ्‍या गोष्टी करत असले, तरी तुम्ही यहोवाला आवडेल असं वागायचा निवडू शकता. तसंच, असाही विचार करू नका, की यहोवाला खूश करणं तुमच्यासाठी अशक्य आहे. लक्षात ठेवा, योग्य ते करण्यासाठी यहोवा तुम्हाला नक्की मदत करेल आणि त्यासाठी तो तुम्हाला नक्की आशीर्वाद देईल.

यहूदा

१३. यहूदाला कशामुळे चिंता वाटली असावी?

१३ नंतर, याकोब यहूदाशी बोलतो. याकोबने यहूदाच्या मोठ्या भावांना जे काही सांगतलं होतं, ते ऐकून कदाचित यहूदाला चिंता वाटली असावी. कारण त्यानेसुद्धा काही गंभीर चुका केल्या होत्या. असं दिसतं, की शखेमचं शहर लुटण्यात त्याचासुद्धा हात होता. (उत्प. ३४:२७) तसंच, आपल्या भावाला गुलाम म्हणून विकण्यात आणि आपल्या वडिलांना खोटं सांगण्यात त्याने त्याच्या भावांना मदत केली होती. (उत्प. ३७:३१-३३) नंतर त्याने त्याच्या सूनेसोबत, म्हणजे तामारसोबत ती वेश्‍या आहे असं समजून संबंध ठेवले.—उत्प. ३८:१५-१८.

१४. यहूदाने कोणत्या चांगल्या गोष्टी केल्या होत्या? (उत्पत्ती ४९:८, ९)

१४ असं असलं तरी देवाच्या प्रेरणेने, याकोबने यहूदाची फक्‍त प्रशंसाच केली आणि त्याला आशीर्वाद दिले. (उत्पत्ती ४९:८, ९ वाचा.) का बरं? कारण यहूदाने याकोबसाठी जे जे केलं त्यातून त्याची त्याच्या वयस्कर पित्याबद्दलची काळजी दिसून आली. तसंच, त्याचं त्याच्या धाकट्या भावावर बन्यामीनवर इतकं प्रेम होतं, की तो त्याच्यासाठी गुलाम बनायलाही तयार झाला.—उत्प. ४४:१८, ३०-३४.

१५. यहूदाच्या बाबतीत केलेली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली?

१५ याकोबने अशी भविष्यवाणी केली, की यहूदा त्याच्या सर्व भावांमध्ये पुढाकार घेईल. पण ही भविष्यवाणी जवळपास २०० वर्षांनंतर पूर्ण व्हायला सुरुवात होणार होती. ओसाड रानातून सगळ्यात आधी यहूदाचा वंश वचन दिलेल्या देशात गेला. (गण. १०:१४) इतकंच नाही तर, याच्या बऱ्‍याच शतकांनंतर यहूदाच्या वंशजांनी वचन दिलेला देश काबीज करण्यासाठी कनानी लोकांशी युद्ध करण्यात पुढाकार घेतला. (शास्ते १:१, २) तसंच, यहूदाच्या वंशातून आलेल्या बऱ्‍याच राजांपैकी दावीद हा पहिला होता. पण यहूदाच्या बाबतीत जी भविष्यवाणी केली होती, त्याची अजून मोठ्या प्रमाणावर पूर्णता व्हायची होती.

१६. उत्पत्ती ४९:१० मधली भविष्यवाणी कशी पूर्ण झाली? (“याकोबने मृत्यूआधी केलेली भविष्यवाणी” ही चौकटसुद्धा पाहा.)

१६ याकोबने असंसुद्धा म्हटलं, की यहूदा वंशातून एक शासक येईल. तो सगळ्या मानवांवर शासन करेल आणि त्याचं राज्य कधीही नाहीसं होणार नाही. (उत्पत्ती ४९:१० आणि तळटीप वाचा.) याकोबने या शासकाला शिलो म्हटलं. तो शासक येशू ख्रिस्त होता. येशूबद्दल एका स्वर्गदूताने असं म्हटलं: “यहोवा त्याला त्याच्या पित्याचं म्हणजे दावीदचं राजासन देईल.” (लूक १:३२, ३३) तसंच, येशूला ‘यहूदा वंशातला सिंहसुद्धा’ म्हटलंय.—प्रकटी. ५:५.

याकोबने मृत्यूआधी केलेली भविष्यवाणी

यहूदा.

मुलगा

यहूदा

भविष्यवाणी

“शिलो येईपर्यंत राजदंड यहूदाच्या हातून जाणार नाही.”—उत्प. ४९:१०.

पूर्णता

यहूदाच्या वंशातला येशू देवाच्या राज्याचा राजा बनला.—लूक १:३२, ३३.

१७. आपण यहोवासारखं कसं वागू शकतो?

१७ आपण काय शिकतो? यहूदाने काही गंभीर चुका केल्या असल्या, तरी यहोवाने त्याला आशीर्वाद दिला. पण ‘यहोवाने यहूदाला आशीर्वाद का दिला, त्याने त्याच्यात काय पाहिलं,’ असं त्याच्या भावांना वाटलं असावं का? त्यांना काय वाटलं असेल हे आपल्याला माहीत नाही, पण आपल्याला हे माहीत आहे की यहोवाने यहूदामध्ये नक्कीच चांगल्या गोष्टी पाहिल्या असतील आणि त्यामुळे त्याने त्याला आशीर्वाद दिला. मग आपण यहोवासारखं कसं वागू शकतो? जेव्हा एखाद्या भावाला किंवा बहिणीला काही विशेष बहुमान मिळतात, तेव्हा सगळ्यात आधी कदाचित आपलं त्यांच्या अपरिपूर्णतेकडे लक्ष जाईल. पण आपण नेहमी हे लक्षात ठेवलं पाहिजे, की यहोवाने नक्कीच त्यांच्यामध्ये चांगले गुण पाहिले असतील आणि त्यामुळे तो त्यांच्यावर खूश आहे. यहोवा नेहमी त्याच्या उपासकांमधल्या चांगल्याच गोष्टी पाहतो. आणि आपणसुद्धा तसंच करायचा प्रयत्न केला पाहिजे.

१८. आपण धीर का धरला पाहिजे?

१८ यहूदाकडून आपल्याला धीर धरण्याबद्दलही शिकायला मिळतं. यहोवा, दिलेलं वचन नेहमी पूर्ण करतो. पण दर वेळी तो आपल्याला हवं तसं किंवा हवं त्या वेळी त्याचं अभिवचन पूर्ण करत नाही. यहूदाच्या वंशजांनी लगेच देवाच्या लोकांचं नेतृत्व करायला सुरुवात केली नाही. याउलट यहोवाने ज्यांना त्यांचं नेतृत्व करायला निवडलं होतं, त्यांना त्यांनी प्रामाणिकपणे पाठिंबा दिला; मग तो लेवी वंशातला मोशे असो, एफ्राईम वंशातला यहोशवा असो किंवा मग बन्यामीन वंशातला शौल राजा असो. आपणसुद्धा आज यहोवा ज्यांना पुढाकार घेण्यासाठी नेमतो, त्यांना पाठिंबा दिला पाहिजे.—इब्री ६:१२.

१९. याकोबने त्याच्या मृत्यूच्या आधी केलेल्या भविष्यवाणीतून आपण यहोवाबद्दल काय शिकलो?

१९ याकोबने केलेल्या भविष्यवाणीतून आपण आतापर्यंत काय शिकलो? आपल्याला हे अगदी स्पष्ट झालं, की “माणूस जसं पाहतो तसं देव पाहत नाही.” (१ शमु. १६:७) यहोवा धीर धरतो आणि तो क्षमाशील आहे. तो वाईट वागणूक खपवून घेत नसला, तरी तो त्याच्या उपासकांकडून परिपूर्णतेची अपेक्षा करत नाही. जे गंभीर चुका करतात पण नंतर पश्‍चात्ताप करून चांगलं वागू लागतात, त्यांनासुद्धा यहोवा आशीर्वाद देतो. पुढच्या लेखात आपण याकोबने त्याच्या बाकीच्या आठ मुलांना काय म्हटलं ते पाहणार आहोत.

याकोबने त्याच्या मुलांच्या बाबतीत केलेल्या भविष्यवाणीतून आपण काय शिकतो?

  • रऊबेन.

  • शिमोन आणि लेवी.

  • यहूदा.

गीत १२४ कायम एकनिष्ठ राहू या!

    मराठी वॉचटावर लायब्ररी (१९७५-२०२६)
    लॉग आऊट
    लॉग इन
    • मराठी
    • शेअर करा
    • पसंती
    • Copyright © 2026 Watch Tower Bible and Tract Society of Pennsylvania
    • वापरण्याच्या अटी
    • खासगी धोरण
    • प्रायव्हसी सेटिंग
    • JW.ORG
    • लॉग इन
    शेअर करा