अभ्यास लेख १०
यहोवावरचं प्रेम आपल्याला बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित करतं
“मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?”—प्रे. कार्ये ८:३६.
गीत १० “हा मी आहे, मला पाठीव!”
सारांशa
१-२. प्रेषितांची कार्ये ८:२७-३१, ३५, ३६, ३८ या वचनांत उल्लेख केल्याप्रमाणे कूशी अधिकारी कोणत्या गोष्टीमुळे बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रेरित झाला?
तुम्हाला बाप्तिस्मा घेऊन ख्रिस्ताचा शिष्य बनायचं आहे का? यहोवाबद्दल प्रेम आणि कदर असल्यामुळे अनेक जणांना बाप्तिस्मा घ्यायची प्रेरणा मिळाली आहे. आता आपण एका कूशी अधिकाऱ्याच्या उदाहरणावर चर्चा करू या.
२ कूशी अधिकाऱ्याला शास्त्रवचनांतून समजलं की बाप्तिस्मा घेणं गरजेचं आहे आणि म्हणून त्याने लगेच पाऊल उचललं. (प्रे. कार्ये ८:२७-३१, ३५, ३६, ३८ वाचा.) हे पाऊल उचलण्यासाठी तो कोणत्या गोष्टीमुळे प्रेरित झाला? यात काहीच शंका नाही की त्याला देवाच्या वचनाची कदर होती. तो आपल्या रथात बसून यशया संदेष्ट्याच्या पुस्तकातला एक भाग वाचत होता. जेव्हा फिलिप्प त्या अधिकाऱ्याशी बोलला तेव्हा येशूने त्याच्यासाठी केलेल्या गोष्टींची त्याला कदर वाटली. पण तो अधिकारी यरुशलेमला का गेला होता? कारण त्याचं यहोवावर प्रेम होतं आणि म्हणून तो यरुशलेममध्ये यहोवाची उपासना करायला गेला होता. तो अधिकारी आधी वेगळा धर्म पाळायचा. पण आता तो खऱ्या देवाला समर्पित असलेल्या सेवकांसोबत त्याची उपासना करत होता. देवावरच्या याच प्रेमामुळे प्रेरित होऊन त्याने आणखी एक महत्त्वाचं पाऊल उचललं. त्याने बाप्तिस्मा घेतला आणि तो येशूचा शिष्य बनला.—मत्त. २८:१९.
३. बाप्तिस्मा घेण्यापासून कोणती गोष्ट एका व्यक्तीला रोखू शकते? (“तुमचं हृदय कोणत्या प्रकारची जमीन आहे?” ही चौकट पाहा)
३ यहोवावरच्या प्रेमामुळे तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रेरित होता. पण इतर गोष्टींवर किंवा व्यक्तींवर असलेलं प्रेम तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यापासून रोखू शकतं. ते कसं? काही उदाहरणांवर विचार करा. सत्यात नसलेल्या तुमच्या नातेवाइकांवर आणि मित्रांवर तुमचं मनापासून प्रेम असेल. आणि तुम्ही जर बाप्तिस्मा घेतला तर ते तुमचा द्वेष करतील अशी चिंता तुम्हाला वाटत असेल. (मत्त. १०:३७) किंवा देव ज्या गोष्टींची घृणा करतो त्या तुम्हाला आवडत असतील आणि त्या सोडणं तुम्हाला कठीण जात असेल. (स्तो. ९७:१०) किंवा, तुम्ही लहानपणापासून खोट्या धर्माशी संबंधित असलेले सण साजरे करत असाल. त्या सणांच्या चांगल्या आठवणींमुळे तुम्हाला आजही आनंद होत असेल आणि म्हणून तुम्हाला यहोवाला नापसंत असलेल्या प्रथा सोडणं कठीण जात असेल. (१ करिंथ. १०:२०, २१) मग अशा वेळी तुम्हाला स्वतःला प्रश्न विचारावा लागेल: “माझं कोणावर सर्वात जास्त प्रेम आहे?”
तुमचं सर्वात जास्त कोणावर प्रेम असलं पाहिजे?
४. तुम्ही बाप्तिस्मा घेण्याचं सर्वात महत्त्वाचं कारण काय असलं पाहिजे?
४ तुम्हाला बऱ्याच गोष्टींबद्दल प्रेम आणि कदर असेल. उदाहरणार्थ, साक्षीदारांसोबत अभ्यास सुरू करण्याआधी तुम्हाला बायबलबद्दल कदर वाटत असेल व येशूवरही तुमचं प्रेम असेल. आणि आता तुम्ही साक्षीदारांना ओळखत असल्यामुळे तुम्हाला त्यांच्यासोबत वेळ घालवायला आवडत असेल. पण या गोष्टींवरच्या प्रेमामुळे तुम्ही यहोवाला समर्पण करून बाप्तिस्मा घ्यायला प्रेरित व्हालच असं नाही. खरंतर यहोवावर असलेल्या प्रेमामुळे तुम्ही बाप्तिस्मा घेण्यासाठी प्रेरित व्हाल. तुमचं त्याच्यावर सर्वात जास्त प्रेम असेल तर कोणतीच गोष्ट किंवा व्यक्ती तुम्हाला त्याची सेवा करण्यापासून रोखू शकत नाही. यहोवावरचं प्रेम तुम्हाला बाप्तिस्मा घेण्यासाठी आणि त्यानंतरही त्याला विश्वासू राहण्यासाठी मदत करेल.
५. या लेखात तुम्हाला काय शिकायला मिळेल?
५ येशूने म्हटलं की आपण पूर्ण मनाने, जिवाने, बुद्धीने आणि शक्तीने यहोवावर प्रेम केलं पाहिजे. (मार्क १२:३०) तुम्ही पूर्ण मनाने यहोवावर प्रेम करायला आणि त्याची कदर करायला कसं शिकू शकता? यहोवाचं आपल्यावर किती प्रेम आहे यावर मनन केल्यामुळे आपणही त्याच्यावर प्रेम करायला लागतो. (१ योहा. ४:१९) यहोवावरचं प्रेम वाढवण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी केल्या पाहिजेत याबद्दल या लेखात आपल्याला शिकायला मिळेल.
६. रोमकर १:२० या वचनात सांगितल्याप्रमाणे यहोवाबद्दल जाणून घेण्याचा एक मार्ग कोणता आहे?
६ सृष्टीतून यहोवाबद्दल शिका. (रोमकर १:२० वाचा; प्रकटी. ४:११) यहोवाने बनवलेल्या झाडांकडे आणि प्राण्यांकडे पाहा. त्यांच्या रचनेवरून तो खूप बुद्धिमान असल्याचं तुम्हाला दिसून येईल. तसंच, तुमच्या शरीराची रचना किती अद्भुत रीतीने केली आहे याचाही जरा विचार करा. (स्तो. १३९:१४) इतकंच काय तर, यहोवाने सूर्याला किती अमाप उर्जा दिली आहे यावरही विचार करा. खरंतर सूर्यासारखे असंख्य तारे अस्तित्वात आहेत.b (यश. ४०:२६) तुम्ही जर यहोवाने बनवलेल्या सृष्टीचा विचार केला तर तुमची त्याच्याबद्दल असलेली कदर दिवसेंदिवस वाढत जाईल. यहोवा किती बुद्धिमान आणि शक्तिशाली आहे हे जाणून घेणं महत्त्वाचं आहे. पण त्याच्याबद्दल प्रेम वाढवायचं असेल आणि त्याच्यासोबत जवळची मैत्री करायची असेल तर आपल्याला त्याच्याबद्दल आणखी माहिती घ्यावी लागेल.
७. यहोवावर मनापासून प्रेम करण्यासाठी तुम्हाला कोणत्या गोष्टीची खातरी करून घेण्याची गरज आहे?
७ तुम्हाला या गोष्टीची खातरी असली पाहिजे की यहोवाला तुमची वैयक्तिक रीत्या काळजी आहे. स्वर्ग आणि पृथ्वीचा निर्माणकर्ता तुम्हाला वैयक्तिक रीत्या ओळखतो आणि त्याला तुमची काळजी आहे हे मान्य करणं तुम्हाला कठीण जातं का? असं असेल तर लक्षात असू द्या की यहोवा “आपल्यापैकी कोणापासूनही दूर नाही.” (प्रे. कार्ये १७:२६-२८) दावीदने शलमोनला म्हटलं “यहोवा सर्व अंतःकरणे शोधून पाहतो” आणि “जर तू त्याचा शोध करशील तर तो तुला सापडेल.” (१ इति. २८:९, पं. र. भा.) यहोवाही आपल्याला हेच आश्वासन देतो. खरंतर यहोवाने तुम्हाला त्याच्या “जवळ केले” म्हणूनच तुम्ही बायबल अभ्यास करत आहात. (यिर्म. ३१:३) यहोवाने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींची तुम्ही जितकी जास्त कदर कराल तितकं तुमचं त्याच्यावरचं प्रेम वाढेल.
८. तुमचं यहोवावर प्रेम आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?
८ यहोवाप्रमाणे आपलंही त्याच्यावर प्रेम आहे हे आपण त्याला प्रार्थना करण्याद्वारे दाखवू शकतो. तुम्ही जसजसं यहोवाला तुमच्या चिंता सांगाल आणि त्याने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींबद्दल त्याचे आभार मानाल तसतसं तुमचं त्याच्यावरचं प्रेम वाढत जाईल. यहोवा तुमच्या प्रार्थनेचं उत्तर कसं देतो हे जेव्हा तुम्हाला जाणवेल तेव्हा तुमचं त्याच्यासोबतचं नातं मजबूत होईल. (स्तो. ११६:१) तो तुम्हाला चांगल्या प्रकारे जाणतो याची तुम्हाला खातरी होईल. पण यहोवाच्या आणखी जवळ जाण्यासाठी तुम्ही हे समजून घेणं गरजेचं आहे की त्याला कोणत्या गोष्टी आवडतात आणि कोणत्या नाही. तसंच, एखादी गोष्ट तो विशिष्ट प्रकारे का करतो आणि तो तुमच्याकडून काय अपेक्षा करतो हेही तुम्ही माहीत करून घेतलं पाहिजे. ही सर्व माहिती मिळवण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्याच्या वचनाचा, बायबलचा अभ्यास करणं.
यहोवासोबत मैत्री करण्याचा आणि तो आपल्याकडून काय अपेक्षा करतो हे जाणून घेण्याचा सर्वात चांगला मार्ग म्हणजे बायबलचा अभ्यास करणं (परिच्छेद ९ पाहा)c
९. तुम्हाला देवाच्या वचनाची कदर आहे हे तुम्ही कसं दाखवू शकता?
९ देवाचं वचन, बायबल याची कदर करायला शिका. यहोवाबद्दलचं सत्य आणि त्याचा आपल्यासाठी काय उद्देश आहे याबद्दलची माहिती फक्त बायबलमध्येच दिली आहे. नियमितपणे बायबलचं वाचन करण्याद्वारे, साक्षीदारांसोबत बायबल अभ्यास करण्याआधी तयारी करण्याद्वारे आणि शिकलेल्या गोष्टी जीवनात लागू करण्याद्वारे तुम्ही हे दाखवू शकता की तुम्हाला देवाच्या वचनाची कदर आहे. (स्तो. ११९:९७, ९९; योहा. १७:१७) तुम्ही वैयक्तिक बायबल वाचनाचा आराखडा बनवला आहे का? आणि त्यानुसार तुम्ही बायबल वाचन करता का?
१०. बायबलबद्दलची एक खास गोष्ट कोणती आहे?
१० बायबलची एक खास गोष्ट म्हणजे त्यात येशूबद्दलच्या अशा घटनांचा उल्लेख आहे ज्या लोकांनी स्वतः पाहिल्या. हेच एक असं पुस्तक आहे ज्यात येशूने तुमच्यासाठी केलेल्या गोष्टींची अचूक माहिती दिली आहे. तुम्ही जेव्हा येशूचे शब्द आणि कार्यं यांबद्दल शिकाल तेव्हा तुम्हाला त्याच्याशी मैत्री करावीशी वाटेल.
११. तुम्ही यहोवावर प्रेम करायला कसं शिकू शकता?
११ येशूवर प्रेम करायला शिकल्यामुळे तुमचं यहोवावरचं प्रेम वाढेल. असं का? कारण येशूने त्याच्या पित्याच्या गुणांचं हुबेहूब अनुकरण केलं. (योहा. १४:९) तुम्ही येशूबद्दल जितकं शिकून घ्याल तितकं तुम्हाला यहोवाला चांगल्या प्रकारे जाणून घेता येईल आणि तुमची त्याच्याबद्दल असलेली कदर वाढेल. लोक ज्यांच्याकडे दुर्लक्ष करायचे अशा गरीब, आजारी आणि कमजोर लोकांना येशूने दाखवलेल्या दयेबद्दल विचार करा. तसंच येशूने दिलेल्या व्यावहारिक सल्ल्यांचा आणि ते जीवनात लागू केल्यामुळे होणाऱ्या फायद्यांचाही विचार करा.—मत्त. ५:१-११; ७:२४-२७.
१२. येशूबद्दल शिकल्यामुळे तुम्ही काय करायला प्रेरित व्हाल?
१२ आपल्याला पापांची क्षमा मिळावी यासाठी येशूने त्याचं जीवन बलिदान दिलं. याबद्दल खोलवर विचार केल्यामुळे तुमचं त्याच्यावरचं प्रेम नक्कीच वाढेल. (मत्त. २०:२८) येशू तुमच्यासाठी स्वतःचं जीवन द्यायला तयार होता हे जेव्हा तुम्हाला समजेल तेव्हा तुम्ही पश्चात्ताप करायला आणि यहोवाची क्षमा मिळवायला प्रेरित व्हाल. (प्रे. कार्ये ३:१९, २०; १ योहा. १:९) जितकं जास्त तुम्ही येशूवर आणि यहोवावर प्रेम कराल तितकं जास्त तुम्हाला अशा लोकांसोबत राहावसं वाटेल ज्यांचं त्या दोघांवर प्रेम आहे.
१३. यहोवाने तुम्हाला काय दिलं आहे?
१३ यहोवाच्या कुटुंबावर प्रेम करायला शिका. सत्यात नसलेल्या तुमच्या कुटुंबातल्या सदस्यांना आणि जुन्या मित्रांना कदाचित हे समजणार नाही की तुम्हाला यहोवाला तुमचं जीवन का समर्पित करायचं आहे. म्हणून ते कदाचित तुमचा विरोध करतील. पण यहोवाने तुम्हाला एक आध्यात्मिक कुटुंब दिलं आहे आणि त्याद्वारे तो तुम्हाला मदत करेल. तुम्ही जर भाऊबहिणींच्या जवळ राहिलात तर तुम्हाला प्रेम आणि आधार मिळेल. (मार्क १०:२९, ३०; इब्री १०:२४, २५) कालांतराने तुमच्या कुटुंबातले सदस्यही कदाचित तुमच्यासोबत यहोवाची सेवा करतील आणि त्याच्या स्तरांनुसार जगतील.—१ पेत्र २:१२.
१४. १ योहान ५:३ या वचनात सांगितल्यानुसार तुम्हाला यहोवाच्या स्तरांबद्दल काय जाणवलं आहे?
१४ यहोवाच्या स्तरांची कदर करायला आणि ते जीवनात लागू करायला शिका. यहोवाला ओळखण्याआधी तुम्ही कदाचित स्वतःचे काही स्तर ठरवले असतील पण आता तुम्हाला जाणवलं असेल की यहोवाचे स्तर त्यांपेक्षा चांगले आहेत. (स्तो. १:१-३; १ योहान ५:३ वाचा.) बायबलमध्ये पती, पत्नी, आईवडील आणि मुलं यांच्यासाठी दिलेल्या सल्ल्यांचा विचार करा. (इफिस. ५:२२–६:४) या सल्ल्यांचं तुमच्या कुटुंबात पालन केल्यामुळे तुमचं कुटुंब आधीपेक्षा आनंदी झालं आहे का? तुमचे मित्र कसे असले पाहिजेत याबद्दल यहोवाने दिलेल्या सल्ल्यांचं पालन केल्यामुळे तुमच्या सवयी सुधारल्या आहेत का? तुम्ही एक आनंदी व्यक्ती बनला आहात का? (नीति. १३:२०; १ करिंथ. १५:३३) नक्कीच तुम्ही या प्रश्नांचं उत्तर ‘हो’ असं द्याल.
१५. तुम्हाला जर बायबल तत्त्वांनुसार जगायचं असेल तर तुम्ही कुठून मदत मिळवू शकता?
१५ तुम्ही शिकत असलेली बायबल तत्त्वं जीवनात कशी लागू करायची हे समजून घेणं कधीकधी तुम्हाला कठीण जाऊ शकतं. आणि म्हणून यहोवा त्याच्या संघटनेद्वारे बायबल आधारित प्रकाशनं पुरवतो. यामुळे चांगलं व वाईट यांतला फरक ओळखण्यासाठी तुम्हाला मदत होऊ शकते. (इब्री ५:१३, १४) जेव्हा तुम्ही ही प्रकाशनं वाचता आणि त्यांचा अभ्यास करता तेव्हा तुम्ही पाहू शकाल की त्यांत दिलेला सल्ला किती व्यावहारिक आहे. तसंच, त्यांत जीवनातल्या महत्त्वाच्या विषयांवर विशिष्ट मार्गदर्शन दिलं आहे. या अभ्यासामुळे तुम्हाला यहोवाच्या संघटनेचा भाग बनण्याची नक्कीच इच्छा होईल.
१६. यहोवाने त्याच्या लोकांना कसं संघटित केलं आहे?
१६ यहोवाच्या संघटनेवर प्रेम करायला आणि तिला सहकार्य करायला शिका. यहोवाने त्याच्या लोकांना मंडळ्यांमध्ये संघटित केलं आहे आणि त्याचा मुलगा येशू हा ख्रिस्ती मंडळ्यांचा मस्तक आहे. (इफिस. १:२२; ५:२३) आज आपलं काम पूर्ण करण्यासाठी येशूने अभिषिक्त जनांच्या एका लहान गटाला संघटनेत पुढाकार घेण्यासाठी नेमलं आहे. या गटाला येशूने “विश्वासू आणि बुद्धिमान दास” म्हटलं आहे. तुम्हाला आध्यात्मिक अन्न पुरवण्याची आणि देवासोबतचं तुमचं नातं टिकून ठेवण्याची जबाबदारी ते गंभीरतेने हाताळतात. (मत्त. २४:४५-४७) तसंच, योग्य पात्रता असलेल्या बांधवांना वडील म्हणून नियुक्त केलं जाईल या गोष्टीचीसुद्धा ते काळजी घेतात. (यश. ३२:१, २; इब्री १३:१७; १ पेत्र ५:२, ३) ते तुमच्यासाठी शक्य तितकं करायचा, तुम्हाला सांत्वन द्यायचा आणि यहोवासोबतचं तुमचं नातं घनिष्ठ राहावं यासाठी तुम्हाला मदत करायचा प्रयत्न करतात. पण त्यासोबतच ते आणखी एका महत्त्वाच्या कामात, म्हणजे ते तुम्हाला यहोवाबद्दल इतरांना शिकवायला मदत करू शकतात.—इफिस. ४:११-१३.
१७. रोमकर १०:१०, १३, १४ या वचनांनुसार आपण यहोवाबद्दल इतरांना का शिकवतो?
१७ यहोवावर प्रेम करता यावं यासाठी इतरांना मदत करा. येशूने त्याच्या अनुयायांना सांगितलं की त्यांनी इतरांना यहोवाबद्दल शिकवावं. (मत्त. २८:१९, २०) तुम्ही कदाचित ही आज्ञा कर्तव्य म्हणून पाळाल. पण जसजसं तुमचं यहोवावरचं प्रेम वाढेल तसतसं तुम्हालाही प्रेषित पेत्र आणि योहान यांच्यासारखंच वाटेल. त्यांनी म्हटलं: “ज्या गोष्टी आम्ही पाहिल्या व ऐकल्या आहेत त्यांबद्दल बोलायचं आम्ही थांबवू शकत नाही.” (प्रे. कार्ये ४:२०) एखाद्या व्यक्तीला यहोवाच्या जवळ येण्यासाठी मदत केल्यामुळे तुम्हाला खूप आनंद होईल. कल्पना करा, फिलिप्पने जेव्हा त्या कुशी व्यक्तीला शास्त्रवचनातलं सत्यं समजण्यासाठी आणि बाप्तिस्मा घेण्यासाठी मदत केली, तेव्हा त्याला किती आनंद झाला असेल! फिलिप्पचं अनुकरण करून आणि प्रचारकार्याबद्दल येशूने दिलेल्या आज्ञेचं पालन करून तुम्ही दाखवून देता की तुम्हाला एक यहोवाचा साक्षीदार बनण्याची इच्छा आहे. (रोमकर १०:१०, १३, १४ वाचा.) आणि असं जेव्हा तुम्हाला वाटेल तेव्हा तुम्हीही त्या कुशी व्यक्तीप्रमाणे विचाराल: “मला बाप्तिस्मा घ्यायला काय हरकत आहे?”—प्रे. कार्ये ८:३६.
१८. पुढच्या लेखात कोणत्या प्रश्नांवर चर्चा केली जाईल?
१८ बाप्तिस्मा घेणं हा तुमच्या जीवनातला सर्वात महत्त्वाचा निर्णय असेल. हा खरोखर एक गंभीर निर्णय आहे. त्यामुळे बाप्तिस्मा घेण्याआधीच त्याचा नेमका काय अर्थ होतो हे तुम्ही समजून घेणं गरजेचं आहे. बाप्तिस्म्याबद्दल तुम्हाला काय माहीत असलं पाहिजे? बाप्तिस्म्याच्या आधी आणि नंतर तुम्ही काय करण्याची गरज आहे? या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला पुढच्या लेखात मिळतील.
गीत १ यहोवाचे गुण
a यहोवाबद्दल प्रेम असलेल्या काही जणांच्या मनात अशी शंका येते की त्यांनी बाप्तिस्मा घेऊन साक्षीदार बनावं की नाही. तुम्हालाही जर असं वाटत असेल तर या लेखामुळे तुम्हाला अशी काही व्यावहारिक पावलं उचलता येतील ज्यांमुळे तुम्हाला बाप्तिस्मा घेण्याची प्रेरणा मिळेल.
b आणखी उदाहरणं पाहण्यासाठी वॉझ लाईफ क्रिएटेड? आणि जीवसृष्टीची सुरुवात—विचार करण्यासारखे पाच प्रश्न ही माहितीपत्रकं पाहा.
c चित्राचं वर्णन: एक बहीण खरेदी करताना एका तरुण मुलीला पत्रिका देत आहे.