परिणामकारक पुनर्भेटींकरता चांगली तयारी करणे आवश्यक
१. सुरुवातीच्या ख्रिस्ती सेवाकार्याचा व्याप कशा प्रकारे वाढणार होता?
१ येशूने आपल्या शिष्यांना ‘राज्याच्या सुवार्तेचे’ उत्तम प्रचारक होण्याकरता चांगल्या प्रकारे तयार केले. (मत्त. ४:२३; ९:३५) पण हे प्रशिक्षण पॅलेस्टाईनच्या मर्यादित क्षेत्रातच देण्यात आले होते. स्वर्गात जाण्याअगोदर मात्र, येशूने शिष्यांना स्पष्टपणे सांगितले की कालांतराने ख्रिस्ती सेवाकार्याचा व्याप इतका वाढेल की “सर्व राष्ट्रांतील लोकांस शिष्य” बनवले जाईल.—मत्त. २८:१९, २०.
२. ‘शिष्य बनवण्याच्या’ येशूने दिलेल्या आज्ञेचे पालन करण्याकरता काय करणे गरजेचे आहे?
२ शिष्य बनवण्याकरता, ज्या व्यक्तींनी देवाच्या राज्याच्या सुवार्तेबद्दल आवड व्यक्त केली त्यांच्याकडे परत जाऊन त्यांना ख्रिस्ताने आज्ञा दिलेल्या सर्व गोष्टी पाळायला शिकवणे गरजेचे आहे. आणि अशा परिणामकारक पुनर्भेटींकरता चांगली तयारी करणे अत्यावश्यक आहे.
३. तुम्ही पहिल्या भेटीतच पुनर्भेटीची व्यवस्था कशी करू शकता?
३ आधीपासूनच व्यवस्था करा: काही प्रचारक पहिल्या भेटीतच घरमालकाचा निरोप घेण्याअगोदर त्यांच्यापुढे एक प्रश्न ठेवतात आणि त्या प्रश्नाच्या उत्तरावर चर्चा करण्याकरता आम्ही पुन्हा येऊ असे सांगतात. पुनर्भेटीत बायबल काय शिकवते या पुस्तकातील माहिती दाखवल्यामुळे लगेच बायबल अभ्यास सुरू करता येतो असे अनेकांना आढळले आहे.
४. पुनर्भेट देण्याकरता टेहळणी बुरूजचा नवीन अंक येईपर्यंत थांबण्याची गरज का नाही?
४ टेहळणी बुरूजची सार्वजनिक आवृत्ती दर तीन महिन्यांनी निघते. पण पुनर्भेट देण्याकरता नवीन अंक येईपर्यंत थांबण्याची गरज नाही. घरमालकाला दिलेल्या अंकातूनच निरनिराळ्या लेखांतील माहितीच्या साहाय्याने आपण त्यांची आस्था वाढवण्याचा प्रयत्न करू शकतो. आपल्या क्षेत्रात विरोध होत असल्यामुळे आणि कट्टर धार्मिक विश्वास बाळगणारे लोक असल्यामुळे आपण पुनर्भेटीला जातो तेव्हा आजूबाजूच्या परिस्थितीचे भान ठेवले पाहिजे व सावध असले पाहिजे.
५. डोळ्यांपुढे एखादे उद्दिष्ट ठेवल्याने कोणता फायदा होतो?
५ डोळ्यांपुढे एखादे उद्दिष्ट ठेवा: घरमालकाकडे पुन्हा जाण्याअगोदर त्यांच्याविषयी तुम्ही घेतलेल्या नोंदी वाचा आणि त्यांची पुन्हा भेट घेताना तुम्हाला नेमके काय साध्य करायचे आहे हे ठरवून घ्या. उदाहरणार्थ, पहिल्या भेटीत दिलेल्या प्रकाशनातील एखाद्या मुद्यावर चर्चा करण्याचे तुमचे ध्येय असू शकते. किंवा, आधीच्या संभाषणाशी संबंधित असणारे दुसरे साहित्य त्यांना देण्याचे तुम्ही ठरवू शकता. जर मागच्या भेटीत तुम्ही त्यांच्यासमोर एखादा प्रश्न ठेवला असेल तर त्या प्रश्नाचे उत्तर देणे हे नक्कीच तुमच्या उद्दिष्टात समाविष्ट असेल. प्रश्नाचे उत्तर देताना तो मुद्दा सिद्ध करणारे एखादे वचन सरळ बायबलमधून वाचून दाखवण्याचा प्रयत्न करा.
६. पुनर्भेट घेण्याचा आपला उद्देश कोणता आहे?
६ आपले उद्दिष्ट: अर्थात, आपले उद्दिष्ट हे बायबल अभ्यास सुरू करण्याचे आहे. एका बांधवाने एका मनुष्याला पुनर्भेट देताना बायबल अभ्यासाविषयी विचारले पण त्याने नकार दिला. बांधवाने मग पुढच्या वेळी अलीकडची मासिके नेली व म्हटले, “आम्ही लोकांची भेट घेऊन त्यांना बायबलमधून एका प्रश्नाचे उत्तर देत आहोत.” त्या मनुष्याचा अभिप्राय विचारल्यावर बांधवाने एक वचन वाचून दाखवले आणि बायबल अभ्यासांकरता वापरल्या जाणाऱ्या एका प्रकाशनातून संबंधित परिच्छेद वाचून दाखवला. अशा रीतीने नियमित बायबल अभ्यास सुरू झाला.
७. चांगली तयारी केल्यामुळे तुम्हाला बायबल अभ्यास सुरू करण्यास कशा प्रकारे मदत मिळाली?
७ पुनर्भेटींकरता चांगली तयारी केल्यास अतिशय चांगले परिणाम मिळू शकतात. यामुळे प्रचार कार्यातील आपला आनंद तर द्विगुणित होतोच, पण त्यासोबतच आपल्याला एखाद्या “योग्य मनोवृत्तीच्या” व्यक्तीला जीवनाच्या मार्गावर येण्यास मदत करण्याची सुवर्णसंधीही लाभू शकते.—प्रे. कृत्ये १३:४८, NW.